मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना मी पाच बाबींना प्राधान्य दिले आहे. त्यात नागरीकरणाचे आव्हान, पाणीटंचाई दूर करण्याचे आव्हान, कोरडवाहू शेतीचा प्रश्न, प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि शिक्षणाची गुणवत्तावाढ यांचा समावेश आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्या आणि आकारमानाच्या दृष्टीने जगातील अनेक देशांपेक्षा मोठे असलेले एक राज्य आहे. तेथे एक भौगोलिक विविधता आहे. खनिज संपत्ती आणि पाणी उपलब्धता कमी आहे. तरीही बौद्धिक संपदेच्या जोरावर आर्थिक विकास दराचे उद्दिष्ट गाठता येईलच आणि आर्थिक महाशक्तीही होता येईल. सध्या वैश्विक मंदीचे वातावरण असून नवीन रोजगारनिर्मिती सोडाच, पण आहे त्या नोकऱ्या टिकतील अशीही शाश्वती नाही. त्यामुळे संख्यात्मक विकासाचे उद्दिष्ट आपण गाठले तरी गुणात्मक विकास साधलेला नाही. प्राथमिक व उच्चशिक्षणाचा दर्जा समाधानकारक नाही. ज्ञानाधिष्ठित अर्थकारणाची कास धरताना नवसंकल्पनांचे केंद्र अमेरिका, जपानकडून आता चीनकडे सरकले आहे. त्यामध्ये आपण कुठेही नाही. ही धोक्याची घंटा आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आपण पूर्णपणे खासगी क्षेत्राकडे सोपविले आहे. हे बरोबर नाही. इतर राज्यांमध्ये सरकारच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे जाळे तालुका पातळीपर्यंत विस्तारले आहे. महाराष्ट्रात मात्र आपण प्राथमिक शाळांवर भर दिला असून आता माध्यमिक शाळाही शासनाकडून उभाराव्या लागतील.
शिक्षणक्षेत्रात बहुतांश संस्थाचालक राजकारणी असल्याने त्यांच्या दबावामुळे भरमसाठ डीएड महाविद्यालये आणि कायम विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न आदी निर्माण झाले. कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळा चालविण्याचे प्रतिज्ञापत्र शासनाला देऊनही काही वर्षांनी हे संस्थाचालक अनुदानाची मागणी करू लागले. राजकीय दबावामुळे नाइलाजाने ‘कायम’ हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र अनुदानासाठी पात्र ठरण्यासाठी निकषांचा आग्रह सरकारने धरला आहे. डी.एड्. महाविद्यालयांचाही असाच प्रश्न आहे. आपल्याकडे शिक्षकांच्या नऊ हजार नोकऱ्या या महाविद्यालयांमध्ये जागा मात्र ९० हजार आहेत. केंद्र सरकारची भोपाळ येथील शिखर संस्था या महाविद्यालयांना परवानगी देते. गरज नसताना अनेक पटींनी अधिक शिक्षकांची निर्मिती आपण करीत आहोत. अभियांत्रिकी महाविद्यालयांबाबतही तेच झाले आहे. मराठवाडय़ात ४० टक्के तर राज्यात ३० टक्के अभियांत्रिकीच्या जागा रिक्त असताना नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव माझ्याकडे आले. एवढय़ा जागांची आपल्याला खरोखरच गरज आहे का?
केवळ उच्च शिक्षणच नव्हे तर प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. हे काम केवळ सरकारचे नाही, तर पालक, शिक्षक, प्रसिद्धीमाध्यमे आणि समाजातील सर्व घटकांची त्यासाठी साथ हवी. सर्वानीच शैक्षणिक क्षेत्रातील मूलगामी बदलांसाठी आग्रह धरायला हवा. राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचा विचार करताना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी उच्चशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना काही बाबींची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आयआयटी, आयआयएमसारख्या मानांकित संस्थांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, याचा विचार करण्यात येईल. सर्व बाबींची माहिती घेतल्यावर बदलांचे व उपाययोजनांचे स्वरूप निश्चित करण्यात येईल.
राज्यातील बहुसंख्य जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून असून त्यामुळे सहकार क्षेत्र फोफावले. या क्षेत्राचा विकास झाला, पण ज्ञानाधिष्ठित अर्थकारणासाठी तो पुरेसा नाही. सहकार चळवळीसाठी फारशी गुणवत्ता लागत नाही. त्यातून पुढारी होता येते व अर्थप्राप्तीही होते. सरकार नवीन नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. त्या निर्माण करण्याची जबाबदारी खासगी क्षेत्रावरच आहे. खासगी क्षेत्रामध्ये केवळ गुणवत्तेचाच विचार प्राधान्याने केला जातो. पण कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे आव्हानही आपल्यापुढे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून बाहेर पडलेल्या ८० टक्के अभियंत्यांना नोकरी दिल्यावर त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्याची वेळ खासगी कंपन्यांवर येते.
राज्यातील शिक्षणक्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी काही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने मुख्याध्यापक, शिक्षक आदींना इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकापर्यंत पोचविले जाईल. नेट-सेट किंवा पीएचडीची अट प्राध्यापकांना असताना या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार मिळत नाहीत, या कारणावरून १९९१ मध्ये ही पात्रता नसलेल्यांनाही नोकऱ्या देण्यात आल्या. त्यांच्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला होता व प्राध्यापकांचा संपही झाला. सरकारवर बराच दबाव येऊनही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही.
अमेरिकेत विद्यापीठांचे पतनिर्धारण केले जाते, त्यामुळे तेथील विद्यापीठांच्या गुणवत्तेचे मोजमाप होते व ती वाढविण्यावर भर दिला जातो. आपल्याकडे ‘नॅक’चे पतमानांकन सक्तीचे करण्यात आले असले तरी त्यातून अजून फारसे काही साध्य झालेले दिसत नाही. शिक्षणाची गुणवत्ता वाढविली नाही, तर आपण २१व्या शतकाचे आव्हान पेलू शकणार नाही. अभियांत्रिकीमध्ये आपल्याला नावीन्यपूर्ण उत्पादन घडविण्यामध्ये यश का मिळत नाही? जगभरात वापरले जाईल असे नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आपण यशस्वी होत नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल, संगणकाचे सुटे भाग, सिलीकॉन चीप आदींच्या निर्मिती क्षेत्रात आपण कुठेही नाही. एखाद्या राष्ट्राने र्निबध घातले, तर आपली अतिशय अडचण होऊ शकते. चुकीच्या राजकीय निर्णयांचा फटका दीर्घकाळ जनतेला भोगावे लागतात. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक नको, अशी भूमिका जनता सरकारच्या काळात घेण्यात आली होती. त्यामुळे आयबीएमसारख्या कंपन्यांनी आपले उत्पादन भारताबाहेर करण्याचे ठरविले. सिलीकॉन चीपचा आराखडा भारतीयांकडून केला जातो, मात्र उत्पादन परदेशांमध्ये होते. केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपयांचे अनुदान देऊ केले, तरीही कोणतीही कंपनी भारतात येण्यास अजून तयार झालेली नाही. प्राथमिक शिक्षणातून इंग्रजी हद्दपार करण्याचा तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचा निर्णयही तसाच होता.
आपल्याला आता मागे राहून चालणार नाही. नाहीतर अन्य राज्ये आणि देश प्रगतीच्या वाटेवर पुढे निघून जातील. आपल्याला मानाचे स्थान मिळणार नाही. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेची निर्मिती हाच आता एकमेव मार्ग राहिला आहे.
आपल्याकडे शिक्षकांच्या नऊ हजार नोकऱ्या, मात्र या महाविद्यालयांमध्ये जागा ९० हजार आहेत. केंद्र सरकारची भोपाळ येथील शिखर संस्था या महाविद्यालयांना परवानगी देते. गरज नसताना अनेक पटींनी अधिक शिक्षकांची निर्मिती आपण करीत आहोत. अभियांत्रिकी महाविद्यालयांबाबतही तेच झाले आहे. मराठवाडय़ात ४० टक्के तर राज्यात ३० टक्के अभियांत्रिकीच्या जागा रिक्त असताना नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव माझ्याकडे आले. एवढय़ा जागांची आपल्याला खरोखरच गरज आहे का?
शिक्षणचिंतन!
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना मी पाच बाबींना प्राधान्य दिले आहे. त्यात नागरीकरणाचे आव्हान, पाणीटंचाई दूर करण्याचे आव्हान, कोरडवाहू शेतीचा प्रश्न
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-08-2013 at 05:19 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meditation on education