नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गांधीजींच्या सिद्धान्त आणि कृतीत ग्रामविकास, कृषीक्षेत्र सशक्त बनविणे, साफसफाईला महत्त्व, खादीला प्रोत्साहन, महिला सक्षमीकरण व आर्थिक समानता यासह अनेक विषय होते. स्वच्छतेसाठी आज जनआंदोलन उभे आहे..

आज आपण आपल्या लाडक्या बापूंच्या १५० व्या जयंतीच्या कार्यक्रमांचा शुभारंभ करीत आहोत. ज्यांना समानता, सन्मान, समावेश व सक्षमीकरणाने परिपूर्ण असलेले जीवन जगण्याची इच्छा आहे अशा जगातील लाखो-कोटय़वधी लोकांसाठी बापू आजही आशेचा किरण आहेत. म. गांधीजींनी खऱ्या अर्थाने भारताला सिद्धान्त आणि व्यवहाराने जोडले होते. भारत देश विविधतेने भरलेला आहे, हे सरदार पटेल यांनी उचित सांगितले होते. ज्यांनी भांडवलशाहीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी सर्वाना एकत्र केले, लोकांमधील मतभेद संपुष्टात आणून  जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढविला, अशी केवळ एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे म. गांधीजी. त्यांनी याची सुरुवात द. आफ्रिकेतून केली.

आज २१ व्या शतकातही म. गांधीजी यांचे विचार प्रासंगिक आहेत जेवढे त्या वेळी होते आणि जग आज ज्या समस्यांचा सामना करीत आहे, अशा अनेक समस्यांवर ते तोडगा काढू शकले असते.  बापूंचा समानता व सर्वसमावेशक विकासाचा सिद्धान्त विकासाच्या अखेरच्या पायरीवर असलेल्या लाखो जनांसाठी नव्या समृद्धीपर्वाची सुरुवात करू शकतो.

सध्या हवामान बदल व पर्यावरण-रक्षण हे विषय केंद्रस्थानी आहेत, गांधीजींनी शंभर वर्षांपूर्वीच, १९०९ मध्ये मनुष्याची गरज व लोभ यामधील अंतर स्पष्ट केले होते. त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर करताना दया व संयम पाळावा असा सल्ला दिला होता आणि स्वत: त्याचे पालन करून एक आदर्श ठेवला होता. आपले शौचालय ते स्वत: साफ करीत.  पाण्याचा कमीत कमी अपव्यय होईल याची काळजी घेत. अहमदाबादमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले होते की दूषित पाणी साबरमती नदीत मिसळू नये.

‘रचनात्मक कार्यक्रम : त्याचा अर्थ व स्थान’ असे शीर्षक असलेला लेख १९४१ मध्ये बापूंनी लिहिला होता. त्यामध्ये १९४५ मध्ये त्यांनी काही दुरुस्त्या केल्या तेव्हा स्वातंत्र्यलढा आंदोलनामुळे एक नवा उत्साह होता. त्या दस्तावेजात बापूजींनी विविध विषयांवर मत मांडले होते त्यामध्ये ग्रामीण विकास, कृषी क्षेत्राला सशक्त बनविणे, साफसफाईला महत्त्व देणे, खादीला प्रोत्साहन, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समानता यांसह अनेक विषय होते.

प्रिय भारतवासीयांना मी आवाहन करतो की, त्यांनी गांधीजींचा रचनात्मक कार्यक्रम वाचावा (तो मुद्रित आणि इंटरनेटवरही उपलब्ध आहे). त्यातील अनेक विषय आजही सुसंगत आहेत आणि भारत सरकार ते पूर्ण करीत आहे, ज्यांची चर्चा बापूजींनी ७० वर्षांपूर्वी केली होती. ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत.

गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी एक हा की, त्यांनी प्रत्येक भारतीयाला तो स्वातंत्र्यासाठी काम करीत आहे याची जाणीव करून दिली. त्यांनी प्राध्यापक, वकील,  शेतकरी, कामगार, उद्योजक या सर्वामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की तुम्ही जे काही करीत आहात ते स्वातंत्र्यलढय़ात योगदान आहे.

आज आपण अशी कामे करू या की, त्यामुळे आपल्याला वाटेल की गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही कामे आपण करू शकतो. अन्नाची नासाडी करण्यासारख्या साधारण गोष्टी थांबवून, आपुलकीची भावना व  अहिंसा अंगीकारून आपण याची सुरुवात करू शकतो.

आपण या गोष्टीवर विचार करू की आपली कृत्ये कशा प्रकारे भावी पिढय़ांना स्वच्छ, हरित वातावरण तयार करण्यात योगदान देऊ शकतील. आठ दशकांपूर्वी प्रदूषणाचा एवढा धोका नव्हता तेव्हा म. गांधीजींनी सायकल चालविण्यास सुरुवात केली. त्या वेळचे अहमदाबादवासी आठवण सांगतात की गांधीजी गुजरात विद्यापीठापासून साबरमती आश्रमात सायकलवरून कसे येत. जोहान्सबर्गमध्येही गांधीजी सायकलचा वापर करीत होते. असे सांगितले जाते की, जोहान्सबर्गमध्ये प्लेगची साथ पसरली तेव्हा गांधीजी सायकलवरून साथीची जोरदार लागण असलेल्या परिसरात मदतकार्य करू लागले. आज आपण तीच भावना जोपासू शकतो का?

हा सणांचा काळ आहे. देशभरात लोक कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू, भेटवस्तू आणि अन्य खरेदी करतील. असे करताना आपल्याला गांधीजींची एक गोष्ट गळय़ातल्या ताइतासारखी लक्षात ठेवली पाहिजे. आपण सारे विचार करू या की आपल्या कोणत्या कृत्यांमुळे आपण अन्य भारतीयांच्या जीवनात कसा समृद्धीचा दीप लावू शकतो. मग ते खादीचे उत्पादन असो, भेटवस्तू असो वा खाण्यापिण्याची गोष्ट. ज्या गोष्टींचे ते उत्पादन करतात त्या खरेदी करून आपण एक सुंदर जीवन जगण्यासाठी आपल्या सहकारी भारतवासीयांना साह्य करू.

गेल्या चार वर्षांत स्वच्छ भारत अभियानमार्फत १३० कोटी भारतीयांनी गांधीजींना आपली श्रद्धांजली वाहिली आहे. स्वच्छ भारत अभियान- ज्याची चार वर्षे आज पूर्ण होत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या कठोर परिश्रमाने या अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप आले आहे आणि त्याचे परिणाम प्रशंसनीय आहेत. साडेआठ कोटींहून अधिक कुटुंबांकडे पहिल्यांदाच शौचालयाची सुविधा आली आहे. चाळीस कोटींहून अधिक भारतीय आता उघडय़ावर शौचासाठी जात नाहीत, चार वर्षांच्या छोटय़ा कालावधीत स्वच्छतेची टक्केवारी ३९ वरून ९५ टक्क्यांवर गेली आहे. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, साडेचार लाख गावे आज उघडय़ावर शौच करण्यापासून मुक्त आहेत.

आज गांधीजींच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची उत्तम संधी आपल्याकडे आहे. आपण भरपूर केले आहे आणि आपल्याला विश्वास आहे की भविष्यात आणखी काही करण्यात आम्ही यशस्वी होऊ.

‘वैष्णव जन तो तेणे कहिए, जे पीर परायी जाणे रे’ या पंक्ती बापूजींना अतिशय प्रिय होत्या, याचा अर्थ असा आहे की, उत्तम आत्मा तो आहे ज्याला दुसऱ्यांच्या दु:खाची कल्पना आहे. हीच ती भावना होती, ज्यामुळे गांधीजींना दुसऱ्यांसाठी जीवन जगण्याचे प्रोत्साहन मिळाले. आपण १३० कोटी भारतीय या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एकत्रित काम करण्यास कटिबद्ध आहोत, जी बापूंनी देशासाठी पाहिली आणि ज्यासाठी त्यांनी बलिदान दिले होते.

Story img Loader