पर्यावरणवादी हे मानवासह निसर्गाचा विचार करतात, परंतु ते मानवकेंद्री विचारापाशी थांबत नाहीत, म्हणून त्यांना ‘माणूसघाणे’ म्हणायचे का, अशा प्रतिक्रियेपासून सुरू होणारा हा पत्रलेख.. मानवकेंद्री विचारात ‘उपभोगा’ची लालसा जम बसवू लागली आहे, अशा काळातही निसर्गाचा साकल्याने विचार करणे आणि उपभोगाऐवजी उपयोगापुरतेच निसर्गाकडून घेणे आवश्यक आहे, अशी बाजू मांडणारा..
निसर्गसौंदर्य म्हणजे ‘नजरेला सुखावणारे’ निसर्गाचे दृश्य अशी बऱ्याच शहरवासीयांची व्याख्या असू शकते पण खऱ्या पर्यावरणवाद्यांची नक्कीच नाही. खरा पर्यावरणवादी कोण आणि ‘माणूसघाणा’ पर्यावरणवादी कोण, यामध्येच गल्लत करून राजीव साने यांनी ‘‘सम्यक’ निसर्ग : एक शुद्ध भंकस’ या लेखात (गल्लत, गफलत, गहजब : १७ ऑक्टोबर) गहजब केला आहे. खरा पर्यावरणवादी माणूसघाणा असूच शकत नाही. माणसाच्या अस्तित्वाचा व निसर्गातील प्रक्रियांचा अभ्यास करून, त्यानुसार जीवनशैली, समाजरचना, देवाणघेवाण यंत्रणा (अर्थयंत्रणा शब्द मुद्दाम वापरत नाही कारण अर्थवाद हा शोषणकारकच असतो) याचे प्रारूप दर्शवणारा म्हणजे खरा पर्यावरणवादी. कुठे तरी एखादा पर्यावरणवादी माणूसघाणा असला तर तो अपवाद ठरू शकेल, पण त्या अपवादालाच सर्व पर्यावरणवादाचे प्रतिनिधी मानून मुद्दे मांडणे, ही चलाखीच म्हणावी लागेल.
निसर्ग हा प्रक्रियेने घडतो. विध्वंस, क्रौर्य व अनागोंदी ही मानवाच्या नजरेतून आलेली विशेषणे आहेत. निसर्गात फक्त प्रक्रिया असतात. जैव साखळीचे एकमेकांवर अवलंबून असणे ही एक नसíगक प्रक्रियाच. पण यात जास्त मिळविण्याचा हव्यास नसतो. पृथ्वीच्या गर्भातील लाव्हा ‘दाब’ नियंत्रित करण्यासाठी भूपृष्ठावर येतो तेव्हा बराचसा प्रदेश जळून जातो, लावा खाली दबतो. हिमयुग आले तेव्हा पृथ्वीवरील बऱ्याचशा प्रजाती नष्ट झाल्या. उल्का वर्षांवात बऱ्याचशा प्रदेशांचे ‘भूगोल’ बदलले. पाऊस येऊन पूर आल्यावर बरीच उलथापालथ होते. या अजैविक क्रिया झाल्या. जैविक क्रियांमध्ये प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खाऊन स्वत:च्या अन्नाची गरज भागवतात. उत्क्रांतीत प्रत्येक प्राण्याला प्रजनन करून पुढे वारसा चालू ठेवण्याइतपत प्रेरणा मिळाल्या आहेत. या सगळ्या घटना योग्य-अयोग्यतेच्या पातळीवर मोजल्याच जाऊ शकत नाहीत. एखाद्या ‘निश’मध्ये (एखाद्या जागेवर, अशा अर्थाने.. एखाद्या परिसंस्थेत) एखादी वनस्पती वा प्राणी आजवर टिकून राहिला, तर तो तसा राहिला याची काही कारणे असतील, पण आज तो त्या ‘निश’मध्ये आहे एवढंच. मात्र मानवाच्या हस्तक्षेपाने एखाद्या प्राणी वा वनस्पतीची ती विशिष्ट जागा नष्ट होत असेल व जैव साखळीवर गंभीर परिणाम होत असतील जेणे करून बऱ्याच जिवांची तसेच तेथील एक जीव ‘मानव’ याचीही ससेहोलपट होत असेल, तर याला योग्य म्हणावे का?
लाव्हा किंवा उल्कापात क्षणार्धात वनस्पतीची वा प्राण्याची ‘निश’ संपवू शकतो, हे खरे आहे. पण म्हणून मानवालाही तसे करण्याचा- म्हणजे अगदी क्षणार्धात नाही पण काही शे वर्षांत नष्ट करण्याचा अधिकार प्राप्त होतो का? या पृथ्वीवरचा, मानव हा एकमेव ‘जाणीव असलेला’ (विचार करता येणारा) प्राणी आहे. तेव्हा आपल्याबरोबर इतरही जैविक व अजैविक सृष्टी अबाधित ठेवण्याचा मानव नक्कीच विचार करतो. अगदी त्याचा स्वत:चा काहीही फायदा नसतानासुद्धा.
निसर्गाला अशी कुठलीही सम्यक अवस्था नसते, हे खरे. तो फक्त क्रियांना प्रतिक्रिया देत असतो व संतुलनात जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्या मानवासाठी व जैविक सृष्टीसाठी योग्य/अयोग्य असतात एवढेच. पश्चिम घाटाची, हिमालयाची जैवविविधता संपवायचा मानवाला पूर्ण अधिकार आहे असे म्हणणे म्हणजे मानवाच्या विचारक्षमतेची, जाणीवक्षमतेची वंचनाच करण्यासारखे आहे. निसर्गातील ‘भौतिक संतुलन’ हा नियम आहे. ते रासायनिक अभिक्रियेच्या समीकरणांसारखे ‘समीकरण’देखील आहे. मात्र या समीकरणाच्या डाव्या बाजूला काय होते आणि आता उजव्या बाजूला काय राहिले याचा विचार केला गेला पाहिजे, मग ‘संतुलन’, ‘समीकरण’ या शब्दांचा निसर्गातला अर्थ लक्षात येईल.
उदाहरणार्थ, पश्चिम महाराष्ट्राची जास्त पाणी न मानवणारी जमीन ओलिताखाली आल्याने क्षारपड झाली. यात पाणी जमिनीत खोलवर जाऊन क्षार वर आले व पिके येईनाशी झाली हेही भौतिकदृष्टय़ा ‘संतुलन’ आहे. पण त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होतो आहे. त्यात मानवही आहेच.
पृथ्वीवर फक्त भौतिक घटक नसून जैविक घटकही असतात, त्यामुळे एकंदर जीवनाकडे – सृष्टीकडे साकल्याने बघण्याची गरज आहे. निसर्गात मूलत:च एक सायकल म्हणजे एक गोलकार प्रक्रिया असते. मानवाच्या हस्तक्षेपाने ही प्रक्रिया सपाट होत असते. साधे उदाहरण म्हणजे झाडाची पाने – बॅक्टेरिया – नायट्रोजन – परत मुळाकडे – झाडाकडे अशी निसर्गाची गोलाकार प्रक्रिया. मानवाचा राबीट, प्लास्टिक आदी बॅक्टेरिया वा कोणत्याही अन्य निसगरेपकारक द्रव्यात रूपांत न होणारी (डीकम्पोज न होणारी), ज्यांची विल्हेवाट शक्य नाही अशी उत्पादने निर्माण करण्यात हातखंडाच आहे.
हे सर्व करताना जैवविविधता संपवण्याचा मानवाला प्रत्यक्ष मानवघातक न ठरतासुद्धा हक्क आहे हे कसे मानायचे? चष्मा, कवळ्या या मानवाला उपयोगी वस्तू आहेत. पण उपयोगी वस्तू आणि उपभोगी वस्तू यात फरक करावा की नाही? आणि जर या कृत्रिम वस्तू तयार करताना बरीचशी निसर्गसंपदा, जैवसाखळ्या संपणार असतील व मानवालाच त्याचा लाभ होणार असेल.. तर योग्य मानाव्यात काय? फक्त उपयोगी वस्तूसाठीच मानव उत्खनन करेल असा नियम आहे काय? याची सीमा रेषा कोणी आखायची? कृत्रिम असेल, ‘सपाट’ असेल – गोलाकार नसेल. मग बोजा निसर्गावर राहणारच.
निसर्ग क्रियेला प्रतिक्रिया देतो, ती शास्त्रीयदृष्टय़ा सांगता येते.. मग आपण ती ‘स्वाभाविकच’ म्हणणार. पण प्रक्रियेचा परिणाम काय? मानवाच्या हस्तक्षेपाने प्रतिक्रिया किती तीव्र झाली याचा नक्कीच विचार करायला हवा.
भौतिकदृष्टय़ा मृत शरीरही संतुलनात असते. विनाश ही केवळ मानवी संकल्पनाच आहे पण स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारणाऱ्यांना काय म्हणायचे? मानवी हस्तक्षेपाने विशेषत: औद्योगिक क्रांतीनंतर (१७५० नंतर) किती जैवविविधता नष्ट झाली, किती तापमान वाढले, त्याचे मानवावर परिणाम काय? इतर सजीव सृष्टीवर परिणाम काय झाला याचा विचार अभ्यासांती करता येतो, तेव्हा आतापर्यंत (औद्योगिक क्रांतीनंतर) चालत आलेली मानवी क्रिया ही ‘विकास’ म्हणून स्वीकारायला कशी पोकळ आहे याचा प्रत्यय येतो. औद्योगिक क्रांतीनंतरचा इतिहास फक्त २५० वर्षांचा आहे. डायनासोरच्या ऱ्हासाला सुरुवात झाल्यावर तो संपेपर्यंत ५० हजार वष्रे इतका काळ लोटला होता, हे ‘मानवघातक परिणाम टाळून विकास’ करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
‘मानवघातक परिणाम-सावधता’ एवढा संकुचित विचार करणारा, ‘पर्यावरणवादी’ नक्कीच नसणार. विश्वाचा विचार करण्याची, त्यानुसार उचित पावले उचलायची प्रवृत्ती मानवात असतेच; तसेच उपभोगासाठी.. लालसेसाठी ओरबाडण्याचीही वृत्ती माणसात असते. या दोन प्रवृत्तींमधीलच हा लढा आहे. मग या प्रवृत्ती विचारवंताचे लेबल लावून येवोत, क्लिष्ट, अगम्य भाषेत लेख लिहून येवोत, सहजपणे ओळखता येतात. मानवातल्या प्रत्येकाने स्वत:ला कुठल्या प्रवृतीशी जोडावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कुठली जैवविविधता संपली तर मानवावर घातक परिणाम होणार वा नाही हे कसे आणि कुणी ठरवायचे? वाघ, सिंह, बिबळे संपले, तर मानवघातकता कमीच होते की! मग कशाला पाहिजे त्यांचे संवर्धन, फक्त श्रीमंतांच्या पर्यटनासाठी? इंजिन टू स्ट्रोक वाईट व फोर स्ट्रोक चांगले हे ठरवताना कार्बन मोनोक्साइड उत्सर्जति होणारच (पण फोर स्ट्रोकमधून तो कमी प्रमाणात उत्सर्जित होणार) हे गृहीत धरलेले असते. हे म्हणजे ‘सिगारेट १० पाकिटांऐवजी पाचच पाकिटे ओढा’ असे सांगण्यासारखे असते. या ‘मानव परिणाम सावधते’चे आणखी उदाहरण म्हणजे मोठमोठे प्रकल्प, धरणे, इत्यादी.
फक्त मानवी समूहावर तंत्राच्या वापराने परिणाम झाला म्हणून ते वाईट. पण तंत्राच्या उपलब्धतेसाठी जल, जंगल, जमीन यांची नासाडी नसतेच का? निसर्गातील कुठलीही क्रिया संतुलानासाठीच होत असते. रँडम वाटणाऱ्या घटनांनाही कार्यकारण भाव असतोच. निसर्गाचे स्वरूप जंगल, वाळवंट, समुद्र, पर्वत, हिमाचल प्रदेशातले स्लेटचे डोंगर तर कोकणातले जांभ्याचे सडे असे विविधांगी असते. त्यात दिसणारे सौंदर्य प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकते, कारण सौंदर्य ही वैयक्तिक भावना आहे. पण मानवाच्या उपयोगासाठी नव्हे, तर उपभोगासाठी सृष्टीवर आघात करणे ही गुन्हेगारी भावना आहे.
उपयोग आणि उपभोग यांच्या व्याख्यांचा झगडा सुरूच राहण्याचा सध्याचा काळ आहे. त्या व्याख्या हव्या तशा वाकवणाऱ्यांची सरशी अनेकदा होताना दिसते. मात्र, निसर्ग विनाश करतो म्हणून मानवालाही विनाश करण्याचा परवाना मिळतो असा अर्थ काढला गेल्यास तो अनर्थकारकच ठरणार आहे.
निसर्गही मानवकेंद्रीच हवा?
पर्यावरणवादी हे मानवासह निसर्गाचा विचार करतात, परंतु ते मानवकेंद्री विचारापाशी थांबत नाहीत, म्हणून त्यांना ‘माणूसघाणे’ म्हणायचे का, अशा प्रतिक्रियेपासून सुरू होणारा हा पत्रलेख..
First published on: 26-10-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nature for adequate use instead of consumption