दयानंद लिपारे
रासायनिक खताची उपलब्धता करण्यातील अडथळे, त्यासाठी करावा लागणारा खर्च, पुन्हा या खताच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान या साऱ्यांमुळे शेती व्यवस्थेपुढे नवेच प्रश्न तयार झाले आहेत. यालाच पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ या द्रवरूप खताचा पर्याय पुढे आला आहे. या खताच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. याच ‘नॅनो युरिया’बद्दल..
खतांची उपलब्धता शेतीसमोरील महत्त्वाची समस्या बनत चालली आहे. शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खते वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. रासायनिक खताची उपलब्धता करण्यामध्ये अडथळेही अनेक आहेत. युद्धामुळे आयातीवर होणारे परिणाम ते खत आयात करण्यासाठी करावा लागणारा प्रचंड परकीय चलनाचा खर्च, अशा अनेक प्रश्नांची यात गुंतागुंत आहे. शिवाय रासायनिक खताच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते ते वेगळेच. याला पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ द्रवरूप खताच्या वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र शासनाने या पातळीवर अधिक पुढाकार घेतला आहे. याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी फायदे होत असल्याचे म्हटले आहे. तर अभ्यासकांनी सावध पावले टाकण्याची इशारा दिला आहे.
युरिया खत हे एक प्रकारचे रासायनिक खत आहे. हे खत थेट स्वरूपांत अमोनिया आणि नत्रवायू पिकांना पुरवते. युरियाच्या अनुपलब्धतेमुळे मोठय़ा अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत. खतटंचाई जाणवत असल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी देशातील खताचा साठा गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्या पेक्षाही कमी होता. जगभरात खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होत आहे. परिणामी खतटंचाई जाणवू लागली आहे. अशातच रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशियाने निर्यातबंदी जाहीर केल्याने टंचाईच्या समस्येत नव्याने भर पडली.
शेतकरी युरियाकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. युरिया हे नत्रयुक्त सर्वात स्वस्त खत आहे. देशातील पन्नास टक्के जमिनीमध्ये नत्र या अन्नद्रव्याची कमतरता आहे. त्यामुळे युरियाच्या वापरास आपल्या जमिनी व पिके चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे वर्षांनुवर्षे देशात युरिया खताचा वापर वाढत आहे. सन २०२०-२१ मध्ये देशांमध्ये ६६१ लाख टन रासायनिक खतांची विक्री झाली. त्यामध्ये युरियाचा वाटा ३५० लाख टनांचा होता. म्हणजेच सर्वसाधारणपणे एकूण रासायनिक खतांमध्ये युरियाचा वाटा पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे. याची कार्यक्षमता ही साधारणत: तीस ते पन्नास टक्के असते. म्हणजेच वापरलेल्या युरियापैकी पूर्ण भाग पिकांना उपलब्ध झाला नाही. काही प्रमाणात तो पर्यावरणामध्ये मग तो जमिनीमध्ये, पाण्यामध्ये किंवा हवेमध्ये वाया गेला. युरियासोबत त्यांच्यावरही केलेला खर्च वाया गेला.
युरिया वापराचे तोटे
युरियाच्या अतिवापरामुळे अनिष्ट परिणाम जाणवत आहेत. पीक रोग व किडीला बळी पडते. पिकाचा नाजूकपणा वाढल्यामुळे पीक लोळते. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीतील कर्ब, नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची, गांडुळांची संख्या कमी होते. त्याचा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. युरियाच्या अधिक वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते. त्याचा अनिष्ट परिणाम पिकावर, प्राण्यांवर व जमिनीवर होतो. हवेचे प्रदूषण वाढते. त्याच्या अतिवापरामुळे पीक, जमीन, पाणी व हवामान यांच्यावर घातक परिणाम होतात असे दिसून आले आहे. ही हानी टाळण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी युरियाचा वापर मर्यादित होणे काळाची गरज आहे. यामुळेच सरकारने आता खरिपाच्या तोंडावर युरियाची मागणी पूर्ण करण्यासाठी नॅनो युरिया (द्रवरूप खत) वापरावे असा सल्ला कृषी विभागाने द्यायला सुरुवात केली आहे. युरियाचे उत्पादन करणाऱ्या इफको खत कंपनीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात केले आहे. इफकोने तांत्रिक मार्गदर्शन केल्याने आरसीएफ कंपनीचा प्रकल्प प्रकल्प उभा राहत आहे. हळूहळू अन्य काही कंपनी यामध्ये पुढे येतील असे चित्र आहे. इफको या जगातील सर्वात मोठय़ा खत उद्योगातील सहकारी संस्थेने नॅनो युरिया तयार करून देशातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन संस्था व अकरा हजार शेतकऱ्यांच्या शेतावर ९० पिकांवर चाचण्या घेतल्या. त्यामध्ये उत्पादनात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे भारत सरकारने देशात पहिल्यांदाच नॅनो युरियाचे खत नियंत्रण कायदा १९८५ अनुसार २४ फेब्रुवारी २०२१ रोजी राजपत्र अधिसूचना प्रसृत केली आहे. त्यामुळे कायद्याने आता नॅनो युरियाचा वापर देशात सुरू झाला आहे.
सन २०१९-२० या कालावधीत या ‘नॅनो युरिया’च्या देशात ११ हजार ठिकाणी क्षेत्रीय चाचण्या घेण्यात आल्या. या नुसार शेती उत्पादनात सरासरी ८ टक्के तर शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पन्नात २ हजार रुपये प्रति एकर वाढ झाली आहे. एकूण खत वापरात ५० टक्के बचत झाली तसेच यामुळे खत अनुदान, परकीय चलन यामध्ये मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे. वाहतूक, गोदाम याच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. या नव्या द्रवरूप खत वापरण्यासाठी केंद्र शासनानेही प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी ‘इफको’ या ‘नॅनो युरिया’चे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ३.६ कोटी बाटल्यांचे उत्पादन केले असून त्यापैकी २.५ कोटी बाटल्या शेतकऱ्यांना विकल्याही गेल्या आहेत. हा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा आणखी आठ प्रकल्पांच्या उभारणीची योजना तसेच ‘इफको’चे ‘नॅनो-युरिया’चे रोजचे उत्पादन १.५ लाख युरियाच्या बाटल्या तयार करण्यापर्यंत नेण्याचे जाहीर केले आहे.
‘नॅनो युरिया’चे फायदे
याच्या वापरामुळे पिकाच्या उत्पादकतेत वाढ होते. खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते. पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते. ‘नॅनो युरिया’ची ५०० मिलीची एक बाटली आणि युरियाची ४५ किलोची एक गोणी यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपरिक युरिया खतावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी होते. पारंपरिक युरियाच्या तुलनेत ‘नॅनो युरिया’ कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची साठवणूक व वाहतूक यावरचा खर्च कमी होतो. देशाच्या दृष्टिकोनातून युरियासाठी द्यावे लागणारे अनुदान व साठवणूक यावरील खर्च कमी होतो. हवा, पाणी, जमीन यांची हानी थांबते. जाागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते. शेतकऱ्यांना ‘नॅनो युरिया’ वापरासाठी वेळोवेळी मार्गदर्शन दिले जात आहे. ‘नॅनो युरिया’मुळे केवळ उत्पादनात वाढ होते किंवा उत्पादन खर्चात बचत होते एवढेच नाही तर यामुळे पर्यावरणाचे संवर्धन देखील राखले जाऊ शकते. आतापर्यंत इफकोने नॅनो युरियाच्या ३.६ कोटी बाटल्यांचे उत्पादन केले असून त्यापैकी २.५ कोटी बाटल्या देशभरातील शेतकऱ्यांना विकल्या गेल्या आहेत. द्रव स्वरूपात असल्यामुळे या युरियाच्या वापराने प्रदूषण टाळता येणे शक्य होणार आहे, असे इफकोचे क्षेत्र अधिकारी विजय बुणगे यांनी सांगितले. सन २०१९-२० या कालावधीत देशात ११ हजार क्षेत्रीय चाचण्यांनुसार शेती उत्पादनात सरासरी उत्पन्नात ८ टक्के तर शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पन्नात २ हजार रुपये प्रति एकर वाढ झाली आहे. एकूण खत वापरात ५० टक्के बचत झाली, तरी खत अनुदान, परकीय चलन यामध्ये मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे. वाहतूक, गोदाम याच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे.
युरिया खताची वाढती मागणी व पारंपरिक पद्धतीने शेतामध्ये खत टाकल्याने वाया जाणाऱ्या युरियाचे प्रमाण पाहता त्यावर पर्याय म्हणून द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया द्रवरूप खत केले आहे. त्याच्या प्रचार व प्रसार जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात सुरू केला आहे. न वापरलेला नत्र हा वनस्पतीच्या पेशी पोकळीमध्ये साठवला जाऊन वनस्पतीच्या वाढीसाठी गरजेनुसार पुरवला जातो. नॅनो युरिया जमिनीमधून न देता पिकाला फवारणीद्वारे म्हणजेच पानांद्वारे देत असल्यामुळे जमीन व पाण्याशी थेट संबंध येत नाही. कार्यक्षमता चांगली असल्यामुळे हवेमध्ये वाया जात नाही. त्यामुळे तो पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी उपयोगी आहे.
– आमदार प्रकाश आवाडे, अध्यक्ष, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना.
नॅनो युरियाचा वापर फायदेशीर असल्याचे प्रत्यक्ष वापराने दिसून आले आहे. आमच्या ऊस शेतीमध्ये याचा वापर केला असता पिकाची वाढ, उसाची कांडी भरण यामध्ये चांगली वाढ झाली आहे. ड्रोन फवारणी द्वारे खत दिल्याने पिकावर खत समप्रमाणात जात असल्याने वाढ चांगल्या प्रमाणात झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांत प्रचार करण्यासाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन केले आहे. याचा वापर शेतकऱ्यांनी सुरू केला असून त्यांनाही याचा लाभ दिसू लागले आहेत.
– गणपतराव पाटील, अध्यक्ष, दत्त शेतकरी साखर कारखाना, शिरोळ
रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच कच्चा मालाच्या आयात-निर्यातीच्या विस्कळीतपणामुळे खताचे दर गगनाला भिडू लागले आहेत. खरीप हंगामावर खतटंचाई निर्माण झाल्यास त्याचा मोठा परिणाम बाजरी, कडधान्ये, तेलबिया उत्पादनावर होईल. गहू, तांदूळ यांचेही उत्पादन घटेल. १२५ कोटी जनतेला पुरेल एवढे धान्य पिकवून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचे असल्यास नॅनो टेक्नॉलॉजीचे विद्राव्य खताची निर्मिती करून ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचे तंत्रज्ञान सर्वत्र अवलंबिले पाहिजे.
– राजू शेट्टी , संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना.
माझ्या यड्राव येथील शेतात २६५ जातीच्या उसाची लागण केली होती. युरियाची कमतरता कायमची असल्याने पर्याय म्हणून इफको नॅनो युरिया (द्रवरूप) चा वापर केला. २५० रुपयांना मिळणारी ५०० मिलीच्या द्रवरूप खताची फवारणी केली. ऊस पिकाची जोमदार वाढ, पाने गर्द हिरवेगार आणि कांडी लांबीत वाढ असे बरेच फायदे दिसून आले आहेत.
– विजय माने, ऊस उत्पादक शेतकरी
‘नॅनो युरिया’ म्हणजे काय?
‘नॅनो’ म्हणजे सूक्ष्म. आजवर वापरल्या जाणाऱ्या युरियाची कार्यक्षमता तेवढीच ठेवत त्याचे हे ‘नॅनो’ रूप संशोधनातून आकारास आले आहे. एरवी ४५ किलो वजनाच्या पोत्यात सामावले जाणारे युरिया इथे केवळ ५०० मिलीच्या ‘नॅनो युरिया’ बाटलीतून मिळणार आहे. याचा वापर अगदी अचूक असल्याने त्याचे शेती, जमीन, हवा, पाणी असे पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाहीत. यासाठी येणारा खर्चही कमी आहे. या प्रकारचे खत देशांतर्गतच तयार होत असल्याने त्यावर होणारा परकीय चलनाच्या खर्चातही बचत होत आहे.
dayanand.lipare@expressindia.com