(राग-अनुराग, अनुवाद – विलास गीते, मैत्रेय प्रकाशन या पुस्तकातून संकलित साभार)
मला अंतर्मुखी संगीत आवडतं. तोच माझा ‘अॅप्रोच’ आहे आणि तो मी बाबांकडूनच (अल्लाउद्दीन खान यांच्याकडून) ग्रहण केला. बाबा पूर्वबंगालचे – म्हणजे आताच्या बांगलादेशाचे रहिवासी. खेडय़ातले गृहस्थ. त्यांना पश्चिम बंगालमध्ये प्रचलित असलेली बंगाली बोलता येत नसे. नेहमी गावाकडची भाषा वापरीत. सुरुवातीच्या दिवसांत तर धोतर अशा पद्धतीने नेसत, की ते गुडघ्यांच्या वर येई. डोक्यावर टोपी, दाढी-मिशा राखलेल्या. अशाच अवतारात ते रामपूरहून शिक्षण पूर्ण करून आले. किती त्रास, क्लेश सहन केले त्यांनी तेव्हा! उस्तादलोक आणि त्यांचे भक्त त्यांची किती टवाळी करीत! कलाकार जिथे जिथे जात, तिथे तिथे त्यांचे शिष्यभक्तही त्यांच्यामागून जात. उलट बाबांचा इतका विनय, की स्वत:ला नीट प्रस्तुत करण्याचाही ते प्रयत्न करीत नसत. नेहमी ‘आमि किच्छु जानि ना, किच्छु करते पारि ना’ (मला काहीच ठाऊक नाही, काहीच करता येत नाही) असंच म्हणत. आजकाल कलाकार ‘मी यंव् करू शकतो, त्यंव् करू शकतो’ असं म्हणून लोकांना कन्व्हिन्स करतात, त्याउलट बाबा! त्यामुळे आयुष्यात त्यांना आपली कला दाखवण्याची कधीच संधी मिळाली नाही. त्यात ते अत्यंत नव्र्हस स्वभावाचे गृहस्थ. हळूहळू या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्यांच्या वादनाबद्दल बऱ्याच अफवा उठल्या. पण त्या सगळ्या किती खोटय़ा होत्या हे मी स्वत: या डोळ्यांनी पाहिलंय. कसं ते दोन मिनिटांत एखाद्याच्या डोळ्यात पाणी आणीत हेही मी पाहिलंय. सरोद असो, व्हायोलिन असो, की सूरशृंगार असो- त्यांची उत्कटता अजूनपर्यंत मी इतर कुणाच्या वादनात पाहिली नाही. मैहरला मी शिकत होतो, तेव्हा पाहिलंय मी- वादन करीत असताना बाबाही रडत, आणि आम्हीही रडत असू. मी अगदी ठामपणे सांगू शकतो – बाबा किती उत्तम वादन करीत, त्यांचा हात किती सुरेल होता, रागामध्ये त्यांचं किती ध्यान असे- हे सारं शब्दांत वर्णन करणं अवघड आहे. बाबांच्या वादनामध्ये, त्यांच्या प्रतिभेमध्ये एक अपूर्व असा तपस्येचा जो भाव होता, तो मला मुग्ध करीत असे. त्यांच्याप्रमाणेच तो माझ्या वादनामध्येही उतरावा असा माझा प्रयत्न असतो. ‘संगीतातच ईश्वर मिळतो’, ‘नादब्रह्म’ हे काही केवळ शब्द नाहीत. त्यांच्याकडे शिकण्यामुळेच मला समजलं, की संगीतामध्ये हा जो गहन असा आनंद मिळतो, किंवा आपण दुसऱ्यांना हा जो आनंद संगीतामधून देऊ शकतो, तोच संगीताचा उच्च पातळीवरचा ‘अॅप्रोच’ आहे..
कामसूत्र, कुमारसंभव, गीतगोविंद यांचं लेखन आहे. भोग, संभोग आणि त्याग यांच्यामधून त्या युगातल्या ऋषि-मुनींनी, कलाकारांनी, अभ्यासकांनी, संगीतज्ञानी, नर्तकांनी आणि अभिनेत्यांनी कितीतरी गोष्टींची निर्मिती केली आहे! खूप उच्च स्तरावर स्पिरिच्युअॅलिटी आणि सेन्शुअॅलिटी यांचं मिलनस्थल आहे हे त्यांना ठाऊक होतं. एक सीमारेषा असते. मुसलमानांच्या आगमानानंतर आणि नंतर इंग्रजांच्या अमलात सगळा प्रकार काहीच्या काहीच होऊन गेला. हळूहळू आमचा दृष्टिकोनच बदलून गेला. आक्रमकांच्या प्रभावामुळे आणि भयामुळे आपण मनाची ती निर्मळता, वसंतोत्सव, जीवनाला सरळपणे उपभोग करण्याची कला विसरू लागलो. आमच्या मनात भय, पाखंडीपणा आणि विवेकाच्या कानपिचक्यांनी प्रवेश केला. तरीही आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की ज्यांनी वेद-उपनिषदांनी रचना केली, ईश्वरावर अटळ श्रद्धा ठेवून कोणार्क-खजुराहो उभारलं, कामसूत्र लिहिलं, त्यांचेच आपण वंशज आहोत. आपल्या दृष्टीने कुठलीही गोष्ट हीन नव्हती. सगळ्याच गोष्टींना एक पूर्ण रूप होतं. म्हणूनच ते त्यागही करीत भोगाच्या मध्ये भोग आहे म्हणून केवळ त्यातच अडकून पडत नसत. म्हणजेच सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी एक मध्यमार्ग शोधून काढला होता. अद्भुत असं हे कॉम्बिनेशन होतं. माझा या गोष्टीवर चिरंतन विश्वास आहे आणि तेच मला माझ्या संगीतामध्ये दिसतं. तेच माझ्या वादनामधून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. किंबहुना ‘प्रयत्न करतो’ म्हणण्यापेक्षा ते आपोआपच होतं. ते आलाप, जोड या सगळ्यांमध्ये तर होतंच, त्याशिवाय विलंबित गतीमध्येही तुम्हाला दिसेल. पुन्हा सीमारेषेच्या मुद्यावर येतो. एका बाजूला आध्यात्मिक संयम दिसतो, तर दुसऱ्या बाजूला रोमँटिक दृष्टिकोन दिसतो. ‘विलंबित गतीची ‘फेज’ हे माझे वादनातलं प्रिय अंग आहे’ या विधानातून सगळं काही स्पष्ट करता येत नाही. हा माझ्या वादनातला एक विशेष प्रिय पीरियड आहे. लोकांना द्रुत गत ऐकायला आवडतं हे खरंय, मला ती वाजवावी लागते, मी वाजवतोही – मग ती तीन तालात असो वा एक तालात असो. आधी गत, नंतर ‘तोडा’, नंतर ‘झाला’, वाजवणं- हे सारं करतो. पण हे सारं झालं चटणीसारखं किंवा स्वीट डिशसारखं. तरीही व्यक्तिगत दृष्टीने सांगायचं, तर मी त्यांना वादनातील मुख्य प्रकार मानीत नाही. पण लोकांना मात्र हे वादनप्रकार ऐकण्यातच खूप रस असतो. मी जनतेच्या आवडीबद्दल सांगतोय. द्रुत वादन असं असतं, की ते सगळ्यांनाच डोलवतं. जोरदार तयारी, स्पष्ट असा ‘झाला’ – त्यामुळे लोक अगदी ‘एक्साइट’ होतात. त्याला लोकांची दादही लगेच मिळते. मीसुद्धा हे करीत नाही असं नाही, करतोच. पण तरीही तो काही माझा वादनातील विशेष आवडता भाग नाही. पण वादनातील एक ‘फेज’ माझी अत्यंत आवडती आहे – ती म्हणजे ठुमरीच्या अंगाने रागमालिका किंवा एखादी ‘धुन’ वाजवणे. मुख्य वादनाच्या शेवटी हा प्रकार वाजवतात. ठुमरी वाजवताना अर्थात एक प्रकारची परंपरेची पकड मनावर असते. तोच ठरावीक पॅटर्न – तीच वळणं – ती ऐकण्यासाठी श्रोते अगदी अधीर असतात. तुम्ही ठुमरीवादनाला सुरुवात केल्याबरोबर ते अगदी ‘आहा! उहू!’ चा जल्लोष करतील. पण धुन वाजवणं म्हणजे काय ठाऊक आहे? जेट विमानात बसून खूप उंचावर गेल्यावर खाली पाहिलंय कधी? कापसासारखे शुभ्र मेघ खाली दिसतात- अगदी गालिच्यासारखे- असं वाटतं, की त्यांच्यावरून चालता येईल, पळता येईल, जणू ती एखादी स्वप्ननगरीच आहे असं वाटतं. कुठल्याही प्रांतातल्या लोकगीताची पहिली ओळ वाजवायला मी सुरुवात करीत असे, आणि त्याबरोबर अल्लारखांच्या जादुई हातांची साथ- केरवा, दादरा किंवा चाचर चा ठेका- जणू एखाद्या सुंदरीभोवती कुणा निपुण प्रेमिकाचा हात! या पहिल्या ओळीला साक्षी ठेवून, म्हणजेच सगळं जग फिरून आल्यावर पुन्हा ती पहिली ओळ वाजवताना होणारा आनंद काय वर्णावा? केवळ मीच नाही, बडे गुलाम अली, अली अकबर भाई आणि विलायत भाई यांच्याही गायना-वादनात मी पाहिलंय. कल्पनेचे पंख पसरून अधूनमधून आम्ही त्रिलोक दर्शन घेतो आणि प्रिय श्रोत्यांनाही घडवतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा