जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनाचा वेध..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीन गडकरी

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक आणि ‘लोकमत’ समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहाच्या अनेक आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा पटही माझ्या डोळय़ांपुढून सरकतो आहे. बाबूजी हे एक वेगळेच रसायन होते. आमचे विद्यार्थी दशेतील धडपडणे, राजकारणात पाऊल टाकणे या आरंभिक टप्प्यांवर त्यांचे मार्गदर्शन आमच्या पिढीला मिळाले. त्यानंतरच्या काळातही त्यांनी आम्हाला पाठिंबा आणि मार्गदर्शन केले. बाबूजी हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पत्रकार-संपादक आणि त्यांच्या काळातील प्रमुख राजकारणी होते. ते दीर्घ काळ मंत्री होते, पण राजकारणात त्यांनी पत्रकारिता आणली नाही आणि पत्रकारितेत राजकारण घुसू दिले नाही. ते काँग्रेसचे होते, पण दैनिक ‘लोकमत’मध्ये सर्व प्रकारच्या मतांना प्रसिद्धी मिळण्याचा शिरस्ता बाबूजींनी सुरुवातीपासून घालून दिला. तीच परंपरा ‘लोकमत’ परिवार आजही सांभाळत आहे. निर्भीड पत्रकारितेचा आदर्श बाबूजींनी निर्माण केला. स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात सक्रिय झाल्यावर बाबूजींनी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रबोधनाचे मोठे व्रत आरंभिले. जनसामान्यांचे प्रश्न लावून धरणे, महत्त्वाच्या राष्ट्रीय व स्थानिक प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा घडवून आणणे तसेच बदलत्या काळाला अनुसरून विविध विषयांची ओळख वाचकांना करून देणे हे ‘लोकमत’चे वैशिष्टय़ आहे. त्याचे श्रेय बाबूजींना आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील विजयबाबू आणि राजेंद्रबाबू या कुशल व परिपक्व मंडळींना जाते. कला-साहित्यातील रसिकता, मनमिळाऊ स्वभाव, सौंदर्यदृष्टी, वाक्चातुर्य, नीटनेटकेपणा असे अनेक संस्कार त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातून अनौपचारिकपणे ‘लोकमत’ परिवारात आणि त्यांच्या सहवासात येणाऱ्या अनेकांमध्ये संक्रमित केले.

स्वातंत्र्यसंग्रामातील बाबूजींचे योगदान फार मोठे आहे. यवतमाळ जिल्ह्याने महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचे लक्ष वेधून घेत स्वातंत्र्य चळवळीला अतुलनीय प्रतिसाद दिला हा इतिहास आहे. यवतमाळ जिल्हा स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय होता आणि त्याचे श्रेय बाबूजींसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना दिले पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यातील अग्रणी स्वातंत्र्यसैनिकांमध्ये बाबूजींचा समावेश होतो. १९४१मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा केली. त्यालाही यवतमाळमध्ये प्रतिसाद मिळाला. आंदोलकांच्या एका गटाचे नेतृत्व जवाहरलाल दर्डा करीत होते. स्वातंत्र्य चळवळीत बाबूजींनी तुरुंगवासही भोगला. बाबूजी विचारांनी व कृतींनी सदैव समकालीनांच्या पुढे होते. ते धाडसी आणि संयमीही होते. त्यांनी नेहमीच समाजाचा विचार केला. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात योगदान दिले आणि स्वातंत्र्यानंतर लोककल्याणाचा विचार केला तसेच विधायक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांचा समाजाच्या कल्याणाबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट होता. ते म्हणायचे, ‘‘भारताचे भविष्य बदलायचे असेल तर ग्रामीण-दुर्गम भागातील लोकांसह सर्वाना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.’’ दीर्घकाळ राजकारणात राहूनही बाबूजींनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान मिळालेली लोककल्याणाची शिकवण बाजूला पडू दिली नाही. पत्रकारितेचा उपयोग ग्रामीण भागातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी व्हावा, असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळेच ‘लोकमत’चा उपयोग त्यांनी समाजाच्या भल्यासाठी केला.

सर्वाना सोबत घेऊन चालणे हा बाबूजींचा स्वभाव होता. सरकारात मंत्री असून देखील त्यांच्या वृत्तपत्रात सरकारवरील टीका मुक्तपणे प्रसिद्ध होत असे, यावरून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष पटते. विरोधी पक्षाच्या माणसांशी सौजन्याने वागणे, हे बाबूजींचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़. ते मोठय़ा मनाचे आणि उदार होतेच, शिवाय पक्षाचा अभिनिवेष न बाळगता ते विरोधकांचा सन्मान करीत. मला स्वत:ला आणि अनेकांना याचा अनेकदा अनुभव आला. चांगली माणसे राजकारणात आली पाहिजेत, असे बाबूजींना वाटे. त्यामुळे पक्ष न पाहता बाबूजींनी सज्जनशक्तीला ताकद दिली. बाबूजींमध्ये विकासाची तळमळ होती. उद्योगमंत्री असताना बाबूजींनी अनेक भागांत औद्योगिक वसाहती उभारल्या. ‘विदर्भ पुढे गेला पाहिजे’ असे त्यांना मनापासून वाटे. विधिमंडळात बाबूजींचा युक्तिवाद बिनतोड असे. त्यांचे उत्तर नेमके असायचे. पूर्ण अभ्यास करून ते सभागृहात यायचे. नेमक्या मुद्दय़ांवर बोलायचे. विधिमंडळाच्या माध्यमातून लोकहिताची, विधायक कामे व्हावीत आणि त्यासाठी चर्चा व्हावी, अशी त्यांची भूमिका होती. पक्षीय राजकारण आणि विधिमंडळातील कामकाज या दोन गोष्टी वेगवेगळय़ा असतात याचा वस्तुपाठ त्यांच्या कार्यशैलीतून मिळे. बाबूजींचा सदैव प्रसन्न असलेला चेहरा, तणावातही शांत राहण्याचे कसब, काम करण्याची हातोटी, सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव, लोकांची कामे मार्गी लावण्याची तळमळ या गोष्टी माझ्या आजही स्मरणात आहेत. त्यांच्या स्मृतींना माझी विनम्र आदरांजली.

(लेखक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत.)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari article on jawaharlal darda life on the occasion of the birth centenary zws