शाळेत असताना गणित या विषयाविषयी आपल्या मनात नकळतच एक संताप असतो. असे असले तरी आपल्याला आयुष्यात प्रत्येक पायरीवर गणिताची गरज भासत असते. यंदाचे वर्ष हे थोर गणिती भास्कराचार्य यांचे ९००वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या निमित्ताने गणित संशोधन, शिक्षण अशा विविध पातळय़ांवर आपण कुठे आहोत याबाबत प्रा. मंदार भानुशे यांनी केलेला ऊहापोह.
भारतात गणिताची एक दीर्घ आणि प्राचीन अशी परंपरा राहिली आहे. दैनंदिन जीवनात अनेक वेळा आपल्याला गणिताची साथ लागते. उदाहरणार्थ, कुठलंही सामान विकत घेताना त्याचे वजन, दर प्रति नग आणि एकूण मूल्याचे गणित आपल्याला करावे लागते. तर व्यापारामध्ये किंवा उद्योगामध्येही लेखाविभाग हा सर्वात महत्त्वाचा असतो. सर्वप्रकारच्या विज्ञानामध्ये उपयोजित गणिताच्या अनेक सूत्रांचा वापर होतो. सामाजिक विज्ञानाच्याही अनेक शाखांमध्ये गणिताचा आधार विश्लेषणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अभियांत्रिकी, कला, संगीत, नृत्य, अर्थशास्त्र, वाणिज्य, संगणकविज्ञान या सर्व शाखांमध्येही बीजगणित, भूमिती, अंकसिद्धांत, कॅलकुलस व अन्य गणितीय प्रकारांचा बराच उपयोग होतो.
भारताने जगाला शून्य (०) हा अंक दिला आणि त्यामुळे ९च्या पुढची संख्या लिहिता आली. भारताने दशमान पद्धती दिल्यामुळे मोठय़ा संख्या लिहिता आल्या व त्यावर आधारित गणती शक्य झाली. देशातील विविध गणित संस्थांमधून दर वर्षी साधारण १७०० संशोधन पत्रे जगभरातल्या ६० देशांमधल्या शोध पत्रिकांमध्ये प्रसिद्ध होत असतात. सर्वाधिक संशोधन बायोमॅथेमॅटिक्स, सांख्यिकीशास्त्र, टोपोलॉजी, स्पेशल फ्रॅक्शन्स, कॉम्प्लेक्स अनॅलिसिस, नंबर थिअरी, डिफरेंशिएल जिओमेट्री, फझी गणित या विभागामध्ये चालू असून असे संशोधनाचे किमान ६० हून अधिक संशोधनाच्या विषयांचा समावेश गणितामध्ये होतो.
आधुनिक गणितातल्या अनेक गोष्टी या सामान्य व्यवहारापासून अलिप्त आहेत. जे संशोधन होत आहे, त्यातही अधिक भर अॅबस्टक्ट कन्सेप्ट्सवर अधिक आहे. आज आपल्याला गणित जर लोकप्रिय करायचे असेल तर काही गोष्टींबद्दल पुनर्वचिार करण्याची गरज आहे. भारतात संशोधन आणि शिकवणे या दोन गोष्टी सोबत जाताना अपवादानेच दिसतात. एकतर फक्त संशोधनावर भर असतो किंवा फक्त शिकवण्याकडे. अभ्यासक्रमाला नीट आकार देण्याची गरज आहे. स्वयंप्रेरित आणि गुणवान गणित शिक्षकांची गरज शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांना आहे. शालेयस्तरावर विशेष प्रयत्नांची गरज आहे, जेणेकरून भविष्यातील गणितज्ज्ञ निर्माण करता येतील. महाविद्यालयात आलेला विद्यार्थी हा मुळातच गणिताच्या चुकीच्या संकल्पना घेऊन आलेला असेल तर आपण त्याच्याकडून फार अपेक्षा करणे गर आहे. म्हणून शालेय जीवनात असताना गणिताबद्दल आकर्षण निर्माण होईल, असे देशभर प्रयत्न व्हायला पाहिजेत. उच्च शिक्षणासाठी कुठेही जाण्याची तयारी त्यांनी ठेवावी. भारताला गणिताचा विश्वगुरू करण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था सर्वाचा सक्रिय सहभाग असण्याची आवश्यकता आहे. शून्याकडून अनंताकडे प्रवास करायचा आहे, आपल्यात ते सामथ्र्य आहे, फक्त त्याची निष्पत्ती आपणास व्हावी ही सदिच्छा.
(लेखक मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त शिक्षण संस्थेचे प्राध्यापक आहेत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा