भारतात हवेचे प्रदूषण भयावह असून श्वसनविकारामुळे दर वर्षी साडेसहा कोटी भारतीय मृत्युमुखी पडतात. राजधानी दिल्ली यातील सिंहाचा वाटा उचलते. हे लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी नववर्षांपासून ९० लाख वाहनांपैकी दररोज अर्धीच वाहनेरस्त्यांवर येतील, असा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शहराची स्थिती दिल्लीएवढी बिकट नसली तरी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या, वाहतुकीची कोंडी ही डोकेदुखी ठरत आहे. वायू- ध्वनी-पाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने येणाऱ्या काळात याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल..
अज्ञानात सुख असते, असे म्हणतात. देशाच्या राजधानीत गेला महिनाभर हवेच्या प्रदूषणावरून वातावरण तापले आहे आणि तरीही महाराष्ट्रातील जनता आणि राज्यकत्रे सुशेगात आहेत. उच्च न्यायालयाकडून ‘गॅस चेंबर’ अशा शब्दांत दिल्लीचे वर्णन करण्यात आले. राज्याच्या राजधानीतल्या रहिवाशांनाही अशा चेंबरची सवय आहेच. चेंबूरला तर ही उपाधी काही दशकांपूर्वीच देण्यात आली. त्यानंतर चेंबूरची स्थिती काही अंशी सुधारली असली तरी आजही मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित भागांमध्ये चेंबूरसह पूर्व उपनगरांचा वरचा क्रमांक लागतो. अर्थात मुंबई-पुण्याबाबत व काही अंशी चंद्रपूर, सोलापूरबाबत असे काही भाष्य तरी करता येते. राज्यातील इतर शहरांमध्ये तर प्रदूषण मोजणारी सक्षम यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने प्रदूषणाचे आकडेच लोकांसमोर येत नाहीत. त्यामुळे प्रदूषण कमी करण्याचा तर प्रश्नच उभा राहत नाही. अज्ञानात सुख असते म्हणतात, ते हेच..
‘लॅन्सेट’ नियतकालिकात २०१२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार भारतात हवेचे प्रदूषण हे मृत्यूसाठी सहावे मोठे कारण आहे. श्वसनविकारामुळे दर वर्षी साडेसहा कोटी भारतीय मृत्युमुखी पडतात. राजधानी दिल्ली यातील सिंहाचा वाटा उचलते. दिल्लीतील हवेचा दमा हा काही आजचा नाही. या जुनाट आजारावर आजवर अनेक डॉक्टरांनी सल्ले दिले. जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबर २०१४ मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीला सर्वात वरचे स्थान दिले. भारतातील १३ शहरे ही पहिल्या २० शहरांमध्ये होती. चीनची राजधानी बीजिंगही १५ वर्षांपूर्वी सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत होती. मात्र हा गौरव नसल्याचे चिनी राज्यकर्त्यांच्या वेळीच लक्षात आले आणि त्यांनी वाहने, बांधकाम याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. दिल्लीतील राज्यकर्त्यांना मात्र हवा प्रदूषणासारख्या क्षुल्लक मुद्दय़ावर विचार करावासा वाटला नाही. त्यामुळे बीजिंगमध्ये २००३ मध्ये घेण्यात आलेला सम-विषम वाहनांच्या वाहतुकीचा निर्णय घेण्यास दिल्लीस २०१६ची वाट पाहावी लागली. दिल्लीत आजमितीला ९० लाख वाहनांची नोंदणी आहे. या निर्णयाने वाहनांची संख्या अध्र्यावर येण्याची शक्यता आहे, अर्थात दिल्लीकरांनी नियम पाळला तर.. दिल्लीतील हवेचा फटका लाखो लोकांना अनेक वष्रे बसत असला तरी गेल्या वर्षभरात ‘सफर’कडून येत असलेल्या सततच्या आकडेवारीमुळे लोकांना त्यातील गांभीर्य समजू लागले आहे. सफर (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकािस्टग अॅण्ड रिसर्च) प्रकल्पांतर्गत दिल्लीतील विविध परिसरातील हवेच्या प्रदूषणाची पातळी ‘लाइव्ह’ पाहण्याची सुविधा देण्यात आली. वेधशाळा आणि आयआयटीएम पुणे यांनी एकत्रितरीत्या सुरू केलेल्या या प्रकल्पातून दिवसाचे २४ तास दिल्लीतील प्रदूषण लाइव्ह पाहता येऊ लागले. या वर्षीपासून मुंबईतही ‘सफर’ प्रकल्प सुरू झाला आहे, तीन वर्षांपूर्वी तो पुण्यातही सुरू झाला. राज्याच्या इतर शहरांतही तो सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र सरकारी वेगाप्रमाणे देशातील सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प सुरू होण्यास काहीशे वर्षांचा कालावधी तरी लागेल. तोपर्यंत या शहरांच्या प्रदूषणाची पातळीच समजत नाही. त्यावरचे उपाय ही पुढची पायरी..
मुंबई, पुण्यातील या प्रकल्पामुळे किती तरी गोष्टी समोर आल्या आहेत. पुण्यातील वाहनांची संख्या दिल्लीच्या मानाने कमीच. मात्र तरीही वाहतूक कोंडी आणि बांधकामांमुळे पुण्याच्या हवेतील पर्टक्यिुलेट मॅटर २.५ आणि पर्टक्यिुलेट मॅटर १० या प्रदूषक घटकाची संख्या गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. हडपसर, शिवाजीनगर आणि लोहगाव परिसरांत या घटकांची संख्या वाढत असून त्यानंतर कात्रज आणि भोसरीचा क्रमांक लागतो. पुण्याप्रमाणेच सर्वच शहरांच्या हवेतील सर्वात घातक असे हे दोन घटक आहेत. अडीच ते दहा मायक्रोमीटर व्यास असलेले पीएम १० आणि २.५ मायक्रोमीटरपेक्षाही सूक्ष्म असलेले पीएम २.५ हे शरीरात गेले तर श्वसनविकारांसोबत थेट फुप्फुसांच्या कर्करोगापर्यंत विकार होऊ शकतात. शहरांमध्ये घातक वायूंसोबतच या धूलिकणांचेही प्रमाण वाढत आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर तसेच बांधकामांच्या जागेमधून उडणारे धूलिकण हे यांचे प्रमुख स्रोत आहेत. मुंबईतील हवा प्रदूषित करण्यामागेही हेच दोन घटक मुख्यत्वे आहेत. बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे, भांडुप, चेंबूर, वरळी, माझगाव आणि कुलाबा येथे प्रदूषणमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यात पीएम १०, पीएम २.५ यासोबतच कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स आणि ओझोनची पातळी मोजण्यात येते. याशिवाय सल्फर डायऑक्साइड, पारा, बेन्झिन, मिथेन, नॉन मिथेन हायड्रोकार्बन यांचीही पातळी मोजणे अपेक्षित आहे, मात्र अजून ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. गेल्या काही महिन्यांतील या मोजणीतून पावसाळ्याअखेर शहराच्या, त्यातही पूर्व उपनगरांमध्ये, पीएम २.५ व पीएम १० हे घटक मर्यादित प्रमाणापेक्षा दुपटीने जास्त असल्याचे दिसते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही मुंबई (वांद्रे), पुणे (कर्वे रोड), चंद्रपूर (उद्योग भवन) आणि सोलापूर (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे सहा महिन्यांपूर्वी अशा प्रकारची यंत्रणा सुरू केली. ही यंत्रणा सुरू झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांतील रोजची सरासरी पातळी या संकेतस्थळावर दिसते. त्यावरून चंद्रपूर व सोलापूर या शहरांमध्येही धूलिकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक नोंदले जात असल्याचे दिसते. एमपीसीबीकडून हवेच्या प्रदूषणाची माहिती वेगळ्या स्वरूपात अनेक वष्रे गोळा करण्यात येत असली, तरी त्यातून बोध घेत प्रदूषण थांबवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नाहीत.
दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांना आधीही होतीच. त्यामुळे सायकल रॅलीतून जनजागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र दिल्लीच्या जुनाट आजारावर केवळ मानसोपचार नाही तर शस्त्रक्रियेची गरज असल्याने १ जानेवारीपासून सम-विषम क्रमांकाच्या वाहनांसाठी एक दिवस आड करून रस्त्यांवर प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने महाराष्ट्रातील कोणत्याही शहराची स्थिती राजधानीएवढी बिकट झालेली नाही. स्वत:च बंधने घालून हे प्रदूषण कमी करता येईल व थेट र्निबधांचे टोक गाठण्याची वेळ येणार नाही. मात्र सुरुवात कोण करणार आणि फक्त आम्हीच का बंधने घालायची हे चिरंतन प्रश्न उभे राहिल्यास काहीच घडणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे हे फक्त हवेच्या प्रदूषणाबद्दल आहे, पाणी प्रदूषणाचा महत्त्वाचा मुद्दा तर आहेच, शिवाय ध्वनिप्रदूषण, प्रकाशप्रदूषण आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या वेगळी आहेच. तिकडे पॅरिसमध्ये सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत भारताने विकसित राष्ट्रांच्या दबावाला बळी न पडण्याची गर्जना केली असेलही, पण त्यामुळे आपण स्वत:चे प्रश्न सोडवायचे नाहीत असा अर्थ होत नाहीत. ओझोनला पडलेले भोक किती मोठे होईल व त्याचा जगाला किती फटका बसेल हे कदाचित पन्नासेक वर्षांनंतर कळेल, पण आपण रोज शरीरात घेत असलेल्या हवेमुळे थेट आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होत असलेला परिणाम सांगण्यासाठी जागतिक पातळीवरील संशोधनाची गरज नाही. निसर्गाला आपण जे देतो, ते तो आपल्याला परत देतो, त्यामुळे आपण निसर्गाला काय द्यायचे ते ठरवण्याची वेळ आली आहे.
समुद्रकिनाऱ्यामुळे
मुंबई वाचते..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा