मी स्वत: तिसरीपर्यंत कराड तालुक्यातील घोणशी या गावी मराठी शाळेत शिकलो. नंतर शिक्षणासाठी भाईंदरला आलो. तेथील अभिनव विद्यामंदिरात मराठी माध्यमात प्रवेश घेतला. शाळा नावाजलेली. तिथे मिळणारे शिक्षणही उत्तम. मी दहावीला ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो आणि अकरावीला विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आतापर्यंतचे सर्व शिक्षण मराठीत झाले असल्याने तिथले इंग्रजी डोक्यावरून जायचे. वाटायचे, ‘कशाला आम्हाला मराठीत घातलं?’ काहीच समजत नव्हते. मी तेव्हाच विचार केला, की जी चूक आपल्या पालकांनी केली ती आपण नाही करायची. आपल्याला मुलं होतील तेव्हा त्यांना इंग्रजीतच टाकायचे. मिठीबाईतील इंग्रजी वातावरणाचा व्हायचा तोच परिणाम झाला. मी अकरावीला गणित व इंग्रजीमध्ये नापास झालो.

पुढे तेरावीसाठी भाईंदर येथील नव्यानेच उघडलेल्या शंकर नारायण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माझ्या विचारसरणीत हळूहळू बदल घडू लागला. मी बारावीपर्यंत कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता. मात्र तेरावीपासून नाटक, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत भाग घेऊ  लागलो. बीकॉमच्या शेवटच्या वर्षी वादविवाद स्पर्धेत मी प्रथम पारितोषिक मिळविले. स्पर्धेचा विषय होता- शिक्षणाचं माध्यम मराठी की इंग्रजी?

ज्या काळात मराठी माध्यमाची विद्यार्थी गळती सुरू झाली, अगदी त्याच वेळी मी माझी मुलगी स्वरा हिला मराठी माध्यमात प्रवेश घेतला. माझ्या या निर्णयावर अनेक जणांच्या भुवया उंचावल्या. माझी पत्नीही थोडी नाराज झाली. परंतु मी तिला योग्य रीतीने पटवून दिले. ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेत स्वरा जाते. शिशुवर्गापासूनच ती शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊ  लागली. आता ती सातवीत आहे. दरवर्षी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके मिळवीत आहे. स्वत:चा अभ्यास स्वत:च करायची सवय आम्ही तिला लहानपणापासूनच लावली. आज अनेक इंग्रजी शाळेतील बहुतेक पाल्यांचा अभ्यास, विविध प्रकारचे प्रकल्प त्यांचे पालकच करत असतात. माझी मुलगी स्वत:चा अभ्यास स्वत:च करते.

इंग्रजी भाषा शिकणे व इंग्रजी माध्यमातून शिकणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे आजच्या आधुनिक पालकांना समजायला हवे. स्वराचे इंग्रजी उत्तम होण्यासाठी तिला खास इंग्रजीसाठी वेगळी वैयक्तिक शिकवणी लावली आहे.

स्वराला मराठी शाळेत घातल्यामुळे व अभ्यासाचा विशेष ताण नसल्याने आम्ही तिला अनेक वैचारिक, सांगीतिक कार्यक्रमांना घेऊन जाऊ  शकतो. तिला वाचनाचीही गोडी लागली आहे. ती स्वत:हूनच तिच्या शाळेतील वाचनालयाची सभासद झाली आहे, तेही पाचवीला असतानाच. या सर्व गोष्टींमुळेच तिचा सर्वागीण विकास होत आहे. जे नातेवाईक व माझे मित्र-मैत्रिणी माझ्याकडे कुत्सितपणे पाहात होते, की मी स्वराला मराठीत घातले, आज तेच सर्व जण तिचे कौतुक करताना हातचे राखत नाहीत.

मरतड बाजीराव औघडे, भाईंदर

 

दोन्ही मुली मराठी माध्यमातच..

आ म्ही उभयता इंजिनीअर. दोघांचेही शिक्षण मराठी माध्यमातून झाले. माझे पती आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. आम्हाला दोन मुली आहेत. मोठय़ा मुलीच्या शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्वत्र इंग्रजी माध्यमाचे वर्चस्व होते. नातेवाईकांची, शेजारची, मैत्रिणींची मुले इंग्रजी माध्यमात शिकत होती. आम्हाला आमच्या मुलीला मराठी माध्यमात घालायचे होते. पण केवळ आमच्या मतासाठी प्रवाहाविरुद्ध जायचे, की प्रवाहाबरोबर जाऊन मुलीवर बालवयातच इंग्रजीचा भार लादायचा असे द्वंद्व सुरू होते. मला मुलीवर अभ्यासाचा ताण येऊ  द्यायचा नव्हता. ती जे काही शिकेल, ते तिने मनापासून, आनंदाने शिकावे असे वाटत होते. त्यामुळे आम्ही तिला विक्रोळीतील विकास हायस्कूलच्या मराठी माध्यमात घातले. त्या शाळेतून ती उत्तम गुणांनी दहावी झाली. आता ती बारावीत आहे. महाविद्यालयात गेल्यावरही तिला इंग्रजी भाषेचा अडसर आला नाही. धाकटय़ा मुलीच्या शाळा प्रवेशाच्या आधीपासूनच माझ्या हितचिंतकांचे सल्ले सुरू झाले होते, की आता हिला तरी इंग्रजी माध्यमात घाला. मी त्या सर्वाना स्पष्ट  सांगितले, माझी मोठी मुलगी मराठी माध्यमात शिकत आहे. तिच्या प्रगतीबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे धाकटय़ा मुलीलाही मराठी माध्यमात घालणार. ती आता त्याच शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे.

‘मातृभाषेतून शिक्षण’ हा आमचा निर्णय अगदी योग्य होता, हे आमच्या मुली सिद्ध करत आहेत. अवाढव्य फी भरून, मुले आणि पालक सतत अभ्यासाच्या तणावाखाली असण्यापेक्षा हसतखेळत, कृतिशील उपक्रमांमधून, पालकांच्या खिशाला अधिभार न देता मातृभाषेतून म्हणजेच मराठी माध्यमातून शिक्षणाचा मी पुरस्कार करते.

ज्योती वैभव देशमुख, विक्रोळी (मुंबई)

 

आमचाही खारीचा वाटा..

आम्ही ‘शार्दूल’ला मराठी शाळेत पाठवायचे ठरवले तेव्हा बऱ्याच जणांनी आम्हाला मूर्खात काढले. ‘तुम्ही दोघेही कमावणारे आहात. तरीही तुम्हाला इंग्रजी माध्यमाची शाळा परवडत नाही का?’ असेही विचारले. पण ‘मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण अधिक योग्य आहे’ या विचारावर आम्ही दोघे व आमच्या दोघांचे आईवडीलही ठाम होते.

आमचे सर्वाचेच १०वीपर्यंत शिक्षण मराठी माध्यमातून झाले. मी स्वत: मराठी शाळेत शिक्षिका आहे व गणित, विज्ञान या विषयांबरोबर इंग्रजीही व्यवस्थित शिकवू शकते, याचा मला अभिमान आहे. एक शिक्षिका म्हणून मला असे जाणवते, की आजच्या काळात मराठी शाळांमध्ये जागरूक पालकांची मुले नाहीत म्हणून शाळांची चांगली प्रसिद्धी होत नाही व चांगली प्रसिद्धी नसल्यामुळे जागरूक पालक मुले पाठवत नाहीत. हे दुष्टचक्र भेदले गेले पाहिजे. ‘आधी केले मग संगितले’ या उक्तीप्रमाणे, हे चक्र भेदण्यातील हा आमचा खारीचा वाटा.

आमचा शार्दूल गिरगावातील चिकित्सक समूह पोतदार प्राथमिक शाळेत चौथीत शिकतो. शाळेत तो खूप लवकर रमला. तेथील सर्व उपक्रमांत तो हौसेने सहभागी होतो.  संस्कृत, इंग्रजीसाठी विशेष मार्गदर्शन अगदी बालवाडीपासून केले जाते. शाळेत ई-लर्निग तर होतेच पण कृतीयुक्त शिक्षणही छान होते.  सध्या तरी आम्ही समाधानी आहोत.

मुग्धा राजेश जोशी, गिरगाव (मुंबई)

 

मराठी माध्यमाची कसली अडचण?

कराड तालुक्यातील शिरगावचा मी रहिवासी. माझे वडील हणमंतराव मोहिते हे रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत शिकले. वडिलांचे इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व होते. माझा आणि भावंडांचाही इंग्रजीकडे कल होता. मात्र आम्ही सारी भावंडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच शिकलो. पुढे वकिली व्यवसायासाठी पुन्हा साताऱ्याला परतलो. माझी पत्नीही उच्चशिक्षित आहे. तोवर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ खूपच वाढले होते. माझी मुले सई, तनुजा आणि हर्षवर्धन यांच्या शिक्षणास सुरुवात झाली, त्या वेळी स्वाभाविकच मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याविषयी घरातील तसेच नातलग आग्रह करत होते. मात्र आम्ही मुलांना मराठी माध्यमातच शिकवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुली प्रथम नूतन मराठी शाळा, कराड येथे व त्यानंतर मुली शेठ रामविलास लाहोटी कन्या प्रशाला, कराडच्या विद्यार्थिनी झाल्या. मोठी मुलगी सई दहावीमध्ये संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवण्यात यशस्वी झाली. धाकटी कन्या तनुजा हिनेही उत्तम यश संपादन केले. मुलगा हर्षवर्धन हाही नूतन मराठी शाळेचा विद्यार्थी होता. साताऱ्यातील सैनिक शाळेची प्रवेश परीक्षा त्याने मराठी माध्यमातूनच दिली. त्यात तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. मराठी माध्यमाची अडचण त्याला पुढच्या सीबीएसईच्या प्रवासात यत्किंचितही आली नाही. बारावीनंतर त्याची निवड भारतीय नाविक दलात अधिकारीपदी झाली आहे. आजमितीस हर्षवर्धन याचे प्रशिक्षण केरळमध्ये  सुरू असून, डिसेंबर २०१८ मध्ये तो सैन्यदलात रुजू होईल. सई पर्यावरणशास्त्रात सुवर्णपदकासह एमटेक झाली, तर छोटी कन्या तनुजा विशेष गुणवत्तेसह एमफार्म उत्तीर्ण झाली. तिन्ही मुले सफाईदारपणे इंग्रजी भाषा बोलतात, वाचतात, लिहितात. त्यांना मराठी माध्यमातून शिकल्याची किंचितही अडचण जाणवत नाही.

संभाजीराव मोहिते, कराड

 

मराठी शाळांवर इंग्रजीचे आक्रमण.. इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल.. ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण.. कोणत्याही मराठी माणसाचे मन विषण्ण करणारे हे मथळे.

पण यात बदल होत आहे. मराठी शाळांकडे पालकांचा कल वाढू लागल्याच्या सुखद बातम्या आता येऊ लागल्या आहेत. हे प्रमाण तुलनेने कमी असेल. चांगल्या मराठी शाळांची संख्या कदाचित कमी असेल. परंतु, गेल्या काही वर्षांत त्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. यातून दिसतो तो पालकांचा मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेच्या योग्यतेवरील विश्वास आणि प्रवाहाविरोधात जाण्याचे धाडस. असेच ‘धैर्य’ दाखविणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे मनोगत गेल्या रविवारी प्रसिद्ध केले होते.

मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या मनाचा, उत्तम भवितव्याचा विचार करणारे असे पालक आज समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करीत आहेत. मराठीच्या नावाने केवळ अभिमान गीते गात हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा हे पालक जे करीत आहेत ते नक्कीच अधिक मोलाचे आहे.. आणि म्हणूनच आजच्या शैक्षणिक आंग्लाईच्या काळात असे करणाऱ्या पालकांच्या या विचारकथा समाजासमोर येणे आवश्यक आहे. कारण अखेर अशा पालकांना नैतिक बळ देतानाच, त्यांचे विचारविश्व एकमेकांशी जोडले जाणेही महत्त्वाचे आहे. त्यात अधिक सकारात्मकता आहे.

आपण असे पालक असाल, तर आपणास आपल्या मुलास मराठी शाळेत का घालावेसे वाटले, तसेच त्या शाळेचा अनुभव आम्हांस जरूर कळवा. आज ज्यांची मुले शाळेत शिकत आहेत अशा पालकांनीच आपले अनुभव पाठवावेत.

सोबत आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, तसेच मराठी शाळेचे नाव आणि त्या शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुला-मुलीसोबतचे छायाचित्रही पाठवा. यातील निवडक पत्रांना ‘लोकसत्ता’तून प्रसिद्धी दिली जाईल.

loksatta@expressindia.com

ई-मेलच्या विषयामध्ये – ‘माझी शाळा मराठी’साठी असे आवर्जून नमूद करा.

Story img Loader