अनिकेत साठे aniket.sathe@expressindia.com

पर्जन्यमान अधिक असणाऱ्या डोंगरराजीत घेतले जाणारे नागली हे एक महत्त्वाचे पीक. परंतु, या पिकासाठी घ्यावे लागणारे कष्ट, किडीचा प्रादुर्भाव, हाती कमी पडणारे उत्पादन यामुळे आदिवासी बांधव नागलीपासून दूर जात आहेत. परिणामी, कसदार भरडधान्य त्यांच्या आहारातून कमी होऊ लागले. ही बाब लक्षात घेऊन चार वर्षांपासून नागलीचे सुधारित सेंद्रिय पध्दतीने उत्पादन वाढविण्यासाठी राबविलेल्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. याच प्रयोगाविषयी..

अतिशय पौष्टिक असणारी नागली आदिवासी जीवनशेैलीचा प्रमुख भाग मानली जाते. परंतु, पिकवण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, किडीचा प्रादुर्भाव, हाती कमी पडणारे उत्पादन यामुळे आदिवासी बांधव नागलीच्या शेतीपासून दूर जात आहे. परिणामी, कसदार भरडधान्य त्यांच्या आहारातून कमी होऊ लागले. ही बाब लक्षात घेऊन चार वर्षांपासून नागलीचे सुधारित सेंद्रिय पध्दतीने उत्पादन वाढविण्यासाठी राबविलेल्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. नाशिकसह ठाणे, पालघर भागातील आदिवासी भागात हजारो शेतकऱ्यांनी या पध्दतीच्या नागली शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. इतकेच नव्हे तर, बचत गटातील महिला नागलीचे लाडू, बर्फी, केक असे पदार्थ निर्मितीत पारंगत होत आहेत.

दैनंदिन आहारात तृणधान्य महत्त्वाचा घटक असतो. गहू, ज्वारी, बाजरीच्या तुलनेत नागली आदिवासी भागात प्रमुख धान्य म्हणून वापरले जाते. कृषी विभागाचा अहवाल पाहिल्यावर इतर भरड धान्याच्या तुलनेत नागलीचे राज्यातील लागवड क्षेत्र आणि उत्पादन बरेच कमी असल्याचे लक्षात येते. गहू आणि भाताच्या तुलनेत नागलीची प्रति हेक्टरी उत्पादकता बरीच कमी आहे. त्यात पारंपरिक पध्दतीची नागली शेती अधिक कष्टप्रद ठरते. किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन पुरेसे मिळत नाही. यामुळे शेतकरी कसदार नागलीपासून दुरावत असल्याचे निदर्शनास आल्यावर नाशिक येथील ‘प्रगती अभियान’ने आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने राबविलेल्या आदिवासी नागली विकास कार्यक्रमाची फलश्रुती उत्पादन वाढीत झाली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा अलीकडेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात मेळावा झाला. वेगवेगळय़ा भागातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ‘प्रगती अभियान’ २०१८ पासून या विषयावर काम करीत आहे. चारसूत्री पध्दतीच्या लागवडीविषयी संस्थेने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. निंदणीसह (खुरपणी) अन्य कामांसाठी सामूहिक शेतीत अवजारे उपलब्ध केली. बचत गटातील महिलांना नागलीच्या विविध पाककृतीचे प्रशिक्षण दिले. पारंपरिक पध्दतीच्या शेतीत एकरी अडीच ते तीन क्विंटल उत्पादन मिळायचे. सुधारित लागवड पध्दतीने शेतकऱ्यांना सरासरी आठ क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे संस्थेच्या कार्यकारी संचालक अश्विनी कुलकर्णी सांगतात. या उपक्रमात तीन जिल्ह्यांतील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित पध्दतीची ओळख करून देण्यासह स्थानिक व्यवस्थापनावर आधारित सामूहिक बियाणे आणि शेती अवजार केंद्र स्थापन करण्यावर लक्ष दिले गेले. याच धर्तीवर प्रक्रिया केंद्राचाही विचार झाला. त्यामध्ये कापणी, मळणी यंत्र, पीठ गिरणी आदींचा अंतर्भाव आहे. नागलीचा आहारातील वापर वाढविण्यासाठी जनजागृतीकडेही लक्ष दिले गेले.

या उपक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे नियमितपणे स्नेहमेळावे होतात. माहितीचे आदानप्रदान केले जाते. त्यांचे अनुभव नागली लागवड पध्दतीतील बदलाचे महत्त्व दाखविणारे आहे. पेठ तालुक्यात मोतीराम भांगरे यांची शेती आहे. नागलीसाठी गादी वाफ्यात मूठभर बियाणे लागतात. पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाले तरी रोपवाटीका टिकून राहते. गादी वाफा बनवत असल्याने आता पारंपरिक राब केला जात नाही. त्यामुळे आमचे कष्ट कमी झालेच, शिवाय जंगलही वाचते, असा अनुभव ते मांडतात. महिला शेतकरी जयश्री अवतार यांनी सायकल विडर यंत्राचे महत्त्व अधोरेखित केले. आधी निंदणी करताना होणारा त्रास या यंत्राने कमी झाला. आता कमी वेळेत जास्त क्षेत्रात निंदणी करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचे त्या सांगतात. सुधारित पध्दतीचा अवलंब केल्याने आमच्या नागलीला जास्त फुटवे आणि जास्त गोंडे लागतात, असा अनुभव सुरगाण्याचे देवराम पढेर कथन करतात.

सुधारित पद्धत कशी?

नव्या पध्दतीत साधे बदल करण्यात आले. या बदलाने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली नाही. राब बंद केल्याने मजुरांची संख्या कमी झाली. पारंपरिक पध्दतीत दाटीवाटीने लागवड व्हायची. त्यामुळे फांदीला एक-दोन कणसे येत असे. नव्या पध्दतीत दोन ओळीत विरळ लागवड केली जाते. त्यामुळे १० ते १२ फांद्या फुटतात. प्रत्येक फांदीला तितकीच कणसे येतात.

गादी वाफ्यावर पेरणी

पावसाआधी जमिनीची खोल नांगरणी करून कुळवाच्या दोन-तीन पाळय़ा देऊन जमीन भुसभुशीत केली जाते. एक मीटर रुंद व तीन मीटर लांब आणि १५ सेंटीमीटर उंच गादी वाफा बनवला जातो. वाफा करताना दोन घमेले शेणखत किंवा गांडूळ खत आणि ५० ग्रॅम सुफला मिसळले जाते.

बिजामृत उपयोग आणि बीज प्रक्रिया

बिजामृत वापरल्याने करपा, तपकिरी ठिपके अन्य बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करता येतो. त्यासाठी बियाण्याला बिजामृत प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. पाच किलो गायीचे शेण कापडात बांधून २० लिटर पाणी असलेल्या बादलीत ठेवले जाते. जोडीला ५० ग्रॅम चुना आणि एक लिटर पाणी यांचे मिश्रण तयार केले जाते. दुसऱ्या दिवशी कापडातील शेणाचा अर्क बादलीत पिळून घेतला जातो. या पाण्यात थोडी माती मिसळली जाते. नंतर पाच लिटर गोमूत्र आणि चुन्याचे द्रावण बादलीतील द्रावणात मिसळले जाते. ५० मिलीलीटर द्रावण एक किलो बियाण्यांना लावून ते सावलीत वाळवून पेरणी केली जाते.

जिवामृत

२० लिटर पाण्यात एक किलो गुळ, अर्धा लिटर गोमूत्र एकत्र करून २०० ग्रॅम डाळीचा चुरा आणि थोडी वारूळ वा पिंपळाच्या झाडाखालची माती एकत्र केली जाते. ४८ तास सावलीत हे मिश्रण ठेवून अधूनमधून घुसळले जाते.

पुनर्लागवड

१५ दिवसांचे रोप २५ सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड केली जाते. दोन ओळीतील अंतरही २५ सेंटीमीटर राखले जाते. २० दिवसांचे रोप असल्यास दोन रोपात १० सेंटीमीटर अंतर आणि दोन ओळीत २० सेंटीमीटर. ३० दिवसांचे रोप असल्यास दोन रोपात आणि ओळीत प्रत्येकी १० सेंटीमीटर अंतर राखले जाते.

मटका खत, निम अर्क फवारणी

घरच्या घरी मटका खत तयार करता येते. एक किलो शेण, दोन लिटर गोमूत्र आणि ५० ग्रॅम गुळ, प्रत्येकी एक किलो निम, करंज आणि रुई पाने (कापून) एकत्रित करून सर्व मडक्यात ठेवले जाते. मडके बंद करून १० दिवस ठेवले जाते. अधूनमधून हे मिश्रण घुसळले जाते. एक लिटर द्रावण ४० लिटर पाणी या प्रमाणात त्याची फवारणी करता येते.

पीक कापणी प्रयोग

शास्त्रीय पध्दतीने पीक कापणी कशी करावी याचेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतात दिशा निश्चित करून दक्षिण-उत्तर कोपऱ्यात उभे राहून पीक कापणी प्रयोगाचे क्षेत्र निवडण्याची माहिती दिली गेली. विहित प्रक्रियेनुसार चौकट निश्चित झाल्यानंतर गोंडे कापून त्याचे वजन घेतले जाते. कडबा कापून त्याच्या वजनाची नोंद केली जाते. कोणत्याही हाताला लागणाऱ्या एका रोपाचे वैशिष्टय़ नोंदवून घेण्यास सांगितले जाते.

Story img Loader