मराठी भाषेच्या भवितव्याविषयी अनेक जण गळा काढतात. मराठीचे बहुतेक प्राध्यापकही ‘आम्ही वाङ्मय शिकवतो; भाषा शिकवणे हे आमचे काम नाही’ अशी दर्पोक्तीची भाषा करतात. या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा व वाङ्मय विभागात गेली दोन वर्षे मराठी भाषा अध्ययन- अध्यापनाच्या आधुनिकीकरणाचा, त्या पद्धतीसाठी लिखित व दृक्श्राव्य सामग्री तयार करण्याचा प्रकल्प चालू असून तो अन्य भाषकांना मराठी भाषेचे शिक्षण मिळण्यासाठी उपयुक्त आहे. १३ ऑगस्ट या आचार्य अत्र्यांच्या जयंतीदिनी याअंतर्गत ‘माय मराठी’ नावाचे पाठय़पुस्तक, एक अभ्यास पुस्तक आणि एक डीव्हीडी असा हा संच अभिनेते आमीर खान यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने..
मराठीचे पाऊल खऱ्या अर्थाने पुढे पडायचे असेल तर ती आपल्या मुलुखात (आणि परमुलुखातही) रुजली पाहिजे, बोलली गेली पाहिजे, जीवनाच्या विविध क्षेत्रांत वापरली गेली पाहिजे. प्रशासनापासून चित्रपटापर्यंत, व्यवस्थापनापासून संशोधन-अध्यापनापर्यंत अनेक क्षेत्रांत मराठी माणसाचे पाऊल पुढे पडत आहे, रोवले जात आहे, पण मराठी भाषेचे पाऊल मात्र पुढे पडण्याऐवजी मागेच पडत आहे. शिक्षण, प्रवास, खरेदी-विक्री, सेवा इत्यादी बहुतेक क्षेत्रांत मराठीऐवजी इंग्रजी व हिंदूीचा वापर झपाटय़ाने वाढतो आहे आणि त्यामुळे मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता भल्याभल्यांना सतावते आहे. मराठी माणसाचे पाऊल पुढे आणि मराठी भाषेचे पाऊल मात्र मागे असे का होत आहे, याचा शोध घेतला तर असे दिसेल की मराठी माणसाने अन्य भाषकांना मराठी शिकवले नाही, किंबहुना मराठी भाषा शिकवण्यासाठी काही सुजाण प्रयत्नच केले नाहीत.
अन्य भाषकांना मराठी शिकवायची म्हणजे काय करायचे? जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच इत्यादी भाषा अन्य भाषकांना शिकवण्यासाठी काय केले जाते हे पाहिले तर मराठी शिकवण्यासाठी काय, काय आणि किती केले पाहिजे हे समजू शकेल. आधी उल्लेख केलेल्या भाषा शिकवण्यासाठी काय केले जाते? भाषांचे प्रमाणीकृत अभ्यासक्रम आहेत- अगदी प्रारंभिक संभाषणापासून उच्च दर्जाच्या वाङ्मयाच्या रसग्रहण-अभ्यासापर्यंत! तुम्ही कुठेही शिका- खासगी संस्था, विद्यापीठे कुठेही आणि भारत, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड अशा कुठेही! अभ्यासक्रम, त्यातील परीक्षा, यशस्वी विद्यार्थ्यांना दिली जाणारी प्रमाणपत्रे आणि शिकवण्याच्या पद्धती- सर्व गोष्टी सर्वत्र समान! एका ठिकाणापासून तुम्ही दुसरीकडे गेला तरी तुमचे शिक्षण पुढे चालू राहते. सर्व ठिकाणी तीच पुस्तके, तीच दृक्श्राव्य साधने वापरली जातात. शिक्षकांनाही ही कशी वापरायची याचे शिक्षणही एकाच प्रकारचे दिलेले असते. त्यामुळे शिक्षण या समान पद्धतीने, समान पातळीवर दिले जाते. त्यासाठी प्रचंड संशोधन, प्रयोग, साहित्य व सामग्रीची निर्मिती, या गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उदाहरणार्थ, जर्मन भाषा शिकणारा विद्यार्थी (मग तो कुठल्याही वयाचा असो!) पहिल्या दिवसापासूनच जर्मन बोलायला लागतो, हळूहळू व्यवहारात वापरायला लागतो आणि सहा पातळ्यांवरील सुमारे ८०० तासिकांचे शिक्षण पूर्ण करताना श्रवण, संभाषण, वाचन, लेखन ही कौशल्ये मिळवतो; एवढेच नव्हे तर त्या भाषेतील उच्च दर्जाचे वाङ्मय वाचण्याइतके त्या भाषेवर प्रभुत्व मिळवतो! मराठी भाषेच्या शिक्षणाच्या क्षेत्रात असे काही दिसते का? जे थोडेफार प्रयत्न झाले आहेत ते खासगी, व्यक्तिगत पातळीवर आणि भाषा-अध्यापनाबद्दलच्या कालबाहय़ सिद्धांतांवर आधारलेले. एके काळी पाठांतर, व्याकरण, भाषांतर यांचा भाषा शिकवताना उपयोग केला जायचा. ‘भाषा म्हणजे एक सवय आहे’ या समजुतीवर आधारलेले वाक्य-नमुने व शब्दांच्या घोकंपट्टीचा उपयोग केला जायचा. पण त्यामधून भाषा शिकायला खूप वर्षे लागत आणि तरीही भाषा बोलता किंवा आत्मविश्वासाने वापरता येत नसे.
जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच या भाषा शिकवण्यासाठी आता वापरली जाते ती सर्व पद्धतींचा एकजीव वापर करणारी संवादपद्धती. मराठी माणसे या पद्धतीने परकीय भाषा शिकतात, पण ती पद्धत मराठी भाषेच्या अध्यापनासाठी वापरण्याचे मात्र त्यांना सुचत नाही. मराठीचे बहुतेक प्राध्यापक ‘आम्ही वाङ्मय शिकवतो; भाषा शिकवणे हे आमचे काम नाही’ अशी दर्पोक्ती काढतात आणि इतर कुणाला ही पद्धती, तिच्यासाठी लागणारे साहित्य व सामग्री तयार करणे, भाषाकौशल्याच्या विविध पातळ्या ठरविणे, त्यासाठी तासिकांची संख्या, परीक्षा आणि प्रमाणपत्रे इ. करणे शक्य होत नाही. सरकारचेही याकडे दुर्लक्ष! त्यामुळे मराठी माणसाचे पाऊल पुढे पडले तरी मराठी भाषेचे पाऊल मात्र मागे पडत चालले आहे.
या अंधकारात एक दिवा आता उजळला आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा व वाङ्मय विभागात (मराठी विभागात नव्हे!) गेली दोन वर्षे मराठी भाषा अध्ययन- अध्यापनाच्या आधुनिकीकरणाचा, त्या पद्धतीसाठी लिखित व दृक्श्राव्य सामग्री तयार करण्याचा प्रकल्प चालू आहे. येत्या बुधवारी, १३ ऑगस्टला, आचार्य अत्र्यांच्या जयंतीच्या दिवशी या प्रकल्पाचे पहिले दृश्यफळ प्रसिद्ध होणार आहे. ‘माय मराठी’ (ट८ टं१ं३ँ्र) या नावाचे एक पाठय़पुस्तक, एक अभ्यास पुस्तक आणि एक डीव्हीडी असा हा संच अभिनेते आमीर खान यांच्या हस्ते, कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जर्मनीचे कॉन्सुल जनरल मायकेल जीबर्ट यांच्या उपस्थितीत कालिना कॅम्पस येथे प्रकाशित होणार आहे. हा प्रकल्प या टप्प्यापर्यंत आला याचे श्रेय आमीर खानला आहे. त्याने या प्रकल्पासाठी पंचवीस लाख रुपयांची घसघशीत देणगी दिली आहे. शिवाय विजय सेल्स कॉर्पोरेशनचे प्रमुख नीलेश गुप्ता यांनीही तीन लाख रुपयांची देणगी दिली आहे. हे दोघेही मराठी शिकले श्री. सुहास लिमये यांच्याकडे. ‘माय मराठी’च्या संचाच्या लेखकद्वयीत लिमये आहेत. दुसरे आहेत श्री. जयवंत चुनेकर. त्या दोघांनी गेली बरीच वर्षे मुंबई मराठी साहित्य संघातर्फे अमराठी भाषकांना मराठी शिकवले आहे. त्यांच्या जोडीला सहलेखक आहेत जर्मन भाषा अध्यापनातील तीन तज्ज्ञ विदुषी- गिरिषा सावंत-टिळक, मानसी सामंत व कृत्तिका भोसले. या संचाच्या मुख्य संपादक आहेत डॉ. विभा सुराणा (जर्मन भाषा विभागाच्या प्रमुख) आणि संपादक मंडळात माधुरी पुरंदरे, प्र. ना. परांजपे, मेहेर भूत व सोनाली गुजर. हा संच ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. किंमत रु. १२५० (सवलतीने रु. १०००).
या प्रकल्पाला मराठी अभ्यास केंद्र (ठाणे) मराठी अभ्यास परिषद (पुणे) यांचा पाठिंबा आहे आणि प्रकल्पाचे समन्वयक म्हणून डॉ. दीपक पवार व डॉ. विभा सुराणा हे काम करत आहेत.
हे सर्व तपशील देण्याचे कारण असे, की या संचाच्या मागे किती तज्ज्ञ व्यक्तींचा विचार, सहकार्य व परिश्रम आहेत हे वाचकांच्या लक्षात यावे. यापूर्वी अन्य भाषकांसाठी मराठी अभ्यासक्रम व पुस्तके तयार करणाऱ्यांत साउथवर्थ- नरेश कवडी, मॅक्सीन बर्नसन- जाई निंबकर, काशी वाली- रमेश धोंगडे, कल्याण काळे-अंजली सोमण, विजया चिटणीस आणि नीती बडवे यांचा समावेश आहे. पण ते एकांडे शिलेदार त्यांचा परस्परांशी संपर्क-सहकार्य, सांघिक वा संस्थात्मक समावेशक संशोधन वा प्रयत्न नसावा. जर्मन विभागातील मराठी अध्यापन गटाचा प्रयत्न आहे तो सर्वाना, सर्व ठिकाणी वापरता येईल असा पद्धतशीर क्रमबद्ध अभ्यासक्रम, रोजच्या व्यवहारातील संभाषणे, म्हणी, गाणी, चित्रफिती यांचा समावेश असलेली सामग्री, भाषाकौशल्याचे वाढत्या व्यापाचे सहा टप्पे, त्यासाठी परीक्षा, शिक्षकांचे प्रशिक्षण, प्रमाणपत्रे या सर्वाचा विचार, समावेश व व्यवस्था हा गट करत आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की या गटाकडे, अन्य भाषकांना मराठी भाषेचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गटाकडे ‘व्हिजन’ आहे, समावेशक दीर्घ पल्ल्याची योजना व नि:स्वार्थ परिश्रम करण्याची तयारी आहे.
अर्थात, हे सर्व प्रत्यक्षात उतरण्यासाठी आर्थिक साहाय्याची नितांत निकड आहे. यापुढील पाच टप्प्यांपैकी प्रत्येक टप्प्यासाठी सुमारे एक कोटी याप्रमाणे एकूण पाच कोटी रुपयांची गरज आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या मंडळींना स्वल्प मानधन, कागद, मुद्रण, चित्रकार, मांडणीकार, छायाचित्रकार, बहुमाध्यमांतील सामग्री या सगळ्यांना सतत नि:स्वार्थ बुद्धीने काम करत राहा असे म्हणणे योग्य नाही. शासन, विद्यापीठ यांच्याकडे आटोकाट प्रयत्न करूनही त्यांनी अद्याप एक छदामही दिलेला नाही. या प्रकल्पाचे महत्त्व ओळखून त्याला आर्थिक साहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी आपले धनादेश पुढील नावे काढून, त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. त्यांना १०० टक्के आयकर सवलत मिळू शकेल.
‘फायनान्स अँड अकाउंट्स ऑफिसर, मुंबई विद्यापीठ’. धनादेश पाठविण्यासाठी पत्ता- प्रमुख, जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ, रानडे भवन, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०००९८, दूरभाष- ९८२०५९५८५०/ ९८२०४३७६६५.
एक पाऊल पुढे.. मराठीचे, मराठीसाठी!
मराठी भाषेच्या भवितव्याविषयी अनेक जण गळा काढतात. मराठीचे बहुतेक प्राध्यापकही 'आम्ही वाङ्मय शिकवतो; भाषा शिकवणे हे आमचे काम नाही' अशी दर्पोक्तीची भाषा करतात. या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा व वाङ्मय विभागात गेली दोन वर्षे मराठी भाषा अध्ययन- अध्यापनाच्या आधुनिकीकरणाचा, …
First published on: 10-08-2014 at 02:29 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One step ahead for marathi by maharashtrians