ठिकठिकाणची थंडी किती होती,  अशा कुतूहलातून पाहिले जाणारे तापमानाचे आकडे कधी कधी चक्रावून टाकणारेही ठरू शकतात. बातम्यांमध्ये तर महाबळेश्वरचं तापमान जास्त आणि अहमदनगरचं कमी, असंही छापून आलंय.. हा नोंदींमधला निष्काळजीपणा नव्हे.. पद्धत कसोशीनं पाळूनच या नोंदी केल्या जातात आणि प्रसारमाध्यमंही अधिकृतपणे कळवले गेलेलेच आकडे देतात, तरीही इथं महाबळेश्वर ‘गरम’ कसं काय राहातं?

 महाबळेश्वरला बर्फ पडल्याच्या बातम्या हिवाळ्यात वृत्तपत्रं व वाहिन्यांवर हमखास झळकतात. पाठोपाठ या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची आणखी गर्दी वाढते. तिथे वेण्णा तलावात जलविहार करण्यासाठी असलेल्या बोटी व परिसरात भल्या पहाटे हे बर्फ दिसते. त्यानंतर मात्र ते दिवसभर गायब होते. एकीकडे ही स्थिती असताना याच ‘बर्फ पडणाऱ्या’ शहराचे तापमान मात्र कितीतरी जास्त असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जाते. इतके की जवळच्या सातारा, पुणे अशा सर्वच ठिकाणांच्या तुलनेतही महाबळेश्वरचे रात्रीचे तापमान कितीतरी जास्त भरते. मग साहजिकच हे गौडबंगाल आहे, हा प्रश्न मनात येतो.
अगदी कालच्याच मंगळवारचे (१४ जानेवारी) उदाहरण घेतले तरी हेच दिसते. मंगळवारी पुण्याचे किमान तापमान होते १०.७ अंश सेल्सिअस, साताऱ्याचे होते ११.७ अंश. त्याच वेळी महाबळेश्वरचे किमान तापमान नोंदवले गेले तब्बल १७ अंश सेल्सिअस. राज्यात कमी तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक, अहमदनगरच्या तुलनेत तर ते खूपच जास्त होते. याच दिवशी नगरचे तापमान ११.१ अंशांवर होते, तर नाशिकचे ९.४ अंश. हे केवळ एका दिवसासाठी नाही, तर यंदाच्या संपूर्ण हिवाळ्यात अशीच स्थिती राहिली आहे. गेल्या वीसपंचवीस वर्षांचा मागोवा घेतला, तरी बहुतांश वेळी महाबळेश्वरच्या किमान तापमानाचे आकडे इतर शहरांच्या तुलनेत जास्तच राहिले असल्याचे दिसते. तिथे आतापर्यंत नोंदवले गेलेले नीचांकी तापमानही हेच सांगते. राष्ट्रीय हवामान केंद्राकडून उपलब्ध झालेल्या आकडय़ांनुसार, महाबळेश्वर येथे १ फेब्रुवारी १९४८ रोजी ३.९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे, तर पुण्यात १७ जानेवारी १९३५ रोजी १.७ अंशांचा नीचांक नोंदवला गेला आहे. हे पाहिल्यावर महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण कसे म्हणायचे, हा प्रश्न पडला तरी आश्चर्य वाटायला नको. पुढचा प्रश्न असा की महाबळेश्वरचे कोणते हवामान प्रातिनिधिक मानायचे- ‘बर्फ’ पडणारे खरे महाबळेश्वर की रात्रीचे तापमान पुणे-साताऱ्यापेक्षाही जास्त असलेले खरे?.. थंडीचे गौडबंगाल इथेच थांबत नाही. राज्यात सर्वात कमी तापमान कुठे नोंदवले जाते, याचे उत्तर ऐकले तर अनेकांना धक्का बसेल. काहींच्या मनात याचे उत्तर लोणावळा-महाबळेश्वर असेल, काहींच्या मनात नाशिक असेल किंवा मध्य भारतात मोडणारा व बराच काळ थंडीच्या लाटेत हरवणारा विदर्भसुद्धा असेल. प्रत्यक्षात मात्र या सर्व शहरांवर मात करून कमी तापमानाचा मान जातो तो अहमदनगरला. गेल्या तीनचार वर्षांपासून अहमदनगर अचानक चर्चेत आले. तिथे राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदवले जाऊ लागले.
हवामानाच्या या गोष्टी चकित करणाऱ्या वाटल्या, तरी त्याची वैशिष्टय़े नेमकेपणाने माहिती असणाऱ्यांना तितका धक्का बसणार नाही. हवामान-वातावरणाबाबत रूढ अर्थाने आपल्या मनात घर करून असलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष वास्तव यात मोठी तफावत आहे. याचे अगदी साधे उदाहरण म्हणजे दिवसाचे सर्वात कमी (किमान) तापमान कोणत्या वेळी नोंदवले जाते? मोजके लोक वगळता बहुतांश जणांकडून या प्रश्नाचे उत्तर येईल – मध्यरात्री किंवा पहाटे! प्रत्यक्षात मात्र किमान तापमान नोंदवले जाते ते सकाळी सूर्योदय झाल्यावर दहा-पंधरा मिनिटांनी. हवामानाच्या काही स्थितीचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी सकाळीच किमान तापमान नोंदवले जाते, पहाटे नाही आणि रात्रीच्या वेळी तर नाहीच नाही!
अशाच काही वस्तुस्थितींच्या आधारावर महाबळेश्वरच्या तापमानाचा वेध घेतला की त्याबाबतची कोडी आपोआप सुटतात. महाबळेश्वरातच काय, पण महाराष्ट्रात कुठेही बर्फ पडत नाही. कारण बर्फ पडण्यासाठी आवश्यक असलेल्या शून्य अंश सेल्सिअसच्या खाली तापमान राहील, असे राज्याचे हवामान नाही. महाबळेश्वरचे ‘बर्फ’ म्हणजे थंडीच्या दिवसांत तिथे गवतावर किंवा इतर पृष्ठभागांवर जमणाऱ्या दवबिंदूंचे गोठणे! हिवाळ्यात बऱ्याच भागात दव साचते. रात्री व पहाटेच्या वेळी विशेषत: गवत, पानं किंवा धातूंच्या पृष्ठभागावर लहान दवबिंदू जमा होतात. तापमान आणखी खाली म्हणजे शून्य अंशाच्या आसपास गेल्यावर हे दवबिंदू गोठतात. महाबळेश्वरला हेच घडते. पण काही तज्ज्ञांच्या मते त्यासाठी तापमान शून्य अंशांपर्यंत जाण्याचीही आवश्यकता नसते. पुण्यातील नॅशनल क्लायमेट सेंटरचे प्रमुख डॉ. ए. के. श्रीवास्तव यांच्या मते, तापमान ४ अंशांच्या खाली गेले की ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यासाठी शून्यापर्यंत तापमान गेले पाहिजेच असे नाही. हे दवबिंदू संपूर्ण महाबळेश्वरभर गोठत नाहीत, तर वेण्णा तलाव, लिंगमळा धबधबा येथे मुख्यत: ते घडते. इतरत्र थंडी असली तरी ते घडत नाही. महाबळेश्वर हा डोंगराळ प्रदेश असल्याने तेथील तापमानात भूरचनेनुसार मोठी तफावत असते. म्हणूनच वेण्णा तलावाजवळ दवबिंदू गोठत असतात, तेव्हा हवामान विभागाची वेधशाळा असलेल्या ठिकाणी मात्र तुलनेने उबदार वातावरण असते. तापमानातील अशीच तफावत इतरत्रही दिसते. पुण्यात शिवाजीनगर, पाषाण व लोहगाव येथे तापमानात किमान तीनचार अंशांचा फरक असतो. मुंबई तर हिवाळ्यात कुलाबा, सांताक्रुझ येथील तापमानात पाच ते सात अंशांची तफावत आढळते.
हवामानातील आणखी एक वस्तुस्थिती अशी, की एकाच ठिकाणी जमिनीजवळ व हवेत वेगवेगळे तापमान नोंदवले जाते. त्यामुळे जमिनीजवळ दवबिंदू गोठतात, तेव्हा तिथलेच हवेचे तापमान मात्र थोडे जास्त असते. हवामान विभागाची तापमान मोजण्याची विशिष्ट पद्धत आहे. त्याचा एक भाग म्हणजे तापमान जमिनीपासून १२५ सेंटीमीटर उंचीवर (साधारणत: चार फूट) मोजले जाते. जमिनीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत हवेचे तापमान कमी असते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी दवबिंदू गोठले, तरी तिथल्या हवेचे तापमान वेगळे भरते.. त्यामुळे कोणतेही एक तापमान महाबळेश्वरसाठी प्रातिनिधिक ठरत नाही. दव गोठणारे ठिकाण आणि तुलनेने उबदार असलेले ठिकाण ही दोन्ही त्याच एकाच शहराची ओळख आहे.
अहमदनगरला नोंदवले जाणारे कमी तापमान हासुद्धा चकित करणारा प्रकार. यापूर्वी नगरचे तापमान मोजले जायचे नाही. त्या वेळी बरीचशी नगरकर मंडळी एकीकडे असलेले पुणे आणि दुसरीकडे असलेले औरंगाबाद यांचे तापमान पाहायची. त्यावरून आपल्या शहराचे तापमान किती असेल, याचा अंदाज घ्यायची. पण गेल्या चारपाच वर्षांपासून तापमान मोजले जाऊ लागले आणि नगर हे नाव चर्चेत आले. नगर हा पर्जन्यछायेतील प्रदेश, त्यामुळे तिथे पाऊस कमी आणि वनस्पती आवरणही कमी. तरीसुद्धा तिथे तापमान कमी असते, हे वास्तव पचायला अवघड आहे. तरीही हवामानाच्या दृष्टीने हे स्वाभाविक आहे. कमी झाडोरा असलेल्या व समुद्रापासून दूर असलेल्या वाळवंटी प्रदेशात रात्रीच्या वेळी तापमान बरेच खाली जाते. म्हणूनच राजस्थानात चुरू, श्रीगंगानगर, जैसलमेर, बारमेर या ठिकाणी उन्हाळ्यात तापमान पन्नास अंशांकडे झेपावते, तर हिवाळ्यात शून्यापर्यंत पोहोचते.
त्यामुळे कोरडय़ा असलेल्या नगरला कमी तापमान नोंदवले गेले, तर आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. इतकेच नाही तर पुढच्या काळात महाराष्ट्रात कमी तापमान असलेले आणखी भलतेच ठिकाण नावारूपाला आले तरी नवल वाटून घ्यायला नको, कारण आपण अजूनही मोजक्याच ठिकाणचे तापमान मोजतो.

Story img Loader