या सहस्रकातील ‘ऐतिहासिक’ तारीख मानल्या जाणाऱ्या १२-१२-१२ या तारखेला विवाहबद्ध होण्याचा मानस असलेल्या असंख्य ‘चि.’ आणि ‘चि.सौ.कां.’ यांचा हिरमोड झाला आहे. १२-१२-१२ या तारखेलाच नेमकी अमावस्या असल्याने या दिवशी लग्नाचे मुहूर्तच नाहीत. तर मुहूर्ताच्या फंदात न पडता काढीव मुहूर्तावर लग्न करणाऱ्यांनीही केवळ अमावस्या म्हणून या दिवसाला नापसंती दर्शवली आहे. मात्र अमावस्येचा जाच केवळ हिंदू विवाहेच्छुकांना होणार आहे. इतर धर्मियांपैकी काही जोडपी आज विवाहबद्ध होत आहेत.
१२-१२-१२ ही ऐतिहासिक तारीख गाठण्यासाठी अनेक जोडप्यांनी सहा महिने आधीपासून तयारी सुरू केली होती. मात्र पंचागानुसार या तारखेला अमावस्या येत असल्याने बहुतांश सगळ्याच जोडप्यांनी लग्न या तारखेच्या आगेमागे ठरवली. आजकाल अनेक जण काढीव मुहुर्तावर लग्न करतात. मात्र १२-१२-१२ या दिवशी अमावस्या येत असल्याने अनेकांनी हा दिवस टाळला असावा, असे लग्नाचे छायाचित्रण करणारे छायाचित्रकार निखिल जोशी यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातील अनेक लग्न कार्यालयांशी संपर्क साधला असता डिसेंबरमधील अनेक तारखा लग्नासाठी आधीच नोंदवल्या गेल्याचे समजले. मात्र १२-१२-१२ ला यापैकी अनेक कार्यालयांमध्ये एकही लग्न किंवा लग्नाचा स्वागत समारंभ नाही. आमच्या कार्यालयातही लग्नाचा मुहूर्त नाही.
मात्र संध्याकाळच्या वेळी एका ख्रिश्चन जोडप्याच्या विवाहाचा स्वागत समारंभ होणार असल्याची माहिती ठाण्याच्या शहनाई हॉलच्या चाफेकर यांनी दिली.
बँकांनीही साधला मुहूर्त
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध बँकांनी १२-१२-१२ चा मुहूर्त साधत विविध ठेव योजना जाहीर केल्या आहेत. आपल्या ग्राहकांनी या दिवशी आवर्ती ठेव खाते सुरू करावे, असे प्रयत्न सारस्वत बँक करत आहे. त्याशिवाय आयडीबीआय बँक याच दिवशी १२ राज्यांमधल्या १२ जिल्ह्यांत १२ शाखा १२ वाजून १२ मिनिटांनी सुरू करणार आहे.
अमावस्येमुळे वाजले लग्नाचे १२-१२-१२!
या सहस्रकातील ‘ऐतिहासिक’ तारीख मानल्या जाणाऱ्या १२-१२-१२ या तारखेला विवाहबद्ध होण्याचा मानस असलेल्या असंख्य ‘चि.’ आणि ‘चि.सौ.कां.’ यांचा हिरमोड झाला आहे. १२-१२-१२ या तारखेलाच नेमकी अमावस्या असल्याने या दिवशी लग्नाचे मुहूर्तच नाहीत.
First published on: 12-12-2012 at 01:07 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No occasion because of no moon day