प्रखर सामाजिक जाणीवेची आणि विद्रोहाचा आवाज उठविणारी नामदेव ढसाळ यांची कविता म्हणजे संस्कृती, परंपरा, सामाजिक अन्याय आणि उच्चवर्णीयांचा दंभ यांच्याविरोधात उचललेले हत्यार होते. १५ मे १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरजवळील पूरकणेरसर येथे त्यांचा जन्म झाला. पाचवी ते दहावीपर्यंतचे त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. दलित जीवनातील सर्व प्रकारचे दु:ख, यातना, शोषण त्यांनी पचविले. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सामाजिक-राजकीय चळवळीत उडी घेतली. ‘दलित पँथर’चे ते संस्थापक होते.
ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह ‘गोलपिठा’ १९७२ मध्ये प्रकाशित झाला. ढसाळ यांनी पाहिलेले, अनुभवलेले बरेवाईट अनुभव, मुंबईतील शोषण, दारिद्रय़, क्रूरपणा, वेदना, दु:ख याचे चित्रण यात होते. मध्यमवर्गीय साहित्य, संवेदना, संकेत आणि जाणीवांना त्यांच्या ‘गोलपीठा’ने हादरवून टाकले. दलित, शोषित आणि पीडितांच्या मुक्तीचा लढा उभारण्याच्या कार्याचा एक भाग म्हणजे त्यांच्या कवितेकडे पाहता येईल.
‘गोलपिठा’नंतर ढसाळ यांचे ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले’, ‘तुही यत्ता कंची’, ‘खेळ’, ‘गांडू बगीचा’, ‘आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे’, ‘तुझे बोट धरुनी मी चाललो आहे’, ‘आंधळे शतक-मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले. ढसाळ यांनी लिहिलेल्या ‘हाडकी हाडवळ’ आणि‘निगेटिव्ह स्पेस’ या कादंबऱ्या तसेच ‘अंधारयात्रा’ हे नाटकही प्रसिद्ध आहे. अनोख्या प्रतिमांची निर्मिती हा ढसाळ यांच्या काव्यशैलीचा खास विशेष आहे. त्यांचे लेखन हे संवेदनशील, धगधगीत होते. ढसाळ यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे कंगोरे त्यांच्या लेखनातून दिसून येतात. ढसाळ यांनी वैचारिक स्वरूपाचे गद्य लेखनही केले. यात ‘बुद्धधर्म-काही शेष प्रश्न’, ‘आंबेडकरी चळवळ सोश्ॉलिस्ट आणि कम्युनिस्ट’, ‘सर्व काही समष्टीसाठी’, ‘उजेडाची काळी दुनिया’ आदी पुस्तकांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रखर निष्ठा आणि सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून आलेली तळमळ त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनातून दिसून येते. बंडखोर कवी, संघर्ष आणि परिवर्तन करण्यासाठी तसेच आपला प्रक्षोभ व्यक्त करण्याकरिता ढसाळ यांनी आपल्या कवितेचा प्रभावीपणे उपयोग केला. ढसाळ यांना ‘पद्मश्री’, लेखनासाठीचे राज्य शासनाचे पुरस्कार, सोव्हिएट लॅण्ड नेहरू पुरस्कार, साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कार आणि सन्मान मिळाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा