आपल्याकडची शेती सतत बिनभरवशाची म्हणून चर्चेत असते. अशा वेळी उत्पादन वाढ आणि खर्चात कपात करणे आवश्यक ठरते. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक बनले आहे. याअंतर्गतच आता ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा वापर पुढे आला आहे. या एका तंत्रज्ञानाने शेतीच्या सर्व कामांचे व्यवस्थापन तर अचूक होऊ लागले आहेच शिवाय त्यातून खर्चातही मोठी बचत होऊ लागली आहे. कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी गावातील उच्चशिक्षित डॉ. युगंधर राजेंद्र सरकाळे या तरुणाने याच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करत डाळिंब लागवड केली आहे.
डॉ. युगंधर याचे वडील सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे. ते स्वत: प्रयोगशील शेती आणि त्यातील नवनवीन बदलाबाबत सजग शेतकरी म्हणून परिसरात ओळखले जातात. त्यांच्या या संस्कारातच डॉ. युगंधर शेती पाहू शिकू लागले. जिज्ञासू वृत्तीने शेतीकडे पाहण्यास सुरुवात केली. त्याने अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजीनियरिंग मध्ये एम.एस. आणि २०१९ साली पीएचडी असे शिक्षण पूर्ण केले. मुळची शेतीची आवड, वडिलांनी दिलेला प्रयोगशीलतेचा धडा आणि उच्च शिक्षणामुळे त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. याअंतर्गतच ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा वापर पुढे आला. हे तंत्रज्ञान त्याने आपल्या शेतात वापरण्याचे ठरवले. याचा पहिला प्रयोग डाळिंबाच्या शेतीवर करण्याचे ठरले.
हा विचार डोक्यात आल्यावर त्याने शेतीकडे फक्त शेती म्हणून न पाहता नफा कमवणारा व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली. हे करताना शेतीच्या, शेतकऱ्यांच्या मूल्यांना कुठेही, कसलाही धोका पोहोचणार नाही याची त्याने जाणीवपूर्वक खबरदारी घेतली. सेंद्रिय शेतीवर त्याचा भर आहे. सामान्य शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाताना मानवी आरोग्याबरोबर मातीच्या आरोग्याची काटेकोरपणे काळजी घेण्याची त्याची मानसिकता आहे. त्यासाठी दिवस-दिवस मातीच्या ढेकळांतून, माळरानांतून फिरण्याची त्याने मनाची तयारी केली आहे.
वडिलांची शेतीची आवड यातून त्यांचे मार्गदर्शन तर होतेच. शिवाय डॉ. युगंधरने बाजारपेठ तज्ज्ञ, कृषी सल्लागार, सातारा जिल्हा बँकेमधील कर्मचारी, जागतिक पातळीवरील शेतीविषयक शास्त्रज्ञ, शेतज्ज्ञ आणि शेतकरी वर्गांचा समावेश आपल्या सहकारी, मार्गदर्शकांमध्ये केला. पीक लागवड आणि सिंचनापासून ते कीटक व्यवस्थापन आणि पर्यावरणातील बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी ए.आय. प्रणालीचा होणारा उपयोग त्यांच्या लक्षात आला. यासाठी होणारा खर्च आवाक्यामध्ये बसतो आहे का, याचे भान राखत चाचणी सुरू केली.
‘मॅप माय क्रॉप’ने उपलब्ध करून दिलेल्या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून युगंधर याने शेती व्यवसायाला सुरुवात केली.
यामध्ये सर्वप्रथम शेतामध्ये ‘वेदर स्टेशन्स’ बसवले. त्यामुळे त्यांना रोजचे हवामान, वातावरणातील बदलाबाबतच्या सूचना आता मोबाइलवर मिळू लागल्या. येणाऱ्या काळात काही क्षेत्रात, काही विशिष्ट रोगाची, किडीची संभावना असेल तर त्याबाबत आधीच जागरूक केले जाऊ लागले. त्यासाठी कोणते औषध फवारण्याची गरज आहे याबद्दल मार्गदर्शनही होते. ‘फसल’च्या माध्यमातून ही सुविधा प्राप्त झाली. याशिवाय फवारणी दिवसाच्या कोणत्या कालावधीत करणे योग्य आहे, फवारणी करून फायदा होणार आहे किंवा नाही अशा बारकाव्यांसहित मार्गदर्शन केले जाते. यातून वेळ, पैसा आणि कष्ट या तिन्हींची बचत होऊ लागली. युगंधरने आपल्या शेतामध्ये या प्रकारचे ‘आय.ओ.टी. सेंसर’ बसवून संपूर्ण शेतात ‘एआय’ प्रणालीचा वापर केला आहे.
डॉ. युगंधर याची शेती सर्कलवाडीतील निसर्गरम्य डोंगराळ भागात आहे. आसपासची शेती अजून वापरात नसल्यामुळे भरमसाठ रासायनिक फवारण्या नाहीत. डोंगरउतारावरून आलेले पावसाचे पाणी शुद्ध स्वरूपात शेतीला मिळते आहे. पाणी साठवण्यासाठी शेततळी, विहिरी आहेत. व्यावसायिक बाजू सांभाळत असताना दीर्घायुष्य देणारी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्याकडे त्याचा विशेष कल आहे. म्हणूनच रायसायनिक ऐवजी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आग्रही आहे. हुमणी सारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेणखताचा वापर पारंपरिक पद्धतीने न करता त्या खतावर आधी तीन-चार महिन्याची प्रक्रिया करून शेणखताचे रूपांतर कंपोस्ट खतामध्ये केले जाते. शेतात एका बाजूला ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.
शेतात खत आणि पाणी वापराने मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव वाढतो. हे तण पिकाच्या वाटणीचे खत, पाणी शोषून घेते. शिवाय तणावरील कीड पिकाला मारक ठरू शकते. हे सर्व रोखण्यासाठी युगंधरने डाळिंबाच्या संपूर्ण शेतात ‘विडमॅट’चा वापर केला आहे. मातीच्या सुरक्षिततेबरोबर फळांमध्ये रासायनिक खताचा घातक अंश आढळून येत नाही हा ‘विडमॅट’चा फार मोठा फायदा आहे.
सध्य:स्थितीत ड्रॅगनफ्रुट, अवाकाडो, केळी, डाळिंब या मालाला चांगला उठाव असण्याचा हा काळ आहे. तज्ज्ञांशी चर्चा करत युगंधरने आपल्या शेतात डाळिंब लागवड करण्याचे ठरवले. तेल्यासारख्या प्रचलित रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने रोपे बनवणाऱ्या तज्ज्ञ अशा धावडे-पाटील यांच्याकडून त्यांनी चार हजार रोपे उपलब्ध करून घेतली. प्रत्येक रोपाला भरीव बांबूचा आधार दिला. बांबूचा आधार देताना ‘पिनबोरर’चा हल्ला होऊ नये अशी काळजी घेतली. ही कृती रोपाच्या पुढील वाढीसाठी आणि वाऱ्यापासून होणाऱ्या नुकसानीसाठी तारक ठरली.
रोपांची वाढ तपासत, योग्य वेळी छाटणी आणि थीनिंग केले गेले. ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक खतांचा संतुलित वापर केला. डोंगरातले प्रदूषण नसणारे नितळ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर जैविक खते यातून रोपांची निकोप वाढ होऊ लागली.
फलधारणेसाठी डोंगरात असणाऱ्या मधमाश्यांमुळे नैसर्गिकरीत्या परागीकरण होईल म्हणून मग मधमाश्यांच्या पेट्याही आणल्या आहेत. मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून फळाच्या गुणवत्तेबरोबरच त्याच्या रंगरूपाचाही विचार होतो. त्यासाठी डाळिंबाच्या प्रत्येक फळाचे ऊन, पाऊस, किडीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणारे बॅगिंग, क्रॉप कव्हरिंग केले जाते. उन्हाळा किंवा मृग बहारांपैकी एक बहार घेतला जातो. बरेच निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतले जातात. याकडेही डॉ. युगंधर याचा जोर आहे. पूर्णपणे शेतीवर अवलंबून नसतानाही त्याने शेतीवर केलेला अभ्यास आणि कष्ट पाहून केवळ कौतुकच नाही तर प्रचंड आश्चर्य वाटत राहते.
डाळिंबास साधारण १८ ते २० महिन्यांनंतर पहिला बहार येतो. परंतु युगंधर त्याच्या बागेचा पहिला बहार दहाव्या महिन्यात घेतो आहे. झाडांवर चांगल्या पद्धतीने फलधारणा झाली असली तरी झाडाला ते फळ पेलण्यासाठी आवश्यक असणारी मंडपाची व्यवस्थाही त्यांनी आपल्या शेतात केली आहे. शेती व्यवसायातील त्याचे हे मोठे यश मानावे लागेल. ‘एआय’ प्रणाली वापरून डाळिंब शेती करण्याबरोबरच युगंधर आपल्या शेतात इतर पिकेही घेत आहे.
पिकाची लागवड करताना ज्या रोपांची लागवड करायची ते कुठून आणायचे, त्याला निरोगी आणि सशक्त कसे बनवायचे, इथपासून युगंधर याचे बारीक लक्ष असते. लागणारी रोपे पॉलिहाऊसमधून आणायची, शेडनेटमधून आणायची, ओपन नर्सरीतून आणायची की लॅबमध्ये तयार केलेली टिश्यू कल्चरची रोपे लावायची याबाबतचा निर्णय तज्ज्ञांसोबत चर्चा करून मगच घेतला जातो. कोणत्या जातीची रोपे लावायची यासाठी संबंधित तज्ज्ञांशी चर्चा होते.
युगंधर याच्या शेतात सध्या भगवा जातीचे डाळिंब, रेड जारवी/रेड डायमंड जातीचे पेरू, जॅपनीज १५ पपई, नामधारी ऑरेंज, अंबर आणि इंडस यलो याग्ना जातींचे झेंडू, कुंदन टरबूज, ब्लॅक सुप्रीमो आणि बाहुबली जातींचे कलिंगड, इंद्रा ढोबळी मिरची, माहीम जातीचे आले, सेंट व्हाईट शेवंती, अंजीर, स्ट्रॉबेरी ही पिके जोमाने वाढत आहेत.
यातील प्रत्येक पिकासाठी विशिष्ट आकाराचे बेड बनवणे, शेताच्या बांधावर इन्सेक्ट नेट लावणे, एखाद्या पिकासाठी क्रॉप कव्हर लावायचे की नाही, लावले तर कसे लावायचे यासाठी त्याने वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले आहे. डोंगराळ भागात जंगली जनावरे येऊ नयेत म्हणून योग्य ती यंत्रणा राबवलेली आहे. शेतात शेतमालाचे नुकसान करणाऱ्या मोरांना, माकडांना हुसकावून लावण्यासाठी वाऱ्यावर तडतड आवाज करणारे यंत्र बसवलेले आहे.
फळबागांमधून फळमाशी, डंखमाशी यांना आकर्षित करणारे इन्सेक्ट ट्रॅप, चिलटांसाठी चिकट सापळे, वेगवेगळ्या किडीसाठी सोलर पंप यांचाही वापर केला आहे. गेल्या १० महिन्यांपासून युगंधर सर्कलवाडीमध्ये असणारी स्वत:ची आणि सोबत घेतलेल्या शेतकऱ्यांची अशी एकूण ३० एकरामध्ये ए.आय. तंत्रज्ञानाने शेती व्यवसाय राबवत आहे.
शेतकऱ्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या या शेतीतील मातीची सुपीकता वाढली पाहिजे, यातून त्यांचाही फायदा झाला पाहिजे याकडे त्याचे लक्ष असते. त्याचे अंजिराचे प्लॉट्स फळांनी लगडलेले आहेत. झेंडूचे पीक शेताचे सौंदर्य वाढवत आहे. पहिल्याच पिकात ए.आय. प्रणालीवर केलेला खर्च निघेल याबद्दल त्याला विश्वास आहे. कलिंगड, टरबूज यांची शेती अत्यंत बहरलेली आणि सशक्त आहे.
तुम्ही दरवेळी स्वत:चे शंभर टक्के दिले तरी शेती फायद्यात राहीलच असे नाही याची त्याला कल्पना आहे. मात्र ‘एआय’च्या माध्यमातून अंदाज घेत अभ्यासपूर्वक शेती केली तर किमान घातलेले पैसे वसूल होतात, असे डॉ. युगंधर याचे म्हणणे आहे.
शेतीसाठी ‘एआय’ प्रणालीच्या वापराबद्दल सरकारचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वबळावर अशी शेती करण्याची तयारी असणारे शंभर शेतकरी एकत्र येऊन ‘अॅग्रीकल्चर प्रोड्युसर कंपनी’ स्थापन करू शकतात. शेतीचे क्षेत्र आणि उत्पादन वाढल्यामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानावर झालेला खर्च विभागला जाऊन शेती फायद्यात राहते. एकीच्या बळावर व्यापाऱ्यांशी संपर्क साधून शेतकरी आपल्या मालाला योग्य तो भाव मिळवून देऊ शकतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती समोरील पारंपरिक आव्हानांना सामोरे जाताना ‘एआय’ तंत्रज्ञान शाश्वत ठरणार असून यासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. – डॉ. युगंधर सरकाळे