एखाद्या क्षेत्रात सर्वस्वानं झोकून देऊन त्यात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या यशवंतांची यशोगाथा कथन करणारं साप्ताहिक सदर..

या घटनेला तीस-बत्तीस र्वष झाली असतील. बोरीवलीच्या गोराई खाडीत भरावाचं काम सुरू होतं. त्यासाठी दगड-माती भरलेले ट्रक तिथल्या झोपडपट्टीजवळून भरधाव ये-जा करीत असत. बेदरकारपणे घुसणारा प्रत्येक ट्रक जणू जगणं हिरावून घेण्यासाठीच टपलाय असं वाटायचं. त्या झोपडपट्टीत रामनवमीच्या आदल्या मध्यरात्री एक भरधाव ट्रक घुसला. फुटपाथवर झोपलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता या मजुरांच्या अंगावरून तो ट्रक गेला आणि झोपडपट्टी हादरली. दुसऱ्या दिवशी स्थानिक आमदार राम नाईक यांनी या झोपडपट्टीला भेट दिली. त्या झोपडीपासून सहा-सात झोपडय़ांच्या पलीकडील एका झोपडीच्या प्लास्टिकच्या भिंतीवर टांगलेली चित्रे पाहून रामभाऊ थबकले. कुणीतरी त्यांना झोपडीत घेऊन गेला आणि रामभाऊंना आश्चर्य लपवता आले नाही. आतमध्ये काही अप्रतिम शिल्पे रांगेत उभी होती..
दुसऱ्या दिवशी त्या झोपडीत राहणाऱ्या शिल्पकाराला रामभाऊंचा निरोप मिळाला आणि तो त्यांना भेटायला गेला. एका कलेला कलाटणी देणारा तो क्षण..
नगर जिल्ह्यातल्या एका खेडय़ात जन्मलेल्या आणि तिथंच वाढलेल्या उत्तम पाचारणेंना आपल्या बोटात जादू असल्याचा साक्षात्कार गावात असतानाच झाला होता. त्याकाळी शिकलं की नोकरी मिळते, एवढाच समज रूढ होता. त्यामुळे उत्तम पाचारणेंना कलाशिक्षकाची नोकरी मिळवण्याचा ध्यास लागला आणि ते पुण्याला आले. एका पिशवीत मावतील एवढे कपडे, एक जेवणाची थाळी, पेला आणि रंगपेटी एवढाच त्यांचा जामानिमा होता. पुण्याच्या अभिनव कलामहाविद्यालयात आर्ट टीचरचा डिप्लोमा केला की कुठल्यातरी शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी मिळणार, हे पक्कं गणित होतं. घरून निघताना वडिलांनी हातावर ठेवलेली दहा रुपयांची नोट खिशात सांभाळत उत्तम पाचारणे पुण्याच्या एस. टी. स्टँडवर उतरले आणि भिरभिरत्या नजरेनं ते शहर न्याहाळत चालू लागले. फिरत फिरत पाषाणला पोहोचले. एका वीटभट्टीवर ट्रक मोजायचं काम मिळालं. आणि मुख्य म्हणजे राहायला खोली मिळाली. दिवसाकाठी काही पैसेही मिळायचे. अशा तऱ्हेनं पुण्यातली कलासाधना सुरू झाली. वीटभट्टीवरूनच पुण्याकडे जाणारा एखादा ट्रक पकडून, पुढे थोडी पायपीट करून महाविद्यालयात पोचायचं आणि संध्याकाळी चालत पाषाणला परतायचं- असा दिनक्रम सुरू झाला..
हे खरं तर खडतर होतं. महाविद्यालयातलं एकंदर वातावरण पाहता आपण घेतोय ते शिक्षण खूपच तोकडं आहे, हे उत्तम पाचारणेंना जाणवत होतं. कॉलेजवरून परतल्यावर वीटभट्टीवरच्या मुलांना चित्रकला शिकवायची आणि उरलेल्या वेळात अभ्यास करायचा. कला ही समाजाच्या निरीक्षणातून फुलते, हे त्यांना तिथं प्रकर्षांनं जाणवलं. आणि आपलं शिक्षण समाजाशी नातं जोडणारं आहे हे त्यांना उमगलं. अन् आपसूक समाज व निसर्गाच्या निरीक्षणाची ओढ त्यांना लागली. मूड टिपण्याचा, आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला..
चित्रकार आपली चित्रं विकतात, त्यांना चांगली किंमतही मिळते, हेही पाचारणेंना पुण्यातच समजलं. चित्रकलेची राज्यस्तरीय स्पर्धा असते, त्यात जिंकलं तर बक्षीसही मिळतं, हेही तिथेच पहिल्यांदा समजलं आणि त्यांच्या मनात एक चित्र आकार घेऊ लागलं. पाषाणहून पुण्यापर्यंतची पायपीट, खांद्यावरची झोळी आणि डोळ्यांत शिक्षणाची स्वप्नं असं त्या चित्राचं बाह्यरूप निश्चित झालं, आणि पाचारणेंचं पहिलं स्वत:चं चित्र राज्यस्तरीय स्पर्धेत दाखल झालं. त्याचं शीर्षक होतं- ‘एकटा’!
..इथपर्यंत आपल्या कलाप्रवासाचा पहिला टप्पा सांगताना काहीसं त्रयस्थपणे भूतकाळाकडे पाहणाऱ्या उत्तम पाचारणेंनी पुढच्या टप्प्यात मात्र या कथेत स्वत:ला झोकून दिलं.. आणि ते प्रथमपुरुषी भाषेत बोलू लागले..
‘त्या चित्राला पहिलं बक्षीसही मिळालं आणि कलाक्षेत्रात आपण काहीतरी केलं पाहिजे, या ओढीनं मला पछाडलं. दरम्यान, कलाशिक्षक म्हणूनचा डिप्लोमाही पूर्ण झाला होता. निकालाच्या यादीत उत्तम पाचारणे हे नाव पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकावर होतं..
‘माझा आर्ट टीचर डिप्लोमाचा निकाल लागला तेव्हा वेगवेगळ्या शाळांमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून नेमणुकीची नऊ पत्रे माझ्या हातात होती. कला- महाविद्यालयात जयप्रकाश जगताप हे माझे शिक्षक होते. मी शिक्षकी पेशात गेलो तर कुजून जाईन असं त्यांना वाटत होतं. त्यांनी मला पुढील शिक्षणाचा सल्ला दिला. त्यानुसार मी मुंबईच्या जे. जे. कलामहाविद्यालयात जाऊन पुढे शिकायचं ठरवलं. पुण्याहून मुंबईला निघताना जगताप सरांनी दोनशे रुपये आणि कपडय़ांचा एक जोड दिला. आणि त्यांनीच उभारी देऊन फुलवलेलं स्वप्न सोबतीला घेऊन मी मुंबईत दाखल झालो. कला संचालनालयात सुगंधी नावाचे एक अधिकारी होते. जगताप सरांचा त्यांच्याशी परिचय होता. त्यांनी सुगंधी यांना देण्यासाठी माझ्याकडे चिठ्ठी दिली होती. ती घेऊन मी सुगंधी यांच्याकडे गेलो..
‘दुसऱ्या दिवशी जे. जे. स्कूलच्या आवारात मी दाखल झालो. तिथल्या कलामय वातावरणानं मी अक्षरश: भारावून गेलो होतो. शिल्पकलेचे अप्रतिम नमुने न्याहाळताना मीही मनाशी ठरवलं की, आपण शिल्पकार व्हायचं! त्याआधी ‘अभिनव’मध्ये शिकताना मी शिल्पकलेचा प्रयत्न केला होता. जे. जे.मधला शिल्पकलेचा वर्ग मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी चित्रकलेसाठी प्रवेश घेतला होता, पण शिल्पकलेचं माझं वेड दिवसागणिक घट्ट घट्ट होत होतं. सहा महिन्यांनंतर जणू चमत्कार घडल्यासारखा मला खानविलकर सरांनी शिल्पकलेच्या वर्गात प्रवेशासाठी बोलावून घेतलं. आपलं स्वप्न आपल्यासोबत वर्तमानातही वाटचाल करतंय आणि पुढेही ते साथ देणार याची मला तेव्हा खात्री पटली.
‘मी चित्रकला सोडून शिल्पकलेकडे जाणार असं कळल्यावर आमचे संभाजी कदम सर अस्वस्थ झाले. शिल्पकलेकडे वळून मी माझ्यातल्या चित्रकाराचा बळी देणार असं त्यांना वाटत होतं. पण माझा निर्धार पक्का होता. कारण मी ज्या खेडेगावात जन्मलो होतो, तेथे माझ्या हातात रंगाचे ब्रश नव्हते. हातोडा, लोखंड, लाकूड आणि माती यांच्याशीच तर माझं पहिलं नातं होतं. मी कदम सरांना पटवून सांगितलं आणि त्यांनी काहीशा नाखुशीने, पण तोंडभरून मला आशीर्वाद दिला. अशा रीतीनं चित्रकलेकडून शिल्पकलेच्या दालनात माझा प्रवेश झाला होता. माझ्या भविष्याची ही सुरुवात होती.
‘पुढे प्रत्येक वर्षी पुरस्कारांची मालिका सुरू झाली. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सुवर्णपदकही मिळालं. अशा तऱ्हेनं माझं स्वप्न आणि शिक्षणही पूर्णपणे सत्यात आलं होतं..
‘..त्याचदरम्यान माझ्या झोपडीशेजारी ती दुर्घटना घडली. त्या विचित्र योगायोगातून राम नाईक यांची भेट झाली. आणि त्या दिवशी व्यावसायिक शिल्पकार म्हणून या क्षेत्रात माझं पहिलं पाऊल पडलं. बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावरचा विवेकानंदांचा पुतळा बनवण्याचं काम राम नाईकांनी माझ्यावर सोपवलं आणि कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात मी तो पुतळा साकारला..
‘बांधकामावर मजुरी करणाऱ्या एका गरीब मजुराचा मुलगा शिल्पकार झाला होता. डोक्यावर छप्पर नसलं तरी डोक्यातल्या प्रतिमा बोटांच्या माध्यमातून साकारणं आपल्याला सहज शक्य आहे, हा माझा विश्वास दुणावला होता.
‘तेव्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. रामभाऊंनी त्यांना पुतळ्याच्या अनावरण समारंभास निमंत्रित करण्यासाठी त्यांची भेट घेतली. शंकररावांना त्या समारंभास येणं कार्यबाहुल्यामुळे शक्य नव्हतं. पण त्यांनी या उपक्रमास मनापासून दाद दिली, आणि समारंभास येण्याऐवजी दुसरं काहीतरी काम सांगा, असं ते राम नाईकांना म्हणाले. त्यावर ‘एवढय़ा सुंदर शिल्पकृतीचा निर्माता फुटपाथवरच्या एका झोपडपट्टीत राहतो, त्याला घर द्या,’ असं रामभाऊंनी त्यांना सुचवलं. शंकररावांनी तात्काळ ते मान्य करून मला मुख्यमंत्री कोटय़ातून घर दिलं. आणि खेडय़ातून वीटभट्टीवर, वीटभट्टीतून फुटपाथवरच्या झोपडीत वास्तव्य करणाऱ्या मला मुंबईत हक्काचं स्वत:चं छप्पर मिळालं. शिल्पकार म्हणून ओळखही मिळाली. यथावकाश मुंबईच्या कलाक्षेत्रानेही मला स्वीकारलं. अतिशय प्रतिष्ठेच्या बॉम्बे आर्ट सोसायटीचं अध्यक्षपदही पुढे माझ्याकडे चालून आलं.
‘अंदमानची स्वातंत्र्यज्योत, विधानसभेतला शाहूमहाराजांचा पुतळा, बोरीवलीतला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, दहिसरमधला अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा, तर मराठवाडय़ातल्या सर्व जिल्ह्यांत ‘मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ’ अशी माझी असंख्य शिल्पं आज दिमाखात उभी आहेत. अनेक घरांचे दिवाणखाने, अनेक उद्योगसमूहांची कार्यालये आणि अनेक व्यावसायिक आस्थापनांच्या सभागारांना माझ्या शिल्पकृतींची शोभा लाभली आहे..
‘हे करत असतानाच देशासाठी प्राण वेचणाऱ्या जवानांच्या जीवनाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिशिल्पांची मालिका तयार करण्याचं एक स्वप्नही माझ्या मनात आकार घेत होतं. महाराष्ट्रात अशी मालिका घडवण्याचा प्रस्ताव मी सरकारला दिला होता. राम नाईक यांच्याशी त्यासंबंधी बोलणं झालं होतं. त्यांच्याही मनात ही कल्पना घर करून राहिली होती. उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून रामभाऊंनी सूत्रे हाती घेतली आणि उत्तर प्रदेशात लखनौ येथे हा प्रकल्प साकारण्यासाठी त्यांनी मला निमंत्रण दिलं. परमवीरचक्रविजेत्या हुतात्म्यांचे स्मृतिशिल्प लखनौमध्ये आज पर्यटकांचे आणि उभ्या देशाचे आदरस्थान म्हणून उभे आहे..’
उत्तम पाचारणे यांची ही वाटचाल आता यशाच्या शिखरावर स्थिरावली आहे. शिल्पकलेचं नातं मातीशी असतं. पाचारणे यांच्या यशामध्ये ‘माती’चा मोठा वाटा आहे याचा त्यांना कधीच विसर पडलेला नाही, हे त्यांचं वेगळेपण!
दहिसर चेकनाक्याजवळ बाजूलाच त्यांचा स्टुडिओ आहे. माणूस आणि मन यांचे मूड ओळखून आकार धारण करणारे चेहरे, मूर्त व अमूर्त शैलीतील अनेक शिल्पे तिथे या कलावंताच्या अस्सल प्रतिभेची साक्ष देत उभी आहेत.
dinesh.gune@expressindia.com

Story img Loader