त्यांना ऐकायला येत नाही म्हणून बोलताही येत नाही. लौकिकार्थाने मूकबधिर म्हणूनच त्यांची गणना होते. स्वतच्या या व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेली अशी मुले कुचेष्टेच्या भीतीने सामान्यजनांपासून चार हात दूर राहाणे पसंत करतात. मात्र या मुलांना आता शिकायला मिळत आहे. त्यांच्या स्वप्नांना उंच भरारीसाठी पंख फुटत आहेत. कारण त्यांच्या पंखांना बळ देणारी शाळा त्यांना मिळाली आहे. ही शाळा म्हणजे नगर जिल्ह्य़ातील संगमनेरमधील संग्राम संस्थेने सुरू केलेले निवासी मूकबधिर विद्यालय.

विज्ञान आणि अध्यात्माची कास धरून मानवाचे कल्याण हाच ध्यास उराशी बाळगून मूकबधिर आणि मतिमंद मुलांना मानाने जगायला शिकवणारी संस्था म्हणजे संगमनेरची संग्राम (संगम ग्राम विकास मंडळ) संस्था. संस्थेमार्फत सात एकरांच्या विस्तीर्ण परिसरात संग्राम मूकबधिर विद्यालय आणि डॉ. देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालय चालविले जाते. यापकी मूकबधिर विद्यालयात ८० विद्यार्थी निवासी आहेत. सुदृढ मुलांना शंभर टक्के प्रगत करण्यासाठी सरकार धडपडत असताना फक्त हावभावाच्या भाषेतून मुलांना प्रगत करण्याचे आव्हान येथील शिक्षकांनी लिलया पेलेले आहे.

नानाविध सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करून रचनात्मक कार्यासाठी प्रेरित झालेले संगमनेरचे काही डॉक्टर, शिक्षक व सामाजिक कार्यकत्रे एकत्र आले. त्यांच्या विचारमंथनातून ‘संगम ग्रामविकास मंडळ’ या सेवाभावी संस्थेची स्थापना १९८४मध्ये करण्यात आली. स्थापनेच्या वेळी शाळा वगरे काढण्याचे कोणाच्या गावीही नव्हते. फक्त सामान्य माणूस केंद्रिबदू मानून ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांबरोबरच वृक्षसंवर्धन, पशुसंवर्धन, सांस्कृतिक व सामाजिक विकासाचे उपक्रम राबविले. प्रारंभी समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांना पशुपालनाचे प्रशिक्षण देऊन शेळ्या, मेंढय़ा व कोंबडय़ांचे मोफत स्वरूपात वाटप तसेच आदिवासी व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून त्यांना आत्मनिर्भर बनविले. समाजातील जातिव्यवस्था, अज्ञान, दारिद्रय़, अंधश्रद्धा, अत्याचार, हुंडाबळी, व्यसनमुक्ती व स्त्रीशिक्षणाबाबत समाजप्रबोधन करण्यासाठी नाटय़ विभागांतर्गत चक्र, सावट व महात्मा फुले यांच्या जीवनावरील आसूड आदी नाटकांची निर्मिती करून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदíशत करत समाजप्रबोधनाचे कार्य केले. समाजप्रबोधनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार नाटकांना प्राप्त झाला आहे.

शैक्षणिक कार्याची सुरुवात

थोडय़ाच कालावधीत समाजसेवेचे व्रत स्वीकारलेली ही संस्था ‘संग्राम संगमनेर’ म्हणून नावारूपाला आली. त्यानंतर मात्र समाजातील उपेक्षित अपंग घटकांसाठी शैक्षणिक प्रकल्प राबविण्याची कल्पना पुढे आली.

मूकबधिर व मतिमंद मुलांसाठी शिक्षण व त्यांचे पुनर्वसन हा प्रकल्प राबविण्याचे ठरले. त्यासाठी पुणे येथील सुहृद मंडळ या अपंगांच्या विशेषत मूकबधिरांच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेस भेट दिली. तेथील संस्थापिका वत्सलाबाई भाटे या चतन्यशील व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संगमनेर परिसरातील कर्णबधिर अपंगांसाठी संस्थेमार्फत वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले. त्या ठिकाणी ३० ते ३५ मूकबधिर मुले आढळली. याच मुलांसाठी काम करण्याचे निश्चित करत १९८८ मध्ये ‘संग्राम निवासी मूकबधिर विद्यालया’ची स्थापना करून शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली. आज विद्यालयात ८० मूकबधिर विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यात मुलींची संख्या जवळपास निम्मी आहे. संस्थेचे क्रियाशील संचालक डॉ. देवेंद्र ओहरा यांच्या अकस्मात अपघाती निधनामुळे त्यांचे चिरंतन स्मारक म्हणून ‘डॉ. देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालया’ची स्थापना १९९३ साली करण्यात आली. नगर जिल्हय़ातील पहिली निवासी मतिमंद मुलांची शाळा म्हणून विद्यालयाने नावलौकिक मिळविला. सद्य:स्थितीत या विद्यालयात ४५ मतिमंद विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. नगरसह पुणे नाशिक जिल्ह्यातील मुलांचा त्यात समावेश आहे.

वर्गाची पायरी

शाळेविषयी माहिती देताना मुख्याध्यापक एन. पी. थोरात सांगतात की, इतर शाळांमध्ये पहिली, दुसरी असे वर्ग असतात त्याप्रमाणे इथल्या वर्गाना पायरी म्हणातात. अशा एक ते पाच पायऱ्या शाळेत आहेत. पहिल्या पायरीत तीन ते पाच वष्रे वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जातो. तिसऱ्या व त्यापुढील वर्गाचा अभ्यासक्रम एक वर्षांत पूर्ण होत नाही म्हणून हे वर्ग प्रत्येकी दीड वर्षांचे असतात. सर्वाना प्रवेश, निवास, भोजनाची मोफत सोय पुरविली जाते. प्रवेश देते वेळीच प्रत्येक मुलाची श्रवणचाचणी केली जाते. त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेनुसार श्रवणयंत्रे पुरविली जातात. सकाळी सहा वाजता मुलांचा दिनक्रम सुरू होतो. बरोबर आठ वाजता चहा, नाश्ता देऊन सकाळी ११ ते ५ या वेळात शाळा भरते. दुपारी एक तास जेवणाची सुट्टी असते.

खुणांची भाषा

राष्ट्रगीताने सुरू होणारा परिपाठही वैशिष्टय़पूर्ण असतो. सगळा संवाद हावभावाच्या म्हणजेच खुणांच्या भाषेत असतो. विशिष्ट खुणांसह लयबद्ध हालचालींतून होणारे राष्ट्रगीत सामान्यांसाठी वेगळीच अनुभूती असते. भारत भाग्य विधाता.. सांगताना एकाच वेळी अगदी बेमालूमपणे सर्वाचे हात कपाळाला स्पर्शून आपणही तेवढेच देशभक्त असल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणवते. परिपाठानंतर सुरू होते औपचारिक शिक्षण. या मुलांना पायरीनुसार बालभारतीचाच अभ्यासक्रम आहे. सगळ्या मुलांचे ध्यान केंद्रित व्हावे यासाठी विशिष्ट प्रकारच्या बारा अष्टकोनी वर्गखोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

एका पायरीत अधिकाधिक आठ मुले असतात. सर्व पायऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षित शिक्षक आहेत. एकूण १४ शिक्षकांपकी तीन कलाशिक्षक व एक वाचाउपचारतज्ज्ञ शिक्षक आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया इतर शाळांसारखीच, मात्र केवळ खुणांच्या भाषेतच चालते. शिक्षकांनी शिकविलेल्या खाणाखुणांच्या व्यतिरिक्त प्रत्येक मुलाची स्वत विकसित केलेली वेगळीच भाषा अचंबित करणारी आहे. आम्ही शिक्षकदेखील मुलांची वैशिष्टय़पूर्ण भाषा त्यांच्याकडून शिकत वेळोवेळी स्वतला अपडेट करत असतो, असे तेथील शिक्षक सुनील कवडे अभिमानाने सांगतात. विशेष म्हणजे या मुलांचा ‘सिक्स्थ सेन्स’ फार जागृत असतो. ऐकायलाच येत नसल्याने आजूबाजूच्या कोणत्याही आवाजाने त्यांचे लक्ष विचलित होत नाही. त्यामुळे जे काम चालू असेल ते अगदी एकाग्रचित्ताने होते. शाळेत आधुनिक स्पीच व ओडिओमीटर रूम व यंत्रसामुग्री, प्रशस्त संगणक कक्ष आणि भाषा, गणित, विकासाकरिता विशेष प्रशिक्षण दिले जाते.

कलागुणांची जोपासना

पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांच्या कलागुणांची जोपासना करण्यासाठी शाळा विशेष लक्ष देते. कारण हीच कला त्यांची भविष्यातील रोजीरोटी ठरणारी असते. येथील कलाशिक्षक देविदास गोरे त्यासाठी अपार मेहनत घेतात. मेणबत्त्या तयार करणे, फिनाइल, शिवणकाम, मातीकाम, लाकडी कलाकुसरीच्या वस्तू, भेटकार्डे, राख्या, आकाशकंदील तयार करण्याचे काम मुले आवडीने करतात. आगामी गणेशोत्सवासाठी मुलांनी आकर्षक मातीचे गणपती बनविले आहेत. संस्थेच्या वतीने मूकबधिरांसाठी दरवर्षी जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धा घेतली जाते. सुदृढ मुलांना लाजवतील इतक्या लिलया पद्धतीने मुले नृत्यात दंग होतात. त्या वेळी लावण्यात आलेल्या गाण्याचा आवाज प्रेक्षकांसाठी असतो, नाचणाऱ्या मुलांच्या बाजूलाच असलेल्या प्रशिक्षकाच्या हावभावांकडे मुलांचे लक्ष असते. अपंगांचे शिक्षण, पुनवर्सन व स्वावलंबन अशा त्रिसूत्री ध्येयप्राप्तीकरिता शाळा अविरत प्रयत्नशील आहे.

मास्टर ब्लास्टरची ५० लाखांची मदत

संस्थेच्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या खासदार निधीतून पन्नास लाखांची मदत गतवर्षी दिली आहे. त्यात आणखी दीड लाखांची भर घालून सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नवीन अद्ययावत इमारतीचे काम चालू आहे. प्रत्येक मुलाची गरज वेगळी असते. त्याचा अभ्यास करून या नव्या इमारतीचा खास आराखडा करण्यात आला आहे.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com