विवेकानंद यांचे आतापर्यंतचे प्रचलित चित्र ते हिंदू धर्माचे व संस्कृतीचे प्रतीक होते, असे रंगवण्यात आले. पाश्चात्त्य संस्कृती, धर्म (ख्रिश्चन) याविरुद्ध उभे करण्यात आले. तसेच मुस्लीम धर्माच्याही विरोधात उभे करून वेद, हिंदू धर्म, संस्कृती इ. प्रसारक व पुरस्कर्ता एवढेच ठरवण्यात आले. गरज नसताना साक्षात्कारात, अवतार, दृष्टांत इत्यादींशी संबंध जोडण्यात आला. आजपर्यंत विवेकानंदांना सोयीनुसार वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे व आजही होत आहे. त्यामुळे विवेकानंदांचा मूळ विचार मात्र लपवून ठेवण्यात आला. त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केलेली प्रतिमा मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आली; पण विवेकानंदांचे विचार व भगवी वस्त्रे यांच्यात अनेकदा विरोधाभास जाणवतो.
विवेकानंद हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पूर्ण संन्यासी नव्हते. ते घराकडेही लक्ष देत. भुकेल्यांना अन्न देत, सर्वश्रेष्ठ मातृसेवा करणारे ते मातृप्रेमी होते. विवेकानंदांनी परंपरेने प्राप्त झालेले नाव नरेंद्र दत्त त्यागून बुद्धिप्रामाण्यवादी नाव ‘विवेकानंद’ हे धारण केले. खरेच ते नावाप्रमाणे विवेकी व बुद्धिप्रामाण्यवादी होते. विवेकनंदांवर हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन धर्मीयांच्या विचारांचा प्रभाव होता. विवेकानंद इंग्रजी, संस्कृत, काव्यवाचन तसेच ग्रीन व गिबन या इतिहासकारांच्या ग्रंथांचे वाचन, नेपोलियन व फ्रेंच राज्यक्रांती यांच्यामुळे विलक्षण प्रभावित झालेले होते. रोज रात्री ते ‘इमिटेशन ऑफ ख्राइस्ट’ या ग्रंथाचे व वेदांचे वाचन, मनन करीत. जॉन स्टुअर्ट मिलच्या धर्मविषयक प्रबंधाचा विवेकानंदांवर प्रभाव पडलेला दिसून येतो. तसेच त्यांचा हर्बर्ट स्पेन्सरशीही पत्रव्यवहार चालू होता. थोडक्यात विवेकानंदांचे विचार हे युरोपियन विचारांनीही वाढलेले होते.
ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक केशवचंद्र सेन यांचेही विवेकानंदांना आकर्षण होते. भारतीय जनतेची जाती-धर्मभेदातीत अशी एकता घडवून आणण्यासाठी व जनतेच्या शिक्षणासाठी जी चळवळ बंगालमधील ब्राह्मसमाजी तरुणांनी सुरू केली तिच्यात विवेकानंद भाग घेत होते. नरेंद्राने हिंदू देवतांविषयी जसा अविश्वास प्रकट केला, त्याचप्रमाणे अद्वैताविषयीही त्यांनी अविश्वास दर्शविलेला आहे. विवेकानंदांनी रामकृष्णांचे उशिरा शिष्यत्व स्वीकारलेले दिसून येते.
आणखी वाचा – जयंती विशेष: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ध्यानधारणा! विवेकानंदांचा संदेश
विवेकानंदांची घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती ही विवेकानंदांना धार्मिक थोतांडापासून संरक्षण करू शकली, कारण त्यांना बऱ्याच वेळेला उपाशी राहावे लागत असे. ते म्हणत, ईश्वर जर खराच दयामात्र असेल तर अन्नाचे चारही घास न मिळाल्यामुळे लक्षावधी लोक भुकेने मरणार नाहीत. जेव्हा १८८६ मध्ये रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या निवडक शिष्यांत विवेकानंदांचे वरचे स्थान होते. यानंतर नरेंद्रांनी ‘विवेकानंद’ हे नाव धारण केले. विवेकानंदांनी आपल्या मार्गदर्शकाचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कुठे तरी मठ स्थापन करून वैयक्तिक स्वार्थासाठी समाधी, आराधना न घेता त्या सर्व शिष्यांनी परिव्राजक (चारिका) स्वरूपात एका ठिकाणी न राहता भारताच्या लोकजीवनाचे ज्ञान करून घेण्यासाठी भारतभ्रमणास सुरुवात करावी, असे सुचवले . विवेकानंदांनी भारतभर दोन वर्षे व भारताबाहेर तीन वर्षे यात्रा केली. या काळात त्यांच्या आयुष्याचा एक क्षणही जनतेच्या निकट संपर्कावाचून गेला नाही. (हिंदू धर्मात संन्यासी जनतेपासून दूर असतात). भगवद्गीतेच्या संदेशाबरोबरच ते ख्रिस्ताच्या संदेशाचाही प्रचार करीत. विवेकानंदांना भारतभ्रमण करताना अनेक अनुभव आले. आत्मकेंद्रित धर्माच्या बौद्धिक वादांचा संताप येऊन त्यांनी निश्चयाने असे ठरवले की, खऱ्या धर्माचे पहिले कर्तव्य म्हणजे गरिबांना साहाय्य करणे व त्यांचा उद्धार करणे हेच होय.
१८९२ नंतरचा त्यांचा दृष्टिकोन हा अधिक व्यापक व आंतरराष्ट्रीय होत गेलेला दिसून येतो, कारण १८९२ ला खांडव्याला असताना त्यांना कळले की, पुढील वर्षी अमेरिकेत शिकागो शहरी एक सर्वधर्मपरिषद भरणार होती. या परिषदेला हजर राहून भारताची भौतिक परिस्थिती सुधारण्यासाठी पश्चिमेकडून मदत मागण्याचा आपला मनोदय त्यांनी व्यक्त केलेला होता. त्यासोबतच भारताच्या आध्यात्मिक शक्तीच्या पुनरुज्जीवनासाठी अखंड प्रयत्न केले पाहिजेत व या आध्यात्मिक शक्तीचे वितरण संपूर्ण विश्वात केले पाहिजे, असा त्यांचा उपदेश होता. जेव्हा ते अमेरिकेला निघाले तेव्हा त्यांनी आपल्या गुरुबंधूंना संदेश असा दिला की, बंधूंनो, आता मी संपूर्ण भारताची पदयात्रा करून आलो आहे; पण या यात्रेत प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी जनतेचे जे भयानक दारिद्रय़ व हालअपेष्टा पाहिल्या, त्यांनी माझे मन इतके विदीर्ण होते की, मला माझे अश्रू आवरेनात. जनतेच्या दारिद्रय़ाचे व दु:खाचे प्रथम निवारण केल्याशिवाय त्यांना अध्यात्माचा विचार सांगणे हे व्यर्थ होईल, अशी माझी निश्चित धारणा झाली आहे आणि यासाठीच गरीब जनतेचे दारिद्रय़ दूर करण्यासाठी साहाय्य मागण्यासच मी असा अमेरिकेला जात आहे.
यावरून असे लक्षात येते की, विवेकानंदांचा मूळ हेतू हा भारतातील सामान्य जनतेचे दु:ख, दारिद्रय़ निवारण हे होते. वेदांचा किंवा हिंदू धर्माचा प्रसार हा दुय्यम हेतू होता. विवेकानंद सर्वधर्मीय परिषदेत हजर राहिले. या वेळी भारतातून सर्वधर्मीयांचे अधिकृत प्रतिनिधी हजर होते. या परिषदेत प्रत्येक वक्ता आपापल्या ईश्वराविषयी, आपापल्या पंथाच्या ईश्वराविषयी बोलत होता; पण केवळ विवेकानंद हे त्या सर्वाच्या ईश्वराविषयी बोलत होते. ते पुढे म्हणतात, असा हा धर्म जगाला द्या म्हणजे सगळी राष्ट्रे तुमचे अनुसरण करतील. प्रत्येक धर्मात तोच ईश्वर वसत आहे. प्रत्येकाने इतर धर्माचा अंतर्गत आशय आपणामध्ये सामावून घेतला पाहिजे; पण या परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वधर्मीय प्रतिनिधींना विवेकानंदांचा हा संदेश किंवा विचार रुचला नाही. ते विवेकानंदांचा द्वेष करू लागले. अमेरिकेत विवेकानंदांनी अनेक शहरांत व्याख्याने दिली. काही बाबतीत त्यांना अमेरिका आवडली, पण काही बाबतीत म्हणजेच त्या देशातील ‘पशुता व निर्दयता, वृत्तीची संकुचितता व धर्मोन्माद’ इ.मुळे ते नाराज झाले. त्यांनी खोटय़ा धर्मावर व धार्मिक ढोंगावर हल्ले केले. मत्सरग्रस्त हिंदूंनीही त्यांना लक्ष्य केले होते, कारण पारंपरिक हिंदू धर्माने घालून दिलेल्या विधिनिषेधांचे पालन विवेकानंद अमेरिकत करत नव्हते. अमेरिकेत असताना एका व्याख्यानात ते म्हणतात, मानवमात्रातील थोरपणाचे माहात्म्य हिंदू धर्माइतके उदात्ततेने दुसरा कोणताही धर्म सांगत नाही; परंतु प्रत्यक्षात हिंदू धर्म दीनदरिद्रय़ांना व दलितांना जितका चिरडून टाकतो, तितका दुसरा कोणताही धर्म टाकीत नाही. हा दोष धर्माचा नाही, पण धर्माची विटंबना करणाऱ्याचा व कर्मकांडाचे अवास्तव स्तोम माजविणाऱ्यांचा आहे.
आणखी वाचा – चतु:सूत्र (गांधीवाद) : दोन महामानवांचे जीवनदर्शन
विवेकानंद हे कधीच कोणत्याच धार्मिक अडथळ्यांना जुमानणारे नव्हते. म्हणून ते म्हणतात, एका विशिष्ट धर्मात किंवा पंथात जन्म येणे हे ठीक आहे, पण त्यांच्या बंधनात मरणे हे मात्र फार भयंकर आहे. ते पुढे म्हणतात, ज्यांचे ईश्वरावर खरे प्रेम आहे, त्या सर्वाना माझी सेवा घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग ते हिंदू असोत, मुसलमान असोत, की ख्रिश्चन. मला त्याची मुळीच पर्वा नाही. विवेकानंदांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात (३९ वष्रे) जो विचार बांधला तो त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे आहे- मठ बांधण्याचा काय उपयोग? हे सारे विकून टाकून आलेला पसा या दरिद्रीनारायणांना वाटून देण्यास काय हरकत आहे?
विवेकानंदांच्या विचारांचे सार असे मांडता येईल की, विवेकानंद हे शुद्ध मानवतावादी, धर्मनिरपेक्षतावादी, विवेकी, बुद्धिवादी, समन्वयवादी, प्रगतीवादी, कर्मकांडविरोधी निर्गुण ईश्वरभक्त होते. ते कुठल्याही एका धर्माला वाहून घेणारे, वैयक्तिक समाधीवादी नव्हते. आपले विचार हे संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणारे असावेत असे ते होते; पण खरे विवेकानंद आपल्यासमोर आले नाहीत. तर उलट हिंदू धर्मवादी, संन्यासी, भगवे वस्त्र परिधान केलेले, वेदांतवादी, हिंदू धर्माचे आदर्श पुरुष असे पुढे आलेले आहेत. म्हणून अनुयायीच विवेकानंदांचा पराभव करत आहेत. विवेकानंदांचे विचार मठात कोंडून ठेवले जात आहेत, ते फार घातक आहे. सर्वसमावेशक विवेकानंद मांडणे ही आजची गरज आहे. विवेकानंद हे हिंदूंचे नसून भारतीयांचे आहेत.
विश्वांभर धर्मा गायकवाड
vishwambar10@gmail.com