माळीण गावातील दुर्घटना मानवनिर्मित कारणांमुळे घडली, असे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहेच आणि तेथे झालेला पाऊस म्हणजे ढगफुटी नव्हे, असेही संबंधित विभागांनी स्पष्ट केले आहे. या अधिकृत आणि प्रमाण मानल्या गेलेल्या निष्कर्षांना छेद देऊ पाहणारे, वेगळी निरीक्षणे नोंदवून आव्हान देऊ पाहणारे हे टिपण..
आंबेगाव तालुक्याच्या (जि. पुणे) अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशीत वसलेले माळीण हे गाव. ३० जुल रोजी चिखलाचे पाट वाहिल्याने त्याखाली असंख्य घरे उद्ध्वस्त झाली. मृतांचा आकडा १५१ वर गेला. मात्र माळीण गावात प्रत्यक्ष किती पाऊस झाला याची नोंद स्पष्ट करण्यासाठी पर्जन्यमापकाची आकडेवारी उपलब्ध नाही. माळीणपासून २५ किलोमीटर अंतरावरील िडभे धरणावर १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जुन्नर येथील हवामान केंद्रावर १५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम किनारपट्टीवर त्या वेळी अजस्र ढगांची दाट थररचना (सिस्टीम) अस्तित्वात होती. कमी वेळात जास्त पावसाकरिता म्हणजे ढगफुटीकरिता ती कारणीभूत ठरू शकते. नॅशनल एअरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)तर्फे २९ जुल रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सहा वाजता माळीणच्या छायाचित्रासह धोक्याचा इशारा दिला होता. नासाचा हा अंदाज भूस्खलन होण्याची शक्यता दाखवीत होता. तसेच १७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवीत होता. नासाच्या ट्रिम (Tropical Rainfall Measuring Mission) उपग्रहाने ६०० पेक्षा जास्त मिलिमीटर पाऊस या भागात झाला असून ज्यात बहुतांशी पाऊस २९ व ३० जुल या केवळ दोन दिवसांत झाल्याचे म्हटले आहे. नासाचा हा रिपोर्ट ढगफुटीकडे इशारा करतो आहे. The South Asian Network for Dams, Rivers and People (SANDRP) या संस्थेने देखील सर्वाधिक पाऊस या भागात होणार असा अंदाज २९ जुल रोजी संकेतस्थळावर टाकला होता. मात्र हवामान खात्याच्या पुणे व दिल्ली विभागाने या अहवालांकडे दुर्लक्ष करीत आपली जबाबदारी झटकली आहे.
माळीणच्या डोंगरावर विशिष्ट भूभागच पाण्याची धार पडल्याने वाहून खाली आल्यासारखा दिसतो आहे. ढगातील विशिष्ट भागातील प्रचंड साठा दहा मीटर ते शंभर मीटरच्या भागात प्रचंड वेगाने अचानक कोसळू शकतो. अशाच प्रकारे माळीण येथील डोंगरावर घडले असण्याची शक्यता आहे. अचानक ढग स्फोटासारखा फुटून पाणी विशिष्ट भागावर फेकले गेल्याने हवेत शॉकवेव्ह निर्माण झाल्याने स्फोटासारखा आवाज होऊ शकतो. ढगफुटीच्या वेळी निर्माण होणाऱ्या शॉकवेव्ह विशिष्ट भागावर केंद्रित झाल्याने कडा कोसळण्यास मदतच झाली असणार अशीदेखील एक शक्यता आहे. ‘रेझोनन्स इफेक्ट’ निर्माण झाल्याने अचानक मिळालेल्या ऊर्जेमुळे चिखलाचा कडा कोसळण्यास मदत झाली असू शकते, असे मानण्यास जागा आहे.
माळीण येथे ढगफुटी झाली असावी व त्याच्या परिणामामुळे चिखलाचे पाट वाहून फ्लॅशफ्लडमुळे ही दुर्घटना झाली असावी याची दाट शक्यता आहे. पावसाचे बोराप्रमाणे टपोरे थेंब, रात्रीच्या अंधारात पांढरे दिसणारे आकाश, डोंगरउतारावर केवळ विशिष्ट जागी अचानक जास्त पाऊस कोसळून तेथील भाग चिखलमय बनून ढासळत राहून पुढे सरकत गेला अशी ढगफुटीची लक्षणे दिसत आहेत.
एकूण माती आणि पाण्याचे प्रमाण यातून बनलेला चिखल आणि वाहून खाली येताना त्याने पार केलेले अंतर, तसेच त्यासाठी लागलेला जोर किंवा ऊर्जा यावरूनदेखील त्या ठिकाणी पडलेला पाऊस आणि त्याचा पडण्याचा दर याचा अंदाज बांधता येईल. या गोष्टी माळीण येथे ढगफुटीच झाल्याची शक्यता दर्शवितात.
१०० मिलिमीटर प्रति तास या दराने कोसळणाऱ्या पावसाला ढगफुटी म्हणजे ‘क्लाऊडबर्स्ट’ म्हणतात असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक अहवालांत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरदेखील तो तसा २०१० सालापर्यंत वर्षांनुवष्रे उपलब्ध होता. डेन्मार्क, यूके, यूएस, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतासह इतर अनेक देशांतील संशोधक ढगफुटी म्हणजे ‘क्लाऊडबर्स्ट’ या शब्दाचा वापर आपल्या वैज्ञानिक शोधनिबंधात करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जात असतानादेखील ढगफुटी ही संकल्पनाच अस्तित्वात नाही, असे दिशाभूल करणारे दावे काही लोक हेतुपुरस्सर करतात. त्यामागे आपली जबाबदारी झटकणे हा उद्देश असू शकतो.
तलासरी ४६० मिलिमीटर, दावडी ४५० मिलिमीटर, ताम्हाणी ४४० मिलिमीटर, महाबळेश्वर ४३० मिलिमीटर, देहरी ३४२ मिलिमीटर, शिरगाव ३२० मिलिमीटर, डहाणू २७० मिलिमीटर, डुंगरवाडी २५० मिलिमीटर, लोणावळा २३० मिलिमीटर, अम्बोणे २२० मिलिमीटर, खोपोली २०० मिलिमीटर, अशी दोन-चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पडलेल्या पावसाची यादी किती तरी लांबविता येईल.. हा पाऊस २४ तासांत झाला, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) हवामान अंदाज विभागातर्फे सांगितले जाते; परंतु हा पाऊस किती वेळात झाला, एका तासातील कमाल पाऊस किती मि.मी. होता, याची नोंदच हा विभाग जाहीर करीत नाही. कोकणात २०० पेक्षा अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झालेली किमान ५० ठिकाणे गेल्या आठवडय़ात होती, मात्र यातील एकाही ठिकाणी ढगफुटी झाली नाही, तर सर्वत्र फक्त अतिवृष्टी झाली असे या विभागाचे म्हणणे आहे. तलासरी येथे ४६० मिलिमीटर पाऊस झाल्याचे या विभागाने स्पष्ट केले, ज्याचा उल्लेख महावृष्टी झाला. महाराष्ट्रात ढगफुटी झाली याची नोंद हवामान खात्याच्या यंत्रांवर कधीच कशी होत नाही, हे जनतेला पडलेले कोडे आहे.
ढगफुटी झाली तर तशी मान्य करायला हवी, असा साधा आग्रह हवामान खात्याला मान्य नाही. नागरिकांना स्पष्ट सूचना मिळाल्या तर नागरिक आवश्यक काळजी घेतील हे स्पष्ट आहे. मात्र भारत हवामान विभाग म्हणजे आयएमडी व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी म्हणजे आयआयटीएम याबाबत नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यापेक्षा दिशाभूलच करीत आहेत, असे म्हणावे लागते. लेहला ५ ऑगस्ट २०१० रोजी एका तासात झालेला २५० मिलिमीटर पाऊस ढगफुटी नव्हे असे सांगण्याचे धाडस हवामान खाते दाखवू शकले नाही. जून २०१३च्या उत्तराखंडची ढगफुटी म्हणजे २४ तासांत झालेला पाऊस असल्याने ती ढगफुटी नव्हे, असे सांगण्याचे धाडस हवामान खाते दाखवत नाही. कारण या ढगफुटींच्या घटनांमध्ये अब्जावधीची हानी झाली, तसेच शेकडो- हजारो बळी गेलेत. मग प्रश्न असा पडतो की, ढगफुटी ही पावसाच्या एका तासात कोसळण्याच्या दरावर ठरणार की मृतांच्या आकडेवारीवरून? हवामान खाते याबाबत खुलासा करण्याची तसदी केव्हा घेणार, हा प्रश्न आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी १०० मिलिमीटर प्रति तास या दराने होणारा पाऊस तो ढगफुटी, तर महाराष्ट्रात तसा होणारा पाऊस म्हणजे अतिवृष्टी अशी संदिग्धता निर्माण करण्यात हवामान खात्याचे अधिकारी यशस्वी झाले आहेत. तसेच अतिवृष्टी, महावृष्टी आणि ढगफुटी या संकल्पनांबाबत जनमानसात कमालीचा गोंधळ आहे. हवामान खात्याने याबाबत दुटप्पी धोरण अमलात आणले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा