अनेक संघटनांना बेमालूमपणे आपल्या हेतूंसाठी वापरून घेणारा साईबाबा म्हणजे बुद्धिवंतांचा बुद्धिभेद करण्यासाठी नक्षलवादी चळवळीने वापरलेले धारदार हत्यारच होते. साईबाबावरील आरोप सिद्ध होऊन एक हत्यार निकामी झाले, तरी अशी दुसरी हत्यारे आहेतच आणि दुर्बळांची बाजू घेण्याच्या नादात या हत्यारांकडून बुद्धिभेद करून घेणारेही भरपूर आहेत. हिंसक नक्षलवादी हेच वंचित आहेत, अन्यायग्रस्त आहेत, असे दाखवण्यात यशस्वी झालेल्या साईबाबाच्या कार्यपद्धतीची ही ओळख..
उत्तराखंडच्या हेम मिश्राला गडचिरोलीतील अहेरीत अटक होते आणि तासाभरात या अटकेच्या निषेधार्थ फेसबुकवर पत्रके झळकू लागतात. हे कसे शक्य आहे? फारशी संपर्काची साधने उपलब्ध नसताना गेल्या अनेक वर्षांपासून जंगलात राहणारे जहाल नक्षलवादी जागतिक घडामोडींविषयी अद्ययावत कसे असतात? जगभरातील फुटीरतावादी नेते नक्षलवाद्यांच्या संपर्कात कसे असतात? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे गडचिरोली पोलिसांनी नुकत्याच अटक केलेल्या प्राध्यापक जी. एन. साईबाबाच्या कार्यशैलीत दडलेली आहेत. आधी पीपल्स वॉर ग्रुप व नंतर भाकप माओवादी असा नामविस्तार झालेल्या या हिंसक चळवळीला जागतिक पातळीवर फुटीरतावाद्यांच्या वर्तुळात मान्यता मिळवून देण्यात तसेच देशपातळीवर विस्तारीकरणाचा मार्ग प्रशस्त करून देण्यात दिल्ली विद्यापीठातील या इंग्रजीच्या प्राध्यापकाचा सिंहाचा वाटा आहे. मूळचा आंध्रचा व पोलिओवर मात करून शिकलेला हा हुशार तरुण दिल्लीत कसा आला त्याचीही कथा मोठी रंजक आहे. देशाच्या मध्यभागातील जंगलात प्रभावक्षेत्र निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना २०००च्या आसपास चळवळ विस्ताराची व देशभरातील विविध माओवादी गटांना एकत्र आणण्याची गरज भासू लागली तेव्हा दिल्लीत कुणी तरी जबाबदार समन्वयक नेमावा अशी कल्पना समोर आली. या चळवळीचा प्रमुख गणपतीने मग आंध्र प्रदेशात शोध सुरू केला व साईबाबा त्याच्या नजरेत आला. गणपतीने २००१ मध्ये साईबाबाला दिल्लीत पाठवले. प्रारंभीची दोन वष्रे उस्मानिया विद्यापीठात नोकरी करणाऱ्या साईबाबाने देशभरातील माओवादी गटांशी संपर्क स्थापित केला, पण मतभेदामुळे विलीनीकरणासाठी कुणी तयार होत नव्हते. हे मतभेद मिटवता मिटवता नाकीनऊ आलेल्या साईबाबाने २००३ मध्ये जंगलात जाऊन गणपतीची भेट घेतली व आपण हे काम करू शकत नाही असे स्पष्ट केले. गणपतीने त्याची समजूत काढली. दिल्लीत काम करण्यासाठी स्वतंत्र निधी मिळेल असे आश्वासन दिले आणि साईबाबा पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. त्याच वर्षी दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या साईबाबाने नंतरच्या एकाच वर्षांत माओवादी गटांच्या विलीनीकरणाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला.
सप्टेंबर २००४ला हे विलीनीकरण यशस्वी झाल्यानंतर साईबाबाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वयकाची भूमिका बजावणे सुरू केले. या चळवळीला जास्तीत जास्त बुद्धिवंत, डावे विचारवंत, फुटीरतावादाचा पुरस्कार करणारे लेखक, कवी, लोकनेते कसे जुळतील या दृष्टीने साईबाबाचे प्रयत्न सुरू झाले व यातूनच २००५ मध्ये क्रांतिकारी लोकशाही आघाडीची स्थापना झाली. कडव्या डाव्या विचारांच्या देशभरातील २२५ संघटना या आघाडीत सामील करून घेण्यात साईबाबा यशस्वी ठरला. आघाडीत सामील झालेल्या या सर्व संघटनांना वर्षभर कार्यक्रम देण्याचे काम साईबाबा करायचा. आघाडीची अधिवेशने घेणे, त्यात देश तसेच जगभरातील फुटीरतावादी नेत्यांना बोलावणे, काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या हिंसक संघटनांना आघाडीत सामील करून घेणे व या माध्यमातून नक्षलवादी चळवळीला केंद्रस्थानी ठेवणे हे साईबाबाचे मुख्य सूत्र होते. विविध समर्थक संघटनांच्या माध्यमातून देशपातळीवर सक्रिय असलेल्या नक्षल समर्थकांना सातत्याने सरकारविरुद्ध उठाव करता यावा यासाठी साईबाबाने तब्बल २५ नवे फोरम तयार केले. यात महिला, कामगार, शेतकरी, दलित विद्यार्थ्यांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठीच्या फोरमचासुद्धा समावेश आहे. गडचिरोली पोलिसांनी साईबाबाच्या घरातून हजारो कागदपत्रे जप्त केली. शिवाय त्याच्या संगणकात लाखो फाइल्स सापडल्या. ही कागदपत्रे नजरेखालून घातली की साईबाबा नक्षलवाद्यांसाठी कसे काम करीत होता हे स्पष्ट होते. देशभरातील अनेक कारागृहांत नक्षलवादी बंदिस्त आहेत. या सर्वाची तपशीलवार माहिती साईबाबाकडे उपलब्ध आहे. या सर्वाना राजकीय कैदी संबोधण्यात यावे यासाठी साईबाबाने अनेकदा प्रसिद्धिमोहिमा (कॅम्पेन) चालवल्या. या कैद्यांनी कारागृहात उपोषण केव्हा करायचे, ते सोडवायला कुठल्या मानवाधिकार संघटनांनी जायचे, हेसुद्धा साईबाबाच ठरवायचा.
या प्राध्यापकाने हा कैद्यांचा प्रश्न जागतिक पातळीवर नेता यावा यासाठी अनेक देशांतील मानवाधिकार संघटनांशी थेट संपर्क प्रस्थापित केला. देशातल्या कुठल्याही कारागृहात नक्षलवाद्यांनी उपोषण सुरू केले की या जगभरातील संघटनांना साईबाबाचा मेल जायचा. देशात नक्षलवादाच्या आरोपावरून कुणालाही अटक झाली की त्याच्या अटकेचा निषेध करणारे पत्रक साईबाबा तयार करायचा व एकाच वेळी सहा हजार मेल आयडीवर टाकायचा. त्यामुळे साहजिकच जगभरातून या अटकेचा निषेध व्हायचा व प्रकरणाचे स्वरूप गंभीर व्हायचे. एवढय़ावरच साईबाबा थांबायचा नाही, तर हिंसा व फुटीरतावादाचा पुरस्कार करणाऱ्या जगभरातील संकेतस्थळांवर साईबाबा चळवळीशी संबंधित प्रत्येक घडामोडीची माहिती टाकायचा. त्यामुळे भारत हा देश सामान्य जनतेवर अत्याचार करणारा देश आहे अशी प्रतिमा तयार झाली. देशातील या हिंसक चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटीरतावाद्यांच्या वर्तुळात मान्यता मिळवून देण्यात साईबाबाचा मोठा सहभाग राहिला आहे. श्रीलंकेत सक्रिय असलेल्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमच्या न्यूयॉर्क कार्यालयाशी नक्षलवाद्यांच्या वतीने सतत संपर्कात असलेला साईबाबा एकमेव व्यक्ती होता. केंद्र सरकारने या चळवळीच्या बीमोडासाठी ग्रीन हंट मोहीम सुरू केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी अमेरिकेत एक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा साईबाबाने आयोजित केला होता व त्यासाठी त्याला लिट्टेच्या तेथील समर्थकांची मोठी मदत झाली. जगभरातील अनेक देशांमध्ये माओवादी गट स्थापन करण्यात यशस्वी ठरलेला साईबाबा या संदर्भात तयार केलेले प्रत्येक पत्र आधी गणपतीकडे पाठवायचा. त्याने मसुदा मंजूर केला तरच ते पत्र समोर रवाना व्हायचे. अनेकदा संपर्काच्या अडचणीमुळे मसुदा मंजूर होऊन येण्यास उशीर व्हायचा, तेव्हा साईबाबा अस्वस्थ व्हायचा. ही अस्वस्थता व्यक्त करणारे अनेक मेल्स साईबाबाच्या संगणकात सापडले आहेत. दहशतवादाने ग्रस्त असलेल्या अनेक देशांत माओवादी गट उभारणे शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर साईबाबाने या दहशतवादी संघटनांशी थेट संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले. यात तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीसुद्धा झाला. या संघटना व नक्षलवाद्यांनी एकमेकांना कशी मदत करायची याचेही प्रारूप साईबाबाने तयार केले होते. ही सर्व कागदपत्रे आता पोलिसांच्या ताब्यात आली आहेत.
नक्षलवाद्यांकडून देशभरात सुरू असलेल्या हिंसाचारावर साईबाबाचे बारीक लक्ष असायचे. पोलिसांनी नक्षलवाद्यांना ठार मारले की सत्यशोधन समिती तयार करणे, त्यात कोण असावे हे ठरवणे तसेच त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणे ही कामे साईबाबा पार पाडायचा. मध्यंतरी ओडिशातील नक्षलवाद्यांनी इटालियन पर्यटकाचे अपहरण केले. तेव्हा साईबाबाच्या दिशानिर्देशावरूनच नक्षलवादी वेळोवेळी भूमिका मांडत होते. काही वर्षांपूर्वी बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण केले. त्यांच्या सुटकेसाठी नितीशकुमार यांनी दबाव आणला. या प्रकरणात जनमत विरोधात जात आहे हे लक्षात येताच साईबाबाने त्यांची सुटका करणे कसे योग्य आहे हे बिहारमधील नक्षलवाद्यांना पटवून दिले व त्यानंतरच त्यांची सुटका झाली. बिहार, उत्तराखंड, पंजाब, आसाम या आंतरराष्ट्रीय सीमा लागून असलेल्या राज्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रसार करण्यात साईबाबाला बऱ्यापैकी यश आले. पंजाबमधील खलिस्तानवाद्यांना आणखी बळ देण्यासाठी नक्षलवादी पाहिजे ती मदत करायला तयार आहे, असे संदेश साईबाबाने अनेकांना पाठवले आहेत.
साईबाबाची दिल्लीतील बुद्धिवंतांच्या वर्तुळात बरीच चलती होती. त्याचा अचूक फायदा त्याने घेतला. नक्षलवादाच्या संदर्भात नियोजन आयोगाने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या बैठकांचे सविस्तर तपशील, गृहमंत्रालयाने या प्रश्नावर आयोजित केलेल्या पोलीस महासंचालकांच्या बैठकांचे इतिवृत्त साईबाबाच्या घरी सापडले. ही सर्व माहिती संकलित करून तो ती नक्षलवाद्यांना पोहोचवत होता. नक्षल चळवळीशी संबंधित कोणतीही व्यक्ती दिल्लीत आली की त्याची व्यवस्था करणे, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याला भाडय़ाचे घर घेऊन देणे, छोटासा व्यवसाय उभारून देणे अशी अनेक कामे साईबाबाने केली. यासाठी लागणारा पैसा नक्षलवाद्यांनी साईबाबाला पुरवला. गडचिरोलीत सक्रिय असलेल्या नर्मदा या कार्यकर्तीने २ वर्षांपूर्वी साईबाबाला ५ लाख रुपये पाठवले. ज्यांच्या हातून पैसे पाठवण्यात आले ते पांडू व महेश आता साईबाबासोबत अटकेत आहेत. नक्षलवाद्यांचा प्रमुख गणपती जंगलात अज्ञातवासात राहून सुरक्षा दलांशी लढत आहे. तो प्रमुख असला तरी त्याच्या कामाचे स्वरूप मर्यादित आहे. मात्र गेल्या १४ वर्षांत साईबाबाने गणपतीचा दूत म्हणून देश व विदेश पातळीवर मोठी कामगिरी बजावली हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, चळवळीशी संबंधित मोठा मासा गळाला लागल्याने पोलिसांच्या वर्तुळात समाधान असले तरी नक्षलवाद्यांच्या वर्तुळात सध्या प्रचंड अस्वस्थता आहे.
हिंसेचा अमर्याद वापर, फुटीरतावाद, स्वदेशाविरुद्ध बंड पुकारणे, या साऱ्यांचे पुस्तकी किंवा तात्त्विक समर्थन आणि भारतीय संदर्भात त्याचा प्रत्यक्ष वापर यांमध्ये अर्थातच फरक आहे. तो फरक बुद्धिवंतांनी विसरावा, यासाठी होणाऱ्या प्रयत्नांची पीछेहाट साईबाबाच्या अटकेमुळे झालेली आहे. साईबाबावरील हे आरोप सिद्ध करण्याचे मोठे आव्हान देशातील पोलीस यंत्रणेसमोर आहेच; परंतु सरकारवर अविश्वास आणि नक्षलवाद्यांवर विश्वास ठेवणाऱ्या बुद्धिवंतांना आपलेसे करण्याचे आव्हान अधिक मोठे आहे. साईबाबाच्या माध्यमातून या चळवळीशी संबंध ठेवून असणारे अनेक बुद्धिवंत सध्या आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत. अरुंधती रॉय त्यात आघाडीवर आहेत.