अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विद्यमाने दुबई येथे भरलेले विश्व मराठी साहित्य संमेलन. साल २०१०. परिसंवादाच्या सकाळच्या सत्राची वेळ गाठून मी आणि संजीवनी खेर सभागृहात पोचलो. सभागृह जवळजवळ रिकामे. आम्ही दोघी दुसऱ्या रांगेत स्थानापन्न झालो. तेवढय़ात एक सूटबूटधारी स्वयंसेवक समोर उभा राहिला.
‘अहो, या खुच्र्या निमंत्रितांसाठी आहेत.’
‘आम्ही निमंत्रित साहित्यिक आहोत.’
मी आमची डबलबॅरल ओळख करून दिली. मख्खपणाच्या जोडीला आता त्याच्या चेहऱ्यावर तुच्छताभाव उमटला.
‘साहित्यिक?’ नाकावर बऱ्याचशा सुरकुत्या! ‘तुमची बसायची सोय तिकडे मागे आहे.’ कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांसारखा चेहरा पाडून आम्ही मुकाट उठलो. मागे जाताना पाहिलं, तर बऱ्याच मागच्या खुच्र्यामध्ये स्थानापन्न झालेले दोन प्रतिष्ठित साहित्यिक आमची फजिती पाहून खी खी हसत होते. आम्हीही त्यांच्या रांगेत जाऊन बसलो. साहित्यिकांचा आदरसत्कार करण्याच्या या अजब पद्धतीबद्दल आम्ही चौघं काहीतरी टीकाटिप्पणी करीत होतो, तेवढय़ात आणखी एका साहित्यिकाची सभागृहात एन्ट्री!
हे एक वलयांकित आध्यात्मिक गुरू! त्यांच्याबरोबर अर्थात आठ-दहाजणांचा दरबार! आपल्या गोतावळ्यासकट ते मोठय़ा ऐटीत पहिल्या रांगेत बसले. मात्र नंतर त्यांनाही आमच्यासारखीच वागणूक मिळाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे भरविण्यात येणाऱ्या ‘अखिल भारतीय’ किंवा ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’तून साहित्यिकाचा चेहरा इतका ‘आऊट ऑफ फोकस’ का आणि कसा झाला?
मराठी साहित्य संमेलनाला वाचकांनी नेहमीच उदंड प्रतिसाद दिला तो अध्यक्ष आणि इतर उपस्थित साहित्यिकांचे विचार ऐकण्यासाठी! पूर्वीची शेकडोंची गर्दी आता हजारोंच्या संख्येत गेली तरीही साहित्यप्रेमी रसिकांचा मूळ हेतू बदललेला नाही.
साहित्यिकांना भेटणे, त्यांच्या गप्पागोष्टी ऐकणे आणि मराठी साहित्याच्या वातावरणात राहून दोन दिवस मनसोक्त वैचारिक आनंद घेणे ही खऱ्या वाचकासाठी मेजवानी असते.
आत्ता आत्तापर्यंत संमेलनामधलं साहित्यिकांचं महत्त्व स्पष्टपणे जाणवायचं. थोडी मागची गोष्ट सांगायची तर १९७५ सालचं कराडचं साहित्य संमेलन आणि अध्यक्ष या नात्याने दुर्गाबाईंनी व्यक्त केलेलं परखड मत आठवतं. साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचं स्थान काय असावं, यासंबंधी दुर्गाबाईंनी जो स्पष्ट विचार मांडला तो सभेला तर पटलाच; पण यशवंतराव चव्हाणांनीही दुर्गाबाईंचा आदर राखून प्रेक्षकांमध्ये बसून औचित्य दाखवलं. तुलनेनं आजचं चित्र काय दिसतं? साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर थोडीथोडकी नव्हे, तर साठ-सत्तर अनावश्यक माणसं! साहित्य महामंडळाचे पंचवीस-तीस पदाधिकारी, स्थानिक निमंत्रक, संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक राजकारणी कंपू, प्रायोजक आणि त्यांचे लोक वगैरे वगैरे! त्याशिवाय अग्रभागी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष, बिग बॉस म्हणावे असे राज्य किंवा केंद्रीय मंत्री आणि या सर्वामध्ये बुजलेले, लपलेले किंवा उपकृत भावनेने झुकलेले असे संमेलनाध्यक्ष.. आजी तसेच माजीही!
अध्यक्षीय सूत्रांची देवाणघेवाण आणि नियोजित उगवत्या संमेलनाध्यक्षांचं भाषण हा उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू! समोर हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेले वाचक प्रेक्षक हे भाषण मन लावून ऐकत असतात, तेव्हा व्यासपीठावरची स्वयंघोषित व्हीआयपी मंडळी एकमेकांशी बोलत असतात किंवा अधेमधे उठून अशिष्ठपणाचा नमुना दाखवतात.
पणजी, आळंदी, मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणच्या साहित्य संमेलनांमध्ये मला हाच प्रकार पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी ‘आधीचं संमेलन बरं होतं!’ असं म्हणायची पाळी! न राहवून साहित्य महामंडळाच्या एका माजी अध्यक्षांना मी विचारलं, ‘महामंडळाचे तुम्ही सर्व लोक, इतक्या मोठय़ा संख्येनं व्यासपीठावर का बसता? तिथे तुमचं काहीच प्रयोजन नसतं. आणि हा एकूणच प्रकार हास्यास्पद दिसतो, असं तुम्हाला वाटत
नाही का?’ यावर मला एक फारच नमुनेदार उत्तर मिळालं- ‘साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांची माणसं वर्षभर काम करीत असतात. त्यांना त्यांच्या कामाचं काहीतरी फळ मिळायला नको का?’
माझ्या डोक्यात स्वच्छ प्रकाश पडला..
अच्छा! मग हे कामाचं फळ म्हणून साहित्य संमेलनातल्या प्रत्येक परिसंवादातही महामंडळाचे दोन-तीन पदाधिकारी, निमंत्रक संस्थेतले एक-दोन कार्यकर्ते आणि मग फोडणीपुरता एखादा साहित्यिक अशी योजना केली जाते का?
अध्यक्षीणबाईंना अचानक काही ऐकू येईनासं झालं आणि त्या निघून गेल्या. मी विचार करीत राहिले- माणसं सामाजिक कार्य कशासाठी करतात? समाजाच्या भल्यासाठी? स्वत:च्या मानसिक आनंदासाठी? की प्रसिद्धीसाठी? प्रश्नांचं उत्तर शोधून काढताना पदरी निराशा येणार.. त्यापेक्षा मी आशेचा चिवट तंतू पकडला आणि स्वप्नरंजनात शिरले.. महाराष्ट्रातल्या एका छोटय़ाशा गावात भरलेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! प्रचंड उत्साहाने भरलेलं वातावरण आणि हातातली कार्यक्रमपत्रिका एकमेकांना दाखवत चाललेलं संभाषण. सहसा साहित्य संमेलनामध्ये हजेरी न लावणारे हे ज्येष्ठ साहित्यिक, श्री अमुक तमुक, या वर्षी संमेलनाध्यक्ष आहेत..
‘अरे वा! हे असं कसं घडलं बुवा?’
‘कारण की, चक्क अध्यक्षीय निवडणूक न घेता, साहित्य महामंडळाने एकमताने त्यांचं नाव ठरवलं आणि त्यांना मानानं निमंत्रण धाडलं.’ ‘या वर्षी अनेक गोष्टी, नेहमीच्या प्रथेपेक्षा वेगळ्या आहेत असं दिसतंय.’
कार्यक्रम पत्रिकेतली साहित्यिकांची यादी आणि नावं पाहिलीस का? ‘हो ना! एकतर भरपूर साहित्यिकांना संमेलनात सामील करून घेतलंय. आणि त्याच त्याच नेहमीच्या विषयांपेक्षा साहित्यातल्या नव्या वाटा आणि कसदार लिहिणाऱ्या नवीन साहित्यिकांचे विचार या गोष्टींना प्राधान्य दिलंय.’
हे बघ. भारताच्या कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रकाश टाकणारं ‘राशा’सारखं पुस्तक लिहिणारे शरद वर्दे, ‘निशाणी डावा अंगठा’ लिहून आपल्या शिक्षण खात्याच्या कारभारावर भाष्य करणारे रमेश इंगळे उत्रादकर,चित्रकाराचं जग आणि त्याचे नातेसंबंध अतिशय मोकळेपणानं मांडणाऱ्या ‘सर आणि मी’च्या लेखिका ज्योत्स्ना कदम, ‘गंगाजळी’ लिहिणारे श्री. बा. जोशी, ‘बदलता भारत’चे लेखक भानू काळे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा वेध घेऊन ‘हुतात्मा’ लिहिणाऱ्या मीना देशपांडे..
मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या या काही लेखकांबरोबरच वेगवेगळ्या मीडियातून उत्कृष्ट मराठी लेखन करणाऱ्या लेखकांचाही या वेळी संमेलनात सहभाग आहे. ही गोष्ट तर विशेषच म्हटली पाहिजे. ‘हो रे! अगदी बरोबर! सातत्याने नवीन प्रयोग करीत ‘माकडाच्या हाती शँपेन’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ अशी वैशिष्टय़पूर्ण नाटकं लिहिणारे डॉ. विवेक बेळे, ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी .. संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेतली नावं वाचूनच उत्सुकता इतकी वाढली आहे, की केव्हा एकदा उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होतो आहे असं झालंय.’ ‘या वेळी नाटकाचा प्रयोगही लेखकच करतायत ते पाहिलंस ना?’ ‘म्हणजे काय? खूपच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण साहित्य संमेलनावर लेखकांचाच पगडा आहे हे सिद्ध होईल.‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साहित्य संमेलनात साहित्य महामंडळ, यजमान संस्था, स्थानिक राजकारणी आणि उद्योजक या सर्वाच्या भूमिका आहेत; पण त्या पडद्यामागच्या!’ ‘साहित्य संमेलन यशस्वी करू; पण आम्ही सगळे अदृश्य सूत्रधार असू, अशी शपथच म्हणे या सर्वानी घेतली आहे.’ इतक्या धक्कादायक बातमीनंतर खाडकन् जाग येणं अपरिहार्य होतं. पण मी डोळे उघडले नाहीत. कारण स्वप्न पूर्ण झालं, हे मला स्वप्नात तरी पाहायचं होतं.
मी उत्साहाने उद्घाटन समारंभाच्या मंडपाकडे निघाले..
असून अडचण, नसून खोळंबा!
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विद्यमाने दुबई येथे भरलेले विश्व मराठी साहित्य संमेलन. साल २०१०. परिसंवादाच्या सकाळच्या सत्राची वेळ गाठून मी आणि संजीवनी खेर सभागृहात पोचलो. सभागृह जवळजवळ रिकामे.
First published on: 12-04-2015 at 12:12 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi writers in sahitya sammelan