कोकणात नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. मात्र फणसाचे झाडही बागायतदारांसाठी आता कल्पवृक्ष ठरत आहे. रत्नागिरीतील हातखंबा येथील मिथिलेश देसाई याने हेच सिद्ध करून दाखवले आहे. जगभरातील ८६ फणसांच्या जातीची त्यांनी लागवड केली आहे. हे करतानाही केवळ फलोत्पादनापुरते न राहाता त्यांनी फणस प्रक्रिया उद्याोगातही पाऊल टाकले आहे. आज परदेशात फणसाची झाडे आणि पाने निर्यात करून त्याने कोकणातील शेतकऱ्यांसमोर आदर्श घालून दिला आहे. याच नव्या वाटेबद्दल…
कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम अशी विविध प्रकारची फळपिके घेतली जातात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील मिथिलेश देसाई यांनी केवळ फणसाची बाग तयार केली आहे. मिथिलेश हे राहुरी कृषी विद्यापीठातून बिटेक अॅग्रीकल्चरल इंजिनिअरींगमध्ये पदवीधर आहेत. खरेतर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिथिलेश यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन नागरी सेवेत प्रशासकीय अधिकारी बनायचे होते. तसे प्रयत्नही त्यांनी केले. त्यात यशही आले होते. ते लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र शेवटच्या मुलाखतीत ते अपयशी ठरले. त्यानंतर मात्र मिथिलेश यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय सोडून दिला. गावी येऊन इतर कुठे नोकरी करण्यापेक्षा आपल्याच शेतीत पूर्णवेळ काम करण्याचे निश्चित केले.
मिथिलेशच्या वडिलांनी २०१० पासून शेतात फणस लागवडीला सुरुवात केली होती. उन्हाळ्यात ते हातखंबा येथे महामार्गावर जाऊन फणस विकत असत. फणसाची उपयुक्तता त्यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे फणसावर संशोधन करून फणस लागवड करण्याचा निर्णय मिथिलेश यांनी घेतला. जगभरातील फणसांच्या प्रजाती, त्यांचे गुणधर्म, त्यांची उपयुक्तता यावर मिथिलेश यांनी अभ्यास सुरू केला. सुरुवातीला २०१४ मध्ये ३६ प्रकारच्या ४०० फणसांची लागवड त्याने बागेत केली. २०१७ मध्ये केरळमधील वायनाड येथे फणस या विषयावर एक जागतिक स्तरावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमुळे फणसाकडे बघण्याचा मिशिलेशचा दृष्टिकोनच बदलला, जागतिक पातळीवर फणसाचे महत्त्व पहिल्यांदा त्याला लक्षात आले. व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड देशात फणस पिकाला असलेली मागणी समजली. फणसातील औषधी गुणधर्म काही आहेत याचीही जाणीव झाली. त्यामुळे बागेत फणस लागवड वाढवण्याचा निर्णय घेतला.
फणसाच्या विविध प्रकारचा झाडांचे संकलन सुरू केले. जगभरात फणसांचे १२८ प्रकार आहेत. त्यापैकी ८६ प्रकारचे फणस मिथिलेशने आपल्या शेतात लावले आहेत. येत्या दोन वर्षात शंभर प्रकारच्या फणसांची लागवड करण्याचा मिथिलेशचा विचार आहे. २०२० साली मिथिलेशने शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. सुरुवातीला १०० शेतकरी होते. आज १०७७ शेतकरी सदस्य आहेत. कोकणातील सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ही कंपनी ओळखली जात आहे. ज्या माध्यमातून प्रामुख्याने फणस, काजू आणि आंबा अशी पिके घेतली जात आहेत. २०२२ साली या कंपनीला जर्मनीतून फणसांच्या पानांची मोठी मागणी (ऑर्डर) प्राप्त झाली. पहिल्या वर्षी १ टन पाने निर्यात केली. दुसऱ्या वर्षी ५ टन फणसांच्या पानांची निर्यात केली. एवढ्या पानांचे जर्मनीत काय केले जाते याचा शोध घेतला तेव्हा असे लक्षात आले की या पानातील अर्क काढून तिथे कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी वापरले जात आहेत.
केरळ राज्याचे राज्यफळ हे फणस आहे. पण तिथे व्हिएतनाम, मलेशिया आणि आफ्रिका खंडातून आयात केली जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे फणसाची रोपवाटिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या प्रमाणात रोपे तयार केली. ही रोपे २०२३ साली मॉरीशिअसला निर्यात केली. भारतातून फणसाची रोपे निर्यात होण्याची ही पहिलीच वेळ होती. यामुळे उत्साह वाढला. फसण प्रक्रिया उद्याोग सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे तळलेले गरे आणि फणस पोळी येवढ्यापुरते फणस प्रक्रिया उद्याोग केले जात होते. त्यांबरोबर पिक्या गरांपासून चिप्स आणि फणस बी पावडर बनवायला सुरुवात केली. आता फणसाच्या सालीपासून गुरांसाठी पौष्टिक खाद्या तयार करण्याचा प्रकल्पही घेतला जाणार आहे.
फणस लागवड कशासाठी?
कोकणात आंबा आणि काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आंबा पीक हे निसर्गावर अवलंबून असलेले आणि खत आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केले जाणारे पीक बनले आहे. हवामानातील बदल आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी साधारणपणे ४० ते ५० टक्केच आंबा बागायतदारांच्या हाती लागत आहे. काजू पिकाची परिस्थिती फारशी वेगळी नाही. केंद्र सरकारने २०१७ मध्ये काजू बियांवरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे कोकणातील काजू बियांना पूर्वी मिळणारा १८० ते २०० रुपयांचा दर आता १०० ते १०५ रुपयांवर आला आहे. परदेशातील काजू ६० ते ७० रुपयाने उपलब्ध होत असल्याने कोकणातील काजूला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. फणसाच्या झाडांना देखभाल खर्च येत नाही. झाडाचे आयुष्य ८० ते ३०० वर्ष आहे. त्यामुळे पाच पिढ्या बसून खातील असे हे झाड आहे. खत आणि फवारणीची गरज नाही. दीड वर्षात फळधारणा सुरू होते. फणसाची पाने, फांद्या, गरे, बी राहिलेली फणसाची साले याचा वापर होऊ शकतो. परदेशात हजार रुपये किलोने फणस बी विकली जाते, आपल्याकडे त्याची किंमत शून्य आहे. त्यामुळे या संधी शेतकऱ्यांनी ओळखायला हव्यात, नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी याकडे पाहायला हवे असे मिथिलेश यांनी सांगीतले.
दिवसाला १ टन फणस पानांची मागणी
मिशिलेश यांच्या फणस संशोधनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यांना युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर फणस शेतीबद्दल सादरीकरण करण्याची संधी त्यांना नुकतीच प्राप्त झाली आहे. वनतारा येथे उभारण्यात आलेल्या वन्यजीव सेंटरमधूनही दिवसाला १ टन फणस पानांची मागणी मिथिलेश यांच्याकडे नोंदविण्यात आली आहे.
फणस हे अत्यंत पोषकद्रव्य असलेले फळ आहे. जागतिक पातळीवर हे सिध्द झाले आहे. पण त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. ज्याप्रमाणे कोरफडीला गेल्या काही वर्षात जगतमान्यता प्राप्त झाली, त्याच धर्तीवर फणसाचे मार्केटींग होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही सध्या प्रयत्नशील आहोत.– मिथिलेश देसाई, फणस संशोधक
harshad. harshad. kashalkar@expressindia. Com