सी कॅडेट कॉर्प्स ही युवकांमध्ये कार्यरत असणारी स्वयंसेवी संघटना असून माननीय कमोडोर गोकुलदास एस. आहुजा यांनी १३ मे १९३८ रोजी कराचीमध्ये या संघटनेची स्थापना केली. युवकांमध्ये शिस्त, साहसीवृत्ती, नेतृत्वगुण विकसित व्हावे यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण या संघटनेमार्फत दिले जाते. दरवर्षी १० ते १८ वयोगाटील पाचहजारपेक्षा अधिक मुलांना या संघटनेमार्फत प्रशिक्षण दिले जाते. दमण, गोवा, कोची, कोलकाता, लोणावळा, मुंबई, ओखा, उटकमंड, पोरबंदर, पोर्ट ब्लेअर, पुणे आणि विशाखापट्टणनम या ठिकाणी नौदल, तटरक्षक दल तसेच लष्कराच्या केंद्रांशी संलग्न या संघटनेचे केंद्र कार्यरत आहे.
या संघटनेचे मुख्यालय दक्षिण मुंबईत असून १० फेब्रुवारी १९६६ रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्री. एस. राधाकृष्णन यांनी त्याचे उद्घाटन केले. आपल्या संस्थेच्या शिखरावर निळा ध्वज फडकविण्यास कॉर्प्सना १९६१ मध्ये संसदेने संमत केलेल्या विधेयकानंतर परवानगी देण्यात आली आहे. जवाहरमधील प्रशिक्षण नौकेला आयएनएस विराट या देशामधील एकमेव विमानवाहू युद्धनौकेची संलग्न राहण्याची संधी मिळाली आहे. देशातील आघाडीच्या युवा खलाशांमध्ये ‘सी कॅडेट’ मधील जवान नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. ‘वरुण’ या प्रशिक्षण नौकेच्या उभारणीमध्येही सी कॅडेट्सचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
‘वरुण’ नौकेचे १९८१ साली जलावतरण करण्यात आले व त्यानंतर १५ वर्षे ती अन्य नौकांच्या बरोबरीने कार्यान्वित होती. सी कॅडेट्सने विविध क्रीडा प्रकारांतही आपला ठसा उमटवला आहे. १९७६ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅडेट्सच्या जागतिक स्पर्धेचे त्यांनी अजिंक्यपद पटकावले. चीनमध्ये १९८९ साली झालेल्या स्पर्धेत पहिल्यांदाच देशाबाहेर सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम या कॅडेट्सने केला. तसेच आंतर क्लब राष्ट्रीय विजेतेपदालाही त्यांनी २००४ साली गवसणी घातली आहे. इतकेच नव्हे तर १९८२ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत एका माजी कॅडेटने अधिकाऱ्याच्या मदतीने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ‘ द कॉर्प्स’ आंतरराष्ट्रीय सी कॅडेट असोसिएशन ( आयएससीए) चा १९८५ पासून सक्रीय सदस्य आहे.आयएससीएचे वार्षिक अधिवेशन २००५ साली प्रशिक्षणासाठी उपयोगात येणाऱ्या ‘जवाहर’ या जहाजावर आयोजित करण्यात आले होते. या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने जगभरातील कॅडेट्स ‘जवाहर’मध्ये एकत्रित आले होते.जवाहरमध्ये २००५ साली आयएससीएशी संबंधित संघटनांची पहिली स्पर्धा पार पडली. त्यानंतर चार वर्षांनी २००९ मध्ये जवाहरमध्येच दुसऱ्या स्पर्धेचेही यशस्वी आयोजन करण्यात आले होते. आंततराष्ट्रीय देवाणघेवाण योजनेनुसार भारतीय सी कॅडेट्सना अमेरिका, ब्रिटन, स्वीडन व हॉँगकॉँगमधील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधीही मिळाली आहे.
सी कॅडेट्स असलेल्या युवक- युवतींमधील उत्साह, आनंद, शिस्त याचे प्रात्याक्षिक म्हणजे ‘हॉर्न पाइप नृत्य’ आहे, असे मत नौदल प्रमुख डी.के. जोशी यांनी सी कॅडेट्सना उद्देशून मागील वर्षी दिलेल्या संदेशात म्हटले होते. सी कॅडेट्सने सादर केलेले हॉर्न पाइप नृत्य हे गेटवे ऑफ इंडियावर नौदल दिनानिमित्त मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, असे गौरवोद्गारही जोशी यांनी आपल्या संदेशात काढले आहेत. सी कॅडेट ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था असून पश्चिम विभागाचे नौदल प्रमुख या संस्थेचे मुख्य विश्वस्त असतात. या स्वयंसेवी संस्थेच्या अन्य विश्वस्तांमध्ये नौदल, उद्योग,जहाजबांधणी या सारख्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असतो. कमोडर सुपरिंटेंडंटकडे या संस्थेच्या मुख्य कार्यवाहपदाची जबाबदारी असते. तर नौदलप्रमुख हे सी कॅडेट कौन्सिलचे अध्यक्ष असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा