अंमली पदार्थाच्या व्यापारातही नायजेरियन नागरिकांचा मोठय़ा प्रमाणावर हात असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले आहे. गोव्यातील नायजेरियनांच्या दंग्याला खरी किनार होती ती या व्यापारातील टोळीयुद्धाचीच..
गोवा हे पर्यटनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त झाले असून त्यामुळेच देशोदेशीच्या पर्यटकांची १२ महिने गर्दी तेथे कायम असते. पर्यटन म्हटल्यावर साहजिकच मौजमजा आणि तत्सम बाबी त्याबरोबरच येत असतात. त्यामुळेच पर्यटनातील बऱ्या-वाईट गोष्टींचा गोव्यात कमी अधिक शिरकाव गोव्यात झाला असून नेमकी हीच बाब स्थानिकांसाठी चिंतेची ठरली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात गोव्यामध्ये घडलेली घटना याचीच साक्ष देते.
गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी पणजी-म्हापसा महामार्गावर पर्वरी येथे अचानक २०० नायजेरियन लोकांनी तेथे जमून महामार्ग रोखून धरला आणि वातावरण कमालीचे तंग झाले. त्यांनी असे केले, यामागील कारण काय होते ? म्हापशाजवळील पर्रा या गावी आदल्या दिवशी रात्री ओबोदो उझोमा सायमन या नायजेरियन नागरिकाची हत्या झाली होती. या सायमनचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनवरच दुसऱ्या दिवशी पर्वरीजवळ हल्ला करण्यात आला. नंतर पोलिसांनी ५३ नायजेरियन लोकांना अटकही केली. मात्र, पोलिसांवरही हल्ला करण्याइतपत हल्लेखोरांची मजल गेली होती. अंमली पदार्थाच्या व्यापाराच्या वादातूनच सायमनची हत्या करण्यात आल्याचा संशय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला होता. पर्रा हे गाव म्हापशानजिकच असून तेथे सुमारे ३० टक्के नायजेरियन लोकांचे वास्तव्य असते, हे लक्षात घेतल्यानंतर पर्रिकर यांनी व्यक्त केलेल्या संशयाचे गांभीर्य लक्षात येते.
या घटनेनंतर साहजिकच गोव्यात विना पासपोर्ट वा व्हिसा राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध सुरू झाला आणि दूरचित्रवाणीवरील इंग्रजी व हिंदूी बातम्यांमुळे एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावरच या घटनेचे पडसाद उमटले. राज्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आणि पोलिसांना त्यादृष्टीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याच सुमारास नायजेरियानेही याची एकदम ‘गंभीर’ दखल घेत भारतात ५० हजार नायजेरियन असतील तर आमच्या देशात लक्षावधी भारतीय नागरिक असून गोव्यातील या कारवाईची उलट प्रतिक्रिया उमटू शकते असा ‘इशारा’ही नायजेरिया सरकारने आपल्याला दिला. साहजिकच त्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही त्यात लक्ष घालून गोवा सरकारकडे या प्रकरणी विचारणा केली. राज्य सरकारने त्यांना पाठविलेल्या अहवालातही अंमली पदार्थाच्या व्यापारासंबंधी परस्परांमध्ये घडलेल्या वादातून हे प्रकरण उद्भवल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळेच या घटनेला प्रामुख्याने अंमली पदार्थाच्या ‘देवाणघेवाणी’ चा पदर असल्याचे स्पष्टच आहे. नंतर याप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र पॉल या व्यक्तीस सायमनच्या हत्येच्या आरोपाखाली चापोरा येथे अटक केली. आता एकूण या प्रकरणाची धूळ काही प्रमाणात खाली बसलेली असली तरी गोव्यातील अंमली पदार्थाचा व्यापार, परदेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आदी मुद्दे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत, यात शंका नाही.
    

Story img Loader