‘‘काय हा मूर्खपणा, स्वत:ला अतिशहाणे समजतात’’, यासारखे अनेक शेरे नजरेआड करून आम्ही आमचे म्हणणे खरे केले. मुक्ताला मराठी माध्यमात घातले. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे यासाठी आम्ही दोघेही आग्रही होतो. मुक्ताचे अवांतर वाचन, विषय समजून घेणे व स्वत:च्या शब्दात मांडणे हे निव्वळ मातृभाषेतून शिकत असल्यामुळे सुकर झाले. घरातील संवादाची जी भाषा आहे तीच खरी शिकण्याची भाषा असावी. तरच मूलभूत संकल्पना स्पष्ट होतात. पालकांनीही माध्यमाचा बागुलबुवा मनात न आणता मुलांना मराठीत शिकवले पाहिजे. शेवटी यशाचा मार्ग हा ज्ञान व आत्मविश्वासातून जातो. मुक्ता आता सहाव्या इयत्तेत शिकत आहे. मातृभाषेतून शिकल्यामुळे मुक्ता पाठय़पुस्तकांबरोबर अनेक पुस्तके वाचते. विविध विषयांतील ज्ञान तिला प्राप्त होत असते. इंग्रजी भाषा सुद्धा हळूहळू आत्मसात करते आहे. आमची दुसरी मुलगी- राधासुद्धा मुक्ताप्रमाणेच कोकण एज्युकेशन सोसायटीच्या वामन गोपाल गाडगीळ प्राथमिक शाळेत मराठी माध्यमात दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. मला सर्वात मोठा फायदा हा दिसतो की ठरावीक इयत्तेनंतर मुले स्वत:च अभ्यास करू शकतात. अभ्यास तुलनेने लवकर होतो, खेळ व छंदासाठी वेळ मिळू शकतो. वाचनासारखा छंद जोपासता येतो. – शलाका राहुल वारंगे, महाड, जि रायगड
संकल्पना स्पष्ट होतात
मुलींनी हसतखेळत शिक्षण घ्यावे असे पहिल्यापासून आम्हाला वाटत होते. हे केवळ मातृभाषेतूनच शक्य आहे, यावर आमचा दोघांचा विश्वास होता. घरातूनही त्याला पाठिंबा होता. मराठीतून शिकल्यामुळे विषयाचे आकलन चटकन होते. शिक्षक शिकवत असतानाच संकल्पना स्पष्ट होतात. उगाचच भारंभार स्पेल्िंाग पाठ करावी लागत नाहीत. मराठी शाळेसाठी मालाड सोडून गोरेगावला आम्ही राहायला आलो. आम्हाला वर्गात बाक नसलेली, ताईंची शाळा (बाई नव्हे) म्हणून डोसीबाई जीजीभॉय बालविहार फारच भावली. उर्वी, नेहा या दोन्ही मुलींना तेथेच घातले. प्राथमिक शाळेतही अभ्यासाचा ताण नव्हता. पालकांना करायला लावणारी प्रोजेक्ट नव्हती. आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करायला लावणारे छोटे प्रकल्प होते. विविध ठिकाणी भेटी दिल्यामुळे दोघींचीही जिज्ञासा वाढली. मुख्य म्हणजे त्या विचार करायला लागल्या. इंग्रजी शिबिरांनी त्यांच्यात आत्मविश्वास आला. इंग्रजीची आवड निर्माण झाली. एवढंच नव्हे तर मराठी शाळेत जाऊनही त्या दोघी परदेशी भाषा शिकत आहेत. आमची धाकटी नेहा सध्या चौथीत शिकत आहे. ती सगळ्या गोष्टीत हिरिरीने भाग घेते आहे. ती वर्गाचे नेतृत्वही करत आहे. मुलींनी हसतखेळत शिक्षण घेण्यासाठी मराठी शाळेत घालण्याचा आमचा निर्णय योग्यच होता हे मुलींनी दाखवून दिले. – विद्या रानडे, गोरेगाव
उत्तम शाळा, सजग पालक हे महत्त्वाचे
माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि साहजिकच मुलीला कोणत्या माध्यमात घालायचे याबद्दल चर्चा सुरू झाली. मी स्वत: मराठी माध्यमातूनच शिकले होते, पण आमचे मित्रमैत्रिणी आता इंग्रजी माध्यमातच मुलांना घालत होते. पण माझ्या नवऱ्याने आणि घरातल्या सगळ्यांनीच मुलांना बालमोहन विद्या मंदिरमध्येच घालणे कसे इष्ट आहे हे पटवून दिले. मनातून थोडी धाकधूक होती, की माझी मुले इतरांमध्ये बावरतील, मागे पडतील. पण असे काहीही होणार नाही असा नवऱ्याने दिलेला विश्वास आणि त्यांच्या अभ्यासाची त्याने उचललेली जबाबदारी यामुळे मोठय़ा संज्योतचे आणि तिच्या पाठोपाठ आलेल्या सुरभीचे मराठी माध्यमातून शिक्षण सुरू झाले..
मुले मातृभाषेतून शिकतात तेव्हा त्यांच्या विचार करण्याचे आणि व्यक्त होण्याचे माध्यम एकच असल्याने ती अधिक सहजतेने व्यक्त होऊ शकतात असे मला वाटते. अर्थात आम्हाला मिळालेली शाळा ही एक वेगळीच देणगी होती. मराठी वाचनाची हल्लीच्या काळात दुर्मीळ झालेली सवय त्यांना लागली. मराठीतून बोलणे सोपे वाटल्याने शालेय स्तरावरच्या वक्तृत्व स्पर्धा, श्लोकांच्या स्पर्धा या सगळ्यात त्यांनी आवडीने भाग घेतला. अर्थात या बरोबरीने त्यांच्या इंग्रजी व्याकरणावर घेतलेली मेहनत नजरेआड करून चालणार नाही. जगात बाहेर पडल्यावर बोलण्यात किंवा लिहिण्यात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत.
उत्तम शाळा, दर्जेदार शिक्षक मिळणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी सजग असणे या गोष्टी असतील, तर शिक्षणाचे माध्यम मराठी असले तरी काहीच फरक पडत नाही. – नीलिमा माधव देशमुख, दादर
मराठी शाळेसाठीच पुण्यात आलो..
माझ्या दोन्ही मुली, कु. सौम्या, वय वर्षे ७ व कु. संहिता, वय वर्षे ५. या पुणे येथील मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत. मी स्वत: वैद्य आहे आणि माझे यजमान इंजिनीयर आहेत. आम्ही दोघेही मराठी माध्यमामध्ये शिकलेलो आहोत. शालेय शिक्षण हे मातृभाषेतच झाले पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. यजमानांच्या नोकरीनिमित्ताने आम्ही काही वर्षे महाराष्ट्राच्या बाहेर होतो. त्यामुळे नाइलाजास्तव प्रथम मोठय़ा मुलीला तिथल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले. पण नंतर मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात राहायचा निर्णय घेतला. गोळवलकर शाळेत घालण्याचे ठरविले. या शाळेत गेल्यावर माझ्या मुलींमध्ये मला खूप सकारात्मक बदल जाणवला. आपली भाषा, आपले सण, आपले संस्कार या सगळ्यांमुळे शाळेबद्दल जो आपलेपणा वाटायला हवा तो, इथेच जाणवला. त्या स्वत: इतरांना मातृभाषेत शिक्षण किती आवश्यक आणि उपयुक्त आहे, हे सांगतात. मातृभाषेत प्राथमिक शिक्षण झाल्याने विषयाचे आकलन, वाक्चातुर्य इ. गोष्टी लवकर विकसित होतात, असे माझे मत आहे. – डॉ. उल्का फडके, पुणे
विषय पटकन समजतो
माझा मुलगा चि. परीस याचे शिक्षण पार्ले टिळक मराठी माध्यमातून झाले. आम्ही दोघेही मराठी माध्यमातून शिकलो. घरात आणि शाळेत मराठी भाषा असल्याने मुलांचा गोंधळ उडत नाही. विषय पटकन समजतो. त्याचा अनुभव आम्हाला आला. माझ्या मुलाला ४ थी व ७ वीची शिष्यवृत्ती मिळाली. ५ वी व ८ वीत गणित प्रावीण्य प्राज्ञ, सहावीत होमी भाभा यंग सायन्टिस्टचे सुवर्णपदक मिळाले. तसेच त्याने बालनाटय़ात काम केले. शाळेतील वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत तसेच मराठी श्लोकांच्या स्पर्धा यात त्याने बक्षिसे मिळवली. शाळेच्या विहिरीवर पोहायला शिकला, तबल्याच्या चार परीक्षा दिल्या. हसतखेळत १० वीचा अभ्यास करून तो चांगल्या गुणांनी पास झाला. – वर्षां मुळ्ये, मुंबई</strong>
शिक्षणाव्यतिरिक्त अन्य ज्ञानही मिळते
माझा मुलगा भूषणचं शाळेत जाण्याचं वय झालं आणि आईवडील म्हणून आमच्या दोघांत त्याच्या शिक्षणाच्या माध्यमाविषयी चर्चा सुरू झाली. आई अल्पशिक्षित असल्यामुळे चारचौघीत ‘माझा मुलगा इंग्रजी शाळेत जातो’ असं म्हणता यावं म्हणून इंग्रजीत दाखल करण्याचा रेटा होता. परंतु मी साहाय्यक प्राध्यापक, माझे पहिली ते पी.जी.पर्यंत शिक्षण मराठी माध्यमातूनच झालेले असल्यामुळे मला जाणीव होती की, इंग्रजीची आवश्यकता आहे. परंतु बोलणे, वाचणे आणि समजून घेण्यापुरती त्यासाठी इंग्रजी शाळाच असायला पहिजे असे काही नाही. ते ज्ञान तर त्याला मराठी शाळेतसुद्धा मिळणारच आहे. सोबत संस्कृतीचे ज्ञान, सामाजिक संवेदना, वक्तृत्व ज्ञान इत्यादी शिक्षणाव्यतिरिक्त इतर विविधांगी ज्ञानसुद्धा त्याला मिळणार आहे. म्हणून अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालय या मराठी शाळेतच प्रवेश घेतला. आज तो त्याच्या शाळेतून आल्यानंतर दिवसभर मित्रासोबत मिळविलेला आनंद सांगत आम्हालाही आनंदून सोडतो. असं आनंदी शिक्षण आम्ही त्याला दिल्यानं आम्हालाही मनातून आनंद होतो. – प्रा. बिजयसिंग भाबरदोडे अंबाजोगाई (बीड)