शहरे स्मार्टकरण्यासाठी एकीकडे आटापिटा सुरू असताना आजही शहरांमधील शाळा पूर्णपणे तंत्रज्ञानयुक्त झालेल्या नाहीत. शहरांमधील शाळांची ही स्थिती असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या अवघ्या साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या एका खेडय़ातील चार घरातील शाळेने तंत्रज्ञान परिपूर्णतेच्या दिशेने जे पाऊल टाकले आहे ते सर्वानाच चकित करणारे आहे.

मळे संस्कृती लाभलेली..प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्राचे स्वप्न पाहणारी..‘प्रेरणा घ्या, प्रेरणा द्या’ हे घोषवाक्य मिरवणारी..तरुण मित्र, पालकांना आपलीशी वाटणारी..विद्यार्थी हाच केंद्र मानणारी माळीनगरची शाळा आज आपला स्वत:चा वेगळा ठसा उमटवीत आहे. मालेगाव तालुक्यातील प्रयोगशील शाळा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के राहावी यासाठी वर्षभर उपक्रम राबविले जातात. त्यात दप्तरमुक्त शनिवार, क्षेत्रभेट, शैक्षणिक स्पर्धा, शालेय क्रीडा सप्ताह, एक दिवस शाळेसाठी, तंत्रस्नेही प्रयोग आदींचा उल्लेख करावा लागेल. शाळेने केलेली प्रगती पाहून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून सात विद्यार्थी या वर्षी माळीनगर शाळेत दाखल झाले आहेत.

ई लर्निग व तंत्रस्नेही

ग्रामीण भागात असलेली विजेची समस्या, भौतिक सुविधांचा अभाव यावर मात करत विद्यार्थी गुणवत्तेवर लक्ष देऊन सतत पालकांशी संवाद साधत, शिक्षणप्रेमींची मदत घेत शाळेत संगणक, टॅब, एलईडी टीव्ही, प्रोजेक्टर, मोबाइल अशा विविध साधनांचा शिकविण्यासाठी उपयोग करण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील पहिली टॅबयुक्त शाळा होण्याचा मान माळीनगर शाळेस मिळाला आहे. अनेक मोठय़ा शहरांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना टॅब मिळालेला नाही. असल्यास त्याचा गुणवत्ता विकासासाठी कसा वापर करायचा हे माहीत नसते. या शाळेत लोकसहभागातून सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आला असून विद्यार्थी स्वत: त्याचा वापर करतात. स्वत:च शैक्षणिक चित्रफितींची निर्मिती करतात. अनेक शैक्षणिक ‘अ‍ॅप्स’चा वापर करून देवाणघेवाण केली जाते. शिक्षकांकडूनही शैक्षणिक कार्यक्रमांचा धडा टॅबमार्फत दिला जातो. विशेष म्हणजे आधुनिक तंत्र साधनांनी पछाडलेले हे विद्यार्थी पालक कार्यशाळा राबवीत पालकांनाही तंत्रज्ञानाचे धडे देतात. वाचनक्षमता वाढावी यासाठी डिजिटल ग्रंथालयाचा उपयोग शिक्षक, विद्यार्थी, गावातील तरुण मित्र, पालक करीत आहेत. चार हजारपेक्षा अधिक ई पुस्तके या ग्रंथालयात आहेत. ‘वाचन प्रेरणा दिन’ टॅबमधील ई पुस्तकांच्या साहाय्याने साजरा केला जातो.

परिपाठ शाळेचा आत्मा

परिपाठ शाळेचा आत्मा आहे. मराठी व इंग्रजीतून परिपाठ घेतला जातो. मराठी, इंग्रजी, गणित या विषयांचे तोंडी रचनावादी उपक्रम घेतले जातात. प्रत्येक मुलास सर्वासमोर व्यक्त होता आले पाहिजे, या दृष्टीने परिपाठाचा वापर करून घेतला जातो. त्यासाठी शाळा स्वतंत्रपणे उपक्रमांचे नियोजन करते.

ज्ञानरचनावादी शाळा

ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती शाळेने पुरेपूर अनुसरली आहे. वर्ग रचनावादी पद्धतीने रेखाटून घेऊन शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकविले जाते. मराठी, गणित, इंग्रजी विषयांचे साहित्य, त्यात अक्षरकार्ड, शब्दकार्ड, वाक्यकार्ड, अंककार्ड, संख्याकार्ड विद्यार्थी स्वत: तयार करून सहशिक्षणातून शिकतात.

ई कवितासंग्रह प्रकाशित

भाषेची आवड वाढल्याने मुले कथा, कविताही करतात. शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वरचित ‘कविता रानफुलांच्या’ हा ई कवितासंग्रह आणि ‘निशिगंध’ हा इयत्ता चौथीत शिकणाऱ्या निशा रौंदळ हीच ई कवितासंग्रह ‘ई साहित्य प्रतिष्ठान’ या संकेतस्थळाच्या साहाय्याने प्रकाशित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी दरवर्षी शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली योगासने, ध्यानधारणा, विविध शारीरिक खेळ घेतले जातात. बालचेतना, नवचेतना शिबिराअंतर्गत वृक्षारोपण, पाणी वाचवा मोहीम आदी उपक्रम राबविले जातात. चार भिंतींआड विद्यार्थ्यांना जंगलाची माहिती देण्याऐवजी त्यांना थेट जंगलातच नेले जाते. परिसरातील नदी, डोंगर, धरण, शेती, बाजार यांची माहिती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी नेऊन दिली जाते.

शैक्षणिक बचत व दृक्श्राव्य माध्यम बँक

शालेय जीवनात बचतीचे महत्त्व पटावे यासाठी संग्रहित केलेले पैसे शालेय बचत बँकेच्या सचिवाकडे विद्यार्थी जमा करतात. त्यातून शालेय उपयुक्त साधने विद्यार्थी गरज असल्यास पैसे काढून खरेदी करतात. यातूनच अक्षर-अंक-वाक्य बँक अस्तित्वात आली आहे. याशिवाय टॅबच्या साहाय्याने शैक्षणिक अ‍ॅप्स वापरून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृक्श्राव्य माध्यम बँक तयार केली आहे. त्या आधारे सहशिक्षणातून अनेक उपयुक्त शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली आहे.

लोकसहभागातून सुविधा

शालेय विकासात लोकसहभाग खूप महत्त्वाचा घटक असतो. माळीनगर शाळेचा विकास त्यामुळेच झाला आहे. लोकसहभागामुळेच शाळेस कपाट, ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक साधने, कुंपण तसेच इतर तांत्रिक साधने घेता येणे शक्य झाले. शाळेच्या सहकार्याने गावातील युवावर्गास मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले असून त्या आधारे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनही केले जाते.

समाजमाध्यमांचा प्रभावी वापर

शाळेतील शिक्षकांनी पालकांशी सबंध ठेवण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करून घेतला आहे. शैक्षणिक उपक्रम व इतर गोष्टींचीदेवाणघेवाण करण्यासाठी शिक्षक व पालकांचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ गट तयार केला आहे. त्याशिवाय फेसबुक, यू टय़ूब यांचा उपयोग शालेय गुणवत्तावाढीसाठी उपयुक्त ठरत आहे. शाळेचा स्वत:चा शैक्षणिक ‘ब्लॉग’ असून त्यात उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. शाळेतील शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांचे ई मेल आयडी असल्याने त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी केला जातो. समाजमाध्यमांमुळे शाळेचे शिक्षक व विद्यार्थी अनेक लेखक, कवी, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी थेट संवाद साधण्यात यशस्वी ठरले आहेत.

दप्तरमुक्त शनिवार

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी माळीनगर शाळेने दप्तरमुक्त शनिवार ही संकल्पना राबविली असून या दिवशी नियमित अभ्यासास फाटा देत विशेष वेळापत्रकानुसार व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, कवायत, क्रीडा स्पर्धा, बौद्धिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, रचनावादी उपक्रम त्या दिवशी घेतले जातात. दप्तरविना शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांसह पालकांना कळले आहे. शाळेच्या या प्रगतीत मुख्याध्यापक राजेंद्र बधान आणि सहशिक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाचा मुख्य वाटा आहे. मालेगाव आणि बागलाण या दोन तालुक्यांच्या सीमेवर असलेली माळीनगरची ही शाळा आज शैक्षणिक क्षेत्रातील पर्यटनस्थळ झाली आहे, ती त्याचमुळे!

 

संकलन – रेश्मा शिवडेकर reshma.murkar@expressindia.com

अविनाश पाटील