या निवडणुकीचे एक वैशिष्टय़ म्हणजे आयाराम-गयारामांची अपूर्व संख्या. पक्ष फुटीची ही लागण यानंतरही सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे. परंतु महायुतीला आलेले यश पाहता त्यांच्यात सामावून घ्यायला आणि मोबदल्यात सत्ता द्यायला त्यांच्याकडे फारसे उरणार नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाची खरी कसोटी त्यातच आहे. काय घडते ते तपासत राहावे लागेल.
मनमोहन सिंग दहा वर्षे पंतप्रधान होते. पहिल्या पाच वर्षांत त्यांना ६१ डाव्या खासदारांचा पाठिंबा होता म्हणून ते पंतप्रधान होऊ शकले होते. दुसऱ्या वेळी ते पंतप्रधान झाले तो काळ पहिल्या काळाच्या तुलनेत खूपच वाईट ठरला. महागाई नियंत्रणात राहिली नाही. बेकारी कमी करता आली नाही. विषमता वाढली. राष्ट्रीय उत्पादनवाढीचा वेग घटला. स्वत: मनमोहन सिंग काँग्रेसचे नेते कधीच नव्हते. या साऱ्याच्या परिणामी काँग्रेस आघाडीचा पराभव होणे अटळ होते.
त्यातच अब्जावधी रुपये खर्चून प्रसारमाध्यमे हातात घेऊन नरेंद्र मोदी यांनी एक जल्लोष तयार केला. याचा परिणाम भाजप आघाडीला अपेक्षेपेक्षाही जास्त जागा मिळाल्या. या साऱ्याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आणि महाआघाडीने अभूतपूर्व यश मिळवले. काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले. काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीचेही तेच झाले. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जागा जास्त मिळाल्या, परंतु ते म्हणजे नापासांत वरचा नंबर आला असे झाले. शिवाय राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या तुटपुंज्या यशाच्या जागा या पक्षाचे बळ दाखवत नसून त्या त्या उमेदवाराचेच बळ दर्शवितात.
कोल्हापूरचे महाडिक काय आणि सातारचे राजे काय, हे स्वबळावरच मुख्यत: निवडून आले. अर्थात त्यांच्या यशात राष्ट्रवादी पक्षाचा हिस्सा आहे. परंतु हा हिस्सा अत्यल्पच आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हुशारीने या ठिकाणी बलवान उमेदवार दिले आहेत.
पुढे काय?
शरद पवार हे महाराष्ट्राचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांना महाराष्ट्र खूपच चांगला माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीने ते नामोहरम होण्यासारखे नाहीत. कदाचित येत्या ४ महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व राष्ट्रवादी यांची पीछेहाटच होईल. परंतु म्हणून महाराष्ट्रातून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी संपेल असे नाही.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सहकारी साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्था इत्यादी ठिकाणची सत्ता ही त्यांची बलस्थाने अबाधित आहेत व मोठय़ा प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी एक अट आहे. आपापले कार्यकर्ते व नेते यांना पक्षातच ठेवण्यात त्यांना किती यश मिळते यावर हे अवलंबून आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर या निवडणुकीचे दूरगामी परिणाम होणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या चारपैकी एक प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस याच्यावरसुद्धा परिणाम होणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाला आपल्या अस्तित्वाचा फेरविचार करावा लागणार आहे. या परिस्थितीतून तरून जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे जे राजकारण गेली चार-पाच वर्षे जे केलं ते सोडून देऊन त्यांना एकत्र येवून काम करायला हवे. शरद पवार यांच्यासारख्या दीर्घ अनुभव असलेल्या नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र अस्तित्वाची काही गरज आहे काय, याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी राजकारण विशेषत धर्मद्वेषावर आणि जातीद्वेषावर आधारलेले राजकारण वाढू द्यायचे वनसेल तर त्यांनी आपल्या एकूणच भूमिकेचा फेरविचार करावा असे मला वाटते. त्यांना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही, हे मला माहिती आहे.
महाराष्ट्र काँग्रेसला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये संपूर्णत घेऊन जाईल, असे नेतृत्त्व आज राज्यात नाही. ती पोकळी शरद पवार भरून काढू शकतात. ताबडतोब नसला तरी योग्यवेळी ते त्याचा विचार करतील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांची फेरजोडणी घडवून आणण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी आता संकुचित स्वार्थ सोडून राज्याच्या समग्र राजकारणाचा विचार करावा.

Story img Loader