अॅड. सीमंतिनी नूलकर
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षांची समाप्ती आज १५ ऑगस्ट रोजी होत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्य लढय़ातील सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना, घडामोडींचा वेध घेणारी ही विशेष पुरवणी.
सन १८५७ म्हटले, की जोडशब्द म्हणून ‘१८५७ चा उठाव’ किंवा ‘१८५७ चे बंड’ असे काही जण सहज म्हणून जातात. पण ते अगदीच चुकीचे आहे. कोणतीही क्रांती फसली, की तिला उठाव किंवा बंड म्हणतात. १८५७चा सशस्त्र संग्राम होता, सशस्त्र क्रांती होती. ती कोणत्याही परिस्थितीत फसली किंवा अयशस्वी झाली, असे म्हणता येत नाही. कारण याच सशस्त्र संग्रामात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची बीजे रोवली गेली.क्रांती म्हणजे एक प्रकारची मौलिक परिवर्तनाची घटना असते. लष्करी सामर्थ्यांपेक्षा युक्ती, अर्थकारण, तंत्रज्ञान अशा उपायांचा अवलंब करून शत्रूचा बिमोड करणे म्हणजे क्रांती. क्रांतीचे वैशिष्टय़ म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय अशा मूलभूत तत्त्वांचा, मूल्यांचा जन्म किंवा पुनस्र्थापना! क्रांती सामान्य जनतेच्या मनात अदम्य विश्वास निर्माण करते. उज्ज्वल भविष्याच्या आशेचे अंकुर जागवते.
भारताने वर्षांनुवर्षे परकियांची असंख्य आक्रमणे झेलली. गुलामीचे चटके सोसले. ते झुगारण्याचे आत्मिक बळ १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाने भारताला मिळाले. या लढय़ात सहभागी होणाऱ्यांमध्ये तात्या टोपेंबरोबर, साताऱ्याच्या छत्रपतींचे वकील रंगो बापुजी गुप्ते, त्यांचा मुलगा, मेहुणा असे १७ जण होते. ब्रिटिशांच्या लष्करी न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण ब्रिटिशांनी कपटाने त्यांपैकी पाच जणांना फाशी दिली, सहा जणांना गोळय़ा घातल्या आणि उरलेले सहा लोक तोफेच्या तोंडी दिले. ही घटना घडली साताऱ्यात. आता ऐन वस्तीत असलेले हे ठिकाण ‘फाशीचा वड’ म्हणून ओळखले जाते. साताऱ्याचा १८५७च्या सशस्त्र संग्रामाशी असा हा थेट संबंध.
हा स्वातंत्र्यसंग्राम, भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतातल्या स्त्रीशक्तीच्या सहभागाशिवाय पूर्णत्वाला जाणे शक्यच नव्हते. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे राणी लक्ष्मीबाई! जणू क्रांतीचे प्रतीकच. राणी लक्ष्मीबाईचे माहेरचे आडनाव तांबे. हे तांबे घराणे साताऱ्याजवळच्या धावडशीच्या ब्रह्मेंद्र स्वामींकडे सेवा रुजू करण्यासाठी साताऱ्यात स्थायिक झाले. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाशी साताऱ्याच्या स्त्रीशक्तीचा असाही संबंध आहे. राणी लक्ष्मीबाईपासून, स्त्रियांचा स्वातंत्र्यलढय़ातला सहभाग नोंदला जायला सुरुवात झाली. स्त्रियांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी कशी प्राणाची बाजी लावली होती, ते सांगणाऱ्या अनेक घटना भारतीय स्वातंत्र्यलढय़ाने पाहिल्या.
संपूर्ण भारतभर स्त्रियांनी हरप्रकारे स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला. भूमिगतांना आसरा देणे, लपवून ठेवणे, गुप्त माहिती गोळा करणे, गुप्तहेर म्हणून काम करणे, अन्न, स्फोटकांचा क्रांतिकारकांना पुरवठा करणे या कामात स्त्रिया पुढे होत्या. घरादारावर, संसारावर तुळशीपत्र ठेवूनच त्या यात उतरत होत्या. त्यांची प्रेरणा होती राणी लक्ष्मीबाई आणि तिचे सशस्त्र दुर्गा दल! राणी लक्ष्मीबाईच्या दुर्गादलाची सेनानी होती, युद्ध प्रशिक्षित अशी झलकारीबाई. राणी लक्ष्मीबाईची ‘हमशकल.’
हत्यार चालवणे, युद्ध प्रशिक्षण देणे यात माहीर. दरोडेखोरांपासून वाघापर्यंत कोणाशीही तिने झुंज घेतली नाही असे नव्हते. तिच्या हमशकल असण्याचा त्या संग्रामात राणी लक्ष्मीबाईंना किती उपयोग झाला असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. बुन्देलखंडाच्या लोकगीतांत, लोककथांत- वीरगाथांत ही वीरांगना अजरामर झाली आहे.वेगवेगळय़ा वयाच्या, वेगवेगळय़ा समाज स्तरातल्या स्त्रिया या लढय़ात उतरल्या. ढाक्याची प्रीतिलता वद्देदार, आसामची साठ वर्षांची, आठ मुलांची आई असलेली भोगेश्वरी फुक्नानी, अवघी सतरा वर्षांची आत्मघाती दस्त्याची प्रमुख, कलकत्त्याची कनकलता बरुआ, पहिली हुतात्मा झालेली रामगढची राणी अवन्तिबाई लोधी, अशा किती जणी. या मांदियाळीत महाराष्ट्र, साताऱ्याच्या वीरभूमीतल्या, वीरांगनांचा समावेश नाही, असं शक्यच नव्हतं. साताऱ्याच्या मातीत, पाण्यात, रक्तात, डीएनएमध्येच उफाळणारी लढवय्या वृत्ती आहे.
हा काळ चूलमूल करण्याचा काळ होता खरं तर. स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरळ शक्यतांचे ते दिवस होते. स्त्रियांनी जग पाहिलेलं नव्हतं, तशी संधीच उपलब्ध नव्हती. पण स्त्रीचा उपजत वेळप्रसंगी स्वत:चा विचार न करता झोकून देण्याचा गुण, कणखरपणा, मनोधैर्य, आवश्यक तेव्हा, आवश्यक तितकं कठोर होता येणं, सगळय़ावर मात करणारं असतं. म. गांधीनी स्त्रीशक्तीला, स्वातंत्र्यालढय़ात त्यांनी सहभागी व्हावं, यासाठी हाक घालताना म्हटलंच होतं, Man can never be equal to a woman, in the spirit of selfless service, which the nature has endowed her. या हाकेला प्रतिसाद देऊन मिठाच्या सत्याग्रहात भाग घेणारी पहिली स्त्री अवंतिकाबाई गोखले, तेव्हाच्या सातारा जिल्ह्यातल्या तासगावची !
प्रती सरकारात एक ‘जैनाची ताई’ होती. राजमती बिरनाळे. ती बंदूक चालवत असे, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण स्त्रियांना देत असे. धुळे खजिनालुटीत तिचा सहभाग होता. अशीच काशीबाई हणबर. सातारा जिल्ह्यातही अनेक अनामिक स्त्रियांनी त्यांच्या परीने योगदान दिले.नाना पाटलांसारखे दुसरे थोर क्रांतिकारक म्हणजे आण्णा नायकवडी. त्यांची आई लक्ष्मीबाई नायकवडी. जेव्हा फंदफितुरीने आण्णाना अटक झाली तेव्हा जो महिलांचा जमाव पोलिसांवर चालून गेला त्यात लक्ष्मीबाई नायकवडी, राजमती बिरनाळे आघाडीवर होत्या. लक्ष्मीबाई नायकवडींनी आपल्या आचारणातून, वागण्यातून मुलांना प्रोत्साहन दिले, प्रेरणा दिली, दिशा दिली. म्हणून त्यांना क्रांतिमाता म्हणून ओळखले जाते. इंदूताई पाटणकर तर स्वातंत्र्यलढय़ात उतरल्या तेव्हा अवघ्या सोळा वर्षांच्या होत्या. त्यासाठी त्यांनी घरादाराचाही त्याग केला. औंध संस्थानच्या डॉक्टर नलिनी पंत, क्रांतीकारकांना साहित्याचा पुरवठा करत, वैद्यकीय उपचार करत.
नाना पाटलांची एकुलती एक लेक हौसाबाई पाटील. अगदी अलीकडे, त्या ९३ वर्षांच्या होऊन गेल्या. त्यांच्या उल्लेखाशिवाय सातारच्या वीरांगनांच्या लढय़ातल्या योगदानाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.हौसाबाई तूफान सेनेत होत्या. पोलिस स्टेशनवर हल्ला करणं , बॉम्बस्फोट घडवून आणणं, गुप्त माहितीची देवाणघेवाण, गुप्तहेर म्हणून काम करणं, हा त्यांचा हातखंडा होता. पोर्तुगीजांनी बाळ जोशी या क्रांतिकारकाला गोव्यात तुरुंगात टाकले होते आणि फासावर देणार होते. प्रती सरकारने त्यांच्या सुटकेची योजना आखली पण ती त्यांच्यापर्यन्त पोचवणं आवश्यक होतं. यासाठी हौसाबाई यांची निवड झाली. तेव्हा हौसाबाई यांचं तान्हं बाळ, अवघं चार महिन्याचं होतं . त्यामुळे त्यांना कोडं पडलं की बाळाला सोडून जावं तरी कसं आणि घेऊन जावं तरी कसं . नाना पाटलांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते म्हणाले, ‘मी तिला जा असंही सांगणार नाही आणि जाऊ नको असंही म्हणणार नाही. जो घ्यायचा तो निर्णय तिचा असेल.’ ते कळल्यावर आपल्या तान्हुल्याला नातेवाईकांकडे ठेवून हौसाबाई गोव्याला गेल्या. बाळ जोशींच्या सुटकेची योजना त्यांच्यापर्यन्त पोचवली. त्यानंतर गोव्यातच समुद्राला मिळणाऱ्या अफाट विस्ताराच्या मांडवी नदीत, ऐन मध्यरात्री, लाकडी खोक्यावर तरंगत राहून, त्यांनी पोर्तुगीजांना चकवा दिला.
क्रांति ही व्यापक, सर्वंकष संकल्पना असते. सशस्त्र क्रांती असते, राजकीय क्रांती असते, तशी सामाजिक, शैक्षणिक क्रांतीही असते. याच काळात स्त्रियांना शिकता यावे यासाठी सावित्रीबाई फुले, या सातारा जिल्ह्यातल्या नायगावच्या सुकन्येने स्त्रियांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांति घडवली. स्त्रियांबरोबरच त्यांनी प्रौढ, अस्पृश्य यांनाही शिक्षणाची दारं खुली केली. सावित्रीबाई या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका. यशवंत या आपल्या मुलाचा आंतरजातीय विवाह करून सामाजिक सुधारणांचा पायंडा पाडला. त्या काळात समाजात अंधश्रद्धा बोकाळलेल्या होत्या. दगडधोंडय़ांना नवस बोलला तर मूल होईल असा समज असे. सावित्रीबाईंनी त्यावर प्रहार केले. त्यातला फोलपणा दाखवून दिला. ‘काव्यफुले’ या त्यांच्या काव्यसंग्रहात एक कविता आहे.
‘‘नवस करीती ,
बकरू मारीन बाळ जन्मी .
धेंडे मुलं देती , नवसा पावती
मग लग्न का करीती?’’
अशाच कराडजवळच्या देवराष्ट्राच्या पं. रमाबाई रानडे. स्त्री हक्क, स्त्रियांचे समान अधिकार यासाठी त्या लढल्या. पीडित महिलांसाठी संघटना काढली, महिला मजुरांच्या समस्यांवर आवाज उठवला. स्त्रियांना किमान प्राथमिक शिक्षण अनिवार्य करावे यासाठी आंदोलन केले. त्यांच्या ‘सेवासदन’च्या माध्यमातून पहिली भारतीय नर्स समाजात पुढे आली. जागतिक युद्ध परिषदेत त्यांनी भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले.या वीरांगनांपैकी कोणी प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढय़ात उतरले, कोणी स्वातंत्र्यानंतरच्या सक्षमतेसाठीची पूर्व तयारी म्हणून स्त्रीमनाची, समाजमनाची मशागत करण्यासाठी आयुष्य वेचले. कोणी स्वत:चे प्राण अर्पण केले, लीलाबाई पाटलांसारख्या कोणी आपल्या अद्याप जन्मालासुद्धा न आलेल्या मुलाची, या यज्ञात आहुति दिली. कोणी घरादाराचा विचार केला नाही, कोणी सुखासीन आयुष्य लाथाडले. कोणाची जन्मभूमी सातारा जिल्हा होती तर कोणाची ती कर्मभूमी!
जसा प्रत्यक्ष युद्धात सहभाग महत्वाचा तसाच, विपरीत परिस्थितीत समाजाचं परिवर्तन, त्या अनुषंगाने घडवून आणणे, समाजमनाची सकारात्मक मशागत करणे हेही एक युद्धचं. ती दूरदृष्टी सावित्रीबाई, रमाबाई यांच्याकडे होती. याही स्वातंत्र्य लढय़ातल्या वीरांगनाच !. या संपूर्ण काळाच्या आठवणींचा इतिहास कमलादेवीनी लिहिला, त्यात त्या म्हणतात , ’या स्वातंत्र्यलढय़ात, चळवळीत भाग घेऊन या वीरांगनांनी, त्या लढय़ाचं महाकाव्यात रूपांतर केलं!’ या वीरांगनाच्या कर्तृत्वाचं, या महाकाव्याच्या या महानायिकांच्या योगदानाचं मोल करणं शक्य नाही, हेच खरं!