सीरियात अलीकडेच जो रासायनिक हल्ला झाला त्यात काही लहान मुलांसह किमान ८२ लोक मारले गेले. या हल्ल्याची दृश्ये पाहता कुणाचेही मन द्रवल्याशिवाय राहत नाही. रासायनिक हल्ल्यात मरण पावलेली दोन गोड जुळी मुले हातात धरलेल्या माणसाचे छायाचित्र मानवतेला रासायनिक अस्त्रे हा किती मोठा शाप आहे याचीच साक्ष देते. पण रासायनिक हल्ले या देशाला नवीन नाहीत किंबहुना तेथे रासायनिक अस्त्रांचा साठा आहे हे उघड गुपित आहे. पण गेल्या सप्टेंबरमध्ये ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स या संस्थेने सप्टेंबरमध्ये सीरियाकडून रासायनिक शस्त्रे बाळगल्याची अधिकृत कबुली घेतली आहे.
२०१३ मधील रासायनिक हल्ला
सीरियाकडे रासायनिक अस्त्रांचे मोठे भांडार आहे. त्यात सल्फर मस्टर्ड, नव्र्ह गॅस सरीन व व्हीएक्स यांचा समावेश आहे. आताचा रासायनिक हल्ला हा सीरियातील पहिला हल्ला नव्हे, यापूर्वी २१ ऑगस्ट २०१३ मध्ये दमास्कस येथे झालेला हल्ला असाच जगाच्या नजरेतून सुटला नव्हता एवढी त्याची भयानकता होती.
सीरियाचा रासायनिक अस्त्र कार्यक्रम
२००२ पासून सीरियाचा रासायनिक अस्त्र कार्यक्रम सुरू झाला असे अमेरिकेचे म्हणणे आहे. १९७२-७३ पासून सीरियाने रासायनिक अस्त्रे जमवायला सुरुवात केली. अरब-इस्रायल युद्ध १९७३ मध्ये झाले. त्यापूर्वी इजिप्तने यातील काही शस्त्रे सीरियाला दिली होती. नंतर रशियाने त्यांना रासायनिक अस्त्रे जमवण्यास मदत केली.
प्रथम जर्मनीकडून वापर
रासायनिक अस्त्रे प्रथम पहिल्या महायुद्धात जर्मनीने वापरली. १९१९ मध्ये रशियातील यादवीत ब्रिटिश दलांनीही मस्टर्ड गॅसचा वापर केला. सोविएत फौजांनी चीनमध्ये १९३०च्या सुमारास या अस्त्रांचा वापर केला. स्पॅनिश व इटालियन सैन्याने उत्तर आफ्रिकेत ही अस्त्रे वापरली. सरीनचा शोध जर्मन वैज्ञानिकांनी दुसऱ्या महायुद्धात लावला होता. इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी नव्र्ह एजंट असलेल्या सरीन व मस्टर्ड गॅसचा वापर कुर्दावर केला होता, त्यात हजारो लोक मारले गेले होते. जपानी बंडखोर पंथ ओम शिनरीक्योने १९९५ मध्ये टोकियोच्या सबवेत सरीनचा वापर केला होता. सीरियाचा रासायनिक अस्त्र साठा हा जगात सर्वात मोठा आहे, असे इस्रायली संरक्षण दलांचे अधिकारी मेजर जनरल येर नेव्ह यांनी २०१२ मध्ये सांगितले होते. फ्रान्सच्या गुप्तचरांच्या मते सीरियाकडे १००० टन रासायनिक अस्त्रे आहेत.
रासायनिक अस्त्रांचे प्रकार
- सल्फर मस्टर्ड – सीरियाकडे सल्फर मस्टर्डचे मोठे साठे आहेत. तो कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो, त्याचा वास लसूण, कांदा किंवा मोहरी यासारखा असतो कधी त्याला वासही येत नाही. त्याचा रंग पिवळा किंवा तपकिरी असतो. त्वचा, डोळे व नाक यांच्या संपर्कात आल्यास त्याचा वाईट परिणाम होतो. द्रव, वायू किंवा घन स्वरूपातही त्याचा मारा करता येतो. त्यामुळे त्वचा जळते व नाकातील पारपटले खराब होतात. सल्फर मस्टर्ड फार घातक मानला जात नसला तरी त्याचा शरीरावर परिणाम झाल्यानंतर उतारा काही नाही. तो शरीरातून काढणे हाच उपाय असतो. १९९३ मध्ये सीरियाने त्याचा वापर सुरू केला.
- सरीन – हे मेंदूसाठी विषारी असलेले ऑग्र्यानो फॉस्फरस संयुग असून फार विषारी व प्राणघातक असते. सायनाईडपेक्षा ते वीसपट विषारी असते, यावरून त्याची कल्पना यावी. ते रसायन शोधता येत नाही कारण त्याला रंग, वास, चव काही नसते, शुद्ध रूपात ते द्रव असते पण हवेत ते बाष्पीभवनातून पसरू शकते. सरीनमधील अॅसेटिलकोलिनेस्टेरेज हे विकर मेंदूतील न्यूरॉन म्हणजे चेतापेशींना मारक ठरते व न्यूरॉन कार्यक्षम राहत नाहीत. त्यामुळे हृदय व इतर स्नायूंवर वाईट परिणाम होतो, श्वास घेणे कठीण जाते. काही मिनिटातच गुदमरून मृत्यू होतो. त्याचा वापर सीरिया स्वयंचलित पद्धतीने करीत आहे. २१ ऑगस्टच्या एका हल्ल्यात या रासायनिक शस्त्राने शेकडो बळी घेतले होते.
- व्हीएक्स – हे दुसरे ऑग्र्यानो फॉस्फरस संयुग असून ते सरीनपेक्षा दहा पट विषारी असते, ते रासायनिक युद्धात वापरतात. तेलकट असा द्रव असलेल्या व्हीएक्सचा रंग अंबर म्हणजे तपकिरी पिवळसर असतो. हवेत पसरल्यानंतर तो डोळे, त्वचा यांना हानी करतो, त्याला वास व चव नसते. व्हीएक्सची वाफ किंवा द्रव यांच्या काही मिनिटे संपर्कात आले तरी चेतासंस्थेला फटका बसतो. मोटर ऑइलप्रमाणे त्याचे हळूहळू वाफेत रूपांतर होते व साधारण हवामानात तो सरीनपेक्षा बराच काळ टिकून राहतो.
संकलन : राजेंद्र येवलेकर