राज्यात शिवसेनेत झालेल्या मोठय़ा बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आले असता महापूजेला जोडूनच शिंदे गटाचा मेळावाही झाला. यानिमित्ताने शिवसेनेतील काही नव्याजुन्या शिवसैनिकांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. यापूर्वी अनेक वर्षे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू राहिलेले आणि दहा वर्षांपूर्वी त्यांची साथ सोडून शिवसेनेत गेलेले माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांच्या राजकीय विश्वासार्हतेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी उमेदवारी कापल्यामुळे महेश कोठे यांनी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली होती. त्यामुळे सेनेतून हकालपट्टी होऊनसुद्धा महापालिकेतील राजकारणामुळे शिवसेनेला सोडणे कोठे यांना शक्य नव्हते. मात्र अलीकडे दीड वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संपर्क वाढवून सोलापुरात आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा महापौर निवडून आणण्याचा विडा उचलला. अर्थातच महेश कोठे यांना सोलापूर राष्ट्रवादी जणू आंदण देण्यात आले होते. शरद पवार यांच्याशी जवळीक असूनही हेच महेश कोठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. या भेटीत त्यांचे अनुयायी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी नगरसेवक मनोज शेजवाल आदी मंडळी कोठे यांच्या साक्षीनेच शिंदे गटात गेली. नंतर कोठे यांनी मात्र आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवायचा? खुद्द राष्ट्रवादीतून कोठे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा