समाजाला तथाकथित बुवा-बापू आणि महाराजांची गरज का भासते? कशासाठी आपण त्यांच्यामागे मेंढरांसारखे धावतो? वर्षांनुवर्षे तुकाराम, रामदास यांसारखे साधुसंत आपणांस जो उपदेश करत आहेत, तो आपल्या विवेकबुद्धीपर्यंत का पोचत नाही? एखाद्या महाराजाच्या दुष्कृत्यांचा गौप्यस्फोट झाल्यानंतरही त्यांच्या अनुयायांच्या (अंध)श्रद्धेला चरे कसे पडत नाही? आपण एवढे का भयग्रस्त आहोत? आसाराम-प्रकरणाच्या निमित्ताने अशा काही यक्षप्रश्नांच्या उत्तराकडील हा विचारप्रवास..

जुने कपडे घेऊन त्याच्या बदल्यात भांडी देणाऱ्या बोहारणीचा आवाज येताच त्या घरातून एका महिलेने तिला बोलावून घेतले आणि जुन्या कपडय़ांचा ढीग समोर ठेवून सौदा सुरू झाला. त्या बोहारणीची मागणी वाढतच होती. अजून एखादी साडी द्या, असा तिचा आग्रह होता. अखेर आतल्या खोलीत बसलेल्या मुलीला हाक मारून त्या महिलेने कपाटातली साडी घेऊन यायला सांगितले..
..इथे एक कहाणी सुरू झाली!
एक जुनी साडी घेऊन ती मुलगी बाहेर आली आणि बोहारीण तिच्याकडे पाहतच राहिली. अगोदर खूप सराव करून कमावलेली सारी कणव तिच्या चेहऱ्यावर दाटली होती. डोळ्यात काळजीची छटाही उमटली होती.. काही क्षण तसेच, शांततेत गेले. ती मुलगी खाली मान घालून उभीच होती आणि तिची आई उगीचच सुन्न झाली होती. हाच क्षण पकडून बोहारीण चुकचुकली.
‘गोड पोरगी आहे, पण नशीब असं कसं गं हिचं?.. काही इलाज केला नाही का?’ मुलीच्या अंगभर उठलेल्या पांढऱ्या डागांकडे पाहत तिनं आईला विचारलं, आणि त्या आईचे डोळे पाझरू लागले.
‘सगळं केलं.. जो जे सांगेल तिथं, सगळीकडं नेऊन आणलं तिला.. पाण्यासारखा पैसाही ओतला, पण’.. आईला पुढं बोलवेना.
बोहारीण अजून चुकचुकतच होती.  ‘माझं ऐक.. अंधेरीला एक डॉक्टर आहे.. जालीम उपाय आहे. अशा कितीतरी लोकांना बरं केलंय त्यानं. त्याच्याकडे घेऊन जा मुलीला. झाला तर उपयोगच होईल. एवढं केलंयस ना, मग हेही करून बघ’..  मग जादा कपडे न मागताच बोहारणीनं एक नवं भांडं दिलं आणि समोरचे अगोदर ठेवलेले कपडे उचलून ती बाहेर पडली. जाताना डॉक्टरचा पत्ता, फोन नंबर द्यायला ती विसरली नव्हती.
दुसऱ्याच दिवशी, त्या मुलीला घेऊन वडील त्या दवाखान्यात दाखल झाले होते. तिथे अशाच पेशंटांची तुडुंब गर्दी होती. बराच वेळ लागणार होता. अखेर नंबर आल्यावर डॉक्टरानं मुलीला तपासलं, आणि काही पुडय़ा बांधून दिल्या. सोबत बिलाचा कागद होता. तेवढे पैसेही नव्हते. मग त्यानं कुठूनतरी पैसे आणून दिले आणि औषधाच्या पुडय़ा घेऊन ते घरी आले.
पुढे महिनाभरानं पुन्हा भरपूर पैसे घेऊन पुढचे औषध आणायला आणि तपासायला त्या मुलीला घेऊन वडील दवाखान्यात गेले.
तोवरच्या औषधानं काहीच फरक मात्र पडला नव्हता. तसं त्यांनी डॉक्टरला सांगूनही पाहिलं.
डॉक्टरनं काही न बोलता आणखी पुडय़ा बांधल्या, नवं बिल हातावर ठेवलं आणि महिनाभरात पुन्हा यायला सांगितलं. पैसे देऊन पुडय़ा घेऊन ते घरी परतले.
पुढच्या महिन्यातल्या पुडय़ा संपल्या तरी काहीच फरक दिसत नव्हता. आपण फसवले जातोय, हे या कुटुंबाला जाणवू लागलं होतं. हजारो रुपयेही तोवर खर्च झाले होते. आता डॉक्टरला जाब विचारायचा असं ठरवूनच ते पुन्हा दवाखान्यात गेले. तपासणी सुरू असतानाच, वडिलांनी हा विषय काढला.
‘काही फरक पडत नाहीये, पैसे मात्र खर्च होतायत. आता औषध नकोच, अगोदरचे पैसेही परत द्या’ असं आवाज चढवून सांगताच डॉक्टर चमकला.
शांतपणे मागे वळून खुर्चीत बसला आणि बाहेर पाहून त्यानं कुणाला तरी हाक मारली. दोन-चार आडदांड समोर उभे होते. दरवाजा बंद झाला आणि आत काय झालं, ते बाहेर कुणालाच कळलं नाही. मुलगी आणि तिचा बाप नंतर खाली मान घालून कण्हत संथपणे बाहेर पडला. पैसे विसरून..
अशा आणखी काही तक्रारी झाल्या, तेव्हा त्या डॉक्टरवर कारवाई झाली होती..
.. एका कुटुंबाच्या डोळस आंधळेपणाची ही कहाणी!
* * * * * *
रेल्वे स्टेशनचा जिना चढून फलाटावर जाण्याआधी तो रस्त्याकडेच्या झाडावर टांगलेल्या एका तसबिरीला न चुकता नमस्कार करतो.. गुरुवारी हार विकत घेऊन तसबिरीला घालतो, नमस्कार करून मगच रेल्वे स्टेशनात शिरतो..
गेल्या अनेक वर्षांत त्याचा हा क्रम कधीही चुकलेला नाही. मागे कधीतरी, घाईघाईने धावत्या रेल्वेत चढताना त्याचे पाऊल सटकले. अंदाज चुकला आणि वेग घेतलेल्या गाडीबरोबर काही फूट फरफटत गेला. डब्यातल्या लोकांनी त्याला पकडून आत घेतले, तेव्हा साक्षात मृत्यू समोर उभा राहिल्याच्या भीतीने तो घामाघूम झाला होता.
त्याच्या दुसऱ्या दिवशीच, स्टेशनमध्ये येताना त्या तसबिरीसमोर हात जोडलेला कुणीतरी त्याला दिसला. हा बघतच होता. तो माणूस नमस्कार करून वळला आणि समोर याला पाहून त्यानं हलकंसं स्मित केलं.
‘हा आपल्याला वाचवतो.. याच्यावर भरवसा ठेवा, काहीही होणार नाही’.. जिना चढताचढता तो माणूस याला म्हणाला आणि जणू कुणीतरी आपल्याला मार्ग दाखविला, असं याला वाटून गेलं.
त्या दिवशीपासून, स्टेशनात शिरण्यापूर्वी तो न चुकता या तसबिरीसमोर हात जोडून उभा राहतो..
आणि त्या दिवशीपासून, गाडीत चढताना कधीही त्याचा पाय सटकलेला नाही, असं तो विश्वासानं सांगतो.. ..एका व्यक्तीची ही एक दुसरी कहाणी.
* * * * * *
महाराजांच्या दर्शनसोहळ्यासाठी मठाच्या सभागृहात गर्दी जमलेली असते. सारेजण उत्सुकतेने आणि भाविकतेने महाराजांच्या मुखदर्शनासाठी आतुरतेने दरवाजाकडे डोळे लावून असतात. मधूनच डोळे मिटून, नामस्मरण करून हात जोडतात आणि पुन्हा त्यांच्या नजरा दरवाजावर खिळतात.
त्या गर्दीतलाच एक तो.. या वेळी येताना सोबत मुलालाही घेऊन आलेला असतो.
महाराजांच्या पायावर मुलाला घालायचं असतं. त्यांच्यामुळे मुलाच्या आयुष्याला दिशा मिळाली, असं त्याला वाटत असतं. नोकरीधंदा नसल्याने शिकलेला पोरगा हाताबाहेर जाणार अशा भयानं पछाडलेला असतानाच, कुणीतरी त्याला महाराजांकडे जायचा सल्ला देतो, आणि एका दर्शनसोहळ्याच्या दिवशी तो मुलाला घेऊन रांगेत उभा राहतो.
रांग पुढे सरकत असते. महाराजांसमोर गेलेला प्रत्येकजण अपार भक्तिभावाने नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडत असतो. आता महाराज आपल्या समस्या नक्की सोडवणार असा विश्वास त्याच्या डोळ्यात भरलेला असतो.
महाराज त्याच्या कानाशी काहीतरी पुटपुटतात, आणि जीवनाचा संघर्ष संपल्याचा आनंद त्याच्या डोळ्यात चमकू लागतो. पुढे याचा नंबर लागतो. आपली समस्या तो महाराजांसमोर मांडतो. मुलाला नोकरी नाही, तो फुकट जाणार, अशी भीती या वडिलांना वाटत असते.
महाराज मिनिटभर ध्यानस्थ होतात, आणि डोळे मिटूनच बोलू लागतात.. तुझ्या घराबाहेर रस्त्याकडेला मोकळी जागा आहे, तिथे मुलाला पानबिडीचं दुकान घालून दे.. तुझा मुलगा नोकरीत स्थिरावणार नाही, हट्टानं नोकरी करायला लावलंस, तर त्याचं आयुष्य भरकटेल..
महाराज पुन्हा ध्यानस्थ होतात. नमस्कार करून हा तेथून निघतो, आणि गावी परततो. घराबाहेर रस्त्यावर खरोखरीच एका कोपऱ्यात मोकळी जागा असते. घाईघाईनं सगळे सोपस्कार पूर्ण करून, कुणाकुणाचे हात ओले करून तिथे टपरी टाकायची परवानगी मिळवतो आणि एका मुहूर्तावर मुलाचं दुकान सुरू होतं. आता मुलगा स्थिरावलेला असतो. धंदा जोरात चाललेला असतो. म्हणून मुलाला महाराजांच्या पायावर घालायचं असतं.. हे सांगत असताना, त्याच्या डोळ्यातही महाराजांविषयीचा अपार भक्तिभाव ओसंडून वाहत असतो..
.. एका कुटुंबाची ही तिसरी कहाणी!
* * * * * *
मुंबईच्या रेल्वेत सकाळच्या वेळी खचाखच भरलेला डबा, दादरनंतर हळूहळू रिकामा होऊ लागतो. मुंबई सेंट्रल येताच एकजण उठतो, रॅकवर ठेवलेली बॅग उचलतो आणि घाईनं उतरून स्टेशनबाहेर जातो..
गाडीतला त्याच्या शेजारी बसलेला प्रवासी सहज वर पाहतो आणि चमकतो. बॅगची अदलाबदल झालेली असते. मग डब्यात तीच चर्चा सुरू होते. मागे राहिलेली त्या प्रवाशाची बॅग काढून उघडली जाते. त्यात एक वही, एक पोथी, जपमाळ असं काहीतरी सामान असतं. पत्ता, फोन नंबर काहीच नसतं. त्या माणसानं नेलेल्या याच्या बॅगमध्ये मात्र, फोनची डायरी, पैशाचं पाकीट, काही महत्त्वाची कागदपत्रं असतात. आता ते आपल्याला परत मिळणार नाही, या भावनेनं हा प्रवासी निराश झालेला असतो, तेवढय़ात शेजारचा कुणीतरी पुढे येतो.
तुमच्या बॅगेत तुमचा फोन नंबर आहे ना? तो विचारतो, आणि निराश प्रवासी मानेनंच हो म्हणून सांगतो. मग घाबरू नका. तुमची बॅग तुम्हाला नक्की परत मिळेल. तो दुसरा प्रवासी सांगतो, आणि सर्वाच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटतं. तुमच्या बॅगेतल्या पैसे, कागदपत्रापेक्षा, त्याला ही पोथी आणि माळ मागे राहिल्याचं दु:ख वाटत असेल. तो ती परत मिळवण्यासाठी तुमच्या नंबरवर फोन करणारच.. तो आत्मविश्वासानं सांगतो, तोवर चर्चगेट येतं. मागे राहिलेली बॅग घेऊन तो प्रवासी उतरतो, आणि चालू लागतो. दुसऱ्या दिवशी काय झालं, ते कळू शकत नाही..
ही आणखी एक कहाणी!
* * * * * *
हायवेवरच्या नाक्यावर पोलीस दबा धरून बसलेले असतात. त्यांनी अडवलं, तर खिशातून एक हिरवी नोट सरकवावीच लागते. पण नाक्याच्या अगोदर, झाडावर टांगलेल्या तसबिरीसमोरच्या पेटीत पाचपन्नास रुपये टाकले, तर पोलीस अडवतच नाहीत, हा चमत्कार रस्त्यावरून नियमित येजा करणाऱ्या ट्रकवाल्यांना पटलेला असतो. रात्री उशिरा पेटी काढली जाते, त्यातील पैसे वाटून घेतले जातात, आणि दिवसभराचा पहारा साजरा केला जातो.. झाडावरच्या देवाची ही कृपा त्या रस्त्यावरून जाणारे अनेकजण सांगतात. त्यामुळे त्यांची या देवावर नितांत श्रद्धा असते.. कारण, हा देव त्यांच्या खिशातले पैसे वाचवतो..
ही अशीच एक आगळी कहाणी..
* * * * * *
.. या प्रत्येक कहाणीला आंधळेपणाचाच स्पर्श असला, तरी त्यामागे अपरिहार्यता आणि अगतिकता, हतबलता आहे, हे स्पष्ट आहे. कुणाला असुरक्षितपणाच्या भावनेने पछाडलंय, कुणाला कौटुंबिक समस्यांनी ग्रासलंय, तर कुणाला आर्थिक विवंचनांचा विळखा पडला आहे. कुणाला मुलांच्या भवितव्याची चिंता आहे. आपल्या पश्चात मुलांचं कसं होणार, या चिंतेनं त्यांचं जगणं काळवंडून गेलंय, आणि ही चिंता दूर करण्यासाठी दिसेल तो आणि कुणाही सुचवेल त्या मार्गावर जायची त्यांची तयारी आहे. आपल्या मुलावरील संकट दूर करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची कुणाची तयारी असते. कारण, तेवढंच राहून गेलं आणि संकट तसंच राहिलं, ही जाणीव पुढचं आयुष्यभर मनाला पोखरत राहू नये असं त्यांना वाटत असतं..
मग ही माणसं, डोळस असूनही आंधळी बनतात.
कुणी महाराज गाठतात, कुणी बाबांच्या भजनी लागतात, तर कुणी असाध्य आजारावरील उपचारासाठी भोंदू वैदूच्या तिजोऱ्या भरतात. कारण एकच.. असुरक्षितता, काळजी आणि भविष्याची चिंता!
गेल्या आठवडय़ात, बापूच्या वसतिगृहात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला भूतबाधा झाल्याचा कांगावा करून उपचार करण्याच्या बहाण्याने बापूच्या टोळक्याने तिला बापूच्या हवाली केलं, आणि एक उमलतं आयुष्य नाहक चुरगळलं गेलं. आंधळ्या भक्तीपुढे या मुलीच्या आईवडिलांच्या मनाला संकटाची शंकादेखील शिवली नाही.. आपल्या मुलीला भूतबाधा झाली आहे, असं सांगितलं जातंय, म्हणजे ते खरंच असणार, असा त्यांचाही विश्वास असतो, आणि ही बाधा बापूच दूर करू शकतील अशी त्यांची श्रद्धाही असते.
बाबा, बापू, महाराज, बुवा आणि अगदी, बंगाली बाबांसारख्या अनेक भोंदूंचे धंदे फोफावण्यामागे समाजातील अंधश्रद्धा कारणीभूत आहेच, पण असुरक्षितता, अगतिकता आणि भविष्याची चिंता या गोष्टी त्याहूनही अधिक कारणीभूत आहेत. सभोवती अफाट गर्दी असतानादेखील, आपण असुरक्षितच आहोत, संकटाच्या वेळी ही गर्दी आपल्या मदतीला येईलच, याची खात्री राहत नाही, तेव्हा या भावना अधिक तीव्रपणे छळू लागतात, आणि आधाराचा शोध सुरू होतो.
याच अगतिकतेचा फायदा घेऊन कुणीतरी खोटय़ा आधाराचा हात पुढे करतो, आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत, सारे काही संपलेलेही असते. नोकरीतील अडचणी, आर्थिक विवंचना, गृहक्लेश अशा असंख्य समस्या समाजातील एका थराला अलीकडे सदैव ग्रासून राहिलेल्याच आहेत. यातून बाहेर पडण्याचा, सुखी जगण्याचा हक्क पदरात पडण्याची चिन्हे मात्र आसपास कुठेच सापडतदेखील नाहीत. अशा वेळी यातून बाहेर काढणारा मदतीचा हात आहे, अशा भावनेनं तेथे जाणारे अनेकजण अखेरीस फसतात, आणि निराशही होतात. पण आपण अशा जाळ्यात अडकलो आणि फसलो, ही मूर्खपणाची कथा सांगण्यातील कमीपणाची भावना त्यांना या फसव्या भोंदूगिरीचा प्रसार रोखण्यापासूनही अडवत राहते, आणि धंदे फोफावतच जातात. अशा जाळ्यात फसलेल्या साऱ्यांच्या कहाणीचे सार हेच आहे.
म्हणून, अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड असली तरी ती समूळ नष्ट करायची असेल, तर विवंचनामुक्त जगण्याची हमी मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अमलात आला तरी रेल्वेगाडीतील बाबा बंगालींच्या मूठकरनी, वशीकरण, गृहक्लेश आणि संकटांपासून मुक्ती देण्याची हमी देणाऱ्या भडक जाहिराती थांबलेल्या नाहीतच, उलट अधिकच फोफावल्या आहेत..
कारण, समस्यांनी गांजलेला, पिचलेला वर्ग या कायद्याच्या फटक्यानिशी कमी झालेला नाही, आणि त्याच्या मनातील हतबलतेची, असुरक्षिततेची भावनाही संपलेली नाही!

Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai Breaking News Updates in Marathi
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी पेपर स्प्रे का आणला होता? पोलीस म्हणाले…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
mahayuti
महायुती सरकारच्या कारभाराचा पंचनामा; महाविकास आघाडीकडून पुस्तिकेच प्रकाशन, ५० हजार कोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप
Ratan tata death: Young man Ratan Tata's photo kept in his home temple emotional video goes viral
देव चोरला माझा देव चोरला! रतन टाटांचा फोटो देव्हाऱ्यात ठेवून तरुण झाला नतमस्तक; VIDEO पाहून सर्वांचेच डोळे पाणावले
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
viral video of sun surprise father
VIRAL VIDEO : ‘बाबांच्या डोळ्यांतला आनंद…’ केक घेऊन दरवाजामागे उभा राहिला अन्… पाहा लेकानं बाबांना कसं दिलं सरप्राईज
Rahul Gandh
Rahul Gandhi : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार, संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती