शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
देशाच्या राजकीय पडद्यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे वेगळे स्थान होते. त्यांच्यात एक वेगळा सुसंस्कृतपणा होता. आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये किंवा वेगळ्या विचारसरणीचे असलो तरी त्यांनी कधीही संबंधांमध्ये अंतर पडू दिले नाही. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आमचे अत्यंत चांगले संबंध होते. २००१ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भूकंपानंतर पुनर्वसनाचे काम जिकिरीचे होते. १९९३ मध्ये लातूर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचा अनुभव असल्यानेच वाजपेयी यांनी बोलावून घेतले. आपत्कालीन प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे काम आपल्याकडे सोपविले होते. समितीने सादर केलेल्या शिफारसीनुसार पुढे देशात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची (एनडीआरएफ) स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय प्रश्नावर ते नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांना विश्वासात घेत. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर विरोधकांशी चर्चा करीत असत. १९९८ मध्ये वाजपेयी हे पंतप्रधान असताना आपण लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर होतो. काँग्रेस पक्षाने तेव्हा वाजपेयी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता. लोकसभेत झालेल्या मतदानात वाजपेयी यांचे सरकार अवघ्या एका मताने पराभूत झाले. वाजपेयी यांना पायउतार व्हावे लागले. विरोधी पक्षनेते या नात्याने सरकारच्या पराभवाकरिता आपणच सारी व्यूहरचना आखली होती. राजीनामा द्यावा लागला त्याच रात्री वाजपेयी यांचा दूरध्वनी आला होता. पंतप्रधानपदाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच अविश्वास ठरावावर आपण केलेल्या भाषणाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. एवढा मोठेपणा अन्य कोणत्याही नेत्याकडे क्वचितच असावा. सरकार अवघ्या एका मताने पडल्यावरही विरोधी पक्षनेत्याचे आभार मानण्याचा मोठेपणा त्यांच्यात होता.
दुसरी आठवण म्हणजे वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्र संघात गेलेल्या शिष्टमंडळात मीसुद्धा सदस्य होतो. सर्व सहकाऱ्यांना ते विश्वासात घेत. तसेच दररोज सकाळी आपण कोणती भूमिका मांडणार आहोत त्याची पूर्वकल्पना साऱ्यांनाच देत असत.
देशासमोरील प्रश्नाच्या संदर्भात ते नेहमी अस्वस्थ असत आणि हे प्रश्न मिटले पाहिजेत, यावर तोडगा कसा काढता येईल हा त्यांचा प्रयत्न असायचा. संसदपटू म्हणजे त्यांचा साऱ्यांनाच आदर्श होता. एखादा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेल्यास तो सुटेल कसा यावर त्यांचा कटाक्ष असायचा. अशा या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली!