|| दिनेश गुणे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आता कात टाकतोय. येत्या काही वर्षांत तो पूर्ण होईल. पण त्यामुळेच कोकणी माणूस पुन्हा धास्तावलाय.. त्याला भिती आहे हिरवे वैभव नष्ट होण्याची. पण या भयाबरोबरच त्या संकटावर मात करण्यासाठीही तो उभा राहिलेला आहे. एक ‘आंदोलन’ उभारतोय, रुजवतोय, पेरतोय तो. मूकपणे. जमेल तसे.. त्या हिरव्या आंदोलनामागील भावनांची आंदोलने टिपणारा खास लेख..

सुमारे ४५ वर्षांपूर्वीचा काळ. आणीबाणीचे दिवस होते. देशात सगळीकडे होती तशीच भयग्रस्त शांतता कोकणात होती. पण त्या दिवसांतही कोकणवासीयांच्या नकळत कोकणात एक काम सुरू होते. कोकण रेल्वेच्या मार्गासाठी सर्वेक्षण!.. तेव्हा आजच्यासारखी समाजमाध्यमे, दूरचित्रवाणी किंवा वर्तमानपत्रेही मुबलक नव्हती. त्यामुळे असे काही सर्वेक्षण सुरू आहे, याची फारशी कुणकुण कुणाला नसायची. पण आता कोकणात रेल्वे नक्की येणार, अशी चर्चा व्हायची आणि उगीचच काळजीचे सूर उमटू लागायचे. ‘कशाला हवी ती रेल्वे नि फिल्वे?.. आपलं बरं चाललंय की हितं.. घरात गरजेपुरतं धान्य पिकतंय, सगळं सुरळीत सुरू आहे. रेल्वे गावात आली, की गर्दी वाढणार, परप्रांतीय माणसं कोकणात येणार आणि आमची वाट लावणार.. कशाला हवा तो विकास?.. आणि रेल्वे आलीच, तर आम्ही गावातून उठून डोंगरावरच्या आमच्या शेतावर जाऊन रहाणार.. नको आम्हाला ती रेल्वे!’..

कोकणाच्या विकासाचं, कोकणच्या ‘कॅलिफोíनया’चं स्वप्न गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून कोकणात रुजतंय. कॅलिफोíनया करा, पण तो विकास आम्हाला नको, रेल्वेही नको.. आम्ही आहोत ते बरे आहोत, अशीच मानसिकता सगळीकडे दिसायची. ते खरंही होतं. शहरात जाऊन एखादी पदवी मिळाली किंवा हात मिळवत्या वयाचे झाले, की घरटी एक माणसाने मुंबई गाठायची, मिळेल तो रोजगार पकडायचा, आणि महिन्याच्या पहिल्या तारखेला गावी मनीऑर्डर धाडायची.. त्यावर गावाकडच्या माणसांची बरी गुजराण झाली, की घर सुखी झालं, अशीच मनोवृत्ती. फार काही अपेक्षाही नाहीत आणि महत्त्वाकांक्षांचे पंख कोकणाच्या पलीकडे पसरले गेलेले नाहीत. त्याही अवस्थेत कोकण सुंदरच होते, पण संपन्नतेला सीमा होत्याच.. घर, अंगण, वाडी, आंब्याफणसाची झाडं, वाडीतली नारळी-पोफळीची बाग, पाटाचं पाणी, गुरंढोरं, पावसाळ्यातली भातशेती आणि रोजच्या जेवणाला आमटीभाताची, सुकटभाकरीची मेजवानी.. एवढं असलं, की आणखी काय हवं, हीच मानसिकता. तेही सुखच होतं, पण त्याही पलीकडे सुख असतं आणि तेही आपल्याला मिळायला हवं, असं फारसं कुणाला वाटलंच नाही.

अशाच परिस्थितीत अखेर देशात जनता राजवट आली. कोकणचे खासदार असलेले मधू दंडवते रेल्वेमंत्री झाले, आणि १९७७ मध्ये त्यांनी कोकण रेल्वेचा आराखडा मंजूर करून टाकला. बातमी गावोगाव पसरली. आनंद, काळजी अशा संमिश्र भावनांनी त्याचे पडसाद कोकणात उमटले. आणि अखेर रेल्वे येणारच याची खात्री होताच, त्याच्या स्वागताचे मोजके सूर उमटू लागले.

आता तो इतिहास झाला आहे. एक पिढी मागे पडल्याने, तेव्हाचे सूरही आता मावळले आहेत आणि कोकण रेल्वे ही कोकणाची जीवनरेखा झाली आहे. दररोज मुंबईतून कोकणात आणि गावाकडून मुंबईत येऊन धंदा-व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांमुळे कोकणाला नव्या समृद्धीची स्वप्ने पडू लागली आहेत. हाती पसा खुळखुळू लागलाय आणि आपल्या जगापलीकडचं जगही सुंदर आहे, त्याने आपल्याला स्वीकारलंय, या जाणिवेने कोकणी माणूस सुखावून गेलाय..

कोकण रेल्वे आल्यानंतर झालेला हा कोकणाचा कायापालट केवळ भौतिक नाही. मानसिकतेतही असाच बदल झालाय. रेल्वे केवळ भूप्रदेश जोडते असे नव्हे, तर माणसेही जोडते, वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख घडविते आणि त्यातून साऱ्या संस्कृती अधिक समृद्धही होतात. कोकणातील जनतेला कोकण रेल्वेने हा अनुभव दिला. कोकणच्या विकासाचे पहिले पाऊल रेल्वेमुळे पडले.. कोकणाची मुंबईशी जवळीक वाढली आणि मुंबईच्या राजकारणाशी कोकणाचे धागे आणखी घट्ट झाले. कोकणातील प्रत्येक विकास प्रकल्पासोबत राजकारणही रंगत चालले आणि पुन्हा, आमची शेती, आमची मासेमारी, आमच्या बागा आणि आंबे-फणस.. यात आम्ही खूश आहोत, असा जुना सूर उमटू लागला. शांतपणाने जगणारे कोकण प्रत्येक विकास प्रकल्पाच्या चाहुलीबरोबर काहीसे धगधगू लागले.. पण समन्वयाने, संवाद साधून समाजाला सोबत घेऊन प्रकल्प पूर्ण झाले, तेव्हा त्याचे महत्त्वही लोकांनी पटवून घेतले. नव्या रोजगार संधींचे सोने हाती येताच, झाले ते बरेच झाले असेही सूर उमटू लागले.

या बदललेल्या सुरावटीचा नेमका मुहूर्त साधून कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आता कात टाकतोय. जवळपास ९० वर्षांपासून कोकणातून जाणारा हा रस्ता येत्या काही वर्षांत पूर्ण होईल. पण दरम्यानच्या काळात, या रस्त्याच्या कामाकडे पाहून पुन्हा कोकणी माणूस धास्तावलाय. ते साहजिकही आहे. कित्येक पिढय़ांपासून ओळखीची झालेली, सावली धरणारी शेकडो झाडे या कामामुळे जमीनदोस्त झाली आहेत. रस्त्याकडेची हिरवाई पार हरवली आहे आणि खोदाईमुळे उघडी पडलेली तांबडी माती, भेसूर वाटू लागली आहे. या मातीशी, झाडांशी त्याचे जुने नाते आहे. म्हणूनच रस्त्याच्या दुतर्फा असलेली हजारो झाडे डोळ्यादेखत कापली गेली, जाळून त्यांची राख केली गेली आणि त्या तांबडय़ा मातीत मिसळून होत्याची नव्हती झाली, ते पाहून कोकणी माणूस कळवळला. कोकणाचे वैभव या रस्त्यामुळे होणाऱ्या विकासात हरवणार की काय या काळजीने काळवंडला.

आज मुबंईहून कोकणाकडे निघताना, पनवेल पार केले, की रुंदीकरणाच्या कामाच्या खाणाखुणा सुरू होतात. या खाणाखुणा विकासाच्या आहेत, उद्या याच वाटेवरून विकास कोकणात शिरकाव करणार आहे, या जाणिवेने, या वाटेने कोकणात जाणारा चाकरमानी सुखावतो, पण लगेचच तो या नव्या भविष्याच्या चाहुलीने बेचनही होतो. उद्या रस्ता होईल, पण रस्त्याच्या दुतर्फा असलेले हे हिरवे वैभव तेव्हा असेल का, हा प्रश्न त्याच्या मनात येतोच.. मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी प्रचंड यंत्रणा रुंदीकरणाच्या कामात मग्न दिसते. तांबडय़ा मातीचा समांतर रस्ता सुरू होतो, तेव्हा जुना, दोनपदरी काळा रस्ता केविलवाणा भासू लागतो. अंग चोरून तो गावाकडे पुढे जात असतो, ते पाहून कोकणी चाकरमानी हिरमुसलाही होतो. रस्तारुंदीकरणाच्या या कामामुळे कोकणच्या वाटेवर सध्या काहीसे भकास वातावरण आहे. विकास होईल तेव्हा होईल, पण या विकासाने कित्येक वष्रे जपलेल्या वृक्षराजीचा बळी घेतल्याची वेदना प्रत्येक कोकणी माणसाच्या बोलण्यातून उमटत असते. या कामामुळे कोकणाचे हिरवे सौंदर्य सध्या काहीसे करपून गेले आहे.

गावे, रस्ते, घरे आणि माणसे यांचे एकमेकांशी एक नाते असते. ही कामे सुरू झाली, माती भगभगीत भासू लागली, घरे अलिप्तपणे हा बदल पचविण्याची तयारी करू लागली, आणि माणूसही विमनस्क झाला. हे कोकणाचे आजचे चित्र आहे. पण या चित्राने कोकणातला माणूस खचलेला नाही. हे काही काळापुरतेच आहे, यातूनच पुढे विकास होणार आहे, ही हिरवाई पुन्हा उगवेल, जुन्या घरांचे नव्या झाडांशी, नव्या रस्त्याशी नवे नाते पुन्हा जडेल, अशी त्याची खात्री आहे. भविष्याच्या भयाने खचून जायचे नाही, हे त्याने ठरविले आहे, आणि भविष्यातील संभाव्य संकटाला परतवून लावण्याची तयारीही त्याने सुरू केली आहे. विकासामुळे कोकणाचे कोकणपण हरवणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी आपलीच आहे हे त्याने मनाशी ठरविले आहे. सरकार करेल तेव्हा करेल, पण इथे आपल्याला रहायचंय, जगायचंय आणि आपलं, आपल्या भावी पिढय़ांचं जगणं निसर्गावरच अवलंबून आहे हे त्याला माहीत आहे. झाडे भुईसपाट झाली, की पाऊस कमी होणार, मग निसर्गचक्र बिघडणार आणि पावसावर अवलंबून असलेलं जगणंही कठीण होणार हे त्याने ओळखलं आहे.

हे चक्र बिघडू द्यायचे नाही, याची त्याला जाणीव झाली आहे. म्हणूनच या हमरस्त्याकडेच्या काही गावांत सध्या काही घरांमध्ये एक वेगळीच हालचाल जाणवते. उद्या रस्ता पूर्ण होईल, पण त्यावर सावली धरणारी जुनी झाडे नसतील.. असा उघडाबोडका रस्ता कोकणाच्या हिरवाईला शोभा देणारा नाही, हे ओळखून, रस्ता पूर्ण झाल्यावर त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी या घरांनी आतापासूनच, वड-िपपळाची आणि जंगली झाडांची रोपे जोपासण्यास सुरुवात केली आहे. कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे हे काम सुरू झाले आहे आणि कानोकानी होऊन ते वाढतेही आहे. यातून एक मूक चळवळ सुरू होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. एखाद्या विकास प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावरची आंदोलने कोकणातही झाली, पण विकासाच्या साथीसाठी, अशी अनोखी चळवळही इथेच रुजू पाहते, हे कोकणाचे वेगळेपण आहे.. रस्त्याचे काम पूर्ण होताच, ही रोपे आपली जागा घेतील, वाढत जातील आणि पुन्हा नव्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कोकणाचे जुने सौंदर्य आकाराला येईल, असे स्वप्न या घरांमधील अनेकांच्या डोळ्यांत दिसतं.

या स्वप्नपूर्तीचा दिवस फार लांब नाही. चार-पाच वर्षांत पुन्हा या तांबडय़ा मातीचे जुने नाते नव्याने फुलेल, असा विश्वास इथे दिसू लागला आहे.

प्रत्येक विकासाला उगीचच विरोध करायचा, हा कोकणाचा पिंड नाही. आपले भविष्य कुठे आहे, हे त्याला माहीत आहे. उद्या रस्ता झाला, की अंतर कमी होईल, नव्याने गावे जोडली जातील, आणि मनेही जोडली जातील.. रेल्वेने सुरू केलेले, मने व संस्कृती जोडण्याचे काम हा नवा रस्ता अधिक जोमाने करेल, याची कोकणाला खात्री आहे. कोकण त्यासाठी उत्सुकही आहे..

dinesh.gune@expressindia.com

Story img Loader