श्रीदेवीच्या आधी आणि नंतर खूप नायिका आल्या अन् गेल्या. अभिनयाचा किंचितही वारसा नसताना या कलावतीने प्रचंड ऊर्जेद्वारे एकाच वेळी तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी आदी चित्रसृष्टींत अविश्रांत अव्वल दर्जाचे काम करून सुपरस्टारपद पटकावले. या अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा कालदर्शक आढावा..
नायकप्रधान हिंदूी चित्रभूमीत अभिनेत्रींना स्वर्गीय सौंदर्याच्या वर्खातील विशेषणांमध्ये बुडवून दुय्यमस्थानी ठेवण्याचा शिरस्ता अंगळवणी पडलेल्या स्वप्ननगरीतील यंत्रणांना ऐंशीच्या दशकात दक्षिणेतून आलेल्या श्रीदेवी नावाच्या जाड भुवयी वादळाला ‘सुपरस्टार’ पदाचा किताब द्यावा लागला. तत्पूर्वीच्या बोलपटोत्तर काळातील पाच दशके डझनांनी नायिका आल्या अन् कोण्या एकेका नायकाच्या कारकीर्दीला परमोच्चस्थानी घेऊन जाण्याची भूमिका बजावून गेल्या. सौंदर्याची मूर्ती मधुबाला, काळजाचा तुकडा खलास करणारी वहिदा, खानदानी रूपवती नूतन, मोदसंपन्न नर्गीस या सर्वच तारकांना लाभलेले औटघटकेचे नायिकत्व आणि श्रीदेवीच्या नावावर पहिल्यांदा सिनेसृष्टीसह उभरत्या भारतीय माध्यमसंस्कृतीने शिक्कामोर्तब केलेले ‘सुपरस्टार’त्व यातच या दक्षिणेतून मनोरंजन विश्वाच्या केंद्रभागी आलेल्या या सिनेराणीचे वेगळेपण दडले आहे.
लहानपणीच मोठा पडदा व्यापणाऱ्या फारच थोडय़ा कलाकारांना मोठेपणी प्रेक्षकांकडून स्वीकारले जाण्याचा वैश्विक सिनेइतिहास आहे. वयाच्या चार वर्षांच्या काळापासूनच तमिळ, तेलुगू सिनेमांमध्ये झळकून कॅमेराला भय वाटेल इतका हरहुन्नरी भावपूर्ण अभिनय सशक्तपणे पेलणारी ही अभिनेत्री कमल हासन आणि रजनीकांत यांची कारकीर्द दक्षिणेत साकारली जात असताना समांतररीत्या घडत होती. तेराव्या-चौदाव्या वर्षांतील कोवळ्या वयात या अभिनेत्यांसोबत मॉलीवूड गाजवत असताना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दक्षिणी कलाकारांचा शिरकाव व्हायला सुरुवात झाली होती. गाजलेल्या मल्याळी सिनेमाच्या तितक्याच लोकप्रिय झालेल्या ‘ज्युली’ या हिंदी आवृत्तीत नायिकेच्या लहान बहिणीच्या रूपात झळकलेली ही नवयौवना पंधरा वर्षांत बॉलीवूड पादाक्रांत करेल, असे भाकीत कुणीही केले नसते. भारतीय चित्रपटसृष्टी त्या वेळी दोन तगडय़ा प्रवाहांशी लढत होती. सामाजिक संघर्षांत्मक वातावरणाचे पडसाद मुख्य धारेत अँग्री यंग मॅनच्या उदयास पोषक ठरणारे होते. तर दुसरीकडे समांतर सिनेमा वास्तववादाचा डोंगर खणून काढण्यात जुंपला होता. त्यामुळे परवीन बाबी, रेखा, हेमा मालिनी, नितू सिंग, डिंपल, झिनत अमान, रिना रॉय, जयाप्रदा, अनिता राज चकचकीत पडद्यावर लखलखीत गाण्यांसह नायकाशी प्रीतमहोत्सव साजरा करीत होत्या आणि स्मिता पाटील, दीप्ती नवल, शबाना आझमी या सर्वसाधारण भारतीय स्त्रीचा चेहरा घेऊन प्रेक्षकांपुढे आरसा धरत होत्या. या काळामध्ये दक्षिणेतील उग्रांकित वेश-केशभूषेसह १९७९ साली हिंदी बोलताही न येणारी ही गोलाकार चेहऱ्याची ललना हिंदी चित्रपटात नायिका बनली. आधुनिक संदर्भकोशांची पाने चाळताना या नायिकेने या काळात दक्षिणेत भूमिका साकारलेल्या चित्रपटांची संख्या मोजतानाही घेरी येऊ शकेल. वार्षिक डझन-दीड डझनांहून अधिक ब्लॉकबस्टर दिल्यानंतर ही अभिनेत्री बालू महेंद्रा यांच्या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकली. कमल हासन आणि तिच्या अभिनयाच्या जुगलबंदीने भारतीय प्रेक्षकांना अंतर्बाह्य़ हलवून सोडले. १९७७ ते ८३ या काळात कमल हासनसोबत तिने अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. ‘मिस्टर अॅण्ड मिसेस मालिनी अय्यर’ हा त्यातलाच एक. पण ‘सदमा’ हे या दोघांच्या अभिनयाचे यशोशिखर होते. ‘हिम्मतवाला’मध्ये हंटर घेऊन अरेरावी करणारी श्रीमंत बापाची औलाद सर्वगुणसंपन्न नायकाच्या परीसस्पर्शाने ‘सजना पे दिल आ गयाँ’ हे स्वप्नगीत म्हणताना लोकांनी स्वीकारली आणि श्रीदेवी पर्वाचा उदय झाला. नाझ या अभिनेत्रीचा हिंदी आवाज डबिंगसाठी वापरून तिने आपले सुरुवातीचे सारे हिट चित्रपट दिले. ‘इन्कलाब’, ‘मकसद’, ‘मवाली’, ‘तोहफा’ यांच्यासोबत डझन-दोन डझनांहून अधिक हिंदी चित्रपट तिने या काळात दिले. त्या वर्षांत ग्लॉसी मासिकांच्या, वृत्तपत्रीय पुरवण्यांच्या, सिनेसाप्ताहिकांच्या अग्रभागी झळकलेली ही नायिका सर्वाधिक मानधन घेणारी बॉलीवूड नायिका बनली. दक्षिणेतूनच हिंदीत शिरलेली जयाप्रदा आणि श्रीदेवी यांचे स्टारपदासाठी अभिनययुद्ध रंगविले गेले. जयाप्रदा त्यात मागे पडली, श्रीदेवी ‘चांदनी’ बनून हिंदी चित्रपटक्षेत्रावर व्यापून गेली. बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’साठी या अभिनेत्रीची खास निवड केली आणि नंतर पडद्यावर वीज तडकवणारी ही ‘हवाहवाई’ नायिका ‘चालबाज’, ‘लम्हे’सारख्या चित्रपटांतून आपले अभिनयाचे पहिले पर्व समरसून जगली. होम व्हिडीओची (व्हीसीआर-व्हीसीपी) लाट आलेल्या काळात फराह, पद्मिनी कोल्हापुरे, नीलम, मंदाकिनी आदी केवळ नयनसुखदनायिकांमुळे बॉलीवूडमध्ये तयार झालेली नायिकापोकळी माधुरी दीक्षित, जुही चावला या झंझावातांनी भरून काढली. तोवर श्रीदेवी हिने चित्रसृष्टीपासून बाजूला राहणे पसंत केले. हॉलीवूडमधील जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ‘ज्युरासिक पार्क’मधली भूमिका (प्रमुख नायिका नाही म्हणून) नाकारण्याचे धाडस तिने दाखविले होते. बॉलीवूड गाजवत असताना शेकडो ब्रिटन-अमेरिकास्थित उद्योगपतींचे विवाहप्रस्ताव नाकारले आणि मिथुन चक्रवर्ती याच्यासोबत गुप्तरीत्या लग्नगाठ बांधली. हा विवाह फार काळ टिकला नसला, तरी त्यातील अपयश तिच्या कारकीर्दीवर कोणताही ओरखडा न पाडणारे ठरले.
श्रीदेवीच्या सुरुवातीच्या बहुतांश भूमिका या भारतीय आदर्शवादी प्रेयसी-पत्नीच्या रूपातील आहेत. नृत्यनिपुण, नटखट हावभाव आणि हळवेपणाने ओतप्रोत भरलेल्या या भूमिका बदलत्या काळासोबत बदललेल्या दिसतात. म्हणजे भारतीय मनोरंजन क्षेत्रामध्ये ‘मॉड’पणाला महत्त्व आले, त्या काळात श्रीदेवी आत्यंतिक सहजपणे बदललेली दिसली. ‘मिस्टर इंडिया’, ‘चालबाज’, ‘चांदनी’ ही त्याची साक्ष आहेत. ‘चांदनी’ या चित्रपटानंतर तिने स्वत:चा आवाज चित्रपटात वापरायला सुरुवात केली. उदारीकरणाच्या काळात प्रेक्षकांच्या सौंदर्यकल्पना वृद्धिंगत होण्याच्या काळात श्रीदेवीचे थोडेच हिंदी चित्रपट आले. ‘हिर रांझा’, ‘लैला मजनू’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘गुरुदेव’, ‘चंद्रमुखी’, ‘लाडला’ या चित्रपटांना तिचे सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळख नाही. तरीही त्यातल्या तिच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या आहेत. नव्वदीच्या अखेरच्या टप्प्यात माधुरी दीक्षित-जुही चावला-मनीषा कोईराला अग्रस्थानी जाऊ पाहत असतानाच मधू, रंभा, रमय्या, नगमा या दक्षिणी नायिकांनी बॉलीवूडमध्ये हैदोस घातला होता, पण कुणालाही श्रीदेवीसारखा पहिला क्रमांक पटकावता आला नाही.
सुरुवातीच्या काळात अतिउग्र दक्षिणी भासणाऱ्या या नायिकेला दर्शकांनी जितेंद्रसोबतच्या डझनभर नृत्यविभोर चित्रपटांमधून पसंती दिली. मग तिची ‘हवाहवाई’, ‘किसी के हात ना आयेगी ये लडकी’, ‘चांदनी’ या गाण्यांनी भारतीय सार्वजनिक उत्सवांना नृत्यऊर्जा पोहोचवली. ‘नगिना’मधील भूमिकेसाठी निर्मात्यांची ती पसंती नव्हती. दुसऱ्या अभिनेत्रीने नाकारलेली भूमिका तिच्या ताब्यात आली आणि तिचे तिने सोने केले. जवळजवळ दीड वर्षांहून अधिक काळ पडद्यावरची श्रीदेवीने रंगविलेली इच्छाधारी नागीण बॉक्स ऑफिस आणि देशातील घराघरांत धुमाकूळ घालत होती. ‘खुदा गवाह’ हा तिचा ‘रूप की रानी चोरोंका राजा’इतकाच लक्षणीय बृहद् सिनेमा ठरला.
तो काळ भारतीय मनांत स्त्रीवादी चळवळीचा जागतिक परिणाम झिरपवणारा तसेच स्त्रीविषयक मनोरंजन मासिकांच्या बहराचा होता. याच युगात स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांत हिकमतीने पुरुषाशी बरोबरी करण्याचा आरंभ झाला होता. परिणामी, रेखाइतक्याच ताकदीच्या भासणाऱ्या या कलावतीला सहजरीत्या सुपरस्टारपद मिळाले. भारतीय मध्यमवर्गाच्या पोतडीत या नायिकेच्या दंतकथांचाच भरणा अधिक होता. त्यात चित्रीकरणाच्या भागात तिला घरून विमानाने जेवणाचा डबा येई, इथपासून तिच्या खासगी आयुष्यावर गुळगुळीत मासिकांनी ओतलेला रतीब यांचा समावेश होता.
पंधरा वर्षांच्या कालावधीत हिंदी सिनेमाच्या आणि त्याच्या प्रेक्षकांच्या मनोरंजन संकल्पनांमध्ये सुनामीकारक बदल झालेले असताना प्रदीर्घ थांब्यानंतर तिने दणक्यात पुनरागमन केले. दख्खनची ही राणी नव्या कारकीर्दीच्या आरंभकाळातच कायमच्या विश्रांतीसाठी गेली. तीनशेहून अधिक चित्रपटांची बेगमी, कोटय़वधी चाहत्यांचे प्रेम आणि कचकडय़ाच्या या मायाजालामध्ये सुपरस्टारपदाच्या किताबाची मानकरी ठरलेली श्रीदेवी भारतीय मनोरंजनसृष्टीमधून पुढल्या शतकभरापर्यंत तरी अविस्मृत राहील, यात शंका नाही.
समाजमाध्यमांवर विचित्र योगायोगाची चर्चा
श्रीदेवी यांचे पती निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या बाबतीत घडलेल्या विचित्र योगायोगाची चर्चाही रविवारी समाजमाध्यमांवर रंगली होती. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी हिचा ‘धडक’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. असाच विचित्र योगायोग बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना यांच्या बाबतीतही घडला होता. मोना, बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरचा पहिला चित्रपट ‘इशकजादे’ प्रदर्शित होण्याआधी दोन महिन्यांपूर्वी मोना यांचे निधन झाले होते. आणि आता जान्हवीच्या बाबतीतही तसेच घडले. मुलीच्या पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी उत्सुक होत्या.
‘चला हवा येऊ द्या’मधील उपस्थिती
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी श्रीदेवी यांनी हजेरी लावली होती. ‘मॉम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक मराठी नऊवारी साडी परिधान केलेल्या श्रीदेवी यांच्या वेशभूषेची चर्चा त्या वेळी समाज माध्यमांवर झाली. श्रीदेवी यांनी या कार्यक्रमात ‘आता वाजले की बारा’ या लोकप्रिय गाण्यावरही ताल धरला होता. एका मुलीच्या आईप्रति असणाऱ्या भावना या कार्यक्रमात पोस्टमन काकांनी पत्राद्वारे वाचून दाखविल्यानंतर श्रीदेवी गहिवरल्या होत्या.
श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेली काही गाणीही गाजली. लता मंगेशकर, अलका याज्ञिक, आशा भोसले, कविता कृष्णमूर्ती आणि अन्य पाश्र्वगायिकांचा आवाज श्रीदेवी यांना मिळाला होता.
* नवराई माझी- इंग्लिश विंग्लिश
* ना जाने कहाँसे आए ये लडकी- चालबाज
* मोरनी बागा में- लम्हे
* लगी आज सावन की फिर वो झडी है- चाँदनी
* नैनो में सपना- हिंमतवाला
* मेरे हाथों मे नौ नौ चुडिया है- चाँदनी
* मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा- नगिना
* काटे नही कटते दिन ये रात- मि. इंडिया
* हवा हवाई- मि. इंडिया
* चुडीया खनक गयी- लम्हे
* ना ना करते- राम अवतार
* तू मुझे सुना- चाँदनी
* लगे मुझे सुंदर हर- मि. बेचारा
* आज राधा को श्याम- चाँद का टुकडा
* लडकी अकेली तू भी अकेला- वक्त की आवाज
* चल कही दूर- मॉम
* मितवा- चाँदनी
* ए जिंदगी गले लगा ले- सदमा
* तू मुझे कुबुल- खुदा गवाह
* मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू – कर्मा
वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिक आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांनी सुमारे शंभरहून अधिक चित्रपटात काम केले. त्यांचे काही चित्रपट..
* ज्युली
* सोलवा सावन
* सदमा
* हिम्मतवाला
* जाग उठा इन्सान
* अकलमंद
* इन्कलाब
* तोहफा
* सरफरोश
* बलिदान
* नया कदम
* नगीना
* घर संसार
* मक्सद
* सुलतान
* आग और शोला
* भगवान
* आखरी रास्ता
* जांबाज
* वतन के रखवाले
* जवाब हम देंगे
* औलाद
* नजराना
* कर्मा
* हिम्मत और मेहनत
* मिस्टर इंडिया
* निगाहे
* जोशीले
* गैर कानूनी
* चालबाज
* खुदा गवाह
* लम्हे
* हिर राँझा
* चाँदनी
* रूप की रानी चोरों का राजा
* चंद्रमुखी
* चाँद का टुकडा
* गुमराह
* लाडला
* आर्मी
* जुदाई
* हल्लाबोल
* इंग्लिश विंग्लिश
* मॉम
‘चालबाज’ चित्रपटात श्रीदेवी यांच्याबरोबर काम केले होते. चित्रपटातील एका दृश्यात श्रीदेवी मला विद्रूप रंगभूषा करताहेत याचे चित्रीकरण करायचे होते. जमेल तेवढे विद्रूप दिसण्यासाठी भडक प्रकारची रंगभूषा करण्यात आली होती. मात्र ती रंगभूषा दिग्दर्शकाच्या पसंतीस उतरली नाही. त्यामुळे माझ्या वैयक्तिक रंगभूषाकाराला बोलावून त्याच्याकडूनही रंगभूषा करून घेतली. मात्र तरीही दिग्दर्शकाचे समाधान झाले नाही. त्या वेळी श्रीदेवी यांनी चित्रीकरणस्थळी उपस्थित सर्व रंगभूषाकारांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडे होते नव्हते ते सामान गोळा करून माझी रंगभूषा केली. रंगभूषा पूर्ण झाली आणि मी स्वत:लाच ओळखू शकले नाही. दिग्दर्शकाला त्या दृश्यामध्ये मी ज्या प्रकारे विद्रूप किंवा भडक रंगभूषेत दिसणे अपेक्षित होते, तशी रंगभूषा त्यांनी केली आणि मग त्या दृश्याचे चित्रीकरण पार पडले.
– रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री
*******
‘कर्मा’ चित्रपटात श्रीदेवीबरोबर काम केले. त्याच वेळी त्यांच्यातील गुणी अभिनेत्रीची ओळख झाली. अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही. ‘सदमा’ आणि ‘मॉम’ चित्रपटातील त्यांनी केलेली कामे आणि जिवंत केलेली भूमिका अभिनयातील वस्तुपाठ किंवा धडाच म्हणावा लागेल.
– सुभाष घई, निर्माते-दिग्दर्शक
*******
श्रीदेवी यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व त्यांच्या नावाला साजेसे होते. यशोशिखरावर असूनही माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्याबरोबर त्यांनी काम केले. ‘नृत्य’ हा आम्हा दोघांनाही जोडणारा समान धागा होता. मी त्यांच्या नृत्याचा चाहता होतो.
– गोविंदा, अभिनेता
*******
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने चित्रसृष्टीतील एका प्रतिभावान अभिनेत्रीची आणि व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली असून चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू अभिनेत्री गमावली आहे.
– माधुरी दीक्षित, अभिनेत्री
*******
कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर मनाचे दरवाजे उघडून बेधडक आणि दर्जेदार अभिनय सादर करण्याचे सामर्थ्य श्रीदेवी यांच्याकडे होते. आता हे सामर्थ्य रुपेरी पडद्यावर दिसणार नाही, याची खंत आहे.
– आदिल हुसेन, अभिनेते
*******
श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर मोठा आघात झाला आहे. ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘चालबाज’ चित्रपटांत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनयाशी प्रामाणिक आणि मेहनत घेणारी अभिनेत्री चित्रपटसृष्टीने गमावली आहे.
– अन्नू कपूर, अभिनेते
*******
चित्रपटसृष्टीने प्रतिभावान अभिनेत्रीबरोबरच एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्यासारखी उत्कृष्ट अभिनेत्री आजवर पाहिली नाही. त्यांच्या अभिनय कौशल्याची तुलना अन्य कोणत्याही अभिनेत्रींशी करता येणार नाही.
– सुरेश ओबेरॉय, अभिनेते.
*******
श्रीदेवी या सवरेत्कृष्ट अभिनेत्री होत्या. सशक्त अभिनयामुळे विविधांगी भूूमिका करण्याची त्यांची ताकद होती. विनोदी, गंभीर भूमिकाही त्या प्रभावीपणे सादर करायच्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
– मधुर भांडारकर, दिग्दर्शक
*******
माझी पिढी श्रीदेवी यांचा अभिनय आणि त्यांचे चित्रपट पाहतच लहानाची मोठी झाली. त्यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे.
– सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू
*******
श्रीदेवी या हुषार, बहुआयामी आणि अष्टपैलू अभिनेत्री होत्या. आपल्या अभिनयाने त्यांनी विविध भूमिका जिवंत केल्या आणि रुपेरी पडद्यावर आपले स्वतंत्र स्थान, शैली निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या त्या महिला सुपरस्टार होत्या.
– सी. विद्यासागर राव, राज्यपाल महाराष्ट्र राज्य
*******
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बाल कलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर अभिनय कारकीर्द सुरू केलेल्या श्रीदेवी यांनी पुढील कारकीर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका समर्थपणे साकारल्या. ‘सदमा’आणि अलिकडील ‘इंग्लिश विंग्लिश’ स्मरणात राहणारे चित्रपट.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
*******
हिंदीसह अन्य काही भारतीय प्रादेशिक भाषांमधील चित्रपटातून श्रीदेवी यांनी केलेल्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. अष्टपैलू अभिनयाने प्रत्येक भूमिकेवर आपली छाप उमटविणाऱ्या श्रीदेवी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे नुकसान झाले आहे.
– विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
=======
इतक्या लहान वयात श्रीदेवी हे जग सोडून गेली यावर विश्वासच बसत नाही. काय बोलू ते कळत आणि सुचत नाही. बोनी कपूर, त्यांच्या दोन्ही मुली आणि कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
– लता मंगेशकर
*******
मी माझी एक खूप चांगली मैत्रीण गमावली आणि चित्रपटसृष्टीने एक महत्त्वाची अभिनेत्री गमावली आहे.
– रजनीकांत
*******
जे घडले आहे त्याविषयी बोलायला शब्दच नाहीत. संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दु:खदायक आणि क्लेशदायक दिवस आहे.
– प्रियांका चोप्रा
*******
रविवारी सकाळी उठलो आणि ही धक्कादायक बातमी ऐकली. श्रीदेवी आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही.
– ऋषी कपूर
*******
श्रीदेवी नावाचे एक पर्व संपले. आता तिच्या आठवणींचीच साथ आहे.
– शेखर कपूर
*******
श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला, खरेच वाटत नाही. धक्कादायक बातमी आहे.
– अजय देवगण</strong>
*******
सिनेसृष्टीतील चमकता तारा निखळला.
– फराह खान
*******
काय बोलावे त्यासाठी शब्दच नाहीत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे नशीब समजतो.
– अक्षय कुमार</strong>
*******
निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. एका पर्वाचा अंत झाला.
– शिल्पा शेट्टी
*******
अत्यंत धक्कादायक बातमी. श्रीदेवी आता आपल्यात नाही हे ऐकल्यावर काही तरी चुकीचे ऐकले असे वाटते आहे.
– अर्शद वारसी
*******
श्रीदेवी आपल्यात नाहीत ही बातमी ऐकून धक्काच बसला.
– श्रेया घोषाल
*******
अविश्वसनीय बातमी. चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
– काजोल</strong>
*******
धक्कादायक बातमी. त्या आपल्यातून खूप लवकर निघून गेल्या.
– रविना टंडन
*******
सगळ्या कलाकारांसाठी दु:खाचा दिवस.
– मल्लिका शेरावत