कलाभान
आजकालच्या कलाकृती आपण कशा पाहायच्या यापेक्षा कशासाठी पाहायच्या, याचा शोध दृश्यकलेच्या अंगानं घेणारं हे नवं सदर, आजपासून दर सोमवारी. रूढार्थानं ही कलासमीक्षा नाही.. प्रेक्षकांची इच्छा व तयारी असेल तर त्यांना कलाकृती भिडणारच, असा विश्वास बाळगून  आणि मुक्तसंवाद, इतिहासकथन अनुभव-कथन, घडामोडींची उजळणी वा चर्चा.. आदी पद्धतींनी ‘कलाभान’ पुढे जात राहील.

‘आधुनिक’ म्हणजे मी नित्याप्रमाणे माझी दुपारची वामकुक्षी करीत असताना जो राक्षस आला व माझे सोडून इतरांची घरे नासू लागला, तो’ अशी एक कल्पना करून पाहा..
..बरं वाटतं, क्षणभर फारच बरं वाटतं. ही कल्पना एकदा जरी केलीत तरी थोडा वेळ का होईना आपल्या आसपासची सारी बजबजपुरी, सारा भ्रष्टाकार  ‘आधुनिकते’मुळेच माजले आहेत, असा निष्कर्ष झटकन काढूनसुद्धा आपण ‘स्वत्व’ जपलंय, याचं चिरंतन टिकणारं समाधान मिळवता येतं.
पण या असल्या कल्पना करण्याची सोय अगदी टिळक- आगरकरांपासून ते फुले- शाहू- आंबेडकरांपर्यंत कुणीच आपल्याला ठेवलेली नाही. (हे सारे मोठे आहेत आणि त्यांचं वैचारिक आवाहन आजही व्यापकच आहे, पण इथं ‘आपल्याला’ म्हणजे इथं फारच मर्यादित अर्थानं- ‘लोकसत्ता’शी वाचक किंवा अन्य नात्यांनी संबंधित असणाऱ्यांना- म्हणजेच निवासी वा अनिवासी महाराष्ट्रीयांना ही सोय त्यांनी ठेवली नाही). कलाप्रांतापुरतं आणि ‘आपल्या’पुरतंच बोलायचं तर, आधुनिकतेचा दुस्वास करण्याची किंवा तिला राक्षस मानण्याची सोय कवितेत केशवसुतांनी काढून घेतली, रंगभूमीवर नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्यासह अनेकांनी काढून घेतली, नृत्यकलेत रोहिणी भाटेंनी काढून घेतली, जनप्रिय संगीतात केशवराव भोळे ते भास्कर चंदावरकर अशा अनेकांनी काढून घेतली.. चित्रकलेत ती ज्यानं काढून घेतली, तो चित्रकार राजा रविवर्मा १९०६ सालीच मरणही पावला.
म्हणजे आपण गेल्या किमान पाऊणशे वर्षांपासून, आधुनिकतेचा दुस्वास करण्याची सोय नसलेले लोक आहोत, पण चित्रकलेबद्दल बोलायचं झाल्यास, रविवम्र्यानं पाश्चात्त्य चित्रकारांचा दुस्वास करण्याची सोय जवळपास सव्वाशे वर्षांआधीच आपल्याला ठेवलेली नव्हती.
पण तसं झालं नाही. पाश्चात्त्य  कलाकृतींमुळे निव्वळ अनुकरणप्रियता वाढेल आणि पाश्चात्त्य कलाविचार हा भारतीय कला नासवील म्हणून लोकप्रिय माध्यमांनी त्याची चर्चादेखील करायची नाही की परिचयदेखील करून द्यायचा नाही, असा आग्रह धरणारे आजही आहेत. इथे एक छोटासा (उत्तरं मिळू शकणारा, म्हणून लहान) प्रश्न असा की, आधुनिक आणि पाश्चात्त्य हे समानार्थी शब्द आहेत असंच आपण कसं काय मानत राहिलो?
आपण आयटीतल्या पोरापोरींना विचारतो का, की- ‘तुझं सिलिकॉन व्हॅली सोडून मायदेशी येणं वगैरे सारं ठीक आहे, पण तुझ्या कामामध्ये भारतीय विचार कुठे आहे?’
तो किंवा ती फारतर एवढंच म्हणू शकेल की, भारताच्या भल्यासाठीचं काहीतरी माझ्याकडून होणार आहे.
चित्रकलेतला घोळ असा की, फार कमी चित्रकार एवढं तरी म्हणू शकले.
मुळात चित्रकारच ठरवू शकले नव्हते की, आपण आधुनिकतावादी आहोत की नाही. म्हणजे, १९३७ साली जेव्हा ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चं त्या काळी अत्यंत प्रतिष्ठित मानलं जाणारं बक्षीस (गोल्ड मेडल) अमृता शेरगिल या चित्रकर्तीच्या ‘थ्री गर्ल्स’ या चित्राला द्यायचं ठरलं तेव्हा जे वाद झाले, ते तिनं कलाशिक्षणाची पाश्चात्त्य परंपरा पाळलेली नाही म्हणून झालेले होते. मात्र याच वादादरम्यान अमृता शेरगिलला हे बक्षीस मिळालं त्यात काहीही गैर नाही, असा जाहीर पवित्रा घेणाऱ्या सभा मुंबई-पुण्यात झाल्या आणि भारतीय चित्रकार शेरगिलच्या बाजूचे आहेत, हेही दिसू लागलं. पण हा त्या वेळी झालेला एक ‘इव्हेन्ट’च ठरला. अमृता शेरगिल युरोपातून भारतात आली ती स्वत:ची मुळं शोधण्यासाठी.. तसं न करता, कोकणातून मुंबईत आलेले चित्रकार मुंबईकरच झाले. अमृता शेरगिलमुळे जी वैचारिक ढवळणुकीची शक्यता तरी इथं निर्माण झाली होती; तशी शक्यता त्या मुंबईकर चित्रकारांमुळे त्यांच्या गावोगावी निर्माण झाली नाही.
आधुनिकता ही आत्मानुभूतीचा भाग बनण्याचा तो जो शेरगिल-वादामुळे मिळालेला होता, तो ‘रापण’ या पुस्तकात ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे माजी आणि दिवंगत डीन प्रा. म. वा. धोंड यांनी गोष्टिवेल्हाळपणे टिपला आहे. या प्रकारचे – म्हणजे आधुनिकता आत्मानुभूतीचा भाग बनण्याचे- अनेक क्षण बाकीच्या कलांमध्ये आले. इतकंच नव्हे तर  त्या क्षणांमधली संगती समजू लागली आणि त्या संगतीचा अर्थ लोकांनाही कळू लागला. (‘ज्ञानेश्वर ते मर्ढेकर’सारखा कार्यक्रम हे कवितेतल्या अशा क्षणांची मालिका लोकांपर्यंत उदाहरण ठरेल.) नाटकामधल्या ‘स्थळ : दिवाणखाना’वर पुष्पा भावे यांनी केलेली टीकाच आता ४० वर्षांपूर्वीची झालीय आणि त्यानंतर आपण पाश्चात्त्य आधुनिक नाटकापेक्षा निराळं काहीतरी आधुनिक भारतीय रंगभूमीवर घडवू लागलेलो आहोत.. मुख्य म्हणजे, अशा नाटकाला नेहमीच मर्यादित प्रमाणात का होईना, पण लोकाश्रय मिळून ही आधुनिकता आपलीच असल्याच्या मुद्दय़ावर शिक्कामोर्तबही झालेलं आहे.
चित्रकलेत किंवा शिल्पकलेत मात्र ही सोय नाही. अमृता शेरगिलच्या त्या चित्रानंतरच्या सुमारे ५० वर्षांत भारतीय चित्रकारांनी डोईवर पदर घेतलेल्या राजस्थानी वगैरे बायकांची चित्रं फार मोठय़ा संख्येनं केली. कशासाठी? विकण्यासाठी! विकली जाताहेत, म्हणूनच.
एकटा चित्रकार-शिल्पकार. त्याची चित्रं विकत घेणारे कॉपरेरेट/शेठजी ‘क्लायंट’ लोक किंवा मग चित्रकार-शिल्पकारांना स्मारकांपासून सजावटींपर्यंत कसलीही कंत्राटं (कमिशन्स) देणारी सरकारी खाती, संस्था वगैरे.. नाटकवाल्यांना लोकांकडूनच पैसा मिळेल असं वाटण्याची शक्यता तरी असते. चित्रकार मात्र साध्या लोकांपेक्षा शेठजी/उद्योगपती/नेता/ बाबू लोकांवरच पैशासाठी अवलंबून.. असं १९८०च्या दशकापर्यंत तरी होतं. म्हणूनच लोक आणि चित्रकला यांचं नातं जुळलं नाही, असं झालं का?
चित्रकलेतल्या नव्या प्रयोगांना आपलं न मानण्यासाठी वैचारिक अनास्था, करमणूकप्रधानता, भोगवाद आदी आधुनिक कारणांपासून ते चित्रकाराला उच्चकुलीन न मानणं, सरंजामी मनोवृत्तीनं केवळ सत्ताप्रदर्शनासाठी कलांना आश्रय देणं, चित्रकार वा शिल्पकार किंवा स्थपती यांनी त्या त्या पंथाचे धार्मिक आग्रह पाहून मगच कामं करण्याची रीत असणं.. अशी हजार-दीड हजार वर्षांपूर्वीची कारणं देता येतील.
आपल्या आजच्या काळात ही आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही प्रकारची कारणं जुनीच आहेत. असणारच. आता  जागतिकीकरणच २० वर्षांचं झालंय, ‘उत्तरआधुनिक’ ही संज्ञा जागतिक वास्तुकलेत चाळिशीची, साहित्यात पस्तिशीची आणि चित्रकलेतही तितकेच पावसाळे किंवा विण्टर्स पाहिलेली झालीय. तिचा अर्थ न समजणारे लोक आणि आपापल्या परीनं समजणारे किंवा समजून घेऊ इच्छिणारे लोक यांच्यातला फरक जगभरच्या सुसंस्कृत देशांमध्ये जवळपास सारखाच आहे.. अशी नवीच परिस्थिती उदयाला येते आहे. ही उदयोन्मुख परिस्थिती आधुनिक आणि पारंपरिक एवढय़ाच तराजूत तोलता येणारी नाही. तिला तिसरी बाजू आहे.. घडत्या समकालीन काळाची.
त्याहीमुळे असेल, पण अमृता शेरगिलच्या चित्राबद्दल एवढे वाद होण्यासारखं काय होतं, किंवा एखादी भारतीय वंशाची युरोपीय चित्रकार इथं आली तर तिला बक्षीस देऊच नका असं म्हणणारे लोक कसे काय असतील, असा प्रश्न आज आपल्याला पडतो.
पण दुसरं असं की, आपल्याला न्यूयॉर्कमध्ये राहणारी शिरीन नेशात माहीत नसते. तिची एक फोटो-कलाकृती शेजारी आहे सांगितलं तर आपण ‘हं’ म्हणू फारतर.  तरीही ‘शिरीन इराणी आहे’ असं म्हटल्याम्हटल्या लग्गेच आपली टय़ूब पेटू शकते!
‘स्त्री आणि मेंदी’ यांची संगती लावताना आपण बाकीचासुद्धा विचार करू लागतो.. इराण- इस्लामीकरण- हिंसाचार- इस्लामी कर्मठवादामुळे स्त्रियांची झालेली स्थिती- स्त्रीचं परंपरेनंही केलेलं वस्तूकरण- मेंदी.
हा विचार करायला आपल्याला ‘पाश्चात्य’ चित्रकलेनं नाही शिकवलेलं.
दुसरीचकडून कुठून कुठून आपण शिकलो आहोत हे सारं.
म्हणजेच, कलेच्या तत्त्वज्ञानाच्या – अ‍ॅस्थेटिक्सच्या भाषेत असं की, आत्ता कान्टचे ज्ञान, नीती आणि कला (सौंदर्य) यांचे व्यूह निरनिराळे नाही राहू शकत.
याचा आपल्यासाठी अर्थ असा : आधुनिक कलाभान जरी तुमच्याकडे असेल, तरी आजच्या काळात ते बदलणं आवश्यक आहे.. आणि समजा, तुम्ही ‘आम्हाला नायबॉ चित्राबित्रातलं कळत’ अशा प्रकारचे- म्हणजे आधुनिक कलाभानापासनं वंचितच असणाऱ्यांपैकी होतात, तरीही फार काही  बिघडत नाही!
आजचं कलाभान तुमच्या स्वागतासाठी उत्सुकच आहे.

Story img Loader