उपाधी म्हणजे ओळख. ‘मी’चा विस्तार. ‘मी’ला चिकटलेल्या पदव्या. ‘मी’ची प्रतिमा. उदाहरणार्थ मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी निरोगी आहे, मी रोगी आहे, मी योगी आहे, मी भोगी आहे, मी शांत आहे, मी क्रोधी आहे, मी तपस्वी आहे, मी विलासी आहे, वगैरे वगैरे. तेव्हा मी उपाधीच्या ओझ्यापासून कधीच मुक्त नाही. परमात्मा तर निरूपाधिक आहे. आपण मात्र ‘मी’ आणि ‘माझे’च्या उपाधीत अडकलेलो आहोत. उपाधीत अडकलेल्या मला निरूपाधिक व्हायचं असेल, उपाधीच्या ओझ्यातून मुक्त व्हायचं असेल तर निरूपाधिक परमात्म्यालाच उपाधीत आणावं लागेल! जो त्रिगुणातीत आहे, सर्वात्मक आहे, सर्वाचा आहे, त्याला माझ्यापुरतं एका नात्याच्या उपाधीतही आणावं लागेल. श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात, ‘‘मनातून आपले भगवंताशी नाते असावे’’ (चरित्रातील भगवंतविषयक वचने, क्र. ४६). आपल्या प्रिय व्यक्तीचे छायाचित्र आपण न्याहाळतो तेव्हा छायाचित्र हे निमित्तमात्र असतं. ते पाहून आपल्या मनात प्रेम दाटत नाही, तर त्या छायाचित्रातल्या व्यक्तीशी आपलं जे नातं आहे त्या नात्यातील प्रेमाच्या जाणिवेतूनच आपलं मन भरून जातं. अगदी त्याचप्रमाणे मूर्तीसाठी नव्हे तर मूर्तीमध्ये जो आहे त्याच्याविषयीचं प्रेम, मूर्ती पाहून दाटून येऊ शकतं. या प्रेमाचा परमोच्च बिंदू त्या मूर्तीतलं चैतन्यदेखील साक्षात जाणवते, इथपर्यंत असतो. तशा भक्तांची उदाहरणं फार थोडी आहेत. श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या परमशिष्या अघोरमणिदेवी ऊर्फ गोपालेर माँ, विमलाताई ठकार यांच्या सान्निध्यात राहिलेल्या कृष्णामाई.. एका कृष्णाच्या आईंना पाहाण्याचं भाग्य तर मलाही लाभलं आहे. जेव्हा त्यांच्याकडे प्रथम गेलो तेव्हा पाळण्यातल्या कृष्णमूर्तीवर त्या ज्या वात्सल्याचा वर्षांव करीत होत्या, ते पाहून वाटलं, या वेडय़ा तर नाहीत? पण जेव्हा त्या बोलू लागल्या तेव्हा त्यांच्या सरळसोप्या बोलण्यातल्या ज्ञानानं थक्क व्हायला झालं. मनात आलं, यांना जसा तो कृष्ण दिसतो आहे तसा आपल्याला कधी दिसेल का? एकदम म्हणाल्या, ‘आपल्या नात्यागोत्याच्या माणसांना आपण किती आपलं मानतो! खरं कुणी आपलं आहे का या जगात? जो तो स्वत:चा आहे. मग आपणच मानावं ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, तुकाराम, एकनाथ, जनाबाई ही सारी आपली भावंडं आहेत. आपण त्यांचे आहोत, असं वाटलं की मग त्यांना साजेलसं वागताही येईल.’ हाडामांसाची, आपल्याला दिसणारी, आपल्याशी बोलणारी, आपल्या सहवासातली माणसं ‘आपली’ नसून आज न दिसणारी, आपण ज्यांच्याशी बोलू शकत नाही अशी, ज्यांच्या सहवासात आपण राहू शकत नाही अशी देवमाणसं ‘आपली’ मानून जगायचं, हे ऐकायला प्रथम विचित्र वाटेलही. पण शेवटी आयुष्यात ज्यांच्याशी आपला जसा आणि जेवढा संबंध आहे, तो तर सुटत नाही. त्यांच्यासाठी जे आणि जेवढं करायला हवं ते तर टाळता येत नाहीच. पण निदान ‘आपले’पणाचं आरोपण करून त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याची सवय तरी सुटेल. हाडामांसाच्या जगाऐवजी दगडी मूर्तीची उपासना तेच तर शिकवते.
१९७. आप-पर
उपाधी म्हणजे ओळख. ‘मी’चा विस्तार. ‘मी’ला चिकटलेल्या पदव्या. ‘मी’ची प्रतिमा. उदाहरणार्थ मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी निरोगी आहे, मी रोगी आहे,
First published on: 09-10-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Me and my