महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट उलथवून लावणारे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले नेते व दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे प्रदीर्घ आजारानंतर येथे निधन झाले. त्यांनी नागरी हक्कांसाठी दिलेला लढा हा मार्टिन ल्यूथर किंग व अब्राहम लिंकन यांच्या तोडीचा होता. त्यांच्या निधनानिमित्त १४ डिसेंबपर्यंत दुखवटा पाळला जाणार असून अंत्यविधीसाठी जगभरातून अनेक नेते येण्याची अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेत दहा दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत असून भारत व अमेरिकेनेही त्यांचे ध्वज अध्र्यावर उतरवले आहेत. १९९० मध्ये मंडेला यांना भारतरत्न देण्यात आले होते. मंडेला यांना हॉटन येथील त्यांच्या घरी सप्टेंबरपासून उपचार दिले जात होते. त्याआधी ते तीन महिने फुप्फुसाच्या आजाराने प्रिटोरिया रुग्णालयात होते.
मंडेला वकील होते व माजी बॉक्सरही होते, २७ वर्षे ते वर्णविरोधी लढय़ासाठी रॉबेन बेटांवर तुरुंगात होते. रिव्होनिया येथील खटल्यात त्यांना पन्नास वर्षांपूर्वी इतरांसमवेत दोषी ठरवण्यात आले होते. १९९९ मध्ये अध्यक्षपदाची एक कारकीर्द पूर्ण करून ते पायउतार झाले.
आमच्या देशाने महान सुपुत्र गमावला आहे व जनतेने पिता गमावला आहे असे अध्यक्ष झुमा यांनी स्पष्ट केले. त्यांच्या पश्चात पत्नी विनी मंडेला, पहिल्या पत्नी एवलिन मेस, तिसऱ्या पत्नी ग्रॅका माशेल आहेत.
१९७६ मध्ये प्रथम वर्णद्वेषातून काही विद्यार्थ्यांना ठार करण्यात आले, त्या सोवेतो या कृष्णवर्णीय गावात काही लोक जमले व मंडेला यांना आदरांजली वाहिली. या ठिकाणी काही काळ मंडेला वास्तव्यासही होते. लोकांनी मंडेला यांच्या आफ्रिक न नॅशनल काँग्रेसचे हिरवे, पिवळे, काळे झेंडे हाती धरले होते, त्यांनी वर्णविद्वेशातून मुक्तीचा आनंद या वेळी साजराही केला. मंडेला यांचे आयुष्य आज आम्ही साजरे करीत आहोत, त्यासाठी नाचत गात आहोत असे त्यांनी सांगितले. मंडेला यांच्या हॉटन या निवासस्थानाबाहेर दु:खाचे वातावरण नव्हते, सर्वत्र जिवंतपणा होता. लोक गात होते. जागतिक फुटबॉल स्पर्धेत वापरलेला वुवुझेला हा प्लास्टिकचा भोंगा दाखवत होते.
गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेतील नागरी हक्कांचा लढा २० वर्षे चालू होता. तो १९१४ मध्ये संपला. त्यानंतर चार वर्षांनी मंडेला यांचा जन्म झाला होता. पीटरमारित्झबर्ग येथे महात्मा गांधींना ते कृष्णवर्णीय असल्याने रेल्वेतून फेकण्यात आले, त्या घटनेचा मंडेला यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. मंडेला यांनी वर्णद्वेष विरोधी चळवळीत प्रेरणास्थान म्हणून नेहमी गांधीजींना समोर ठेवले होते. इ.स. २००० मध्ये त्यांनी टाइम नियतकालिकासाठी लेख लिहिला होता, त्यात त्यांनी गांधीजींना भारताच्या अहिंसक लढय़ाचे पिता म्हटले होते व गांधीजींच्या लढय़ाची मुळे आफ्रिकेत होती, असेही म्हटले होते. ते एके ठिकाणी लिहितात की, गांधीजींचा जन्म भारतात झाला पण आम्ही त्यांना दत्तक घेतले. ते भारतीय व दक्षिण आफ्रिकी नागरिक होते. दोन्ही देशांनी त्यांच्या बौद्धिक व नैतिक घडणीत मोठा वाटा उचलला होता. त्यांनी अनेक देशांतील वसाहतवादी राजवटीविरोधातील लढय़ांना आकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा