मोठय़ा कंपासपेटीसारख्या मोबाइलपासून ते आत्ताच्या टचस्क्रीन स्मार्टफोनपर्यंत सर्व प्रकारचे मोबाइल आपल्याला बाजारपेठेत उपलब्ध करून देणाऱ्या आणि मोबाइलच्या बाजारपेठेत अधिराज्य गाजविणारी नोकिया या कंपनीचा मोबाइल बाजारपेठेतून शुक्रवारी पूर्णत: अस्त झाला. यापुढे नोकिया मोबाइल बनवणार नाही, हे समजल्यावर अनेकजण नुसते हळहळलेच नव्हे- तर भावनांचा कल्लोळच उमटला.. त्या कल्लोळाच्या खुणा टिपून ठेवतानाच, या विलीनीकरणामागची तांत्रिक आणि व्यावसायिक बाजू उलगडणारा  हा आढावा..  
‘नोकिया या कंपनीने फिनलंडचा व्यवसाय जगाच्या नकाशावर एका उच्च स्थानावर नेऊन पोहोचवला. ‘नोकिया’ ही आमच्यासाठी केवळ एक कंपनी नसून आमच्या आपुलकीचा भाग आहे.’ — ही नोकिया किंवा मायक्रोसॉफ्टच्या कुणा वरिष्ठाने पत्रकार परिषदेत केलेली भलामण नाही..  एका फिनिश कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करणाऱ्या नोव्हेन स्मिथला  ‘लोकसत्ता’ने नोकियाबद्दल ईमेल पाठवला, त्याचे हे उत्तर. नोकिया १९८०च्या दशकाअखेपर्यंत केवळ फिनलंडमध्येच मोठी होती. आजही आहे. फिनलंडमध्ये नोकियाच्या अनेक वस्तू बाजारात विकल्या जातात. पण गेल्या २० वर्षांत ज्यामुळे ही कंपनी जगभर पोहोचली, त्या मोबाइल फोन उत्पादनातूनच या कंपनीचे नाव हद्दपार होणार, इतिहासजमाच होणार याबद्दल सर्वच फिनिश नागरिकांना गलबलून येते, असे तो सांगतो. नोकिया फिनलंडमध्ये फक्त मोबाइलच्या धंद्यात नसून अन्य उद्योगांतही आहेच, पण फोन आता नोकियाचा नाही, ही कल्पनाच अनेक फिनिश नागरिकांना पटत नाही.. एवढी आपुलकी का, याचा खुलासा साक्षात फिनलंडचे परराष्ट्र-व्यापार मंत्री अलेक्झांडर स्टब यांच्या ट्विप्पणीतून मिळतो..
  ‘लहानाचे मोठे होत असतानाच्या प्रवासात नोकिया मोबाइलची एखादी आठवण नाही असा एकही फिनिश माणूस नसेल. यामुळे नोकिया-मायक्रोसॉफ्टचा व्यवहार अनेकांना भावनिक धक्का देऊन गेला.’
 भावनिक धक्का बसलेल्या त्या अनेकांमध्ये भारतीयही आहेत.. १२० देशांमध्ये  ८७ हजारहून अधिक कर्मचारी आज काम करत आहेत. कोटय़वधी मोबाइल हँडसेट नोकियाने आजवर बनवले, हातोहात विकले. भारतात मोबाइल वापरणाऱ्यांमध्ये असे खूप कमी लोक असतील की ज्यांनी नोकियाचा एकही फोन वापरलेला नाही. हातात नोकियाचा मोबाइल असणे ही फिनिश नागरिकांसाठी जशी अभिमानाची गोष्ट असायची तशी ती भारतीयांसाठी सुरुवातीला प्रतिष्ठेची असायची. जगात आजही नोकिया या कंपनीचेच मोबाइल घेणारे अनेकजण आहेत.. म्हणजे ‘नोकिया ११००’  पासून ते ‘नोकिया एक्स’पर्यंत नोकियानिष्ठच राहणारे. स्मार्टफोनची लाट २००५ नंतर आली. त्याहीनंतर हातातला नोकिया न सोडता, नोकियाने जेव्हा स्मार्टफोन बाजारात आणले तेव्हाच स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात करणारे! अशी जाज्वल्य नोकियानिष्ठा केवळ फिनिश नागरिकच दाखवत होते, असेही नाही..
 ‘नोकिया’च्या अधिकृत फेसबुक पेजवर शुक्रवारी दुपारी नोकिया आणि मायक्रोसॉफ्टचा करार पूर्ण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर एक तासांच्या आत नोकियाप्रेमींच्या शेकडो कमेंट्स तिथे पोस्ट झाल्या; त्या जगभरच्या विविध देशांतून होत्या. या नोकियानिष्ठांच्या मांदियाळीतील बहुतेकजण दु:खी.. त्या दुखावेगाच्या भरात अनेकांनी ‘हा करार झाला तरी नोकियाने फोनवरील आपले नाव बदलू नये’ असा सल्लाही दिला. या नावावर प्रेम जडलेल्या एका नोकिया-पाइकाने तर ‘मी स्वत: भविष्यात नोकिया ब्रँडने कंपनी सुरू करेन (नोकियाचे फोन पुन्हा बनवेन)’ असेही नमूद केले आहे. नोकियाचे नाव मोबाइल विश्वात दिसणार नाही ही कल्पनाच अनेकांना सहन झालेली नाही. इतके प्रेम आणि निष्ठा लाभलेले फार कमी ब्रँड आज जगभरात असतील.
‘मायक्रोसॉफ्ट’शीच संग कसा?
मोबाइलमधील अग्रगण्य नोकिया आणि ऑपरेटिंग सिस्टममधील अग्रेसर मायक्रोसॉफ्ट अशा दोन कंपन्यांनी सन २०११ एकत्र येण्याचा निर्णय घेतला. उद्देश सरळ होता, तो म्हणजे सध्या तंत्रग्राहकांची बदलत असलेली गरज भागविणे. पण ही गरज भागविण्यासाठी सन २००० पासून अनेक कंपन्यांनी जागतिक बाजारात उडी घेतली होती. सन २०१३ पर्यंत सॅमसंगसारख्या कंपन्या चांगल्याच पसरल्या होत्या. या बाजारात तरण्याच्या निर्धारानेच मायक्रोसॉफ्टच्या साथीने ‘िवडोज फोन’ घेऊन नोकिया बाजारात आली. पण एव्हाना बाजारात नोकियाचे फोन खूप कमी प्रमाणात वापरले जायचे. आजमितीस नोकियाकडे साध्या फोनचा १५ टक्के आणि स्मार्टफोनचा केवळ ३ टक्के बाजारहिस्सा आहे. साध्या फोनच्या बाबतीत कंपनीचा हिस्सा पूर्वी ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान होता. स्मार्टफोनची लाट येईल आणि आपल्या बाजारपेठेतील नावाला धक्का बसेल याची चाहूल नोकियाच्या उच्चपदस्थांना लागली की नाही याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. मात्र त्यांनी स्मार्टफोनची बस चुकवली. सन २०१०मध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आली, त्यावेळी नोकियाने मात्र आपल्या सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टमवरच भरवसा ठेवत या नव्या ऑपरेटिंग सिस्टमकडे दुर्लक्ष केले. खरे तर हे गणित त्यांना कळणे गरजेचे होते. कारण अॅपल कंपनीचा ‘आयफोन’ बाजारात आल्यापासून स्मार्टफोनची स्पर्धा पूर्णत बदलली होती. भविष्यातील बाजार हा स्मार्टफोनवरच आधारित असल्याचे न कळण्याइतके नोकियाचे पदाधिकारी दुधखुळे नव्हते. मात्र सिम्बियन आपल्याला तारेल या (अती) आत्मविश्वासामुळे हे दुर्लक्ष झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हेच दुर्लक्ष त्यांना महागात पडले की काय असा प्रश्न अनेकांना स्मार्टफोन बाजारातील नोकियाचा नगण्य टक्का आणि या कंपनीचे घटते समभाग पाहून पडत होता. मात्र नोकियाने कधीही ही आपली चूक असल्याचे मान्य केले नाही. दुसरीकडे मायक्रोसॉफ्टलाही छोटय़ा संगणकांचे गणित वेळेवर कळले नाही. छोटे संगणक अर्थात आयपॅड आणि टॅब बाजारात आले आणि स्थिरावलेही. पण तोपर्यंत आपल्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या व्यवसायाला फटका बसेल असे मायक्रोसॉफ्टला वाटले नव्हते. हे त्यांना जाणवले तेव्हा मात्र त्यांनी हातपाय हलविण्यास सुरुवात केली आणि यातूनच नोकिया आणि मायक्रोसॉफ्टचे गणित जुळले असावे, असा कयास बांधला जात आहे.
 फोनच्या केवळ ऑपरेटिंग सिस्टमबाबत झालेले सहकार्य सप्टेंबर २०१३ मध्ये विलीनीकरणापर्यंत पोहाचले. हे सुमारे सात अब्ज युरोंचे विलीनीकरण परवाच्या २५ एप्रिल रोजी पूर्णत्वाला आले आणि नोकियाने ताबडतोब आपल्या फेसबुक पेजवर मायक्रोसॉफ्टचा लोगो आणला!
नोकियाचे स्वतंत्र अस्तित्व हरविणार म्हणजे काय होणार, हे पाहून हळहळलेली मांदियाळी दु:ख व्यक्त करण्यासाठी या फेसबुकपानावर तुटून पडली. याच पानावरील नोकियाचा इतिहास पुन्हा पुन्हा चाळला जाऊ लागला आणि ‘सारं संपलं, पण नव्या नावाने सुरू झालं’ अशी स(किंवा न)कारात्मक भावना घेऊन त्यांनी आपल्या लाडक्या नोकियाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत या चाहत्यांनी बदलाचा स्वीकार केला.
भविष्यात नोकियाच्या सध्याच्या कार्यपद्धतीत बदल होणार असला तरी सामान्यांसाठी यात फारसा फरक पडणार नाही. नोकियाची फिनलंडमधील कंपनीची काही कार्यालये संशोधनासाठी कार्यरत राहतील. या व्यवहारात भारतातील चेन्नई आणि कोरीयातील मासन येथील नोकियाची उत्पादन केंद्रे निव्वळ कज्जे-खटल्यांच्या कारणापायी मायक्रोसॉफ्टकडे जाणार नाहीत. भारतातील उत्पादन केंद्र कर प्राधिकरणाने गोठवले आहे, तर कोरीयातील उत्पादन केंद्र बंद करण्याचा निर्णय आधीच झाल्याचे नोकियाने स्पष्ट केले आहे. भविष्यात मायक्रोसॉफ्टचा फोन, टॅब या सर्व गोष्टी आपल्या हातात येतीलही, पण त्याचे यश हे पूर्णत: मायक्रोसॉफ्टच्या नव्या विपणन धोरणांवर अवलंबून असणार आहे. या सर्वात जगात मोठी मानली जाणारी भारतीय बाजारपेठच मोठे लक्ष्य असेल असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. याच्या कारणमीमांसेमध्ये सध्याचे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे असल्याने भारतीय बाजारपेठेवर अधिक भर राहील असेही एक कारण पुढे होत आहे. नोकियाच्या अस्ताने मायक्रोसॉफ्ट फोनचा उदय झाला असला तरी त्याची ‘रेंज’ कुठवर पोहोचते, हे आत्ताच सांगणे तसे अवघड आहे.
फिरत्या फोनची क्रांती..
नोकिया या कंपनीने एकोणिसाव्या शतकापासून फिनलंडमध्ये आपले अस्तित्व सुरू केले. कधीकाळी रबरी टय़ूब तयार करणारी ही कंपनी विसाव्या शतकात केबल व्यवसायात शिरली. यानंतर संबंधित कंपन्यांचे एकत्रीकरण करून त्यांनी १९६०च्या दरम्यान नोकिया कॉर्पोरेशनची स्थापना केली, त्यात इलेक्ट्रॉनिक्स विभागाचाही समावेश होता.
यानंतर  एक जुल १९९१ रोजी आणखी एक क्रांती घडली.. फिनलंडचे तत्कालीन पंतप्रधान हेरी होल्केरी यांनी नोकिया कंपनी ज्या टाम्पेरे गावात आहे, तिथले उपमहापौर कारीना सोनिओ यांना जगातील पहिला ‘जीएसएम कॉल’ केला.

नोकियाने फोनचा आकार
कमी करत, ऑपरेटिंग सिस्टममध्ये नवनवीन प्रयोग करत, मार्गक्रमण सुरू केले. १९९१ मध्ये नोकियाने सर्वाचा आवडता ‘स्नेक’ हा गेम मोबाइलमध्ये आणला.. फोन ‘स्मार्ट’ असू शकतो, याची ही पहिली खूण!  यानंतर नोकियाने विविध प्रयोग करत फोनमध्ये सातत्याने नावीन्य दिले.

कंपनीचा हा प्रवास फिनलंड या देशासाठी खूप अभिमानाचा होता. कारण फिनलंडच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नोकिया कंपनीचा चार टक्के वाटा होता. नोकियाच्या एकूण कर्मचारी भरतीमध्ये फिनिश नागरिकांना एक टक्के जागा असायची, तर सन २००९ मध्ये कंपनी ४० टक्के वाटा संशोधन आणि विकासासाठी खर्च करत होती. पण कंपनीला जशी उतरती कळा लागली तसा तिचा सर्वातील सहभाग कमीकमी होत गेला.

सकल राष्ट्रीय उत्पन्नातील सहभाग सन २०१२ मध्ये चार टक्क्यांवरून ०.२ टक्क्यांपर्यंत आला होता, तर फिनिश कर्मचाऱ्यांनाही केवळ ०.२ टक्के जागाच राखीव दिल्या जात होत्या. याशिवाय संशोधन आणि विकासावरील खर्चही कमी होऊन तो १७ टक्क्यांवर आला होता.

Story img Loader