शेती परवडत नाही असे अनेकदा म्हटले जाते, त्यामागे शेतीचे बिघडलेले आरोग्य आणि ते सुधारण्यासाठी लागणारी रासायनिक खते, औषधांवरील मोठा खर्च जास्त कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीकडे वळत आहेत. जळगाव जिल्ह्यातील करंज गावी केळी उत्पादनातील सेंद्रिय पद्धतीच्या यशस्वी प्रयोगाविषयी…
रासायनिक खतांचा भरमसाठ वापर वाढल्याने आज सर्वदूर जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. सुपिक शेतीची नापिकीकडे वाटचाल सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी करून फक्त सेंद्रिय खतांच्या जोरावर केळीचे भरघोस उत्पादन घेण्याची किमया जळगाव जिल्ह्यातील करंज गावचे प्रयोगशील शेतकरी मोहनचंद नारायण सोनवणे यांनी केली आहे.
साधारण १९९८ मध्ये मोहनचंद सोनवणे हे शेतीसोबतच राजकारणातही सक्रिय होते. आणि त्यावेळी ते जळगाव तालुक्यातील करंज गावाचे सरपंच देखील होते. मात्र, राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांचे शेतीकडे दुर्लक्ष झाले. केळीसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने खर्चाचे गणित बिघडले. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला. सुदैवाने त्यांचे वडील त्याकाळी नोकरीला होते. मात्र, ते निवृत होण्याच्या मार्गावर असल्याने मुलास शेतीसाठी पैसे पुरवू शकत नव्हते. कोणी मित्र किंवा नातेवाईक देखील मदत करायला तयार नव्हते. सर्व बाजूंनी खचलेले मोहनचंद सोनवणे यांनी शेवटी गावातील राजकारणापासून स्वत:ला अलिप्त केले. त्या दिवसापासून शेतीवर लक्ष केंद्रित करून उत्पादन वाढीवर भर दिला.
सेंद्रिय शेतीला मिळाली दिशा
जमिनीचा कस कमी झाल्याच्या स्थितीत भरमसाट रासायनिक खतांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नसताना, हाती आलेल्या उत्पादनातून कमाईचा ताळमेळ बसत नव्हता. शेतीसाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी सोनवणे यांनी त्यामुळे सेंद्रिय शेतीची कास धरण्याचा निर्धार केला. अभ्यासासाठी या विषयातील तज्ज्ञांची पुस्तके वाचली. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करण्याचा मुख्य उद्देश त्यांचा होता. अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी नंतरच्या काळात पीक काढणीनंतर शिल्लक राहणारा काडी कचरा, पालापाचोळा शेतातच कुजविण्यावर भर दिला. याशिवाय घरच्या गोठ्यातील जनावरांचे शेणखत नियमितपणे शेतात टाकले. धैंचासारखी हिरवळीची पिके घेतली. परिणामी, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला व हळूहळू मातीचा पोत सुधारत गेला. भुसभुशीत झालेल्या जमिनीत पेरलेले प्रत्येक पीक जोमदार बहरू लागले. त्यामुळे सोनवणे यांना रासायनिक खतांची मात्रा जवळपास निम्म्याने कमी करणे शक्य झाले. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढविल्याने केळीच्या उत्पादनात घट न येता उलट आणखी वाढ झाल्याचा अनुभव त्यांना आला. पुढे जाऊन खोड पद्धतीने केळी लागवड न करता त्यांनी ऊती संवर्धित केळी रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली. उत्पादन खर्च कमी होऊन शेतीपासून मिळणाऱ्या नफ्यात आपोआपच वाढ झाली.
केळीच्या घडांचे दर्जेदार उत्पादन
सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीवर भर देत असतानाच, घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यात गाई व म्हशींचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांना दुग्ध उत्पादनासोबत शेणखत व गोमूत्र मुबलक प्रमाणात मिळू लागले. त्याचा वापर करून तयार केलेल्या जीवामृताचा त्यांनी शेतीत प्रयोग करण्यास सुरुवात केली. तसे केल्याने शेतात गांडुळांची संख्या तर वाढलीच शिवाय रासायनिक खतांमुळे मृतावस्थेत गेलेली शेती पुन्हा जिवंत झाली. जमिनीचा टणकपणा कमी झाल्याने कमी अश्वश्क्तीच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत होऊ लागली. इंधनाचा खर्च कमी झाला. रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करूनही पूर्वी जेमतेम १० ते १२ किलो वजनाचे केळीचे घड मिळायचे, तिथे आता सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्यानंतर २० ते २२ किलोपर्यंत वजनाचे दर्जेदार केळी घड मिळू लागले आहेत.
सेंद्रिय शेतीमुळे प्रगती
सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्यानंतर शेतीचा उत्पादन खर्च कमी झाला. शाश्वत कमाई शेतीतून होऊ लागल्यानंतर सोनवणे यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार देखील कमी झाला. हातात चार पैसे शिल्लक राहू लागल्यानंतर त्यांनी मुलगा व मुलगी यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून बाहेर गावी पाठविले. कृषी विभागाने सोनवणे यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन गावातील इतरही बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.