डॉ. मॅक्सिन बर्नसन म्हणजेच मॅक्सिन मावशी या मूळच्या अमेरिकेच्या. १९६६ला भाषाशास्त्रावर संशोधन करण्यासाठी म्हणून त्या फलटणात आल्या. संशोधन सुरू असतानाच मॅक्सिन मावशींना आजूबाजूला नापास, मोलमजुरी करणारी, गरीब, वंचित अशी शिक्षणापासून तुटलेली बरीच मुले दिसून आली. या मुलांना शिकविण्याच्या विचाराने त्यांना घेरले. त्या झपाटून कामाला लागल्या आणि अवघ्या १०-११ विद्यार्थ्यांना घेऊन शाळा सुरू झाली. आज हीच शाळा ‘कमलाबाई िनबकर बालभवन’ या नावाने फलटणमधील एक प्रयोगशील शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.
डॉ. मॅक्सिन बर्नसन या प्रसिद्ध लेखिका इरावती कर्वे यांच्या मत्रीण. त्यांनी दहा-बारा मुलांना घेऊन शाळा सुरू केली, तेव्हा त्यात मंजिरी िनबकर म्हणजे शाळेच्या आताच्या मुख्याध्यापिका यांचाही समावेश होता. मंजिरी या इरावतीबाईंच्या नात.
आता ८५ वर्षांच्या मॅक्सिन मावशी हैदराबादच्या एका शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. परंतु, आजही त्यांनी १९७८ साली ‘प्रगत शिक्षण संस्थे’अंतर्गत सुरू केलेल्या या शाळेला मॅक्सिन मावशींची शाळा म्हणून ओळखले जाते. १९८६ला एका कोठारात बालवाडीने सुरुवात करत शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून ४५० मुले शिकतात. यामध्ये बहुतांश मुले हे गरीब व वंचित गटातील आहेत.
शाळेने पहिल्यापासूनच पारंपरिक अध्ययन पद्धतीला फाटा देऊन अत्यंत सहजसोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन कौशल्यावर भर दिला. त्यासाठी शाळेने आधी बालवाडीत बाराखडी शिकविण्याची पारंपरिक पद्धत बदलून सिव्हेलिया वॉर्नर यांच्या पद्धतीवर आधारित प्रगत वाचन पद्धत सुरू केली. त्यावर आधारित पुस्तके लिहिली. मावशींनी काही अक्षरे व काही स्वरचिन्हे यांचा गट तयार केला. त्या आधारे त्यांचा म, ह, झ, आ आणि ई असा पहिला धडा तयार केला. मग त्याचे शब्द तयार झाले. आई, मामा, मामी, माझा, माझी, हा आणि हो. त्यानंतर वाक्य तयार होऊ लागले. हा माझा मामा, ही माझी आई वगरे. अशा प्रकारे त्यांनी सहजसोप्या पद्धतीने मुलांच्या बोलीभाषेत शब्द व वाक्य तयार करून वाचनाची गोडी लावली.
क्रियाशक्ती जागविण्याचे काम
कृतीबरोबरच मुलाच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, तो त्यातून काय शिकतो, त्यावर काय लिहितो, हे महत्त्वाचे असल्याचे शाळेला वाटते. म्हणूनच येथे मुलांना मुक्तपणे वावरण्यास दिले जाते. त्यामुळे मुले निसर्गाच्या सान्निध्यात रमतात. तेथे कविता, लेख, चित्रे, उपयुक्त माहिती जमा करणे इत्यादी गोष्टी करवून घेतल्या जातात. चित्र काढणे, बाहुली घर, ठोकळ्यांपासून प्रतिकृती, वाचन-लेखन कोपरा, गणित कोपरा, विज्ञान कोपरा यांचा वापर करत मुलांमधील क्रियाशक्ती शिक्षक जागृत करतात व ती व्यक्त करण्यास वाव देतात.
शोधनिबंध
शिशुवर्गापासूनच मुलांना पुस्तकांविषयी आवड निर्माण केली जाते. त्यासाठी शाळेकडे सुसज्ज वाचनालय आहे. ज्यामध्ये आठ हजाराहून अधिक पुस्तके आहेत. मुले आपल्या हाताने कोणतेही पुस्तक निवडून वाचू शकतात. दर आठवडय़ाला मुलांना एक प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ, विमानाचा किंवा बल्बचा शोध कुणी लावला, जगातील सर्वात थंड हवेचे ठिकाण कोणते, असे प्रश्न विचारून त्यावर पाच ते सहा जणांचा गट केला जातो. पुस्तकं, इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा वापर करून विस्तृत लेखन करतात. तो शोध लावण्यात आलेल्या अडचणी, समस्यांचे निवारण व सध्या त्या क्षेत्रात होत असलेल्या घडामोडी, बदल इत्यादी विषयांनाही हात घातला जातो. एक प्रकारे विस्तृत शोधनिबंधच मुले लिहून काढतात.
इतर उपक्रम
आठवडय़ातून एकदा विद्यार्थ्यांनी शाळेतच स्वतच्या हाताने खाऊ तयार करणे, भित्तिपत्रके तयार करणे, वर्गाच्या िभतींवर चित्रे काढणे, संगणकाचा वापर करून जाहिराती तयार करणे, सामाजिक विषय निवडून त्यावर टिप्पण तयार करणे, गोष्ट, प्रश्नमंजूषा, शब्दकोडे, अ‍ॅनिमेशन अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थी व्यक्त होतात. याशिवाय ‘सेल्फ ऑर्गनायझेशन लìनग एन्व्हायरमेंट’च्या (सोल) माध्यमामधून ‘आकाशातील शाळा’ हा उपक्रम शाळा प्रभावीपणे राबवत आहे.
प्रगत वाचन पद्धती
शाळेमध्ये प्रगत वाचन पद्धतीचा वापर केला जातो. यात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ‘एव्हरी डे इंग्लिश’ या उपक्रमाअंतर्गत वर्तमानपत्रातील स्वरचिन्हे, अक्षरे हुडकून काढणे, कागदावर मजकूर लिहून तो वाचायला सांगितला जातो. याकरिता शाळेने शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. शाळा शिक्षकांची निवडही अत्यंत काटेकोरपणे करते. शिक्षकाचे विषयावरील प्रभुत्व, त्याचा उपक्रमांमधील सहभाग आदी गोष्टींना निवड करताना प्राधान्य दिले जाते.
हँड्स ऑन सायन्स
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जाणिवा विकसित करण्यासाठी ‘हँड्स ऑन सायन्स’ हा उपक्रम शाळा राबविते. यात एक खासगी व सरकारी शाळा आणि एक संशोधन करणारी संस्था यांच्या सहकार्याने विज्ञान जत्रेचे आयोजन केले जाते.
गणितावर निबंध!
विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी शाळा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, निबंधाच्या माध्यमातून गणितातील संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविल्या जातात. उदाहरणार्थ, बीजगणितातील एककांचा वापर करून विद्यार्थी लिहितात, मी सकाळी सात वाजता उठलो. २० लिटर पाण्याने आंघोळ केली. त्यानंतर एक किलो साखर आणली. त्या दिवशी दुपारचे तपमान ३६ अंश सेल्सिअस इतके होते. संध्याकाळी बाबांनी आम्हाला प्रत्येकी दोन मीटर कापड आणले. येताना बरोबर एक डझन केळी आणली. तसेच ताईचे लग्न असल्यामुळे १० ग्रॅम सोने खरेदी करून आले. अशा लेखनातून मुलांची निरीक्षणशक्तीही वाढते. भूमितीच्या बाबतीतही असेच वेगळे प्रयोग केले जातात. म्हणजे विविध आकाराच्या रचना तयार करणे, त्या रंगवणे, त्यांचे माप घेणे, योग्य उपकरण वापरून आकृत्या काढणे.
शाळेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे परीक्षा, स्पर्धा यांना स्थान नाही. मुलांची बुद्धिमत्ता टक्क्य़ांच्या तराजूत तोलण्यास शाळेचा विरोध आहे. त्यामुळे, आपल्या मुलांना कोणतीही शिकवणी लावू नये, असे शाळेचे पालकांना सांगणे असते. शाळेचे माध्यम मराठी असले तरी इंग्रजी भाषाही येथे चांगल्या पद्धतीने शिकवली जाते. त्यामुळे, शाळेत बरेचसे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून येण्यास उत्सुक असतात. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना इतरही विषयांमध्ये रुची निर्माण व्हावी, यासाठी शाळा सतत धडपडत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा