रुचकर विशेष, सौजन्य –
कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर खायला काय करायचं या गरजेतून भडंगचा जन्म झाला असावा, त्याचप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्टय़ासम काहीतरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा. मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.
स्वत:ला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथं हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जाताना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणवून टाकणाऱ्या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. ‘पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा. कारण तुम्ही कुठंही कोपऱ्यात बसला असाल तरी तुम्हाला हवं ते व्यवस्थित मिळतं’ असं पूर्वीचे लोक म्हणत, तसंच मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.
मिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, असं हॉटेल किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रिक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडय़ाच्या तिन्ही बाजूंना असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या प्लेटमधला पाव हातात धरून दुसऱ्या हाताने पावाचे तुकडे मिसळीच्या रश्श्यात भिजवत मिसळ हाणणे.
मिसळीला फाकडू बनवण्यात तिच्यात असलेल्या घटकांचा वाटा फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्या वरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी ऑप्शनल असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा या पदार्थापकी काहीही असू शकते. या सर्वावर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतिमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यावर तरंगणारी र्ती! ‘मिसळीची र्ती’ हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणाऱ्यांच्यासुद्धा!) लाळग्रंथींचे नळ धो धो वाहायला सुरुवात होते. आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगरे मंडळी लज्जत वाढवायला मदतीला असतातच. काही ठिकाणी हंगामात कैरीच्या बारीक फोडीही वरून घालतात.
मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणाऱ्याना पंगतीत काटकोनातच बसवायला हवं! हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळ्यावर फोडणी आणि तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं! त्यापेक्षा भोपळ्याचे घारगे केले तर किती दणादण संपतात!
मिसळीबरोबर घट्ट नातं आहे ते पावाचं.. अमुक एका ठिकाणी तर मिसळीबरोबर ब्रेडचे स्लाइस मिळतात, म्हणून तिथल्या मिसळीकडे पाठ फिरवणारी मंडळी आहेत, इतकं पावाचं महत्त्व मिसळीसोबत आहे. पण हे काहीही असलं तरी पहिला मान मिसळीचाच.. मिसळ समोर आली की थेट पाव मोडून रश्शात बुडवण्याआधी नुसत्या मिसळीचे दोन चमचे चाखून बघा. कारण पावामुळे मिसळीची मूळ चव बऱ्याचदा लक्षात येत नाही. नुसतंच उदरभरण होतं. आम्हाला काही ठिकाणी तर उसळीला आंबूस वास यायला लागलाय हे केवळ या सवयीमुळे लक्षात आलेलं आहे. बाकीचं पब्लिक मात्र मजेत खात होतं. कारण फुल्ल र्ती-रस्सा-पाव आणि गप्पा यामुळे तो किंचित आंबूसपणा लक्षात येत नव्हता. म्हणून पहिले दोन चमचे नुसत्या मिसळीचे खा, मग समजेल ठाण्यातल्या मामलेदार कचेरीच्या मिसळीतली उसळ किती चवदार असते आणि दिवसभर तिथला घाणा का सुरू असतो ते..!
ट्रेकर्स मंडळींचे नि मिसळीचे एक वेगळे भावानुबंध आहेत. सह्यद्रीत सक्काळी सक्काळी कुठल्याही दुर्गपायथ्याच्या मोठय़ा गावात जाऊन पडलात तरी मिसळ ही मिळणारच आणि ती एकदा चापली की दुपारच्या जेवणापर्यंतची निश्चिती असते. कैकदा तर मिसळ अख्खा ट्रेकही तारून नेते. ट्रेकच्या फोटोंमध्येदेखील आधी मिसळीचा फोटो आणि मग किल्ल्याचा पायथ्याकडून घेतलेला फोटो असतो इतका मान मिसळीचा आहे. या मंडळींची कुठल्या गावात कुठल्या हॉटेलात किंवा गाडीवर मिसळ चांगली मिळते या विषयावर पीएच.डी. असते आणि चांगल्या ठिकाणांची प्रसिद्धीही हेच लोक जास्त करीत असतात.
‘येथे ट्रेकर्सना सवलतीच्या दरात मिसळ मिळेल’ अशा पाटीच्या आम्ही शोधात आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा