आम्ही दोघेही पती-पत्नी मराठी माध्यमातून शिकलो आहोत. मी स्वत: (बी.ए. बी.एड.) संस्कृत शिक्षिका आहे. माझे पती एका खासगी औषध कंपनीत नोकरी करतात. माझी मुलगी सानिका ही सध्या आठवीत मराठी माध्यमात महात्मा स्कूल (पनवेल) येथे शिकत आहे. मराठीबरोबरच इंग्रजी, संस्कृत या भाषांमध्येही उत्तम प्रावीण्य ती मिळवत आहे. सभाधीटपणे शिक्षकांना प्रश्न विचारणे, चौकस बुद्धीने सर्व जाणून घेणे, मराठीतील उत्तमोत्तम लेखकांचे साहित्य वाचणे, स्वत:चा अभ्यास स्वत: करणे हे सगळे संस्कार तिच्यावर मराठी भाषेने केले आहेत. शिकण्यातील सहजताही तिच्यात मराठी भाषेने आणली आहे, कारण आपण भाषा शिकताना त्या भाषेचे संस्कार व परंपरा अंगीकारत असतो व ती भाषा मातृभाषा असेल तर हे सर्व करणे सोपे जाते. तेव्हा पालकांनो, हे जाणून घ्या, मुलांना मातृभाषेतूनच शिकू द्या. मुलांचे मन मातृभाषेतूनच खुलते.     – मनीषा प्रशांत शेवडे, पनवेल

 

मातृभाषेत शिकणे गुणात्मक व मूल्यवर्धक

मुलीला मातृभाषेतून शिक्षण देणे यामागे अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शिक्षणावर एकूण होणारा भरमसाट खर्च. आमच्या मते, अंदाजित खर्चापैकी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर १५% टक्के खर्च व उच्च माध्यमिक शिक्षणावर १५% टक्के खर्च व उर्वरित ७०% टक्के संकल्पित खर्च उच्च शिक्षणासाठी राखीव ठेवता यायला हवा. बऱ्याच वेळी असे निदर्शनास येऊ  लागले आहे की, कुतूहल आणि कौतुकापोटी इंग्रजी माध्यमाचा प्राथमिक शिक्षणावर वारेमाप खर्च केला जातो व उच्च शिक्षणाची वेळ येते तेव्हा बजेट कोलमडून पडलेले असते. मातृभाषेत शिकून ज्ञान अर्जित करता यावे व उच्च शिक्षणासाठी पैसाही उपलब्ध व्हावा असा आमचा दुहेरी दृष्टिकोन होता. शिवाय मातृभाषेत शिकल्यामुळे ठरावीक इयत्तेनंतर आमची ऊर्वी स्वत:चा अभ्यास स्वत: करू लागली व शाळेतील सर्व उपक्रमांतही भाग घेऊ  लागली.

मुलीला घाटकोपर येथील पुणे विद्यार्थी भवन येथील शाळेत दाखल करताना इतर कुटुंबाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक दबाव, ज्याला आपण इंग्रजीत ‘पीयर प्रेशर’ म्हणतो, असा नव्हता. कारण ऊर्वीचे समवयस्क चुलत भाऊ  आणि बहीण हे कल्याण व बोरिवली येथे मराठी माध्यमाच्या शाळेतच जात होते. गुणात्मकदृष्टय़ा आम्ही घेतलेला निर्णय योग्य निघाला आहे, याबद्दल आम्ही शाळेचेही ऋणी आहोत.    – करुणा कौस्तुभ राजवाडकर, घाटकोपर (मुंबई)

Story img Loader