दयानंद लिपारे
एकेकाळी केवळ ‘भरड’ अशी ओळख असलेल्या या धान्यास आता प्रधानमंत्र्यांच्या प्रयत्नाने ‘श्री अन्न’ असा दर्जा प्राप्त झाला आहे. हे ‘श्री अन्न’ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे प्रयत्न सध्या सर्वत्र सुरू आहेत. यासाठी हैदराबाद येथील भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेकडून (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मिलिट्स रिसर्च, आयआयएमआर) मूलभूत आणि धोरणात्मक कार्य सुरू आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत कार्यरत या संस्थेने भरड धान्यामध्ये केलेले संशोधन जागतिक पातळीवर गौरवले गेले आहे.
एरवी भरडधान्य म्हटले की, ठराविक नि खरखरीत पदार्थ समोर येतात. त्याला विलक्षण अपवाद ठरावा असा या संस्थेत बनलेले एकाहून एक सरस, चविष्ट आणि मुख्य म्हणजे पौष्टिक पदार्थाची मालिकाच आकाराला आली आहे. इतकेच नव्हे तर ही उत्पादने बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, त्यासाठी विविध प्रकारच्या शेतकऱ्यांना अर्थक्षम बनवणाऱ्या योजनाही आखल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्प अंतर्गत श्री अन्नावरील प्रक्रिया उद्योग यालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
सन २०१८ हे देशामध्ये भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. तर आताचे २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भरड धान्य किंवा कदन्न (इंग्रजीत उच्चार – मिलेट्स) ज्वारी आणि बाजरी ही साधारणत: आकाराने मोठी असलेली धान्ये असून, त्यांना ‘ग्रेटर मिलेट’ म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटौप ही सर्व ‘मायनर मिलेट’ किंवा ‘बारीक धान्ये’ म्हणून ओळखली जातात. तर राजगिरा आणि बकव्हीट (कुट्टू) यांना ‘स्यूडो मिलेट्स’ किंवा ‘छद्म भरड धान्य’ असे म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश ही भरड धान्य उत्पादनातील महत्त्वाची राज्ये.
केंद्राच्या या निर्णयामुळे जागतिक पातळीवर भरड धान्याच्या उत्पादनात वाढ, कार्यक्षम प्रक्रिया तसेच आंतरपीक पद्धतीचा उत्तम वापर करून भरड धान्यांना आपल्या भोजनातील मुख्य घटक म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची उत्तम संधी केंद्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य म्हणून साजरे करतानाच या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्यांचा वापर वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवले गेले आहे. शालेय पूर्व वयातील मुले आणि प्रजनन वयातील महिला यांची पोषण विषयक स्थिती सुधारण्यासाठी भरड धान्यांचा समावेश असलेले अधिक वैविध्यपूर्ण पदार्थ पुरवण्याकडे वळण्याची वेळ आली आहे. यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे शाश्वत उत्पादन भरड धान्यांच्या अधिक वापरासाठी जागरूकता निर्माण करणे, बाजार मूल्य साखळी तसेच संशोधन विकासविषयक उपक्रम विकसित करणे, यासाठी निधी देण्यात येत आहे. यामध्ये हैदराबादस्थित भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेचे कार्य उल्लेखनीय स्वरूपाचे राहिले आहे.
१९५८ साली स्थापन झालेल्या या संस्थेने इतक्या वर्षांच्या कालावधीमध्ये भरड धान्यावर आधारित पीक पद्धतीसारख्या महत्त्वाच्या कोरडवाहू पिकावर अत्यंत महत्त्वाचे मौलिक संशोधन केले आहे. भरडधान्याच्या उत्पादनासाठी पाणी कमी लागत असल्यामुळे पाणी टंचाई असलेल्या भागात हे एक पसंतीचे पीक आहे. भरडधान्य रसायनांशिवाय नैसर्गिकरीत्या पिकवता येते. त्यामुळे मानव आणि माती या दोघांच्याही आरोग्याचे रक्षण होते. ग्लोबल साउथह्ण मधील गरिबांसाठी अन्न सुरक्षेचे आव्हान आणि ग्लोबल नॉर्थह्ण मधील अन्न सवयींशी संबंधित आजारांसाठी भरड धान्य उपयुक्त ठरतात. श्री अन्न अशा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. कारण ते पिकवणे सोपे तर आहेच शिवाय त्याचा खर्चही कमी आहे. इतर पिकांपेक्षा याचे उत्पादन लवकर होत असूनही श्री अन्न पोषणाने समृद्ध आहे. विशिष्ट चव आहे, तंतूंचे प्रमाण जास्त आहे, शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जीवनशैलीशी संबंधित आजार टाळण्यास मदत करते. गुणांचा असा सम्मुचय झाला असल्याने भरड धान्याला अधिक महत्त्व आले असून त्यापासून नावीन्यपूर्ण खाद्य उत्पादने कशी घेता येतील, यासाठी हैद्राबादच्या या संस्थेतील कार्य अचंबित करणारे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट उपक्रमाअंतर्गत एका अध्ययन सहलीमध्ये या संस्थेतील भरड धान्याच्या शेतांना, प्रक्रिया केंद्रांना आणि संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शनांना तसेच अनेक स्टार्टअप्सना भेटी देण्याच्या उपक्रमांचा समावेश होता. त्याद्वारे अनेक बाबी पाहता, अनुभवता आल्या. ज्यातून भरड धान्याची एक नवी अद्भूत दुनिया न्याहाळता आली, तिची खुमारी चाखता आली. याअंतर्गत आयआयएमआरच्या संकुलातील शेतांवर जाता आले. आठ प्रकारच्या भरड धान्यांची उभी पिके पाहता आली. भरड धान्याचा प्रचार करण्यासाठी एकत्रित वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून भरड धान्याची पेरणी करण्यात आली आहे. आयआयएमआर संकुलात विविध भरड धान्य प्रक्रिया केंद्रांना शेतकरी गटांनी भेट दिली. यामध्ये प्राथमिक प्रक्रिया केंद्र, बेकरी युनिट, पॅकेजिंग युनिट, फ्लेकिंग युनिट, कोल्ड एक्स्ट्रशन लाईन्स, कंटिन्युअस बिस्किट लाईन इत्यादींचे अवलोकन करता आले. मिलेट मफीन्स, कुकीज आणि नूडल्स यांसारख्या पोषण मूल्यवर्धन करणाऱ्या भरड धान्य उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या प्रक्रिया यंत्रांचा वापर करण्यात येतो. न्यूट्रीहबह्ण या भारत
सरकारच्या पाठबळाने चालवल्या जाणाऱ्या आयसीएआर आयआयएमआर हैदराबादच्या टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरला देखील भेट दिली. विशेष म्हणजे याच काळात विविध जी २० देशांतील कृषीमंत्री आणि प्रतिनिधींना आयसीएआर-आयआयएमआर, या जागतिक भरड धान्य ( श्री अन्न) उत्कृष्टता केंद्रात अध्ययन सहलीसाठी भेट दिली होती. त्यांनाही हा आरोग्यदायी देणगी असल्याचा अनुभव आला.
मिलेट स्टार्टअप्सह्णना आवश्यक ते तंत्रज्ञान आणि पाठबळ पुरवून अतिशय सुविहित पद्धतीने विकास करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने, न्यूट्रीहब आयआयएमआर येथील इन्क्युबेशन प्रोग्रामची रचना करण्यात आली आहे. या उत्कृष्टता केंद्रात या प्रतिनिधींनी भरड धान्यांपासून तयार केलेल्या आपापल्या देशातील स्वादिष्ट खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. आयआयएमआरमधील उत्कृष्टता केंद्र भरड धान्याशी संबंधित ज्ञानाच्या हस्तांतरणाला, तंत्रज्ञान प्रसाराला आणि उत्पादन विकासाला पाठबळ देते. ब्रँड भरड धान्याह्णना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना जगभरातील भरड धान्य उत्पादक देशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भरड धान्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी तसेच भरड धान्य प्रक्रिया केंद्रांना, निर्यातीसाठी आणि स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आयआयएमआरचा तंत्रज्ञान आधारित दृष्टीकोन हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. महाराष्ट्र शासन यामध्ये काम करीत आहे.
देशामध्ये भरडधान्य उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी हमीभाव लागू केला असल्याने शेतकऱ्यांना दराची हमी मिळाली आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन भरड धान्याचे मूल्यवर्धन करण्यावर अधिक भर दिला आहे. हरितक्रांतीनंतर गहू, तांदूळ हे मुख्य अन्न बनले असले तरी त्या तुलनेत भरड धान्यांमध्ये असणारे जीवनसत्व यामध्ये खूप मोठे अंतर आहे. भरडधान्य आरोग्यासाठी पोषक आहे. ही बाब लक्षात घेऊन हैदराबादमधील श्री अन्न संशोधन संस्थेने भरड धान्यापासून रुचकर, चविष्ट आणि जीवनसत्वांनी पुरेपूर उत्पादने बनवले आहेत. त्याच्या छोटय़ा – मोठय़ा अशा दोन्ही प्रकारच्या यंत्रसामग्री उपलब्ध आहे. त्याचे तंत्रज्ञानही त्यांनी सर्वाना मुक्तपणे देऊ केले आहे. महाराष्ट्र शासन या सेवेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत पावले टाकत आहे. शेतकरी, उत्पादक कंपन्यांनी या अंतर्गत उत्पादने घ्यावीत, यासाठी त्यांना पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत मदत करीत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. – प्रशांत कांबळे,अर्थशास्त्रज्ञ तथा वित्तीय सल्लागार, स्मार्ट (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प)
अन्नधान्यामधील पौष्टिकपणा कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असून, अनेक रोग निर्माण होत आहेत. आहारात पौष्टिक अन्नधान्याचा वापर होणे आवश्यक असल्याने यासाठी दैनंदिन आहारात भरड धान्याचा समावेश होणे गरजेचे आहे. त्यासाठी भरड धान्ये व त्यावरील प्रक्रियायुक्त उत्पादने वापर व्हावा, यासाठी हैदराबादमधील भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेने विविध मेजर व मायनर मिलेट यावरती संशोधन करून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले आहेत. बियाणे यावरही संशोधन केले जाते. याचा अभ्यास दौरा व प्रशिक्षणामध्ये सहभागी होता आले. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. या माध्यमातून सकारात्मक प्रभावी काम चालू केले आहे. स्मार्ट योजनेंतर्गत अभिनव किसान फार्मर प्रोडय़ुसर कंपनीच्या माध्यमातून नाचणी, बाजरी, ज्वारी या पौष्टिक अन्नधान्यापासून विविध प्रक्रियायुक्त उत्पादन तयार करून नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. याद्वारे ग्राहकांना पौष्टिक व योग्य किंमतीत शेतमाल मिळण्यास मदत होणार आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्री हीच संकल्पना शेतकऱ्यांना योग्य व रास्त भाव देऊ शकते. यामुळे ही संकल्पना अधिक सक्षम करण्यासाठी कंपनी स्मार्टच्या माध्यमातून काम करणार आहे. – सुनील काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिनव किसान फार्मर प्रोडय़ुसर कंपनी लि, रांगोळी
dayanandlipare@gmail. com