उच्चशिक्षितांना ‘मेट्रो लाइफ’ खुणावत असतानाच्या आजच्या काळात एमबीए झालेला एक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्या गावी थेट शेतीच्या कामात स्वत:ला झोकून देतो. तो म्हणतो, ‘शेतीकडे उद्योग म्हणून पाहायला हवे. नावीन्यपूर्ण संकल्पना शेतीत राबवल्यास शेतीतून निश्चितपणे फायदा मिळू शकतो. पण मेहनत घेण्याची तयारी हवी’.

विवेक प्रकाश बोदडे. मूळ अमरावतीकर. दिल्ली विद्यापीठातून एम.बीए.चे शिक्षण. चार वष्रे खासगी कंपन्यांमध्ये नोकरी. पण, नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याची आंतरिक इच्छा. शेतीचे फारसे ज्ञान नाही. पण, एकदा मित्राचे एक वाक्य त्याचे आयुष्य बदलून टाकणारे ठरते. विवेक बोदडे सांगतात, ‘वडिलांना पोल्ट्री फार्म उभारण्याच्या वेळी मदत करण्यासाठी गावी आलो, तेव्हा शेतात जात होतो. बांधकाम कसे होते, हे केवळ दुरून पाहत होतो. त्यावेळी त्याचे पंजाबमध्ये राहणाऱ्या एका मित्रासोबत बोलणे झाले. त्याच्याकडे ३० एकर शेतीत गहू पिकवला जातो. तो शेतीत कुटुंबीयांची मदतही करीत होता. तो म्हणाला, तुझ्याकडे शेती आहे, तरी दिवसभर नुसता बसून राहतोस. शेतीत लक्ष का देत नाही. मित्राचे हे वाक्य मनाला लागले. मनाशी निर्धार केला आणि शेतीत लक्ष देण्याचे ठरवले.

शेतात सिंचनाची सुविधा आहे, पण गेल्या वर्षीपर्यंत पाटातूनच पाणी दिले जात होते. यात पाण्याचा अपव्यय होतो, हे लक्षात आले. लगेच ठिबक सिंचन संच बसवण्याचा निर्णय घेतला. वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. मिश्र शेतीतून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल, याचा अभ्यास सुरू आहे. ‘महाफिड फर्टिलायझर्स’चे विक्री व्यवस्थापक प्रकाश सुंदरकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. ठिबक सिंचनापासून ते शेतीतील विविध प्रयोगांविषयी आपण ऑनलाइन माहिती घेतली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. बाजारातील स्थिती पाहिली. पहिले वर्ष समाधानकारक ठरले. त्यातून निश्चितपणे आत्मविश्वास वाढला. आता पूर्णपणे शेतीतच लक्ष देण्याचे ठरवले आहे. प्रकाश बोदडे यांची नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पिंपरी गावंडा-बोदडे येथे शेती आहे. त्यांना नोकरीमुळे शेतीकडे लक्ष देणे शक्य होत नव्हते. शेती मक्त्याने लागवडीसाठी देण्याकडे त्यांचा कल होता. पण, आता तेही पूर्णवेळ शेती पाहताहेत. प्रकाश बोदडे सांगतात, ‘तांत्रिक पद्धतीने शेती करण्याचे फायदे आहेत. पहिल्या वर्षी अडीच एकरात टरबुजांची लागवड केली. ६० टन टरबुजांचे उत्पादन झाले. तीन महिन्यात दोन लाख रुपये मिळाले. त्यानंतर खरबूज आणि टरबूज असे मिश्र पीक घेतले. त्यात आर्थिक फायदा झाला नाही, पण खर्च भरून निघाला. टरबुजांसाठी मल्चिंगचा वापर केला होता, त्याचा या खरीप हंगामात कपाशीसाठी वापर केला. ५ जूनला कपाशी पेरली. आता फूल पात्यावर आली आहे. पीक चांगले आले आहे. एकरी २० क्विंटल उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या भागात मिरचीची लागवड केली आहे. पहिला तोडा  झाला. सध्या चांगला दर मिळतो आहे. मिरचीच्या लागवडीतून २०० क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज आहे. १० रुपये किलो भाव जरी मिळाला, तरी २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. एका भागात वेगळ्या प्रकारच्या थाई लिंबूची लागवड केली आहे. शेजारीच शेवगा आहे. या झाडांचा फायदा पोल्ट्री थंड ठेवण्यासाठी नैसर्गिकरीत्या होऊ शकेल. इतर भागात ज्वारी, मूग आहे. हळदीचीही लागवड केली आहे. १५ एकरावर ठिबक सिंचनाची सोय आहे.

शेती करताना प्रयोगशीलता नेहमीच नवनवीन अनुभव देऊन जाते. गेल्या वर्षी मल्चिंगचा प्रयोग करून त्यांनी टरबुजाचे पीक घेतले. त्याचाच वापर यंदा त्यांनी कपाशीसाठी केला. गेल्या वर्षीही पारंपरिक पिके होतीच. पण, वेगळे काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. शेतीला जोड म्हणून कुक्कुटपालनाचा उद्योग त्यांनी सुरू केला. त्यातूनही त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडतच आहे. प्रकाश बोदडे यांची शेती दुष्काळग्रस्त भागातली. पण, त्यांनी शेतात सिंचनाची सोय करून घेतली. त्यांच्या मते, शेतीतून हमखास उत्पन्न मिळू शकते, पण प्रयोगशीलता हवी. कमी कालावधीची पिके घ्यायला हवी. दोन-चार एकरांमध्ये प्रयोग करायला हरकत नाही. आपल्या अनुभवांविषयी ते सांगतात. एकाच पिकावर अवलंबून राहणे योग्य नाही. शेतकऱ्यांनी आपल्या शक्तीनुसार शेतीत प्रयोग केले पाहिजेत. तेही छोटय़ा स्वरूपात. अनुभवांमधूनच शिकता येते. एखाद्या पिकातून नुकसान झाले, तर दुसऱ्या पिकातून ते भरून काढता येऊ शकते. शेती सुधारणा ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आधी रस्ताच नव्हता. लोकसहभागातून पांधन रस्त्यांची प्राथमिक कामे झाल्यास सरकारकडून रस्ता तयार करून मिळू शकतो, याची माहिती मिळाली होती. आम्ही आठ-दहा शेतकऱ्यांनी कच्चा रस्ता तयार केला. सरकारच्या मदतीची वाट पाहिली. पण, रस्ता तयार झाला नाही. अखेर आम्हीच कर्ज काढून शेतापर्यंत पक्का रस्ता तयार केला. त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना झाला आहे. आधुनिक काळाशी सुसंगत अशी शेती करणे आवश्यक आहे. शेतातच पोल्ट्री फार्म तयार झाला आहे. आता गोट फार्म उभारायचा आहे. दालमिल उभारण्यासाठी जागा खरेदी केली आहे. माझी दोन्ही उच्चशिक्षित मुले संकल्प आणि विवेक शेतीच्या विकासात आपले योगदान देत आहेत.

एकीकडे, शेती फायद्याची नाही, अशी ओरड सुरू असताना व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या तरुणांनाही शेतीची आव्हाने खुणावू लागली आहेत. काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची त्यांची तयारी आहे. त्यातूनच इतरांनाही आता प्रेरणा मिळू लागली आहे.

Story img Loader