जागतिक कीर्तीचे क्रीडा मानसतज्ज्ञ व सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी भीष्मराज बाम यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक क्रीडापटूंना घडवले. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत या त्यातील एक. त्यांच्या माध्यमातूनच महिलांसाठी हे क्षेत्र खुलं झालं. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत देशाचं त्यांनी यशस्वी प्रतिनिधित्व केलं. अंजली यांनी आपल्या गुरूला वाहिलेली आदरांजली..
नेमबाजीची ओळख बाम सरांमुळे झाली. आम्ही एनसीसी कॅडेट होतो. गंमत म्हणून या खेळाकडे पाहायचो. गांभीर्य नव्हते. रायफल हाताळायला मिळेल या हेतूने जायचो. त्यांनी आमच्यातले गुण हेरले. त्यांच्यामध्ये ती क्षमता होती. धाडस होतं. स्वप्न पाहण्याची दृष्टी होती. या मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेईन हा त्यांना आत्मविश्वास होता. परिस्थिती एवढी खराब होती की पायाभूत सुविधा नव्हत्या. साधनं नव्हती तरी त्यांनी हार मानली नाही आणि आमच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या या निर्णयाचं आश्चर्य वाटतं. त्यांनी या क्षेत्राला वाहून घेतलं होतं. ते फक्त प्रशिक्षक किंवा सल्लागार नव्हते. अनेकदा त्यांनी स्वखर्चाने आम्हाला स्पर्धाना पाठवलं. मॅचचं शुल्क भरलं. आमच्यासाठी कुठे प्रायोजकत्व मिळतंय का हे पाहायचे. त्यांना मिळणाऱ्या अम्युनिशन आम्हाला वापरू द्यायचे. आम्हाला उपकरणं मिळत आहेत का हे पाहायचे. याबाबत ते सदैव जागरूक असत. जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलो तेव्हा गडबडून गेलो. पण तीही माणसं आहेत, तुम्हीही सर्वोत्तम खेळाडूला हरवू शकता हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवलं. त्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहेत. एवढाच फरक आहे. त्या तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही त्यांच्याहून जास्त चांगला खेळ करू शकाल. हा आशावाद त्यांनी दिला. त्यातूनच आम्हाला स्फुरण मिळत असे. त्यांच्यामुळे आम्ही या क्षेत्रात आलो, स्थिरावलो. ते नसते तर महाराष्ट्रात नेमबाजीचा खेळ या पातळीपर्यंत पोहोचला असता.
त्यांच्या पहिल्या भेटीचा क्षण आजही आठवतो. एनसीसीच्या मॅडम सोबत होत्या. तेव्हा बाम सर महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष होते. पोलीस खात्यात आयजी पदावर कार्यरत होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व भारावून टाकणारं होतं. आपण कोणत्या तरी मोठय़ा माणसाला भेटतोय असं आम्हाला वाटलेलं. त्यांना नुसतं पाहूनच अनोखी ऊर्जा मिळाली होती. ज्ञानी, विद्वान माणसाला भेटतोय याची जाणीव झाली. मात्र साचेबद्ध पोलिसी खाक्या नव्हता. एक अतिशय शांत, स्थिर असा त्यांचा चेहरा होता. प्रभावी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी पहिल्या भेटीतही आमच्याशी छान संवाद साधला होता. त्यानंतर वडीलकीचं नातं निर्माण झालं. माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान आईवडिलांइतकंच आहे. आईवडिलांनी आमचं संगोपन केलं. भक्कम आधार दिला. बाम सरांनी या खेळाची ओळख करून दिली. आम्हाला बोट धरून चालायला शिकवलं. आमची तंत्रकौशल्यं घोटीव करून घेतली. आम्हाला मानसिकदृष्टय़ा कणखर केलं. नेमबाज म्हणून ओळख दिली. आम्ही पाचजणी नेमबाजी शिकणाऱ्या पहिल्याच मुली होतो. त्यामुळे आम्हाला त्यांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाची संधी मिळाली. आता हजारो नेमबाज देशाच्या कानाकोपऱ्यात घडत असतात. आता संघटक आणि खेळाडू यांचं नातं तयार होणं कठीण आहे. मर्यादित जग होतं. त्यामुळे सहवासाची संधी मिळाली.
१९८८ मध्ये मानसिकता आणि खेळ यांचा परस्पर संबंध आहे याविषयी काहीच जागरूकता नव्हती. तेव्हा त्यांनी मानसिकतेसंदर्भात काम करायला सुरुवात केली होती. ते द्रष्टे होते. सुरुवातीला आम्हालाही मानसिक प्रशिक्षणाचा कंटाळा यायचा. पण त्यांनी ही कौशल्यं घोटून घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना त्यांच्या कार्याची महती पटली. आम्ही खेळायला सुरुवात केली. तेव्हा मुली या क्षेत्रात नव्हत्या. पालकांना काही माहिती असणं अपेक्षित नव्हतं. बाम सरांचा आमच्या प्रत्येकीच्या पालकांशी वैयक्तिक संवाद होता. आपली मुलगी सरांकडे शिकतेय म्हटल्यावर पालक निर्धास्त असायचे. त्यांना खेळाविषयी माहिती द्यायचे. बारकावे समजून सांगायचे. खेळाडूची मन:स्थिती काय असते याविषयी सांगायचे. सतत प्रोत्साहन द्यायचे. तुमची मुलगी नेमबाज म्हणून चांगली करतेय यापेक्षाही एक चांगली माणूस म्हणून घडते आहे असा विश्वास द्यायचे. चांगलं माणूस म्हणून वावरू शकते हा विश्वास आमच्यावर ठेवला. आईवडिलांनी बाम सरांना बघितल्यावर तेही भारावून गेले. बाम सर आधारवड होता. ते गेल्याने पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं.
मार्गदर्शनासाठी वरळी नेमबाजी केंद्रात ते आम्हाला पहाटे चार वाजता बोलवायचे. आम्हाला ते आवडायचं नाही. इतक्या पहाटे कारण ९ वाजता त्यांना कार्यालयात जायचं असायचं. ४ ते ६ आम्हाला मार्गदर्शन करायचे. त्यांना दमलेलं पाहिलेलं नाही. पोलीस विभागाची खडतर नोकरी सांभाळून ते आम्हाला प्रशिक्षण द्यायचे. संध्याकाळी पुन्हा एक फेरी असायची. शिष्यांच्या प्रगतीसाठी ते अविरत मेहनत घ्यायचे. आध्यात्मिक बैठक होती. ज्ञानेश्वरी त्यांना पाठ होती, तुकारामांचा अभ्यास होता. पुराणातले असंख्य श्लोक मुखोद्गत होते. वाचन दांडगं होतं. केवळ खेळाडूंना नव्हे तर विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना मदत करायचे. त्यांचं समाजाप्रती योगदान प्रचंड होतं. सरकारला काय करायचं ते करू दे. मी माझं काम करत राहणार. त्यांचा क्लासच वेगळा होता. पोलीस क्षेत्रात त्यांना मान होता. गुन्हेगाराकडून गुन्हा कबूल करणं, त्याचं मन परिवर्तन यासाठी ते समुपदेशन करत. अनेक कुख्यात गुन्हेगारांकडून त्यांनी शिताफीने गुन्हे कबूल करून घेतले आहेत. त्या काळी अंडरवर्ल्डचं प्रस्थ होतं. एकाच वेळी दोन भिन्न स्वरूपाच्या जबाबदाऱ्या पेलत होते. कारकीर्दीत अनेकदा चढउतार आले. अनेकदा नैराश्य ग्रासून टाकायचं. कसून तयारी होती, पण प्रत्यक्ष सामन्यात सुमार कामगिरी झाली असं व्हायचं. हे सगळं कशाला करतोय असं वाटायचं. ओरडायचे वगैरे नाहीत. त्यांचं एखादं वाक्यच दिशादर्शक ठरायचं. मीही प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आहे.
आजही नवीन मुलांना मानसिक कणखरतेसाठी नाशिकचा पत्ता देते. बाम सरांची एखादी भेटही दृष्टिकोन पालटवू शकते. बाम सर नि:स्पृह भावनेतून हे करत होते. ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ या प्रतिष्ठेच्या मुकाबल्यासाठी मी पात्र ठरले. हे काय असतं मला ठाऊकही नव्हतं. पुरुष तसेच महिला यांचा एकत्रित सामना असतो. खूप दडपण आलेलं. त्या वेळी बाम सरांचा चेहरा आठवला.
जर्मनीहून त्यांना फोन केला. दोन-तीन वाक्यांत त्यांनी काय करायला हवं हे सांगितलं आणि मन शांत झालं. सरकारने त्यांना नावं ठेवली, नेमबाजी संघटनेने विरोध केला पण त्यांना नाउमेद झालेलं मी पाहिलेलं नाही. ते फक्त हसायचे. आपल्या कामाद्वारे सळो की पळो करून सोडायचं हे त्यांचं तत्त्व होतं. आताच्या ध्येयधोरणांवर ते नाखूश होते. आपण खूप काही करू शकतो. पण आपण वेगच पकडत नाही असं त्यांना वाटायचं. ‘लोकसत्ता’साठी त्यांना लेख लिहायचा होता. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी फोन केलेला. त्यांचा एवढा अनुभव असतानाही त्यांनी माझ्याशी चर्चा केली. लेख सर्वसमावेशक व्हावा यासाठी अनेक पैलू अभ्यासले. जे काम करायचं ते शंभर टक्के जीव ओतून ही त्यांची कार्यपद्धती होती. छोटय़ा अकादमींना सरकारचा पाठिंबा मिळायला हवा, प्रशिक्षक तयार करण्यासाठी योजना हवी असं त्यांचं मत होतं. घरच्यांचा पुरेपूर पाठिंबा असल्याने त्यांनी अथक कार्याचा वसा घेतला होता. चालतंबोलतं विद्यापीठ म्हणावं अशा व्यक्ती दुर्मीळ असतात. बाम सर असे होते.
ते जेव्हाही भेटायचे तेव्हा डोक्यावर हात ठेवायचे. आशीर्वादाचा तो स्पर्श बळ द्यायचा. सरांची शिकवण पुढच्या पिढीकडे संक्रमित करणं ही आमच्यावरची जबाबदारी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.
(शब्दांकन – पराग फाटक)