जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे (१ ऑक्टोबर) औचित्य साधून राज्य सरकारने सोमवारी जाहीर केलेले ज्येष्ठ नागरिक धोरण, त्यात मुलांवर आईवडिलांना सांभाळण्याचे घालण्यात आलेले बंधन आणि ‘ज्येष्ठ म्हणजे वय पासष्ट’ ही मर्यादा, यांवर उलटसुलट चर्चा पुढील काही दिवस होत राहील.. कदाचित राज्याच्या अन्य ‘कल्याणकारी धोरणां’चे जे होते, तेच याही धोरणाचे होईल.. त्याऐवजी या लेखात चर्चा आहे ती ८० वा त्याहून अधिक वयाच्या अतिज्येष्ठांसाठी ६० ते ७५ वर्षांच्या कार्यक्षम ज्येष्ठांना काय करता येईल याची!
भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या आजमितीला आठ टक्के आहे. ग्रामीण, शहरी किंवा प्रांतवार विभागणीत यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, परंतु महत्त्वाचे म्हणजे पुढील आठ-दहा वर्षांतच (सन २०२०-२२ च्या सुमारास) भारतातील ज्येष्ठांची संख्या १८ टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मर्यादित अपत्ये आणि वाढती वयोमर्यादा यांचा हा अपरिहार्य परिणाम आहे. यातील दृश्य भाग म्हणजे वयाची ८० वा ९० वर्षे पूर्ण केलेल्या वयोवृद्धांची संख्याही आणखी दशकभराने आजच्यापेक्षा बरीच मोठी असणार आहे. शंभरी ओलांडणेदेखील बऱ्याच जणांबाबत शक्य होईल! आज ज्येष्ठांच्या वयोमर्यादेवरून वादंग माजत असताना या दृष्टीने आपण पुढला विचार करायला हवा. त्यासाठी प्रथम ‘ज्येष्ठ नागरिक’ आणि ‘अतिज्येष्ठ’ किंवा वयोवृद्ध यांमधील फरक स्पष्ट करू.
नोकरीपेशामध्ये साठ-पासष्ट वर्षांवरील व्यक्तींच्या कार्यक्षमतेमध्ये आणि कार्यस्वारस्यामध्ये घट होणे अपेक्षित असल्यामुळे तसेच नवीन पिढीला वाव मिळावा या दृष्टीने नियमानुसार ५८, ६०, ६२, ६५ असे निवृत्तीचे वय ठरविले जाते. निवृत्तीच्या वयाला ती व्यक्ती काम करत राहण्यासाठी खरोखरीच ‘अक्षम’ असते का, हा प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर बव्हंशी नकारार्थी असते. केवळ वयोमानामुळे निवृत्त होणारे तसेच वरील वयाआधीच निवृत्ती स्वीकारणारे या सर्वाचा उल्लेख ‘निवृत्त तरुण’ असा करता येईल.
त्यापुढील ‘तरुण ज्येष्ठ’ हे त्यांच्या प्रकृतिमानानुसार ६० ते ७०; किंवा अगदी ७५ वर्षांपर्यंतचे असू शकतात. त्यापुढील म्हणजे ७०-७५ ते ८५ पर्यंत वयोमान असणारे, परंतु स्वावलंबी जीवन आनंदाने जगणारे असे सर्व जण आपण ‘कार्यक्षम ज्येष्ठ’ या विभागात मोजू. त्याही पुढील वयाच्या – म्हणजे ८० ते ८५ वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या वर्गवारीच्या सोयीसाठी ‘अतिज्येष्ठ’ किंवा वयोवृद्ध म्हणता येईल.
ज्येष्ठ नागरिकांमधील ही वर्गवारी गृहीत धरल्यास ‘तरुण ज्येष्ठ’ आणि ‘कार्यक्षम ज्येष्ठ’ यांच्या ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा विरंगुळा केंद्रे विभागवार असतात. त्यांच्या पाक्षिक किंवा साप्ताहिक सभांच्या निमित्ताने इतरांशी भेटीगाठी होऊन, मित्रपरिवार लाभल्यामुळे निवृत्त जीवन आनंदी ठेवण्याची सोय होते. मुख्य प्रश्न राहतो तो प्रकृतिमानामुळे, एकटय़ाने घराबाहेर पडण्यावर र्निबध आल्यानंतर घरातच अडकून पडलेल्या अतिज्येष्ठांचा. त्यांचा असहाय एकटेपणा हा ‘प्रश्न’ म्हणून कोणी सोडवायला घेतच नाही. वयोमानानुसार जीवनसाथी गेल्यामुळे आणि मुलेबाळे नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी/ परदेशी गेल्यामुळे घरातल्या घरातच एकटेपणा सोसणारे अनेक अतिज्येष्ठ दृष्टिआड असतात, म्हणून केवळ समाजाच्या ते लक्षातही येत नाहीत. ही ‘एकटेपणाची’ शिक्षा भोगणारी, आपल्यासारख्याच भावभावना असणारी ‘माणसं’ आहेत, हे विसरणे हा कृतघ्नपणा ठरेल. अशा प्रकारचे एकटेपण सुसह्य़ करण्यासाठी आणि आवश्यक अशी मदत या अतिज्येष्ठांना व्हावी, यासाठी काही सूचना मांडत आहे. त्यांवर विचार व कृतीही व्हावी, अशी अपेक्षा आहे.
‘निवृत्त तरुण’, ‘तरुण ज्येष्ठ’ आणि ‘कार्यक्षम ज्येष्ठ’ अशा विभागणीद्वारे प्रत्येक गटाच्या क्षमता आणि मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या सर्व जणांकडे निवृत्त जीवनशैलीमुळे थोडाफार मोकळा वेळ असेल, असे समजता येईल. या मोकळय़ा वेळाला थोडी सेवावृत्तीची जोड दिली तर वरील तीन प्रकारच्या निवृत्तांकडून त्यांच्या वसाहतीतील किंवा प्रभागातील एकटय़ा असलेल्या ‘अतिज्येष्ठां’ची माहिती घेऊन त्यांच्यासाठी खालीलपैकी काही कामे करता येतील :
१) अतिज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांना भेटणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी स्वरूपात बोलणे, कोणाला तरी येऊन आपल्याशी बोलावेसे वाटते हेसुद्धा अशा एकाकी वृद्धांना दिलासा देऊन जाते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर होतो आहे, ही भावना सुखावणारीच असते.
२) ठरावीक दिवशी, ठरावीक वेळी अतिज्येष्ठांशी फोनवर संपर्क साधून त्यांची विचारपूस करणे हेदेखील अतिज्येष्ठांना दिलासा देणारेच ठरेल. आपली कोणीतरी आपुलकीने, आठवणीने विचारपूस करते आहे, हा अनुभव एकाकी व्यक्तींना सुखावह असेल.
३) आर्थिकदृष्टय़ा शक्य असेल अशा ज्येष्ठांसाठी वीज, दूरध्वनी आणि (असल्यास) मोबाइल फोनची बिले ईसीएस पद्धतीने भरली जावीत यासाठी बँकांचे फॉर्म वगैरे भरून तशी व्यवस्था लावून देणे.
४) या अतिज्येष्ठावस्थेत स्त्री-पुरुष हा भेद खूपच विरळ होऊन जात असल्यामुळे, काही दिवसांच्या परिचयानंतर अशा तीन-चार एकेकटय़ा अतिज्येष्ठांना त्यांच्यापैकी एकाच्या घरी एकमेकांसमवेत पत्ते, गप्पागोष्टी वगैरे करता येतील यासाठी आठवडय़ातून एकदा काही तास एकत्र आणून, जमल्यास चहा-नाश्त्याची व्यवस्था करून पुन्हा त्यांच्या घरी सोडणे.
५) अतिज्येष्ठ मंडळी या प्रकारे एकत्र येत असल्यास त्यांच्यापैकी ज्या कोणाचे स्वभाव एकमेकांशी जुळतात त्यांना सुरुवातीला आठवडय़ातून एक-दोन दिवस एकमेकांकडे जाऊन राहण्याबद्दल सुचवता येईल. हे झाल्यानंतर पुढेमागे दोघा-चौघांना एकत्र राहण्यासंबंधी सुचवता येईल. तो त्यांचा आनंदी वृद्धाश्रम होईल आणि स्वयंपाकपाण्यासाठी सेवकवर्गाची व्यवस्थाही लावून देता येईल.
६) अतिज्येष्ठांना त्यांच्या डॉक्टरच्या भेटींसाठी वेळ निश्चित करणे, त्यांना डॉक्टरकडे नेऊन परत आणणे, औषधे आणून देणे आणि इतर प्रकारच्या सेवाशुश्रूषा लागल्यास रुग्णवाहिकेची सोय करणे, नातेवाइकांना फोन करणे वगैरे कामे असतीलच. त्यासाठी आपण सेवा देत असलेल्या अतिज्येष्ठांच्या डॉक्टरचे तसेच जवळच्या आणि लांबच्या नातेवाइकांचे फोन क्रमांक कार्यक्षम ज्येष्ठांनी घेऊन ठेवणे. स्वयंसेवकांनी स्वत:चे दूरध्वनी क्रमांकही अतिज्येष्ठांच्या हाती लागतील अशा ठिकाणी त्यांच्या घरी ठेवणे.
ज्यांना मनापासून इतरांच्या उपयोगी पडत राहून सेवा करण्याची आवड आहे, अशा वरील तीन प्रकारच्या सक्षम आणि सेवाभावी निवृत्तांना आपल्या घराजवळच्या अतिज्येष्ठांची काळजी घेता येईल. स्वत: काही न करणाऱ्यांपैकी कोणी ‘लष्कराच्या भाकऱ्या’ वगैरे शब्दांनी हिणवले तरी ते मनावर न घेता आपल्या स्वत:च्या अतिज्येष्ठावस्थेच्या शक्यतेचे स्मरण ठेवून, त्याचप्रमाणे आपण एका नवीन सेवासंस्कृतीची पेरणी करतो आहोत या विचाराने हे काम करत राहायला हवे. यासाठी या कार्याला शहर किंवा प्रभागातील अस्तित्वात असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघांतर्फे संस्थात्मक स्वरूप दिल्यास बरे. स्वयंसेवकांचे काम व त्याबद्दलची तपशीलवार माहिती, अशा स्वयंसेवकांचे कौतुक त्या त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभांमधून अथवा वार्तापत्रांतून केले जावे, ज्यायोगे अशा सेवावृत्तीला प्रतिष्ठा मिळून अधिकाधिक स्वयंसेवक पुढे येतील.
शारीरिक व्याधीपेक्षाही असहाय एकटेपणाची अवस्था अधिक तापदायक असते, हे कोठडीतील कैद ही शिक्षा म्हणून दिली जाते, यावरून लक्षात यावे. अनेकानेक वर्षे हसतेखेळते आणि कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व केवळ वय वाढल्यामुळे असहाय वार्धक्याच्या गर्तेत सापडणे, हे कोणत्याही न केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेसारखेच आहे. इच्छामरण वगैरे विषयांची चर्चा इथे अपेक्षित नाही, तो या लिखाणाचा हेतू नाही. सकारात्मक, आनंदी आणि प्रेमळ जीवन जगणे हे प्रत्येक ज्येष्ठाला शक्य व्हावे अशी परिसरातील इतर सर्व ज्येष्ठवृंदाची अपेक्षा असावी. यासाठी आज जे सुपात आहेत, त्यांनी जात्यात असणाऱ्यांना मदत करावी. या नवीन सेवासंस्कृतीच्या पेरणीतूनच आज जे कार्यक्षम ज्येष्ठ आहेत, त्यांनाही अतिज्येष्ठ झाल्यावर लाभ मिळेल.
वय वाढणे आणि वार्धक्य..
वार्धक्याचा मुख्य परिणाम म्हणजे शरीरयंत्राच्या निरनिराळ्या संस्थांच्या सक्षमतांमध्ये होत जाणारी घट. दृष्टिदोष, श्रवणदोष, विकलांगता आदी दृश्य परिणामांव्यतिरिक्त विस्मरण, कंपवात किंवा अवयवांवर ताबा न राहणारे अन्य दोष वाढलेल्या वयामुळे सहज निर्माण होत असतात. शरीरसंस्थांची क्षमता कमी होण्याचे वेळापत्रक वयाशीच निगडित असते असे नसून, ते व्यक्तिनिहाय- जीवनशैलीशी अधिक निगडित असते. वार्धक्याच्या परिणामांचे अध्ययन आणि त्यावरील उपाययोजना यांसाठी अनुक्रमे जेरंटॉलॉजी (वार्धक्यशास्त्र) आणि जेरिअॅट्रिक्स (वृद्धांसाठीचे औषधोपचारशास्त्र) या नवीन वैद्यकीय शाखा आशेचा किरण ठरणार आहेत. वार्धक्य दूर ठेवता येणार नाही, परंतु ते सुसह्य़ करता येण्याचे मार्ग शोधता येतात.