विजय चौधरी
पारंपरिक पिकांना फाटा देत शिंदखेडा तालुक्यातील युवा शेतकऱ्याने पाच एकर क्षेत्रात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कलिंगडाची लागवड केली. अवघ्या ७५ दिवसांत तब्बल १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. पाच एकर क्षेत्रात लागवडीवर त्याने दोन लाख खर्चातून १३० टन कलिंगडांचे उत्पादन घेतले. धुळय़ाऐवजी दिल्ली, गुजरात आणि इंदोरच्या बाजारपेठांमध्ये त्यांची विक्री करीत चांगला नफा कमविला. कलिंगडची शेती फायदेशीर ठरू शकते हे त्याने सिद्ध केले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील सागर पवार याची ही यशोगाथा. पवार यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेतले आहे. शेतात विविध प्रयोग करण्याची त्याला मनापासून आवड होती. रासायनिक खतांचा वापर न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेंद्रिय शेतीत विविध प्रयोग करण्याची त्याची मनापासून इच्छा होती. त्याच्याकडील वडिलोपार्जित शेतीत पाण्याची चांगली उपलब्धता आहे. याच शेतात कापूस, भाजीपाला, कांदा अशी पिके घेतली जात होती. मात्र नफा आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने सागरने पर्यायी पिकांचा विचार केला. गेल्या फेब्रुवारीत त्याने आपल्या शेतात कलिंगडाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
पाच एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक सिंचन केले. त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप, याप्रमाणे ५५ हजार रोपांची लागवड केली. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कलिंगडाला खतांची मात्रा देण्यात आली. कलिंगडांची वाढ होत असताना पाणी देण्याचे योग्य नियोजनही केले. याचाच परिणाम म्हणून केवळ ७५ दिवसांतच १३० टन कलिंगड बाजारात विक्रीसाठी दाखल झाले. योग्य नियोजनामुळे कलिंगडचे विक्रमी उत्पादन झाले. अवघ्या दोन लाख रुपये खर्चातून सागरला तब्बल १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. स्थानिक बाजारात कलिंगडला कमी भाव मिळतो. रमजानच्या महिन्यात कलिंगडासह अन्य फळांना चांगली मागणी असते. भाव वधारलेले असतात. दर्जेदार कलिंगडा अन्य राज्यात विकल्यास चांगले दर मिळतील हे लक्षात घेऊन सागरने दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. दिल्ली, गुजरात, इंदोरच्या बाजारपेठेत कलिंगडा विक्रीसाठी पाठवले. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. एरवी शेतकरी शेतात काबाडकष्ट करून पीक घेतो. स्थानिक बाजारात आहे त्या भावात त्याची विक्री करतो. त्यातून अनेकदा उत्पादन खर्च देखील भरून निघत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. त्यामुळे विपणनाचे तंत्रही महत्त्वाचे ठरते. त्यातून चांगले दरही प्राप्त करता येतात हे सागरने दाखविले आहे.
असे घेतले उत्पादन..
फेब्रुवारी महिन्यात सात फूट अंतरावर यांत्रिक पद्धतीने कलिंगडाची लागवड केली. पिकांच्या उष्णतेसाठी तीन ते चार टन कोंबडी खत वापरण्यात आले. त्यासोबतच मायक्रोन मल्चिंग पेपरचा वापर करत प्रति एकरी सुमारे आठ हजार रोपांची लागवड केली. हा पेपर वापरल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत झाली. वेलवर्गीय पिकांवर तुडतुडे, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. तो रोखण्यासाठी त्याने चिकट फळमाशी, लिमडा, नीम ऑईल याचा वापर केला. सागरने पिकवलेल्या कलिंगडाला दिल्ली, मुंबईसह गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी आली.
नियोजन कसे?
नागमोडी पद्धतीने कलिंगडची लागवड करण्यात आली होती. खतांची मात्रा देताना आठ दिवस, पंधरा दिवस, पंचवीस दिवस असे टप्पे करण्यात आले होते. आठ दिवसांनी तीन किलोची मात्रा, पंधरा दिवसांनी पाच किलोची मात्रा, पुन्हा २५ दिवसांनी तीन किलोची मात्रा देण्यात आली होती. रोपांची वाढ होत असतांना त्या रोपांची मागणी जाणून घेत खतांची मात्रा देण्यात आली. शिवाय प्रत्येक टप्प्याला वेगवेगळय़ा प्रकारची सेंद्रिय खतांची मात्रा देण्यात आली.
शेतात कलिंगडा लागवड करण्याआधी आसपासच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून अभ्यास केला. त्यातील समस्यांवर उपाय शोधला. आधुनिक शेती साधनांचा उपयोग केला. खतांची योग्य मात्रा दिली. पिकांची वाढ होताना पाणी देण्याचे योग्य नियोजन केले. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केल्यास यश नक्की मिळते.
– सागर पवार, पाटण, शिंदखेडा, धुळे.