प्रकाश टाकळकर
अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अकोले तालुक्यातील आदिवासींनी आपले पारंपरिक वाण बऱ्यापैकी जपले. काळाच्या ओघात हे पारंपरिक गावरान बियाणे नाहीसे होण्याच्या मार्गावर असतानाच ‘बायफ’ सारख्या काही स्वयंसेवी संस्थांमुळे या गावरान बियाणांच्या जतन संवर्धन चळवळीने मूळ धरले आहे.
अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेला अकोले तालुक्याचा पश्चिम भाग जैवविविधतेने समृद्ध आहे. निसर्गाच्या विविधतेइतकीच येथील पिकांमध्येही विविधता आढळून येते.सुधारित संकरित वाणांच्या लाटेतही येथील आदिवासींनी आपले पारंपरिक वाण बऱ्यापैकी जपले. काळाच्या ओघात हे पारंपरिक गावरान बियाणे नाहीसे होण्याच्या मार्गावर असतानाच ‘बायफ’ सारख्या काही स्वयंसेवी संस्थांमुळे या गावरान बियाणांच्या जतन संवर्धन चळवळीने येथे मूळ धरले आहे. येथील या पारंपरिक बियाणांना आता राज्याच्या विविध भागातून मागणी वाढत चालली आहे. येथील आदिवासी महिलांच्या परस बागेत तयार झालेल्या दर्जेदार गावरान बियाणांचे संच राज्य तसेच देशातील काही हजार कुटुंबांपर्यंत या वर्षी पोहोचले. स्वत:च्या कुटुंबाची गरज भागविण्या बरोबरच येथील परसबागा आता गावरान वाणांच्या बियाणांच्या निर्मितीची केंद्रे बनत आहेत. अकोले तालुक्याला गावरान बियाणांची निर्मिती करणारा तालुका अशी नवी ओळख निर्माण होत आहे.
या पारंपरिक बियाणांचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची एकदा लागवड केलेल्या पिकापासून निर्माण होणारे बी पुढील हंगामासाठी वापरता येते. हे स्थानिक वाण रोग आणि किडींना प्रतिकार करणारे तसेच चवीला रुचकर आणि आरोग्यदायी असतात. वातावरणीय बदलात टिकून राहाण्याची या वाणांची क्षमता आहे. रासायनिक खते,जंतुनाशके यांची गरज नसते. पावसाच्या पाण्यावर अथवा हवेतील ओलाव्यावरही ती येतात. पोषणमूल्यही चांगले असते.
या गावरान आणि सेंद्रिय उत्पादनांना अलीकडच्या काळात मोठी मागणी निर्माण झाली आहे. परसबागांचं महत्त्व लक्षात आल्यामुळे परसबागेसाठीच्या विविध पिकांच्या बियांना राज्यात आणि देशात मागणी वाढू लागली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी बायफ संस्थेच्या माध्यमातून निवडक महिलांचे प्रशिक्षण व बियाणे निर्मितीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. हा कार्यक्रम निरंतर चालावा म्हणून बायफच्या सहकार्याने ‘कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्था’ निर्माण करण्यात आली. या संस्थेवर पदाधिकारी म्हणून स्थानिक पातळीवर बियाणे संवर्धन करणाऱ्या महिला व पुरुष शेतकऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून परसबागांसाठी लागणाऱ्या दर्जेदार बियाणांची निर्मिती घरोघरी होऊ लागली आहे. तालुक्यात आज दर्जेदार गावरान बियाणांची निर्मिती करणारे सुमारे एक हजार बियाणे उत्पादक तयार झाले आहेत. पालेभाज्या, फळभाज्या, तृणधान्ये,कडधान्ये आदी विविध प्रकारच्या देशी वाणांचे बियाणे ते तयार करतात.
पारंपरिक वाणांचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकाला कळावे यासाठी ‘बायफ’ मार्फत प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, अभ्यास दौरे, मार्गदर्शन शिबिरे,तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. या सर्वाचा एकंदरीत परिणाम होऊन परसबाग चळवळ ही फक्त अकोले तालुका व काही गावांपुरती मर्यादित न राहता ती महाराष्ट्र आणि देशातील विविध भागांमध्ये जाऊन पोहोचली. परसबाग लागवडीचे मार्गदर्शन करणारे सहभागधारक गावोगावी पाडय़ावरती तयार झाले. त्यांच्या माध्यमाने मागणीनुसार प्रशिक्षण व दर्जेदार गावरान बियाणे परसबागेसाठी पुरवण्याचा प्रत्यक्ष कार्यक्रम हाती घेण्यात आला. गेल्या वर्षीच्या हंगामात परसबागांचे बियाणे संच सुमारे वीस हजार कुटुंबांपर्यंत महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये पुरवठा करण्यात आले. त्यापासून कळसुबाई बियाणे संवर्धन संस्थेला सुमारे ४८ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळाले. परसबाग चळवळ ही गावांपुरतीच मर्यादित न राहता मोठी शहरे व मेट्रो शहरांपर्यंत जाऊन पोहोचली. अकोले तालुक्यातील निर्माण होणारे दर्जेदार गावरान परसबागांचे बियाणे, मुंबई, हैदराबाद, म्हैसूर, बेंगलोर, कोलकाता , दिल्ली, चेन्नई, डेहरादून, लखनऊ, भोपाळ या मोठय़ा शहरांपर्यंतसुद्धा पोहोचले असल्याची माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली. बायफने आजपर्यंत येथे ५३ पिकांचे ११६ प्रकारचे वाण संकलित केले आहेत. त्यात वालाचे १८ वाण, तर भाताचे १६ वाण आहेत.
भाजीपाल्याबरोबरच आहारासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या भात, नागली, वरई या पोषणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या पिकांच्या पारंपरिक बियाणांची सुद्धा निर्मिती सुरू झाली आहे. या वर्षी डझनभर शेतकऱ्यांच्या शेतावर बियाणे निर्मितीचे प्रात्यक्षिक प्लॉट घेण्यात आले.अनेक शेतकऱ्यांची शेतीच प्रयोगशाळा बनल्या आहेत.
भात हे आदिवासी भागातील मुख्य पीक. काळभात, जिरवेल या सारखे भाताचे सुवासिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर होते. त्या सारख्या अनेक वाणांना या मुळे जणू जीवनदान मिळाले. मूळच्या शुद्ध स्वरूपात यांचे बी मिळविण्यासाठी चार पाच वर्षे अथक प्रयत्न त्यासाठी करावे लागले. राज्याच्या विविध भागांतील गावरान बियाणे संपलीच आहेत. त्या मुळे येथील बियाणांना विविध ठिकाणांवरून मोठी मागणी आहे. राज्याच्या विविध भागातूनच नव्हे, तर परराज्यातूनही त्या साठी विचारणा होत असते. गावरान बियाणांची निर्मिती ठरावीक जणांपुरती मर्यादित न रहाता ती चळवळ बनावी असा बायफ चा प्रयत्न आहे व त्याला यश येताना दिसत आहे. या बियाणांना असलेली मोठी मागणी लक्षात घेता नजीकच्या काळात पारंपरिक बियाणांच्या निर्मितीतून आदिवासी भागातील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकेल अशी चिन्हे दिसत आहेत.
प्रत्येक भारतीयाच्या ताटात सकस व रसायनमुक्त ताजा भाजीपाला यावा हेच या परसबाग चळवळीचे आणि येथील आदिवासी महिला शेतकऱ्यांचे उद्दिष्ट आहे.यासाठी प्रकल्प क्षेत्रातील प्रत्येक घर व स्वयंसहायता समूहातील महिला बियाणे निर्मितीत सहभाग घेत असतात.
‘बायफ’ने या परसबाग चळवळीने, बियाणे बँकांनी येथील आदिवासी महिलांमध्ये असणाऱ्या परंपरागत ज्ञान आणि कौशल्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या मुळेच कोणी महिला पद्मश्री झाली तर कोणाला बायफ चा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला. त्यांच्या बीजबँका, परसबागा अकोल्यातील आधुनिक पर्यटनस्थळे बनली आहेत. ते पाहण्यासाठी दूरदूरून माणसे येत असतात. त्यात शेतकरी असतात, विद्यार्थी असतात तसेच संशोधकही असतात. गावरान बियाणांबाबतच्या त्यांच्या प्रश्नांना येथील महिला सहजतेने उत्तरे देत असतात. या परस बागा आता बियाणे निर्मिती केंद्रे बनल्यामुळे अनेक कुटुंबाना त्यातून रोजगारही मिळू लागला आहे. गावोगाव जशा बँका आहेत तशा बियाणे बँका असाव्यात. प्रत्येक शेतकऱ्याची स्वत:ची बीजबँक असावी असे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे सांगत असतात.त्या दृष्टीने तालुक्याच्या पश्चिम भागाची वाटचाल सुरू आहे.
‘बायफ’चे काम मोठेच आहे. पण त्याबरोबरच अन्य काही छोटय़ा संस्थाही तालुक्यात या क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘लोकपंचायत’ संस्थेने तालुक्याच्या दहा आदिवासी गावात काळभात जतन संवर्धनाचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी राबविला होता. याच संस्थेने हरिश्चंद्रगड परिसरातील धमाणवन या खेडेगावात कावेरी बचत गटाच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी बीजकोशाची स्थापना केली. तेथील महिलांनी १२० प्रकारचे स्थानिक वाण आजपर्यंत गोळा केले आहेत. वाढीव पध्दतीने परत करण्याच्या बोलीवर स्थानिक शेतकऱ्यांना बियाणे कोशातुन बियाणे उपलब्ध करून दिले जाते. तर बाहेरील शेतकऱ्यांना ते विकत दिले जाते.आजपर्यंत सुमारे हजारभर शेतकऱ्यानी येथून बियाणे विकत नेले आहे. याच परिसरातील दहा गावांमध्ये याच स्वरूपाचे काम याच वर्षांत संस्थेने सुरू केले आहे. दोन गावांसाठी एक असे पाच गावी बीजकोश सुरू केले असून त्या मधून पारंपरिक बियाणांची देवघेव सुरू केली आहे. लोकांमध्ये सेंद्रिय आणि पारंपरिक पिकांबद्दल आकर्षण वाढत चालले आहे.मात्र अपवाद वगळता गावरान वाण नामशेष झाले आहेत.त्या मुळे जेथे हे वाण शिल्लक आहेत तेथे त्यांना भविष्यात मोठी मागणी असेल.त्या दृष्टीने अकोल्यात बाळसे धरत असलेल्या पारंपरिक बियाणे निर्मितीला मोठा वाव आहे.भविष्यात अकोले तालुक्याचा आदिवासी भाग अशा बियाणांच्या निर्मितीचे आगार होऊ शकेल.
रानभाज्यांचे संवर्धन
रानभाज्या व कंदमुळे यांचे मानवी आहार व पोषणाच्या दृष्टीने असणारे महत्त्व ओळखून त्यांचेही संवर्धन व वृद्धी कार्यक्रम परसबाग आणि परंपरागत बियाणे चळवळीत हाती घेण्यात आला आहे. येथील जंगलात येणाऱ्या फांदा, दिवा,बडदा ,चाई, रानकेळी,अळुकंद,भारंगी, कुरडु, कौला, बर्कि, कौदर, भोकर, चीचूर्डा, पाथरी, कोंबडा, कोळू, थरमटा या रानभाज्यांचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी बारी, खिरविरे येथील विद्यालयात भरविण्यात आलेल्या रानभाज्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शंभर च्या आसपास रानभाज्या मांडल्या होत्या.
जतनाची परंपरागत पद्धत
बियाणांची साठवणूक हा आदिवासी महिलांच्या जिव्हाळय़ाचा विषय. पारंपरिक बियाणे त्यांनी गाडग्या मडक्यात साठवून ठेवत, संवर्धित करीत पुढच्या पिढय़ाना दिले. बियाणे साठविण्याची परंपरागत पद्धत अतिशय सोपी आहे. विशिष्ट प्रकारची मातीची भांडी आणि राख यांचा उपयोग त्या साठी केला जातो. या पद्धतीत साठविलेले बियाणे तीन तीन वर्षे खराब होत नाही.
बियाण्यांच्या रांगोळय़ा, राख्या
पद्मश्री राहीबाई पोपरे, ममताबाई भांगरे या सारख्या महिला गणपती, दसरा, दिवाळी वा अन्य सण किंवा अन्य महत्त्वाच्या दिवशी घरापुढे रांगोळय़ा काढतात किंवा जी सजावट करतात ती विविध प्रकारच्या बियाणांचा वापर करून.राखी पौर्णिमेला राख्या तयार करतात त्याही बियाणांचा वापर करून. बियाणे जतन संवर्धनाच्या चळवळीशी आपले नाते किती घट्ट आहे हेच त्या यातून दाखवून देत असतात.
अकोले तालुका गावरान बियाणे उत्पादित करणारा तालुका म्हणून राज्यात आणि देशात नावारूपाला येत आहे. ‘बायफ’ संस्थेच्या मदतीने आदिवासी महिलांचा यात मोठा सहभाग आहे. शास्त्रीय पद्धतीने बियाणे निर्मितीवर भर दिला जात आहे. यापुढे दर्जेदार गावरान बियाणे निर्मितीवर भर देऊन मागणी नुसार पुरवठा केला जाईल .
– जितीन साठे, विभागीय अधिकारी बायफ, नासिक
आमच्या भागात, कळसुबाई परिसरात नागली वर्गीय पिकांच्या लागवडी कमी होत चालल्या होत्या. पारंपरिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर होते. एएसके फाउंडेशन मुंबई व बायफ संस्थेच्या मदतीने चालू वर्षी ३० वाणांचे ज्यामधे नागली, वरई, सावा, बटू या पिकांच्या वाणांचे प्रात्यक्षिक माझे जहागीरदार वाडी येथील शेतावर घेण्यात आले. यातून उत्कृष्ट वाणांच्या बीज निर्मितीस मदत झाली आहे.
– बाळू घोडे , आदर्श शेतकरी, जहागीरदारवाडी
prakashtakalkar11@gmail.com