आर्य संगीत प्रसारक मंडळाचे दीर्घकाळचे विश्वस्त आणि सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे अनेक वर्षांचे साक्षीदार रामभाऊ जोशी यांनी महोत्सवाच्या आठवणींना दिलेला उजाळा, या स्वरसोहळ्याच्या हीरक महोत्सवानिमित्ताने..
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवामध्ये अव्वल दर्जाचे शास्त्रीय संगीत श्रवण करण्याची पर्वणी मंगळवारपासून (११ डिसेंबर) उपलब्ध होत आहे. प्रसिद्ध गायक आणि वादक यांच्या कलेचा आविष्कार सलगपणे श्रोत्यांना ऐकविणारा हा देशातील नव्हे तर, जगातील एकमेव महोत्सव आहे. रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९५३ पासून या संगीत कार्यक्रमाची प्रथा सुरू झाली. सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य. कुंदगोळ हे सवाई गंधर्वाचे मूळ गाव कर्नाटकातील हुबळीजवळ आहे. संगीत नाटकात गायकाची भूमिका करून सवाई गंधर्वानी ख्याती संपादन केली. त्या काळात नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांनी आपल्या अभिनयाने आणि शास्त्रीय गायनाने रंगभूमीचा कब्जा केला होता. त्याच काळात सवाई गंधर्व यांनी आपल्या विशिष्ट गायनाने आणि अभिनयाने रसिकांना आकर्षित केले. बालगंधर्वाइकतेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक सरसतेने गायन आणि अभिनय करणाऱ्या रामभाऊ कुंदगोळकर यांनी प्रेक्षकांकडून सवाई गंधर्व असा किताब संपादन केला. कुंदगोळकर यांची कन्या प्रमिला हिचा विवाह संगीतप्रेमी पांडुरंगशास्त्री देशपांडे यांच्या मध्यस्थीने डॉ. वसंतराव ऊर्फ नानासाहेब देशपांडे यांच्याशी जुळून आला. त्यानंतर सवाई गंधर्व पुण्याला वास्तव्यास आले. शिवाजीनगर भागात जंगलीमहाराज मंदिराजवळील परदेशी बिल्डिंगमध्ये ते राहात होते. नंतरच्या काळात सुभाषनगर येथे त्यांनी स्वत:ची वास्तू उभारली. ‘स्वरसिद्धी’ असे या वास्तूचे नामकरण करण्यात आले.
१९४६ मध्ये सवाई गंधर्व यांच्या षष्टय़ब्दीचा कार्यक्रम हिराबाग टाऊन हॉल येथे झाला होता. त्यावेळी युवावस्थेतील भीमसेन जोशी या त्यांच्या शिष्याने गायन करावे, असे काहींनी सुचविले. गुरूंची आज्ञा घेऊन भीमसेन यांनी २० मिनिटे गायन केले. त्यानंतर उत्साही लोकांनी याविषयी विचारले असता ‘भीमू माझे नाव काढील’, असा अभिप्राय सवाई गंधर्व यांनी व्यक्त केला होता. हा अभिप्राय किती सार्थ होता याची प्रचीती भीमसेन यांनी दिली हे सर्वानाच ठाऊक आहे. भीमसेन यांनी गायनाच्या माध्यमातूनच सवाई गंधर्व यांची परंपरा पुढे नेली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. गेली ५८ वर्षे ते या महोत्सवाचे मुख्य आधारस्तंभ होते. शिवाजीनगर परिसरात सवाई गंधर्व यांचे वास्तुरूपाने स्मारक साकारून पं. भीमसेन जोशी यांनी गुरुपूजा बांधली आहे.
सवाई गंधर्व यांचे १९५२ च्या सप्टेंबरमध्ये अचानक निधन झाले. त्यांचे जावई नानासाहेब आणि शिष्य भीमसेन जोशी यांनी आपल्या संगीत गुरूची पुण्यतिथी १९५३ मध्ये साजरी करण्याची योजना पूर्णत्वास नेली. टिळक रस्त्यावरील भागवत हॉल येथे ही मैफल झाली. ५०-७५ श्रोते बसू शकतील एवढीच ती जागा होती. हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, डॉ. वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, नानासाहेब देशपांडे या किराणा घराण्याच्या मोजक्याच गायकांचे गायन झाले. बैठकीची व्यवस्था मंडपवाले सीतारामपंत गोखले यांनी सुरू केलेली परंपरा गेली साठ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. आज गंगौघाचे स्वरूप प्राप्त झालेल्या या महोत्सवाचा प्रारंभ झुळुझुळु वाहणाऱ्या झऱ्यापासून झाला आहे. पहिल्या दोन-तीन वर्षांतच श्रोत्यांची संख्या वाढू लागल्याने मैफलीच्या जागेत बदल करावा लागला. शनिवार पेठ येथील मोतीबाग प्रांगणात ही मैफल झाली. त्यावेळी पहाटे पाच वाजता ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगल यांनी गायिलेल्या ‘अल्हैय्या बिलावल’ रागाची स्मृती अजूनही रसिक जागवितात. मोतीबाग प्रांगण लहान असल्यामुळे बहुसंख्य श्रोते अहल्यादेवी चौकातील रस्त्यावर उभे राहून गायनाचा आस्वाद घेत होते.
मोतीबागेची जागा अपुरी पडू लागल्याने पुढील वर्षी लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे पुण्यतिथी मैफल करण्यात आली. तेथे ४०० ते ४५० प्रेक्षकच बसू शकायचे. त्यामुळे नंतरच्या वर्षी नूमवि प्रशालेच्या प्रांगणात हा उत्सव झाला. तीही जागा कमी पडू लागल्याने रेणुका स्वरूप प्रशालेचे प्रांगण निश्चित करण्यात आले. त्यावर्षी चार ते पाच हजार श्रोत्यांनी संगीताचा आस्वाद घेतला. गायन-वादनाच्या या उत्सवामध्ये नृत्याचा प्रथमच समावेश करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला यांचे नृत्य झाले. तेव्हापासून नृत्य सादरीकरणाची प्रथा अबाधित आहे. श्रोत्यांची वाढती संख्या आणि संगीत उत्सवासाठीचा खर्च वाढू लागल्याने पुण्यतिथी मंडळाला संस्थेचे स्वरूप प्राप्त करून देणे आवश्यक ठरले. पुणे शहरामध्ये उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांनी १९१० मध्ये रविवार पेठेमध्ये आर्य संगीत विद्यालय सुरू केले होते. कविश्वरबुवा हे विद्यालय चालवीत असत. तेव्हा पुण्यतिथी मंडळाने खाँसाहेबांचे हे संगीत विद्यादानाचे कार्य सुरू ठेवण्याच्या उद्देशातून आर्य संगीत प्रसारक मंडळ असे संस्थेचे नामकरण केले. १९६७ मध्ये या न्यासाची विश्वस्त संस्था म्हणून नोंद करण्यात आली. प्रारंभीची बरीच वर्षे श्रोत्यांसाठी ही संगीत सेवा विनामूल्य होती. मात्र, रेणुका स्वरूप प्रशाला येथे उत्सव सुरू झाला तेव्हा मंडप, व्यासपीठ, ध्वनिक्षेपक आणि कलाकारांची बिदागी हा खर्च वाढल्याने प्रवेशमूल्य असावे असा विचार करून तीन रात्रींच्या मैफलीसाठी पाच रुपये शुल्क निश्चित करण्यात आले. त्या काळात तीन रात्री अखंड हा संगीत उत्सव होत असे. सनईवादनाने सुरू होणाऱ्या या उत्सवाचा समारोप चौथ्या दिवशी सकाळी पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाने होत असे. या मैफलीला पंडितजींबरोबर कित्येकदा हार्मोनिअमच्या साथीला पु. ल. देशपांडे असायचे. पुण्यतिथी मंडळाला तेव्हापासून संगीत महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. भीमसेन जोशी यांचे संगीतविश्वातील प्रभावी व्यक्तिमत्त्व, किराणा घराण्याच्या सवाई गंधर्वाची गायकी यांचे तेजस्वी वलय या महोत्सवाच्या सभोवती चक्राकार गतीने फिरू लागल्यानेच साठ वर्षांच्या सांगीतिक कार्याचा इतिहास या महोत्सवाने निर्माण करून ठेवला आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर विविध वयोगटांतील १२ ते १४ हजार श्रोत्यांना श्रेष्ठ दर्जाच्या संगीत श्रवणाची मेजवानी देणारा हा एकमेव महोत्सव आहे.
पं. भीमसेन जोशी यांनी संगीताच्या माध्यमातून गुरुपूजा बांधण्याचे काम त्यांच्या अखेपर्यंत केले. गायक-वादक कलाकारांची निवड स्वत करून त्यांनी या उत्सवाला वेगळेपण बहाल केले. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतील आणि वेगवेगळ्या भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांचे दर्शन त्यांनी श्रोत्यांना घडविले. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी कटाक्षाने केले. या महोत्सवात कला सादरीकरणानंतर कलाकारांनी कीर्ती संपादन केल्याची उदाहरणे आहेत. देशभरातील विविध शहरांतून त्याचप्रमाणे परदेशातूनही रसिक या महोत्सवास आवर्जून उपस्थिती लावतात. भव्य स्वरूप प्राप्त झाले असले तरी पूर्ण तीन रात्री श्रोत्यांना संगीत श्रवणाचा आनंद देणाऱ्या या महोत्सवाला कायद्याच्या बंधनामुळे मर्यादा निर्माण झाली आहे. रात्री दहानंतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. याचा स्वाभाविक परिणाम उत्सवावर होणे क्रमप्राप्त असले तरी श्रोत्यांचा उत्साह कमी झालेला नाही. वेळेचा बदल घडवून संयोजक श्रोत्यांना संगीत मेजवानीचा आनंद देण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत. हा महोत्सव हीरकमहोत्सवानंतर अमृतमहोत्सवाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. श्रोत्यांचा प्रतिसाद पुढील काळात वाढणार असला तरी सर्वाचा समावेश होईल असे भव्य पटांगण पुणे शहरामध्ये कोठेही उपलब्ध नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. असे पटांगण उपलब्ध व्हावे याकडे महापालिका आणि राज्य सरकारचे लक्ष नाही ही खंत अनेकांच्या मनामध्ये आहे. शास्त्रीय संगीत कोणाचे ऐकावे, कसे ऐकावे आणि किती ऐकावे याचे या महोत्सवाने समाजाला केवळ शिक्षणच दिले असे नाही. तर, मार्गदर्शनदेखील केले आहे. त्यातून अनेक ‘कानसेन’ निर्माण झाले. या महोत्सवाने शहराला संगीताची राजधानी असे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मंडळाला ज्या विश्वस्तांनी न्यासाचे स्वरूप दिले आणि महोत्सवाची रचना करून दिली ते विश्वस्त आता आपल्यामध्ये नाहीत. काळाची पावले ओळखून तरुण पिढीतील विश्वस्तांची योजना केली असून त्यांना महोत्सवासंबंधीच्या आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करून पं. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे विश्वस्त महोत्सवाचे आयोजन करीत आहेत.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अभिजात स्वरसोहळ्याची साठी
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे दीर्घकाळचे विश्वस्त आणि सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे अनेक वर्षांचे साक्षीदार रामभाऊ जोशी यांनी महोत्सवाच्या आठवणींना दिलेला उजाळा, या स्वरसोहळ्याच्या हीरक महोत्सवानिमित्ताने..
आणखी वाचा
First published on: 10-12-2012 at 01:41 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memories of sawai gandharva bhimsen mahotsav in word from rajabhau joshi