शाळा म्हटल्याबरोबर आपोआप पोट दुखायला सुरुवात व्हायची. शाळेची वेळ झाली की आरडाओरड, रडारड सुरू असे. अशावेळी एखाद्या हिंस्र प्राण्याला धरून पिंजऱ्यात नेऊन अडकवावं तशी माझी मोठी बहीण मला शाळेत नेऊन सोडायची. त्यामुळं शाळेला सुट्टी असली की शंभर नंबरी आनंद व्हायचा. सुट्टी मिळवण्यासाठी आम्ही कारणं शोधतच असायचो.
लहानपणी शाळा ही माझ्या शत्रुपक्षात होती. मला शाळा मुळीच आवडायची नाही. म्हणजे ते वर्गात बसून फळ्याकडं बघत राहणं मोठं त्रासाचं वाटायचं. वरती पुन्हा शिक्षकांचा वेगळाच दरारा. चांगले बेशरमीच्या फोकानं बदडून काढायचे. गणिताचे सर तर नंबर एकचे मारकुटे. (त्यांचंच काहीतरी गणित चुकलेलं असावं.) म्हणून शाळा म्हटल्याबरोबर आपोआप पोट दुखायला सुरुवात व्हायची. शाळेची वेळ झाली की आरडाओरड, रडारड सुरू असे. अशावेळी एखाद्या हिंस्र प्राण्याला धरून पिंजऱ्यात नेऊन अडकवावं तशी माझी मोठी बहीण मला शाळेत नेऊन सोडायची. त्यामुळं शाळेला सुट्टी असली की शंभर नंबरी आनंद व्हायचा. सुट्टी मिळवण्यासाठी आम्ही कारणं शोधतच असायचो. गाव छोटंसं होतं. सगळ्यांच्या घरात वीजसुद्धा नव्हती. शाळेत दोन-तीन दिवसांनी शिळा पेपर यायचा. गावात एकूण दोन-तीन रेडिओ होते. त्यापैकी एक आमच्या वाडय़ात- म्हणजे सीताराम आप्पाकडे होता. सीताराम आप्पा मोठे सावकार. त्यांच्या बैठकीत धान्याचे पोते रचलेले. त्याच बैठकीत एका कोनाडय़ात भलामोठा रेडिओ होता. विजेवर चालणारा हा रेडिओ. बटन सुरू केल्यानंतर प्रथम रेडिओमध्ये लाईट लागायचा, नंतर आवाज यायचा. एका रविवारी सकाळी असाच रेडिओ लावलेला होता. वाडय़ातली आम्ही पोरं धान्याच्या पोत्यावर बसून लक्षपूर्वक ऐकत होतो. धान्यातले बारीक किडे पायावर चढून वळवळत होते. तेवढय़ात एक धमाल गाणं सुरू झालं..
‘सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय..’
हे बालगीत मी ऐकतच राहिलो. या गीताची भन्नाट चाल, त्यातील ‘गुबूगुबू’ ध्वनी.. यापेक्षाही मला त्या शब्दांचा अर्थ कळला आणि आवडलाही होता. शाळेला सुट्टी मिळवण्यासाठीची भावना या बालगीतात होती. कुणीतरी माझ्यावतीनं प्रथमच गाण्यातून बोलत होतं. त्यामुळं हे बालगीत माझं आवडतं झालं. मूल होऊन मुलांसाठी लिहिलेल्या या बालगीताचे कवी होते मंगेश पाडगांवकर! ही पाडगांवकरांची पहिली भेट. नंतर पाडगांवकर प्रत्येक टप्प्यावर भेटतच गेले.
त्याकाळी दूरचित्रवाणीचा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळं रेडिओचा मोठा प्रभाव होता. (कलावंत लोक तेव्हा स्वत:च्या नावासमोर चक्क ‘रेडिओस्टार’ असं लिहायचे.) रेडिओवर बारमाही गाणी लागायची. त्यातली प्रेमभावना व्यक्त करणारी मधाळ मराठी गाणी पाडगांवकरांचीच होती. यशवंत देवांच्या संगीतात अरुण दातेंचा आवाज झोपाळ्यावाचून झुलण्याची अवस्था उजागर करायचा. कॉलेजात गेल्यावर ‘सलाम’सारखी अध:पतनाविरुद्ध प्रखर विद्रोह प्रकट करणारी कविता पाडगांवकरांच्या तोंडून प्रथम ऐकली तेव्हा वाचिक अभिनयाचा अर्थ खाडकन् कळला. मुळात पाडगांवकर, बापट, नारायण सुर्वे, महानोर, बोरकर आणि करंदीकरांनी मराठी रसिकांचा कवितेसाठी कान तयार केला. पाडगांवकरांनी नुस्ती कविता लिहिली नाही, तर मन:पूर्वक रसिकांपर्यंत ती पोहचवलीही. नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम यांची मौखिक परंपरा पाडगांवकरांनी पुढे चालविली. कवितेतील आशयाबद्दल चर्चा होऊ शकते; आणि झालीही. पण कविता चांगल्या पद्धतीने सादर करण्याकडे प्रमाद म्हणूनच पाहिले जाऊ लागले. अशा काळातही पाडगांवकर स्वत:ची कविता स्वत:च्या पद्धतीने लिहीत राहिले आणि सादरही करीत राहिले.
पाडगांवकरांच्या कवितेत निसर्गाबरोबरच प्रेमभावनाही ठळक आहे. बालकविता, सामाजिक कविता, प्रेमकविता, विनोदी, उपहासिका, भावगीत, भक्तिपर कविता अशी विविध प्रकारची कविता त्यांनी निष्ठेनं लिहिली. कवितेत अनेक प्रयोग केले. ‘बोलगाणी’सारख्या त्यांच्या प्रयोगावर टीकाही झाली. पण सर्वसामान्य रसिकांच्या ओठावर ही बोलगाणी रुळली. पाडगांवकरांची फार चर्चेत न आलेली एक ‘भाववीणा’ नावाची ध्वनिफीत आहे. तीत वीणा सहस्रबुद्धे यांच्या आवाजातले शब्द आणि श्रीनिवास खळ्यांचं संगीत आहे. सगळ्या वाताहातीनंतरही पाडगांवकर म्हणतात,
‘अजुनी फुले फुलतात ना
हे रंगही खुलतात ना
धुमसून का जळतात हे
अजुनी मने जुळतात ना
अजुनी मनातील स्पंदने
माझी तुला कळतात ना..’
प्रेमकवितेच्या अल्लड अवस्थेनंतरही आपली समजूत काढायला पाडगांवकर सोबत असतातच. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा कवी आपली साथ करीत जातो. आस्वादाच्या पातळीवर रसिकांचीही अभिरुची बदलू शकते. म्हणून कुणाचं श्रेय नाकारता कामा नये. त्या- त्या टप्प्यावर, त्या- त्या साहित्यकृतीनं आपल्याला श्रीमंत केलेलं असतं.. आपल्याला आधार दिलेला असतो. त्यामुळं कृतज्ञता म्हणून सलाम तर करायलाच हवा.
dasoovaidya@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा